Saturday, 7 September 2024

माध्यमभाषा - अडचण की आधार?

 माध्यमभाषा - अडचण की आधार?

शाळेत मुले फक्त भाषेच्या वर्गातच भाषा शिकतात असे नाही. कोणताही विषय शिकताना त्या त्या विषयासाठी लागणारी भाषा, परिभाषाही शिकावी लागते. मुलांची मातृभाषा आणि शाळेतील माध्यमभाषा या जर खूप वेगळ्या असतील, तर सगळेच विषय शिकण्यात अडचणी येतात. मुलांचे प्राथमिक शिक्षण शक्यतो मातृभाषेत व्हावे अशी मूळ भूमिका असली, तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि पर्यायाने या अडचणींचा सामना करणाऱ्या शिक्षक-विद्यार्थ्यांची वाढती संख्या, हे वास्तव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वीकारलेले दिसते. त्यामुळे त्यांत माध्यमभाषेच्या वापराविषयी बरीच लवचीक भूमिका घेतलेली आहे. मात्र त्याकरता आणखीही काही उपाय करणे फायदेशीर ठरेल.

बालवाडी आणि पहिली-दुसरी या पायाभूत स्तरावर सुरवातीला मुलांना स्वतःच्या भाषेत व्यक्त होऊ द्यावे आणि नंतर हळूहळू माध्यमभाषेकडे वळवावे; आधी भरपूर तोंडी काम करून मग अक्षरओळख करून द्यावी अशी अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात पुरेसे तोंडी काम होण्याआधीच लेखनावर जोर दिला जातो. जी प्रक्रिया सावकाश, मुलांच्या कलाने, गतीने पण खात्रीशीररीत्या व्हायला हवी, ती झटपट ‘रिझल्ट्स’ घेण्यासाठी घाईघाईने, सक्तीने उरकली जाते. अनेकदा पालकांनाही मुलांची लेखी कामगिरी पाहण्याची घाई झालेली असते. मात्र हे लेखी काम पूर्णपणे माध्यमभाषेतच होत असल्याने मुलांची घरची भाषा, त्या भाषेत संवाद, गप्पागोष्टी, मुलांच्या अभिव्यक्तीला वाव वगैरे आदर्श बासनातच राहतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना इंग्रजीचे वलय जपणे महत्त्वाचे वाटत असल्याने तसेही एकूण मुलांच्या घरच्या भाषेला काहीच महत्त्व दिले जात नाही. मराठी शाळांतील ‘सेमी-इंग्लिश’ व्यवस्थेत गणित-विज्ञान इंग्रजीतून शिकवतानाही पुन्हा इंग्रजीतील लेखी काम आणि त्याचे पाठांतर यावरच भर दिला जातो. 

कोणताही विषय शिकताना मुलांच्या बौद्धिक, वैचारिक विकासाकरता मुलांनी स्वतः निरीक्षण आणि वर्णन करणे, प्रश्न विचारणे, स्वतः अधिक माहिती मिळवणे, शोध घेणे, इतर मुलांशी, शिक्षकांशी चर्चा करणे, स्वतः केलेल्या प्रकल्प, प्रयोगांवर सादरीकरण करणे अशा अनेक भाषिक कृती करणे गरजेचे असते. पण प्रत्यक्षात मात्र इयत्ता आणि विषयांची गुंतागुंत वाढत गेली, की अशा कृतींचे प्रमाण वाढत जाण्याऐवजी कमीच होते आणि शिकणे-शिकवणे ठरावीक साचेबंद प्रश्नोत्तरांभोवती फिरत राहते. त्याची कारणे अनेक असली, तरी मुलांना (आणि काही वेळा शिक्षकांनाही) माध्यमभाषेतून या सर्व भाषिक कृती करताना येणाऱ्या अडचणी हे त्यातले एक महत्त्वाचे कारण आहे. खरे तर माध्यमभाषा हे  शिकण्याचे साधन आहे, तर ते शिकणाऱ्याच्या सोयीचे, त्याला मदत करणारे हवे. त्यासाठी काही व्यावहारिक उपाय करता येतील.  

- किमान प्राथमिक स्तरावर तरी, शाळा कोणत्याही माध्यमाची असो, मुलांना वर्गात आणि परीक्षेतही त्यांच्या स्वतःच्या भाषेत किंवा इंग्रजी-मराठी अशा मिश्र भाषेत व्यक्त होण्याची पूर्ण मुभा दिली पाहिजे: वेगवेगळ्या विषयांवरचे सोपे, आकर्षक असे भरपूर साहित्य मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत वाचायला दिले पाहिजे.

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठी माध्यमात वैकल्पिक तत्त्वावर ‘सेमी-इंग्लिश’ घेण्याची म्हणजे गणित, विज्ञान इंग्रजीत शिकण्याची सोय आहे; त्याच धर्तीवर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही ‘सेमी-मराठी’ घेण्याची म्हणजे इतिहास, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे, कला यांसारखे विषय स्थानिक भाषेत - मराठीत शिकता येण्याचा विकल्प दिला पाहिजे. मुलांनी स्वतः परिसरात क्षेत्र-भेटी देऊन, लोकांशी बोलून, त्या विषयावरचे उत्तम साहित्य वाचून, छोटे प्रकल्प, उपक्रम करून जर आपल्या सभोवतालचा इतिहास, भूगोल, सांस्कृतिक वारसा, लोककला, लोकविज्ञान हे सर्व समजून घ्यायचे असेल, तर त्यासाठी त्यांच्या परिचयाच्या, त्यांच्या परिसरातल्या भाषेचा वापर करणे केव्हाही अधिक चांगले! मग शिकण्यात भाषेचा कृत्रिम अडसर राहणार नाही. शिवाय या निमित्ताने इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मराठीच्या अध्यापनाला वजन येईल हाही एक फायदा त्यात आहे.

- याखेरीज पुढील शिक्षणासाठी किंवा इतर कारणांनी मुलांना कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही एका किंवा अधिक विषयासाठी वेगळे माध्यम निवडायचे, बदलायचे झाले, तर तशीही तरतूद केली पाहिजे. या लवचिकतेमुळे अनेक भाषांत सक्षमपणे काम करू शकणारे विद्यार्थी घडवण्याचे उद्दिष्टही साध्य होऊ शकेल.


- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २४ जुलै २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...