Saturday, 21 September 2024

ओझे नको, शिक्षण हवे

 ओझे नको, शिक्षण हवे

अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत एक सरधोपट विचार एव्हढाच केला जातो, की त्यातील कठीण किंवा ‘प्रगत’ समजला जाणारा भाग कमी करायचा, गुंतागुंतीचे विषय कमी करायचे. जे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच वेळी अनेक संकल्पनांचा आधार घ्यावा लागेल, परिचित उदाहरणांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल, बरेच स्पष्टीकरण लिहावे लागेल, असे प्रश्न परीक्षेत विचारायचेच नाहीत. मुले पूर्ण कविता लक्षात ठेवतील, असे गृहीत न धरता पाठ्यपुस्तकातील कविता प्रश्नपत्रिकेत पुन्हा छापून त्यावर ठरावीकच प्रश्न विचारायचे. ही यादी आणखीही वाढवता येईल. पण अशा उपायांमुळे अभ्यासाचे ओझे खरोखर कमी होते का? की नवीन, आव्हानात्मक काही शिकल्याचा आनंद नष्ट होऊन शिक्षण नीरस वाटायला लागते?

एखादी नवीन गोष्ट शिकताना बौद्धिक भार कशामुळे वाढतो, यावर बरेच संशोधन झाले आहे. एखादा घटक समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले पूर्वज्ञान विद्यार्थ्याकडे किती प्रमाणात आहे, तसेच तो घटक शिकताना एकाच वेळी त्याला किती गोष्टी प्रथमच किंवा नव्याने लक्षात घ्याव्या लागत आहेत, त्यानुसार शिकण्यातील ‘बौद्धिक भार’ कमीजास्त होतो. हा भार अवाजवी असू नये याची काळजी शैक्षणिक साहित्य तयार करताना, ते वर्गात वापरताना घ्यायलाच हवी. पण बौद्धिक भार हाताळणे हा शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग आहे. नव्या माहितीच्या तुकड्यांची नीट संगती लावून त्यांचा एक मानसिक आकृतिबंध कायमस्वरूपी लक्षात ठेवणे ही प्रक्रिया घडली, तरच खऱ्या अर्थाने शिक्षण झाले असे म्हणता येईल. शिकत असताना मुलांनी हे स्वतःच करणे अपेक्षित असते. ते करण्याची संधी त्यांना मिळाली नाही, तर ओझे नाही, पण शिक्षणही नाही, अशीच परिस्थिती ओढवते!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यातील अभ्यासक्रमाच्या ‘ओझ्या’बाबतची भूमिका स्पष्ट आहे – आशयाचे ओझे कमी करून क्षमतांचा विकास केला पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर मुलांना पांगुळगाडे देण्यापेक्षा त्यांच्या पायातील ताकद वाढेल, असे पाहिले पाहिजे. प्रत्येक विषयाच्या - विशेषतः सामाजिक शास्त्रांच्या  अभ्यासक्रमात जो निव्वळ माहितीचा आणि तपशीलाचा भरणा असतो, ते खरे तर शिक्षणातील ओझे आहे. तो भाग कमी करून, एका बाजूने मुलांना त्या त्या विषयातील मूलभूत, अत्यावश्यक संबोध शिकवणे आणि त्याच वेळी इतर संबोधांचा अभ्यास ते स्वतः करू शकतील, अशी त्यांची तयारी करून घेणे हा शिक्षणाचा गाभा असला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही विषयातील निव्वळ माहिती प्रचंड प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर ती मिळवणे, स्वतःजवळ साठवणेही सोपे झाले आहे. त्यासाठी तासन् तास यांत्रिक पाठांतर करण्याची गरज आता राहिलेली नाही. आपल्या समोर असलेल्या माहितीचा बरोबर-चूक, योग्य-अयोग्य, सुसंगत-विसंगत, उपयोगी-निरुपयोगी, खरी-खोटी असा विचार करता येणे ही यापुढील काळाची गरज आहे. त्यामुळे विश्लेषण, चिकित्सा, वेगवेगळ्या गोष्टींतील सहसंबंध पाहता येणे, नवीन विचार करता येणे अशा क्षमता यापुढील काळात अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी असणे अपेक्षित आहे. 

उदाहरणार्थ, इतिहासात नुसत्या सनावळ्या, व्यक्तींची नावे आणि घटनांची जंत्री, यापेक्षा त्या घटनांच्या मागील कारणे, त्या काळातील सामाजिक, आर्थिक व्यवस्था, भौतिक प्रगती, लोकजीवन, रीतिरिवाज आणि त्यांचे बरेवाईट परिणाम, त्याचा आजच्या काळाशी असलेला संबंध या सर्व बाजू समजून घेता येणे महत्त्वाचे. विज्ञानाच्या शिक्षणात एखाद्या प्रश्नाचा स्वतः पद्धतशीर शोध घेता येणे, त्यासाठी स्वतःची निरीक्षणे, अनुमान नोंदवता येणे, स्वतःचे निष्कर्ष काढता येणे आणि ते वैज्ञानिक कसोट्या लावून तपासता येणे महत्त्वाचे. गणितातील अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले, तर एकोणतीसचा पाढा घडाघडा म्हणता येण्यापेक्षा नऊ आणि वीस असे सोपे पाढे एकत्र करून त्या ‘अवघड’ पाढया’तील कोणतीही संख्या पटकन मिळवता येते, ही उमज महत्त्वाची!  

तपशीलाचे ओझे कमी करायचे म्हणजे अभ्यासाचे तास कमी करायचे, शिकण्याची प्रक्रिया कमी मेहनतीची करायची, असा अर्थ काढणे फार चुकीचे ठरेल. अभ्यासाला पुरेसा वेळ द्यावाच लागेल, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यासाठी स्वतः अधिक चित्त घालून काम करावे लागेल. पण अर्थपूर्ण आणि शाश्वत शिक्षणासाठी त्याला काही पर्याय नाही.


- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १४ ऑगस्ट २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...