Saturday, 28 September 2024

शिकत राहण्याचे शिक्षण

शिकत राहण्याचे शिक्षण  

निव्वळ माहिती संपादन करण्याऐवजी मुलांच्या क्षमता विकसनावर भर, स्वयं-अध्ययनावर भर, शिक्षकाची भूमिका ‘शिकवण्याची’ नसून मुख्यतः शिक्षण सोपे करण्याची असावी, यांसारखी नवीन शैक्षणिक धोरणात स्वीकारलेली तत्त्वे विचारी व्यक्तींना लगेच पटतील अशीच आहेत. पण ती हाताळायला सोपी मात्र नाहीत. यापुढे शिक्षक फक्त फॅसिलिटेटर (सुलभक) असतील, म्हणजे त्यांचे काम कमीच होईल, अशी एक गैरसमजूत अनेकांच्या मनात आहे. खरे तर प्रत्यक्षात यामुळे शिक्षकांचे काम, जबाबदारी आणि मुख्य म्हणजे त्यांच्याच स्वतःच्या क्षमता वरच्या दर्जाच्या असण्याची गरज खूप वाढणार आहे. शिक्षण जितके साचेबद्ध, माहितीवर आधारित असेल, तितके ते शिक्षक, परीक्षक, आणि एकूणच व्यवस्थेला हाताळणे सोपे असते. यापुढील काळात मात्र शिक्षणप्रक्रियेला आपण पारंपरिक शिक्षणापेक्षा निराळे, काहीसे गुंतागुंतीचे असले तरी अधिक संवेदनशील, लवचीक स्वरूप देऊ शकतो की नाही, ही बाब निर्णायक ठरणार आहे.

विद्यार्थी शाळेत गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, क्रीडा, व्यवसाय अशी कोणतीही गोष्ट शिकत असताना यापुढे त्यात एक समान धागा असणे अपेक्षित आहे, तो म्हणजे ‘शिकावे कसे’ हेही शिकणे. म्हणजे फक्त नव्या गोष्टी, नवी कौशल्ये आत्मसात करता येणे एव्हढेच नाही, तर आधी शिकलेल्या, माहीत असलेल्या बाबी नवीन संदर्भात पडताळून पाहता येणे, त्यातील कालबाह्य किंवा अनिष्ट वाटणाऱ्या गोष्टी सोडून देता येणे आणि आपले ज्ञान किंवा कौशल्य वेगळ्या, अपरिचित संदर्भातही उपयोगात आणता येणे. या प्रकारचे शिक्षण यापूर्वी शिक्षकांनी आणि पालकांनीही ते स्वतः शाळेत असताना घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा नवा दृष्टिकोन आणि त्यानुसार अध्ययन-अध्यापनात आवश्यक असलेले बदल पोचवणे फार महत्त्वाचे आहे.

शिकण्याची क्षमता विकसित करताना अभ्यासाची वेगवेगळी तंत्रे माहीत हवीत - संदर्भ पाहणे, जास्तीची माहिती घेणे, वाचलेल्या-ऐकलेल्या-पाहिलेल्या भागाच्या स्वतःच्या उपयोगासाठी नोट्स काढणे, त्यांत आकृत्या, तक्ते इत्यादींचा वापर करणे, वगैरे. शिक्षकांनी दिलेली प्रश्नोत्तरे सरावाने लक्षात ठेवण्यापेक्षा हा अभ्यास निराळा आहे, कारण यात विद्यार्थी स्वतः पुढाकार घेतो आहे. आपल्याला काय येते, काय अजून नीटसे येत नाही, याचा अंदाज घ्यायला, त्यावर काम करायला शिकतो आहे. अभ्यासविषयाचा विचार, त्यावर चिंतन करायला शिकतो आहे. आणि नेमकी हीच सवय त्याला नवीन विषयाला सामोरे जाताना उपयोगी पडणार आहे. यात वेळेचे नियोजन, कधी न रुचणाऱ्या बाबींचा चिकाटीने केलेला अभ्यास, सराव असा थोडा स्वयंशिस्तीचा भाग असेल, तर कधी आवडणाऱ्या बाबींचा वर्गाच्या पुष्कळ पुढे जाऊन केलेला अभ्यास असा आनंदाचा भागही असेल. स्वतःच्या आणि इतरांच्या मतांचे आधार तपासून त्याबद्दल विवेकाने भूमिका घेता येणे हासुद्धा स्वयं-शिक्षणाचाच भाग आहे.

या सर्व गोष्टी घडवून आणणे सोपे नाही. त्यासाठी शिक्षकांना आजवर फारशा न वापरलेल्या पद्धती वर्गात वापराव्या लागतील. ही तंत्रे आधी स्वतः आत्मसात करावी लागतील. विद्यार्थी नेमलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारतील, ते प्रामाणिकपणे हाताळण्याची तयारी ठेवावी लागेल. मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेचा विकास काही त्यावर व्याख्यान देऊन होणार नाही. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने याच पद्धतीने अध्ययन करून घ्यावे लागेल. हा अनुभव वर्गातील फक्त निवडक मुलांनाच नाही, तर प्रत्येक मुलाला मिळतो आहे याची खात्री करून घ्यावी लागेल. वर्गातील चर्चा, प्रयोग, प्रकल्प इत्यादींत प्रत्येकाला भरपूर सहभागाची संधी तर हवीच, पण प्रत्येकाला चुका करण्याची, चुकांमधून शिकण्याची मोकळीक पण हवी. ‘मला प्रयत्नाने हे शिकता येईल’, अशी उमेद, आत्मविश्वास हा शिकण्याच्या क्षमतेचा पाया आहे. जो काही वेळ, जागा, साधनसुविधा हाताशी असतील, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून मुलांमध्ये ही प्रवृत्ती विकसित करणे, हे शिक्षकांपुढचे खरे आव्हान आहे.

पुढील आयुष्यात, नवनव्या उद्योगव्यवसायांत यशस्वी होण्यासाठी सातत्याने शिकत राहण्याची क्षमता मुलांना वैयक्तिक स्तरावर आवश्यक आहे, तशीच ती एक समाज म्हणूनही आपली गरज आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे लोप पावणारे आणि नव्याने तयार होणारे उद्योगव्यवसाय, त्यातून निर्माण होणारी आव्हाने हे संपूर्ण समाजापुढचे प्रश्न आहेत. त्यासाठी उद्याच्या नागरिकांना आत्तापासूनच सक्षम बनवायला हवे.

- धनवंती हर्डीकर 

(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २१ ऑगस्ट २०२४)

Wednesday, 25 September 2024

एका शिक्षकाची दैनंदिनी

 एका शिक्षकाची दैनंदिनी

                 बरीच वर्षे नोकरी केल्यानंतर अलीकडं मी जरा अधिकच प्रेमळ शिक्षक बनलो आहे. मी बऱ्याचदा घरीच ठरवून जातो, की आज कोणत्याही मुलाला चापटीसुद्धा मारायची नाही, रागवायचेसुद्धा नाही. ठरवले की जमते आणि जमवताही येते. शिक्षा करण्याचा प्रसंग आला, की त्या मुलाचे जिव्हाळ्याच्या शब्दांनी भरमसाठ प्रबोधन करायचे. आधी त्याचा चांगुलपणा सांगायचा आणि मग हलक्या हाताने दोष दूर करत न्यायचे. कान झोडण्यापेक्षा असे कान पकवणे बरे! जग बदलतंय, शिक्षण बदलतंय, कायदे बदलतात, अभ्यासक्रम बदलतोय, पाठ्यक्रम बदलतोय मग आपण नको का बदलायला! असे थोडेफार आत्मचिंतनही घडते आहे. शिक्षक सतत बदलत राहिला पाहिजे. अहो, एवढा सर्वशक्तिमान निसर्ग तोही दर चार महिन्यांनी आपले रूप बदलतो. उन्हाळ्यातील सृष्टीपेक्षा पावसाळ्यातील सृष्टी केवढी अलग असते. मुलांना असं पाठिशी घालणं सहकारी शिक्षकांना कदाचित खटकतही असेल,पण गुपचूप आपण आपले बदलाचे प्रयोग चालू ठेवायचे. निष्कर्षांची घाई करायची नाही. तेवढाच आपल्यातला उतावीळपणा कमी होतो. 

 मागच्या आठवड्यात सातवीतल्या उबेद आणि सादने वर्गातल्या पंख्याची वाकलेली पाती सरळ केली. ऑफिसातून वर्गात अक्षरशः हाताला ओढत नेत,"अभी हवा देखो सर कैसी जोरसे आ रही है।" असे सांगत त्यांनी केलेली कामगिरी कथन केली. वाकड्या पात्यांमुळं पंखा बहुतेक हवा वरती फेकत असावा. मी त्यांचे कौतुक केले.शाळा सुटल्यावर घरी जातांना नवा फॅन घेण्याचा खर्च वाचवला म्हणून त्यांनी माझ्या गाडीजवळ येत माझ्याकडे पार्टी मागितली. गावात चिकनशोरमा भारी मिळतो अशी माहिती पुरवत 'रोटी में मिलता वो साठ को और पाव के साथ मिलता है वो पचास को!' अशी फरमाईशपण सांगून टाकली.मी विचारात पडलो, ' मुलांना अशी पार्टी वगैरे द्यावी की नाही?' विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा म्हणून उद्या बघू म्हटलो. दुसऱ्या - तिसऱ्या दिवशीही शाळा सुटली की दोघांचे पार्टीचे टुमणे असायचेच. अखेर एके संध्याकाळी पन्नास रुपये देऊन टाकले. बच्चोने खुशी खुशी में बहुत बढिया चिकनशोरमा बनानेवाले का घर भी दिखाया। देखो सर अभी बना रहा है। छह बजे चौक में गाडी लगवायेगा। चिकनशोरमा पोटात जाण्याआधीच 'आनंद मनात माझ्या माइना.... माइना आनंद मनात माझ्या माइना ' अशी पोरांची अवस्था झालेली. मलाही मजा आली. गंमतीने म्हणालो, "दोनों मे एक प्लेट लेने की और सुनो बाकी बच्चों को बोलना नही , वरना मेरी जेब पूरी खाली हो जाएगी।" लाळ गिळत पोरं हसली. एकाच प्लेटचे पैसे दिल्यामुळं मिळूनवाटून खाण्याचा संस्कार देता आला आणि पोरांशी दोस्ती पक्की झाली. अर्थात दोन दोस्तांतली दोस्ती आणि शिक्षक विद्यार्थ्यांमधली दोस्ती यातले अंतर समजून घेतच असली दोस्ती करावे लागते. काही दिवसांनी वर्गातली अडगळ साफ केल्यावर त्या दोघांनी पुन्हा तोच फंडा वापरला. ' तुम्ही आता जास्तच लाडावलेत ' असं म्हणत मी बधलो नाही. पार्टी कधीतरी मूडमूड मध्ये करायची गोष्ट असते तो रिवाज नाही हे पोरांच्याही ध्यानात आले. मलाही प्रेमळ बनण्याचे शिक्षक- विद्यार्थी नात्यावर कसे कसे परिणाम होतात याची प्रचिती आली. 

 आता मला पहिलीपासून सातवीपर्यंतची कोणतीच मुलं घाबरत नाहीत. मी ऑफिसमध्ये असलो की पहिलीची पोरंपोरीही बिनधास्त माझ्या टेबलसमोरच्या खुर्च्यांवर बसतात. मला भीती वाटते. कुणी पाहिलं तर ह्या मास्तरकडं काही शिस्तबिस्त नावाची गोष्ट आहे की नाही असा पाहणाऱ्याचा गैरसमज होईल याची. पहिलीच्या पोरांना शाळेची घंटा वाजवून, तो आवाज ऐकण्याची कोण हौस असते. पूर्वी मी त्या आवाजाने त्रासिक व्हायचो. आता वाजवू देतो. बघा एकाच आवाजाची गंमत: एकाला आनंद वाटतो तर दुसऱ्याला त्रास! आहे की नाही मौज! आपल्या आतलं ते खट्याळ मूल जागं करतात ही मुलं! आपल्याला पाहिलं की मुलं कशी थर्रर्र घाबरतात याचा मला पूर्वी कोण अभिमान वाटायचा. पालकाबिलकांनी पाहिलं तर तेही करड्या शिस्तीचा मास्तर म्हणून कौतुक करायचे. किती वेडगळ होतो आपण! ते आत्ता कळतंय.तो वेडेपणा बऱ्यापैकी मावळत चाललाय. खरंतर शाळेच्या आणि बाहेरच्याही या जगात कुणीच कुणाला घाबरू नये, कुणालाच कुणाची भीती वाटू नये यासारखी सुंदर गोष्ट कोणती असणार? नाही का? धाक, दरारा, शिस्त वगैरे असावी लेकीन ये डरना और डरवाना क्यों भई? निर्भय,सुंदर, सर्वांना मजेत जगता येईल असं जग का असू नये?अशा कविकल्पनाही जन्मतात हल्ली डोक्यात! बघूत निदान आपला भोवताल तरी असा निर्भय- सुंदर करणं जमतंय का! घाबरणं आणि घाबरवणं दोन्हीही तशी मानवी वैगुण्यच म्हणायची. या बदलत्या प्रेमळ स्वभावामुळं शिक्षा करण्याचे प्रसंग येतील अशा दुसऱ्यांच्या शेकडो तक्रारी पोरं सुटीत सांगतात. आता काय करायचे? प्रश्न पडतो. पण अशावेळी मी 'ज्यानं तुला मारलं त्याच्याकडं शाळा भरल्यावर बघतोच!' अशा खोट्या खोट्या वल्गना करतो. तक्रारदाराला दिलासा मिळतो. काम भागते. तक्रारदार खेळायला जातो आणि खेळता खेळता मूळ तक्रारही विसरून जातो. किंवा तुमच्या सरांना / मॅडमना सांगतो असे आश्वासित करतो किंवा आणखी काही सुचेल ते! पण एक गोष्ट लक्षात आलीय की बऱ्याचवेळा दिलाशावर आणि आश्वासनावर काम भागून जाते. त्या तक्रारी हो अशा असतात तरी केवढुशा!उलट थोडं दुर्लक्ष केलं की भारी वाटतं. 

दुसऱ्याला मार बसावा म्हणून आपल्याला गंडवणाऱ्यांना मीही आत्ता चांगलाच गंडवतोय. एखाद्याने चूक केली, विशेषतः शिकवतांना दुर्लक्ष केले की अचानक व्होल्टेज एकदम हाय होते. तिरीमिरीत हात उचलला गेलाच तर तो खाली यायच्या आत त्या पोरासह साऱ्या वर्गाला, ' चांगला धुतला असता पण आज मी रागवायचे आणि मारायचे नाही अशी प्रतिज्ञा केलीय' हे सांगून टाकतो. मग हळूहळू पोरंही दुर्लक्ष करायचे नाही,खोड्या करायच्या नाही अशा छोट्या छोट्या प्रतिज्ञा करतात.तसा राग संपवणं अशक्यच वाटतं;परंतु प्रयत्नांनी नियंत्रणात मात्र ठेवता येतो याचा अनुभव मिळतो. गरम व्हायचं पण तव्याइतकं नाही. भाकरी भाजली की पुरे, चटका बसायला नको. म्हणतात ना राग आवरायचा नसतो तर राग हाताळायचा असतो. हाताळणं शिकतोय. आताशा आपलं कामापुरतंच रागवावं असं मनात येतं. कामापुरतं गोड बोलण्यापेक्षा कामापुरतं रागवावं आणि कायम गोड बोलावं. मध्यंतरी , इतकंही गोड बोलू नका , की पोरांना लहानवयातच 'साखर' होईल असा एका सहकाऱ्याने हसतहसत सल्ला दिला. पटला... उगीच पटवून घ्यायचा म्हणून नाही , तर खरंच पटला! शिकायचं आणि बदलायचं ठरवलं की प्रत्येक चांगली बाब ' गोष्ट छोटी डोंगराएवढी ' च वाटू लागते. पाण्याची बाटली टेबलावरच ठेवायची, आग भडकतेय असं वाटताच आपले दोन घोट पोटात टाकायचे. मनातल्या मनात केलेल्या १०० ,९९,९८ अशा उलट गिणतीचाही प्रभाव पडतो पण अधिक सराव करण्याची गरज जाणवते. थोडं फार आकांडतांडव करतो पण छडीबिडी नाही वापरत. मॉनिटरने देऊ केली तरी आपल्याला ' निशस्त्र क्रांती ' करायचीहे वगैरे लेक्चर झोडतो. तेवढेच गांधीबाबा आठवून जातात. महात्म्याच्या सहवासात खूपच हलकं वाटतं कारण काही क्षण की होईना आपल्या मनातला हलकटपणा कमी होतो. का कुणास ठाऊक अशांत होण्यापेक्षा शांत व्हायलाच आपल्याला जास्त कष्ट पडतात बॉ! शोध घ्यावा लागेल. 

 शिक्षा केल्याने मूल बचावासाठी प्रयत्न करते आणि शारीरिक प्रक्रिया घडून बचावासाठी शरीर मेंदूच्या मॅमेलियन या भागाकडे रक्त पुरवठा वळवते, की जो मेंदूच्या निओ - कार्टेक्स या भागाला व्हायला हवा. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया थांबते व बचावाचे उपाय शोधले जातात. अशी काही शास्त्रीय माहितीही मिळवलीहे! प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. वर्गात खूप गडबडगोंधळ झाला की वर्ग एकदम शांत होतो असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. थोडा निचरा व्हायलाच हवा. पूर येऊन गेल्याशिवाय सुपीक मातीचं सपाट मैदान तयार होत नाही. गोंगाट सहन करावाच लागेल. मोठी माणसं गोंधळ घालतात, भांडणं- मारामाऱ्या करतात त्यापेक्षा मुलांचा गोंगाट परवडला. सैन्य पोटावर चालतं आणि शाळा छड्यांवर हे गृहीतक सोडावे लागेल. कायदा हातातली छडी काढेल पण मनातली छडी आपली आपल्यालाच काढावी लागेल. शिक्षक मातृहृदयी असावा असं म्हणतात.... देवा मला तसं हृदय दे!

-डॉ. संजय गोर्डे

( पदवीधर प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा कुरण ता . संगमनेर जि अ.नगर )

Saturday, 21 September 2024

ओझे नको, शिक्षण हवे

 ओझे नको, शिक्षण हवे

अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत एक सरधोपट विचार एव्हढाच केला जातो, की त्यातील कठीण किंवा ‘प्रगत’ समजला जाणारा भाग कमी करायचा, गुंतागुंतीचे विषय कमी करायचे. जे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच वेळी अनेक संकल्पनांचा आधार घ्यावा लागेल, परिचित उदाहरणांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल, बरेच स्पष्टीकरण लिहावे लागेल, असे प्रश्न परीक्षेत विचारायचेच नाहीत. मुले पूर्ण कविता लक्षात ठेवतील, असे गृहीत न धरता पाठ्यपुस्तकातील कविता प्रश्नपत्रिकेत पुन्हा छापून त्यावर ठरावीकच प्रश्न विचारायचे. ही यादी आणखीही वाढवता येईल. पण अशा उपायांमुळे अभ्यासाचे ओझे खरोखर कमी होते का? की नवीन, आव्हानात्मक काही शिकल्याचा आनंद नष्ट होऊन शिक्षण नीरस वाटायला लागते?

एखादी नवीन गोष्ट शिकताना बौद्धिक भार कशामुळे वाढतो, यावर बरेच संशोधन झाले आहे. एखादा घटक समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले पूर्वज्ञान विद्यार्थ्याकडे किती प्रमाणात आहे, तसेच तो घटक शिकताना एकाच वेळी त्याला किती गोष्टी प्रथमच किंवा नव्याने लक्षात घ्याव्या लागत आहेत, त्यानुसार शिकण्यातील ‘बौद्धिक भार’ कमीजास्त होतो. हा भार अवाजवी असू नये याची काळजी शैक्षणिक साहित्य तयार करताना, ते वर्गात वापरताना घ्यायलाच हवी. पण बौद्धिक भार हाताळणे हा शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग आहे. नव्या माहितीच्या तुकड्यांची नीट संगती लावून त्यांचा एक मानसिक आकृतिबंध कायमस्वरूपी लक्षात ठेवणे ही प्रक्रिया घडली, तरच खऱ्या अर्थाने शिक्षण झाले असे म्हणता येईल. शिकत असताना मुलांनी हे स्वतःच करणे अपेक्षित असते. ते करण्याची संधी त्यांना मिळाली नाही, तर ओझे नाही, पण शिक्षणही नाही, अशीच परिस्थिती ओढवते!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यातील अभ्यासक्रमाच्या ‘ओझ्या’बाबतची भूमिका स्पष्ट आहे – आशयाचे ओझे कमी करून क्षमतांचा विकास केला पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर मुलांना पांगुळगाडे देण्यापेक्षा त्यांच्या पायातील ताकद वाढेल, असे पाहिले पाहिजे. प्रत्येक विषयाच्या - विशेषतः सामाजिक शास्त्रांच्या  अभ्यासक्रमात जो निव्वळ माहितीचा आणि तपशीलाचा भरणा असतो, ते खरे तर शिक्षणातील ओझे आहे. तो भाग कमी करून, एका बाजूने मुलांना त्या त्या विषयातील मूलभूत, अत्यावश्यक संबोध शिकवणे आणि त्याच वेळी इतर संबोधांचा अभ्यास ते स्वतः करू शकतील, अशी त्यांची तयारी करून घेणे हा शिक्षणाचा गाभा असला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही विषयातील निव्वळ माहिती प्रचंड प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर ती मिळवणे, स्वतःजवळ साठवणेही सोपे झाले आहे. त्यासाठी तासन् तास यांत्रिक पाठांतर करण्याची गरज आता राहिलेली नाही. आपल्या समोर असलेल्या माहितीचा बरोबर-चूक, योग्य-अयोग्य, सुसंगत-विसंगत, उपयोगी-निरुपयोगी, खरी-खोटी असा विचार करता येणे ही यापुढील काळाची गरज आहे. त्यामुळे विश्लेषण, चिकित्सा, वेगवेगळ्या गोष्टींतील सहसंबंध पाहता येणे, नवीन विचार करता येणे अशा क्षमता यापुढील काळात अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी असणे अपेक्षित आहे. 

उदाहरणार्थ, इतिहासात नुसत्या सनावळ्या, व्यक्तींची नावे आणि घटनांची जंत्री, यापेक्षा त्या घटनांच्या मागील कारणे, त्या काळातील सामाजिक, आर्थिक व्यवस्था, भौतिक प्रगती, लोकजीवन, रीतिरिवाज आणि त्यांचे बरेवाईट परिणाम, त्याचा आजच्या काळाशी असलेला संबंध या सर्व बाजू समजून घेता येणे महत्त्वाचे. विज्ञानाच्या शिक्षणात एखाद्या प्रश्नाचा स्वतः पद्धतशीर शोध घेता येणे, त्यासाठी स्वतःची निरीक्षणे, अनुमान नोंदवता येणे, स्वतःचे निष्कर्ष काढता येणे आणि ते वैज्ञानिक कसोट्या लावून तपासता येणे महत्त्वाचे. गणितातील अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले, तर एकोणतीसचा पाढा घडाघडा म्हणता येण्यापेक्षा नऊ आणि वीस असे सोपे पाढे एकत्र करून त्या ‘अवघड’ पाढया’तील कोणतीही संख्या पटकन मिळवता येते, ही उमज महत्त्वाची!  

तपशीलाचे ओझे कमी करायचे म्हणजे अभ्यासाचे तास कमी करायचे, शिकण्याची प्रक्रिया कमी मेहनतीची करायची, असा अर्थ काढणे फार चुकीचे ठरेल. अभ्यासाला पुरेसा वेळ द्यावाच लागेल, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यासाठी स्वतः अधिक चित्त घालून काम करावे लागेल. पण अर्थपूर्ण आणि शाश्वत शिक्षणासाठी त्याला काही पर्याय नाही.


- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १४ ऑगस्ट २०२४)

Wednesday, 18 September 2024

बालकांच्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका

 बालकांच्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका

 शिक्षक हे लहान मुलांच्या जीवनातील पहिले शिक्षण गुरु असतात. त्यांच्या भूमिकेचे महत्त्व शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक आणि भावनिक विकासासाठी अनन्यसाधारण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) या संस्थेनं जाहीर केलेल्या २०२४ च्या शिक्षण अभ्यासक्रमानुसार शिक्षकांच्या भूमिकेची विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे.

  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये, सहा वर्षांच्या आतील मुलांच्या शिक्षणाचा समावेश प्रथमतःच करण्यात आलेला आहे. या शिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता प्रदान केली आहे. बालशिक्षणाची वयोमर्यादा आठ वर्षांपर्यंत वाढवली असून या आठ वर्षांच्या वयाचे दोन भाग करण्यात आले आहेत. पहिला भाग वय वर्ष तीन पर्यंतचा व दुसरा भाग तीन ते आठ या वर्षांच्या वयाचा आहे.

शाळापूर्व शिक्षणाचा भाग म्हणजे प्रामुख्याने बालकांच्या घरांमधील शिक्षणाचा असून, दुसरा भाग संस्थात्मक स्वरूपाच्या म्हणजे बालक शाळांतील शिकण्याचा आहे. ही रचना करताना बालकांच्या वाढीच्या, विकासाच्या आणि कल्याणाच्या दृष्टीने बालशिक्षणाचे हे वय महत्त्वाचे मानले आहे. यामागील शास्त्रीय भूमिका सर्वच संबंधितांनी समजून घेणे आवश्यक आहे.

  शैक्षणिक विकास:

 शिक्षक मुलांच्या बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) ने मान्य केले आहे की शिक्षणाच्या प्रारंभिक टप्प्यातील शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांनी बालकांना विविध शैक्षणिक साधने, खेळ आणि गट पद्धतीचा वापर करून शिक्षण देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेतून मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, मुलं विविध संकल्पना समजून घेतात आणि त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादेत विस्तार करतात.

 बौद्धिक विकास:

बौद्धिक विकास हा लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया आहे. या वयात मुलांच्या मेंदूची क्षमता जलदगतीने वाढते. शिक्षक विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देतात. गणित, भाषा, विज्ञान यांसारख्या विषयांमध्ये मुलांमध्ये रुची निर्माण करणे आणि त्यांच्या विचारशक्तीला प्रोत्साहन देणे हे शिक्षकाचे मुख्य कार्य असते. उदा. खेळांमधून गणित शिकवणे, गोष्टी सांगून भाषेचे महत्त्व पटवून देणे, इ.

 सामाजिक विकास:

सामाजिक विकासामध्ये, शिक्षकांनी मुलांना सामूहिक काम, सहकार्य आणि समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याचे शिक्षण दिले पाहिजे. शिक्षकांनी मुलांना संवाद कौशल्ये, सन्मानाने वागणे आणि समूहात कार्य करणे शिकवले पाहिजे. SCERT च्या अभ्यासक्रमातही या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे, जेणेकरून मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा विकास होतो.

 लहान मुलांच्या सामाजिक विकासात शिक्षकांचे योगदान खूप महत्त्वाचे असते. या वयात मुलांना सामाजिक कौशल्ये शिकवणे आवश्यक असते. शिक्षक विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सहकार्य, आदर आणि समाजशीलता शिकवतात. विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन मुलांना विविध संस्कृतींची ओळख करणे हे देखील शिक्षकांचे कार्य असते.

 शारीरिक विकास:

 शारीरिक विकासासाठी शिक्षकांनी मुलांना विविध शारीरिक हालचालींमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. खेळ, व्यायाम, आणि शारीरिक शिक्षणाच्या इतर उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारले जाते. शिक्षकांनी मुलांच्या शारीरिक क्षमतेचा विकास करण्यासाठी विविध कृतिकार्यक्रमांची आखणी केली पाहिजे, ज्यामुळे मुले सुदृढ होतील.

     शारीरिक विकासही लहान मुलांच्या जीवनात महत्त्वाचा आहे. शिक्षक शारीरिक क्रियाकलापांद्वारे मुलांच्या शरीराची क्षमता वाढवतात. खेळ, योग, नृत्य इ. द्वारे मुलांच्या शारीरिक क्षमतांचा विकास होतो. शारीरिक कृतिमुळे मुलांच्या शरीराची ताकद, लवचिकता आणि सहनशक्ती वाढते.

 भावनिक विकास:

भावनिक विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या भावनिक विकासाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.   

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अभ्यासक्रमात शिक्षकांनी मुलांच्या भावनिक गरजांची काळजी घेण्यावर भर दिला आहे. मुलांची काळजी घेतल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. 

 भावनिक विकास हा लहान मुलांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक मुलांच्या भावनिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि आत्मविश्वास वाढवणे या गोष्टी शिक्षकांना कराव्या लागतात. शिक्षक मुलांचा आत्म-सन्मान वाढवण्यासाठी आणि तणाव हाताळण्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करतात.

  मेंदू संशोधन:

शिक्षकांनी बालकांच्या मेंदूच्या विकासातील योगदान देखील महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. मेंदू संशोधनानुसार, प्रारंभिक वयातील अनुभव आणि शिकणे मेंदूच्या संरचनेत बदल करू शकतात. शिक्षकांनी मुलांच्या मेंदू विकासाला चालना देण्यासाठी संकल्पनात्मक शिक्षण, समस्या सोडविण्याच्या विविध पद्धती आणि औपचारिक खेळांचा वापर करावा. यामुळे मुलांची विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते.

      लहान मुलांच्या विकासात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वय वर्ष ३ ते ८ या वयोगटातील मुलांसाठी शिक्षकांचे योगदान विशेष असते. या वयात मुलांची बौद्धिक, सामाजिक, शारीरिक आणि भावनिक विकासाची प्रक्रिया जोरात चालू असते. शिक्षक या विकासाच्या प्रक्रियेत मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरतात.

 वर्तमानातील मेंदू संशोधनानुसार, लहान मुलांच्या मेंदूचा विकास जलदगतीने होतो. या वयात न्यूरोप्लास्टीसिटी (neuroplasticity) खूप उच्च असते, ज्यामुळे मेंदू नवीन माहिती आणि कौशल्ये आत्मसात करतो. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे मेंदूच्या विविध भागांना सक्रिय केले जाते. उपक्रमांतील सहभागामुळे मुलांची स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते. 

     सामाजिक संवादामुळे मुलांच्या मेंदूच्या सामाजिक नेटवर्कची वाढ होते. सामाजिक कार्यक्रमाद्वारे ऑक्सिटोसिन (oxytocin) आणि इतर न्यूरोकेमिकल्सची निर्मिती होते, ज्यामुळे मुलांच्या संबंधांची गुणवत्ता सुधारते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शारीरिक हालचालीमुळे मेंदूत बीडीएनएफ (brain-derived neurotrophic factor) च्या निर्मितीत वाढ होते, न्यूरॉन्सच्या वाढीस चालना मिळते. यामुळे मुलांची एकाग्रता आणि शैक्षणिक कामगिरी सुधारते.

      भावनिक विकासामुळे अमिगडाला (amygdala) आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (prefrontal cortex) या भागांची वाढ होते. सकारात्मक भावनिक अनुभव मुलांच्या मानसिक आरोग्याला चालना देतात आणि त्यांना तणाव हाताळण्याची क्षमता विकसित होते. 

       जगभरातील शैक्षणिक संशोधनानुसार, शिक्षकांचे योगदान मुलांच्या विकासात निर्णायक असते. फिनलंड, सिंगापूर आणि जपान यांसारख्या देशांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जातो. या देशांमध्ये शिक्षकांना उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम होतात. शिक्षकांच्या भूमिका जागतिक स्तरावर सर्वत्र महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यातील गुणवत्ता आणि कौशल्ये मुलांच्या विकासात प्रभावी ठरतात.

       लहान मुलांच्या विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात. शिक्षक हे योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रेमाने मुलांचे भविष्य उज्ज्वल करतात. 

  शिक्षक हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक आणि भावनिक विकासासाठी शिक्षकांनी विविध पद्धतींचा अवलंब करावा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) ने जाहीर केलेल्या २०२४ च्या शिक्षण अभ्यासक्रमानुसार, शिक्षकांनी त्यांची भूमिका अधिक प्रभावीपणे समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या भूमिकेची जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे.


-अरूण मारुती जाधव,

वरिष्ठ अधिव्याख्याता,डायट, सोलापूर 

Saturday, 14 September 2024

फक्त भार, की वर्षभराचा साथीदार?

 फक्त भार, की वर्षभराचा साथीदार? 

मुलांच्या दप्तराचे ओझे हा एक सतत चर्चेत असणारा विषय आहे. ते साहजिकच आहे. कोवळ्या वयातील मुलांना पेलवणार नाही असे वजन त्यांनी रोज वाहून नेणे कोणाला आवडेल? प्रा. यश पाल समितीच्या ‘लर्निंग विदाऊट बर्डन’ (ओझ्याविना शिक्षण) या 1993 साली प्रकाशित झालेल्या अहवालानंतर हा विषय देशभर खूप गाजला आणि अजूनही कालबाह्य झालेला नाही. पण या समस्येच्या मुळाशी आपण आज तरी खरेच पोचलो आहोत का? या अहवालात वर्गातील हवा, उजेड, विद्यार्थिसंख्या, ग्रंथालये आणि प्रयोगशाळांचा अभाव इथपासून ते परीक्षाकेंद्री अध्यापन, अभ्यासक्रम रचना, शिक्षक प्रशिक्षण अशा शिक्षणाच्या सगळ्याच पैलूंचा विचार करण्यात आला होता. पण त्या सर्व घटकांपेक्षा अधिक प्रकाशझोतात आला तो ‘पाठ्यपुस्तके’ हा सर्वांना सहज दिसणारा, हाताशी असणारा घटक. दप्तराच्या प्रत्यक्ष वजनापेक्षा शिकवलेले ‘कळत नाही’ हे मुलांच्या मनावरचे ओझे कितीतरी जास्त नुकसानकारक, ‘क्रूर’ आहे हे स्वतः प्रा. यश पाल यांनी नमूद केले आहे. तरी ओझ्याची चर्चा मात्र अजूनही पाठ्यपुस्तकांच्या वजनाभोवतीच फिरताना दिसते. सध्या महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांचे जे चार-चार तुकडे करून जोडले आहेत, त्यासाठी देखील दप्तराचे ओझे हे एक मुख्य कारण देण्यात आले आहे. 

हे खरे आहे की यश पाल समितीच्या अहवालात मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा स्पष्ट उल्लेख होता आणि त्या अनुषंगाने पुस्तके शाळेतच ठेवावी, लागतील तशी आलटून पालटून घरी द्यावी अशी शिफारसही होती. नंतरच्या तीसेक वर्षांत दप्तराचे वजन या विषयावर आणखीही भरपूर चर्चा, सर्वेक्षणे, इतकेच काय याचिकादेखील झाल्या. निर्धारित पाठ्यपुस्तकांचा आकार कमी करावा, पाने कमी करावी, धडे कमी करावे, अभ्यासक्रम कमी करावा, अशा मागण्यांचा जोर वाढला. त्या तुलनेत, तेव्हढाच आकार, वजन असलेली खासगी गाईड्स, वर्कबुक्स - नेमलेली नसली तरी - मुले रोज दप्तरातून नेतात, त्यांवर कोणतेच नियंत्रण, बंदी नाही, याकडे मात्र कोणी फारसे लक्ष दिले नाही. आता तर पैसे भरल्यास कोणतेही गुणवत्ता परीक्षण न होता अशा खासगी प्रकाशनांना सरळ परवानाच दिला जातो. इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये त्या त्या संस्थेच्या मर्जीनुसार पाठ्यपुस्तकांचे निर्धारित आणि खासगी असे दोन संच वापरले जातात. वह्यांची संख्याही भरपूर असते. पण ‘ओझ्याचा’ प्रश्न आला की मात्र शासनाने नेमलेल्या पाठ्यपुस्तकांकडेच सगळा रोख वळतो!

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, रोज सर्व विषयांची वह्यापुस्तके आणावी लागणार नाहीत असे वेळापत्रक आखणे, काही वह्या किंवा पुस्तकेही शाळेत ठेवायची सोय करणे असे सोपे आणि चांगले उपाय काही शाळा करतात. पण मुळात गरज आहे, ती पाठ्यपुस्तके म्हणजे ‘ओझे’ हा दृष्टिकोन बदलण्याची. खरे तर आपल्यासारख्या विकासाच्या वाटेवर असलेल्या देशात पाठ्यपुस्तक हे मुले, शिक्षक आणि पालकांच्या हातातील एक खात्रीशीर शैक्षणिक साधन आहे. मुलांच्या वयोगटाला अनुरूप असा त्या त्या विषयातील प्रमाणित आशय आणि संपूर्ण वर्षांचा कार्यक्रम सर्व संबंधितांपर्यंत नेमकेपणाने पोचवण्याचे काम पाठ्यपुस्तक करत असते. शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या कितीतरी मुलांसाठी तर त्या त्या विषयाशी दुवा जोडणारे त्यांच्या हक्काचे, त्यांचे स्वतःचे असे ते एकमेव साधन असते. भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रत्येक विषयाची वेगळी गरज लक्षात घेऊन केलेली पाठांची किंवा पाठयघटकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, आकर्षक चित्रे, आकृत्या, तक्ते, उपक्रम यांतून मुलांना अभ्यासाच्या विषयांचे अंतरंग उलगडत जाते. सत्र परीक्षा संपल्या, तरी पाठ्यपुस्तक वर्षभर मुलांच्या हाताशी राहते, कायमस्वरूपी अध्ययनात त्यांना मदत करते. 

पाठ्यपुस्तकांत त्रुटी असतील, मुलांच्या अभ्यासात अडथळेच येतील, अशा बाबी असतील, तर त्यावर नक्कीच टीका, चर्चा घडवल्या पाहिजेत. बोजड क्लिष्ट भाषा, पाठ्यघटकांची विस्कळित, सहज सुसंगत क्रम नसलेली मांडणी, लेखनातील विसंगती, मुलांना आपलीशी वाटणार नाहीत अशी चित्रे आणि उदाहरणे, अशा बाबी मुले आणि शिक्षक दोघांच्याही कामाचा भार वाढवतात. मुलांना शिकताना येणारे दडपण खरोखर दूर करायचे असेल, तर पाठ्यपुस्तकांवर नुसतीच कात्री चालवण्यापेक्षा अशा बाबी दूर करण्यासाठी काम केले पाहिजे.

- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ०७ ऑगस्ट २०२४)

Saturday, 7 September 2024

माध्यमभाषा - अडचण की आधार?

 माध्यमभाषा - अडचण की आधार?

शाळेत मुले फक्त भाषेच्या वर्गातच भाषा शिकतात असे नाही. कोणताही विषय शिकताना त्या त्या विषयासाठी लागणारी भाषा, परिभाषाही शिकावी लागते. मुलांची मातृभाषा आणि शाळेतील माध्यमभाषा या जर खूप वेगळ्या असतील, तर सगळेच विषय शिकण्यात अडचणी येतात. मुलांचे प्राथमिक शिक्षण शक्यतो मातृभाषेत व्हावे अशी मूळ भूमिका असली, तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि पर्यायाने या अडचणींचा सामना करणाऱ्या शिक्षक-विद्यार्थ्यांची वाढती संख्या, हे वास्तव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वीकारलेले दिसते. त्यामुळे त्यांत माध्यमभाषेच्या वापराविषयी बरीच लवचीक भूमिका घेतलेली आहे. मात्र त्याकरता आणखीही काही उपाय करणे फायदेशीर ठरेल.

बालवाडी आणि पहिली-दुसरी या पायाभूत स्तरावर सुरवातीला मुलांना स्वतःच्या भाषेत व्यक्त होऊ द्यावे आणि नंतर हळूहळू माध्यमभाषेकडे वळवावे; आधी भरपूर तोंडी काम करून मग अक्षरओळख करून द्यावी अशी अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात पुरेसे तोंडी काम होण्याआधीच लेखनावर जोर दिला जातो. जी प्रक्रिया सावकाश, मुलांच्या कलाने, गतीने पण खात्रीशीररीत्या व्हायला हवी, ती झटपट ‘रिझल्ट्स’ घेण्यासाठी घाईघाईने, सक्तीने उरकली जाते. अनेकदा पालकांनाही मुलांची लेखी कामगिरी पाहण्याची घाई झालेली असते. मात्र हे लेखी काम पूर्णपणे माध्यमभाषेतच होत असल्याने मुलांची घरची भाषा, त्या भाषेत संवाद, गप्पागोष्टी, मुलांच्या अभिव्यक्तीला वाव वगैरे आदर्श बासनातच राहतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना इंग्रजीचे वलय जपणे महत्त्वाचे वाटत असल्याने तसेही एकूण मुलांच्या घरच्या भाषेला काहीच महत्त्व दिले जात नाही. मराठी शाळांतील ‘सेमी-इंग्लिश’ व्यवस्थेत गणित-विज्ञान इंग्रजीतून शिकवतानाही पुन्हा इंग्रजीतील लेखी काम आणि त्याचे पाठांतर यावरच भर दिला जातो. 

कोणताही विषय शिकताना मुलांच्या बौद्धिक, वैचारिक विकासाकरता मुलांनी स्वतः निरीक्षण आणि वर्णन करणे, प्रश्न विचारणे, स्वतः अधिक माहिती मिळवणे, शोध घेणे, इतर मुलांशी, शिक्षकांशी चर्चा करणे, स्वतः केलेल्या प्रकल्प, प्रयोगांवर सादरीकरण करणे अशा अनेक भाषिक कृती करणे गरजेचे असते. पण प्रत्यक्षात मात्र इयत्ता आणि विषयांची गुंतागुंत वाढत गेली, की अशा कृतींचे प्रमाण वाढत जाण्याऐवजी कमीच होते आणि शिकणे-शिकवणे ठरावीक साचेबंद प्रश्नोत्तरांभोवती फिरत राहते. त्याची कारणे अनेक असली, तरी मुलांना (आणि काही वेळा शिक्षकांनाही) माध्यमभाषेतून या सर्व भाषिक कृती करताना येणाऱ्या अडचणी हे त्यातले एक महत्त्वाचे कारण आहे. खरे तर माध्यमभाषा हे  शिकण्याचे साधन आहे, तर ते शिकणाऱ्याच्या सोयीचे, त्याला मदत करणारे हवे. त्यासाठी काही व्यावहारिक उपाय करता येतील.  

- किमान प्राथमिक स्तरावर तरी, शाळा कोणत्याही माध्यमाची असो, मुलांना वर्गात आणि परीक्षेतही त्यांच्या स्वतःच्या भाषेत किंवा इंग्रजी-मराठी अशा मिश्र भाषेत व्यक्त होण्याची पूर्ण मुभा दिली पाहिजे: वेगवेगळ्या विषयांवरचे सोपे, आकर्षक असे भरपूर साहित्य मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत वाचायला दिले पाहिजे.

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठी माध्यमात वैकल्पिक तत्त्वावर ‘सेमी-इंग्लिश’ घेण्याची म्हणजे गणित, विज्ञान इंग्रजीत शिकण्याची सोय आहे; त्याच धर्तीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही ‘सेमी-मराठी’ घेण्याची म्हणजे इतिहास, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, कला यांसारखे विषय स्थानिक भाषेत - मराठीत शिकता येण्याचा विकल्प दिला पाहिजे. मुलांनी स्वतः परिसरात क्षेत्र-भेटी देऊन, लोकांशी बोलून, त्या विषयावरचे उत्तम साहित्य वाचून, छोटे प्रकल्प, उपक्रम करून जर आपल्या सभोवतालचा इतिहास, भूगोल, सांस्कृतिक वारसा, लोककला, लोकविज्ञान हे सर्व समजून घ्यायचे असेल, तर त्यासाठी त्यांच्या परिचयाच्या, त्यांच्या परिसरातल्या भाषेचा वापर करणे केव्हाही अधिक चांगले! मग शिकण्यात भाषेचा कृत्रिम अडसर राहणार नाही. शिवाय या निमित्ताने इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मराठीच्या अध्यापनाला वजन येईल हाही एक फायदा त्यात आहे.

- याखेरीज पुढील शिक्षणासाठी किंवा इतर कारणांनी मुलांना कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही एका किंवा अधिक विषयासाठी वेगळे माध्यम निवडायचे, बदलायचे झाले, तर तशीही तरतूद केली पाहिजे. या लवचिकतेमुळे अनेक भाषांत सक्षमपणे काम करू शकणारे विद्यार्थी घडवण्याचे उद्दिष्टही साध्य होऊ शकेल.


- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २४ जुलै २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...