Saturday, 21 February 2026

समग्र प्रगतिपत्रक : मूल्यांकनाचा एक व्यापक दृष्टिकोन

 समग्र प्रगतिपत्रक : मूल्यांकनाचा एक व्यापक दृष्टिकोन

प्रस्तावना :

भारतीय शिक्षण व्यवस्थेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी नवसंजीवनी देण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 करत आहे. बालकाच्या क्षमता वृद्धीसाठी आणि बालकाने आजीवन शिकत राहावे यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनेक वैशिष्ट्यांमधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मूल्यमापनातील परिवर्तन! बालकांचा समग्र विकास आणि प्रगतीशी संबंधित मूल्यांकनासाठी 'परख' या केंद्रस्तरीय संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘परख’तर्फे बालकाच्या प्रगतीच्या मूल्यांकनासाठी एक बहुआयामी ३६० अंशातील प्रगतिपुस्तक तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक बालकाची बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रातील प्रगती सविस्तरपणे दर्शविली जाईल.

हे समग्र प्रगतिपत्रक घर आणि शाळा यांमधील दुवा असणार आहे. विद्यार्थ्यांचा ३६०°तून समग्र विकास करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यांकनाची जबाबदारी केवळ शिक्षकांवर देऊन चालणार नाही, तर सहाध्यायी, पालक, मुख्याध्यापक अशा विविध घटकांवर देणे गरजेचे आहे. म्हणूनच समग्र प्रगतिपत्रकाच्या अहवालात सर्वांना सामावून घेण्यात आलेले आहे.

समग्र प्रगतिपत्रक भरताना वेगवेगळे स्रोत, पुरावे गोळा करावे लागणार आहेत. उदा. विद्यार्थी संचिका, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही इ. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा, संसाधने यांचा विचार करून उपक्रमांची आखणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

समग्र प्रगतिपत्रक हा एक सर्वसमावेशक दस्तऐवज आहे. यात बालकांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांचा सामाजिक, भावनिक विकास, सर्जनशीलता आणि व्यावसायिक प्रावीण्यता यांचादेखील समावेश आहे. पारंपरिक प्रगतिपत्रकाची जागा या वर्षीपासून समग्र प्रगतिपत्रक घेत आहे. बालवाटिका-१,२,३ आणि इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक वि‌द्यार्थ्यासाठी समग्र प्रगतिपत्रक भरणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मधील अनेक उपक्रमांची अंमलबजावणी मोठ्या जोमाने सुरू आहे. उदा. निपुण भारत, विद्याप्रवेश, शाळापूर्व तयारी अभियान (पहिले पाऊल)! ‘निपुण भारत’सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यात प्रगती करत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच काळ उलटला आहे आणि शिक्षकांनी आता मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांच्या अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांबरोबरच समग्र प्रगतिपत्रक भरण्याचे मोठे आव्हान या वर्षी पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसमोर आहे. समग्र प्रगतिपत्रकामध्ये जाणीवजागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन क्षमतांमध्ये वि‌द्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

समग्र प्रगतिपत्रकाची गरज व महत्त्व :

१) व्यापक मूल्यांकन

२) वैयक्तिकृत शिक्षण

३) पालकांचा सहभाग

४) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास

५) शाळा व कुटुंब दुवा

६) स्तरनिहाय प्रगती

७) प्रभावी सर्वंकष मूल्यांकन

८) बालकांच्या प्रगतीचा प्राथमिक स्रोत

९) विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी, ध्येये, सामर्थ्यस्थळे, आदर्श, सवयी, वेळेचे व्यवस्थापन, भविष्यकालीन नियोजन यांबाबत नोंदी करण्यात मदत होईल.

पारंपरिक प्रगतिपत्रक आणि समग्र प्रगतिपत्रक यांमधील फरक :

पारंपरिक प्रगतिपत्रकात पूर्वी गुण नोंद केले जायचे. सद्य:स्थितीत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनानुसार श्रेणी व वर्णनात्मक नोंदी करून आकारिक व संकलित मूल्यांकन केले जाते. या पद्धतीने मूल्यांकन करणे शिक्षकांच्या अंगवळणी पडले आहे, परंतु समग्र प्रगतिपत्रकात 360 अंशातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. शिक्षण क्षेत्रातील या बदलाला सर्व घटकांना सामोरे जावे लागणार आहे. शिक्षकांच्या लेखी कामात भर पडल्याची भावना शिक्षकांमध्ये दिसून येत आहे. परंतु सखोल अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले की, यासाठी खूप जास्त व अवांतर वेळ देण्याची गरज नाही. वेळेचे, अध्ययन-अध्यापनाचे व उपक्रमांचे योग्य नियोजन केले पाहिजे.

समग्र प्रगतिपत्रकाचे हेतू/उ‌द्दिष्टे :

१) बालकांची अध्ययन संपादणूक प्रभावीपणे समजून घेणे.

२) बालकांच्या गरजेनुसार नेमकेपणाने उपचारात्मक अध्यापन कृतिकार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

३) विकासात्मक क्षेत्रे, संपादणुकीचे स्तर निश्चितीकरण करणे.

४) शैक्षणिक संपादणुकीची माहिती बालकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे.

५) बालके शैक्षणिक संपादणुकीच्या नेमक्या कोणत्या स्तरावर आहेत हे पाहणे.

६) सहाध्यायींच्या प्रतिक्रिया घेणे.

७) शैक्षणिक प्रवासातील प्रगतीकडे लक्ष देणे.

८) सर्व पैलूंकडे ठरावीक कालावधीत वाढ करण्याकडे समान लक्ष देणे.

९) बालकास स्वतःचे सामर्थ्य, आवडीचे क्षेत्र, भविष्यातील संधी, स्वतःमध्ये करावयाच्या सुधारणांबाबत जागरूक करणे.

१०) गुण किंवा श्रेणीऐवजी संपादणुकीचे वर्णनात्मक चित्र बालक, पालक व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणांना स्पष्ट करणे.

समग्र प्रगतिपत्रक रचना :

समग्र प्रगतिपत्रकाची रचना थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.

भाग अ-१ : बालकाची सर्वसाधारण माहिती

भाग अ-२ : मी व माझा परिसर

भाग ब : बालकाच्या प्रगतीचा सारांश चार टप्प्यांमध्ये विभागला आहे.

कृतिविभाग

शिक्षकांचा अभिप्राय

स्वमूल्यांकन/ सहाध्यायी मूल्यांकन

पालक निरीक्षण विभाग

भाग क : जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता क्षमता, क्षेत्र ध्येय यांचा वर्णनात्मक तक्ता

अशा पद्धतीने समग्र प्रगतिपत्रक तयार करण्यात आले आहे.

समग्र प्रगतिपत्रकाची वैशिष्टये -

१) सर्वांगीण प्रगतीवर भर

२) सर्वसमावेशक

३) ३६०° प्रगती

४) शाळा व कुटुंब यांमधील दुवा

५) ध्येयनिश्चिती

६) बालकांऐवजी क्षमतांचे मूल्यांकन

७) अध्यापन शास्त्रीय साधने

८) प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतिपत्रक

९) स्तरनिहाय समग्र प्रगतिपत्रक

सन 2025-26मध्ये मीदेखील स्वतः इयत्ता पहिलीचा वर्ग घेतला आहे. भविष्यवेधी शिक्षणाच्या अनुषंगाने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू तर आहे, परंतु मुख्य प्रश्न आला तो समग्र प्रगतिपत्रक भरण्याचा! समग्र प्रगतिपत्रकातील भाग १मधील बालकांची सर्वसाधारण माहिती भरण्यासाठी पालकांची मदत घ्यावी लागते. सर्व पालकांना एकत्र बोलवून समग्र प्रगतिपत्रकाची माहिती देणे मला गरजेचे वाटले. म्हणून काही उपाय मी अवलंबले.

समग्र प्रगतिपत्रक कृती क्र.१- पालक सहभाग

समग्र प्रगतिपत्रक भरण्याकामी पालकांचा सहभाग आवश्यक होता, कारण पहिलीचे विद्यार्थी हे लहान असतात. सर्व पालक एकाच वेळी भेटले पाहिजेत, यासाठी आम्ही सर्वप्रथम आमच्या इयत्ता पहिलीच्या पालकांची सभा घेतली. त्यामध्ये समग्र प्रगतिपत्रक म्हणजे काय? त्यामध्ये पालकांनी काय केले पाहिजे? पालकांचा सहभाग कुठे आणि कसा आवश्यक आहे? हे समजावून सांगितले. याविषयी सविस्तर माहिती दिली. जे पालक साक्षर, सुशिक्षित होते त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जे पालक अशिक्षित होते त्यांना इतर पालकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या मोठ्या भाऊ-बहिणींनीदेखील मदत करण्याचे आश्वासन दिले.

कृती क्र.२ : तंत्रज्ञानाचा वापर- Survey Heart Appचा वापर

बालकांची सर्वसाधारण माहिती भरण्यासाठी मी Survey Heart App या अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने माहिती गोळा केली. ज्यामध्ये प्रश्नावलीच्या साहाय्याने माहिती मागवली. वर्गातील ६०% पालकांनी ऑनलाइन लिंक भरून प्रतिसाद नोंदवला. ज्या पालकांना ऑनलाइन माहिती भरता आली नाही त्यांच्यासाठी प्रश्नावलीच्या फॉर्मच्या प्रिंट काढून त्या भरून घेतल्या. ह्या दोन्ही कृती मला अतिशय फायद्याच्या ठरल्या. या दोन पर्यायांमुळे मला समग्र प्रगतिपत्रकातील बालकांची सर्वसाधारण माहिती भरणे सोपे झाले.

कृती क्र.३ : विद्यार्थी मुलाखत – ‘आजचे पाहुणे’

भाग-अ(२)मधील माहिती भरण्यासाठी मी ‘आजचे पाहुणे’ हा विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचा उपक्रम घेतला. त्यासाठी एक छोटी प्रश्नावली तयार केली. दप्तरमुक्त आनंददायी शनिवार अंतर्गत दर आठवड्याला वर्गातील पाच वि‌द्यार्थिनींच्या मुलाखती घेतल्या. या उपक्रमाचा फायदा असा झाला की, मुली बोलत्या झाल्या. स्वतःविषयी माहिती सांगताना आपण कुणीतरी सेलिब्रिटी आहोत, असे वाटू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. बुजरेपणा कमी झाला.

हे सर्व करत असताना एक लक्षात आले की, आपले काम नेमक्या दिशेने चालू आहे. कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०मधील तत्त्वांनुसार बालकांचा ३६०° तून विकास करण्यासाठी पावले टाकत आहोत.

यानंतर सर्वात महत्त्वाचे काम कृती विभागातील नोंदी करणे. समग्र प्रगतिपत्रकात कृती विभागामध्ये विकास क्षेत्र, कृती व मूल्यांकन रुब्रिक हे तीन प्रमुख भाग आहेत. प्रत्येक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमाची ध्येये व क्षमता देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पुढील कृती केली.

कृती क्र.४ : विकासक्षेत्र, ध्येय निश्चिती

हे मूल्यांकन करण्यासाठी मी सर्वप्रथम विकासक्षेत्र, ध्येय निश्चित केले. त्यानुसार मूल्यांकनासाठी कोणत्या कृती घेता येतील त्यांची यादी तयार केली. कृतींची यादी तयार करत असताना पाठ्यक्रमाशी संबंधित व अभ्यासेतर कृती ठरवल्या.

अध्यापन करत असताना व अधूनमधून छोट्या छोट्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. उदा. स्वच्छतेचा संस्कार रुजवण्यासाठी जेवणाआधी व जेवणानंतर हात स्वच्छ धुण्याचे गाण्यासह प्रात्यक्षिक करून घेतले. शौचालयाचा योग्य वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.

CG-1 पोषक आहाराबाबत रुची व समज दर्शवितो, अन्न वाया घालवत नाही, या ध्येयासाठी मधल्या सुट्टीत मुलांनी आणलेल्या डब्यातील पदार्थाचे नाव, रंग, चव, पदार्थ कशापासून बनवला आहे याविषयी चर्चा केली. फास्ट फूड न खाण्याविषयी सांगितले. ताटातील सर्व अन्न संपवण्याविषयी सूचना देऊन निरीक्षण केले.

अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्रश्नातून सहजगत्या मूल्यांकन करता येणे शक्य आहे.

या पद्धतीने मूल्यांकन करत असताना अगदी हसतखेळत व तणावमुक्त वातावरण निर्माण केले. त्यामुळे मुलांनी मोकळेपणाने व उत्स्फूर्तपणे उत्तरे दिलीत, मत व्यक्त केले, भावना व्यक्त केल्या.

मूल्यांकनाचे निकष संच म्हणजेच रुब्रिक हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होय. त्यावरूनच विद्यार्थी त्या-त्या कृतीच्या संदर्भात नेमक्या कोणत्या क्षमतेत कोणत्या स्तरावर आहे हे लक्षात येते.

उदा. जर वि‌द्यार्थी जाणीवजागृती क्षमतेत पर्वत स्तरावर असेल तर तो आकाश स्तरावर जाण्यासाठी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे लक्षात येते. जर विद्यार्थी निर्झर स्तरावर असेल तर जास्त प्रयत्नांची आवश्यकता आहे, हे लक्षात येते.

कृती क्र. ५ : निकष संच (रुब्रिक) तयार करणे

मुलांसाठी निवडलेल्या कृती, मूल्यांकनाचे प्रश्न व रुब्रिक तयार करणे हे मोठे जिकिरीचे काम आहे, कारण हे करताना शिक्षकांच्याही क्षमतेचा कस लागतो.

परंतु नीट विचारपूर्वक अभ्यास केला तर हे काम खूप सोपे आणि आवडीने करू शकतो.

यासाठी मी निवडलेल्या कृती, मूल्यांकनाचे प्रश्न व रुब्रिक तयार करून घेतले.

उदा. CG-1 : बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात.

मूल्यांकनासाठी घेतलेली कृती/उपक्रम :

इंधनविरहित पाककृती - भेळ बनवणे.

अध्ययन निष्पत्ती : पाककृतींचा आधार घेऊन पौष्टिक न्याहरी/नाश्ता स्वतंत्रपणे बनवतो.

अध्ययन अनुभव : भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणून भेळ बनवतात. उदा. कुरमुरे, मटकी, कांदा, टोमॅटो, शेव, चाट मसाला, कोथिंबीर इ.

मूल्यांकन निकष संच :

 

क्षमतास्तर
निर्झरपर्वतआकाश
जाणीवजागृतीपोषिक घटकांचा समावेश नाही.काही पोषिक घटकांचा समावेश केला.सर्व पोषिक घटकांचा समावेश केला व इतरांनाही मदत केली.
संवेदनशीलतास्वच्छतेकडे दुर्लक्षआणलेले साहित्य वाया घालवले नाही.सर्व साहित्याचा योग्य व पुरेपूर वापर केला व इतरांनाही प्रवृत्त केले.
सर्जनशीलताअनुकरणाने भेळ बनवली.सर्व साहित्य योग्य प्रमाणात वापरले.भेळ आकर्षक पद्धतीने सजवली व इतरांनाही प्रोत्साहित केले.


या पद्धतीने मी स्वतः सर्व रुब्रिक बनवून घेतले. त्यामुळे मूल्यांकन करणे सुलभ झाले. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कमी वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच कृती न निवडता विद्यार्थ्यांचे गट केले व त्या गटासाठी एक कृती या पद्धतीने मूल्यांकन केले.

गटासाठी एक कृती घेतल्यामुळे मूल्यांकनात सुटसुटीतपणा आला. कोणता विद्यार्थी नेमका कोणत्या कामगिरी स्तरावर आहे, हे लक्षात आले. त्यामुळे पुढील सत्रातील अध्ययन-अध्यापनाची दिशा ठरवणे सोपे झाले. उपचारात्मक, सुधारणात्मक अध्ययन अध्यापनाला दिशादर्शक ठरले.

कृती क्र. ६ : स्वयंमूल्यांकन आणि सहाध्यायी मूल्यांकन

आपण केलेल्या कृतीचे स्वमूल्यांकन करणे आणि आपल्या मित्राचे/मैत्रिणीचे मूल्यांकन करणे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या मानाने तसे अवघड काम आहे. परंतु अवघड गोष्ट सोपी करून सांगणार नाही तो शिक्षक कसला? कठिणाकडून सोप्याकडे नेतो तोच खरा यशस्वी शिक्षक!

स्वयंमूल्यांकन आणि सहाध्यायी मूल्यांकनासाठी दिलेल्या स्माईलींच्या प्रिंट काढून त्या कृती झाल्यानंतर भरून घेतल्या. मुलांनी आनंदाने हसतखेळत भरल्या. कुठेही मुलांना जाणवले नाही की हे एक प्रकारे मूल्यांकन करत आहोत.

स्वयंमूल्यांकनामुळे मुले स्वतःच्या शिकण्याबद्दल जागरूक झाले. स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी घेऊन शिकण्यात गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न करतात. स्वयंमूल्यांकनामुळे शिकण्याची प्रेरणा मिळते. स्वतःच्या शिकण्याची प्रगती कितपत झाली हे पडताळून पाहू शकतात. सहाध्यायी मूल्यांकनामुळे विद्यार्थी मित्राला/मैत्रिणीला शिकण्यास मदत करतात. त्यांच्या अडचणी सोडवतात. तसे एकमेकांच्या मदतीने पुढे जातात. कारण समवयस्कांकडून मुले लवकर शिकतात.

या सर्व विवेचनावरून एकच लक्षात येते की, समग्र प्रगतिपत्रक हे एक असे साधन तंत्र आहे की ज्यामुळे मूल काय करू शकते किंवा काय करू शकत नाही हे मुलाला स्वतःला, सहाध्यायींना, पालकांना व शिक्षकांना समजण्यास मदत करते.

भविष्यवेधी शिक्षणासाठी विद्यार्थीकेंद्रित या मूल्यांकनाला कोणाचाच विरोध असू नये, असे मला वाटते. माझे सर्व शिक्षक बांधव या मूल्यांकन साधन तंत्राचा वापर आनंदाने, योग्य पद्धतीने करतील व बालकांच्या शिक्षणात एक नवीन आयाम निर्माण करतील, अशी आशा आहे.

- अंजली रमेश तांबे 

महानगरपालिका शाळा क्रमांक 86 पाथर्डी गाव, नाशिक 

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील मराठी माध्यमातून तृतीय क्रमांक प्राप्त निबंध)

4 comments:

  1. सोप्या भाषेत आणि प्रभावी मांडणी. सर्वांनाच HPC विषयी जाणून घेणे आहे. मात्र अंमलबजावणी बाबत साशंक आहेत... जसजसा काळ पुढे जाईल तसतसे स्पष्टता येईल... आपल्या लेखांतून निश्चितच शैक्षणिक वर्ष 25-26 निकाल जाहीर करण्यात लाभ होईल

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. 'समग्र प्रगतीपत्रक' या विषयी सर्व शंकांचे समाधान करणारे उत्तम विवेचन.. यामुळे शिक्षक सकारात्मकतेने या प्रक्रियेचा स्वीकार करतील आणि नवीन काही स्वीकारण्यापूर्वीची नकारात्मकता नक्कीच कमी होईल.

    ReplyDelete

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...