Saturday, 27 April 2024

 

माझ्या मनातली का तेथे असेल शाळा?

(प्रसिद्ध विधी-सल्लागार अतुल सावंत यांच्या रोजनिशीतील रविवार, ता. ७ जानेवारी २०३५ रोजीची नोंद)   

मी ज्या शाळेतून बारावी झालो, त्या छत्रपती संभाजीनगरच्या रविकिरण प्रशालेला भेट देऊन आजच गुरुग्रामला परत आलो. अठरा वर्षांनी झालेल्या या भेटीत मला दिसलेला शाळेतील बदल चकित करणारा होता.  

मंगळवारी मला रविकिरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुचरिता सानप मॅडमचा फोन आला होता, “अतुल, तू या शनिवारी आपल्या शाळेतल्या आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी बोल.” “एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या विधि-सल्लागाराकडे शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगण्यासारखे काय असू शकते?” मला प्रश्नच पडला होता. “दर शनिवारी एक माजी विद्यार्थी त्याच्या क्षेत्रातल्या व्यवसायाच्या संधींबद्दल माहिती देत असतो. यावेळी तू ‘कायद्याच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर बोल. नाही म्हणू नकोस.” सानप मॅडमना ‘नाही’ म्हणणे मला शक्यही नव्हते.  

शनिवारी मी ठरल्याप्रमाणे शाळेत गेलो. माझ्या लक्षात आले की त्या दिवशीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच ठरवलेले होते. वेगवेगळ्या विषय मंडळांचे उपक्रम, बागकाम, तज्ज्ञांच्या मुलाखती, व्यवसाय मार्गदर्शन असे या कार्यक्रमांचे स्वरूप होते. माझ्या व्याख्यानानंतर कायद्याच्या क्षेत्रातील करिअर, वेगवेगळे कायदे, त्यांची अंमलबजावणी, न्यायप्रक्रिया यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाळेबद्दलची माझी उत्सुकतासुद्धा वाढली. सर्व शाळा मी फिरून तर पाहिलीच, पण माहितीही घेतली.  

आठ गाभा विषय, त्यांच्याखालील शेकडो वैकल्पिक विषय आणि त्यांच्या निवडीतील लवचिकता ही नवीन शिक्षणपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. नवीन शिक्षणपद्धतीत प्रज्ञावान विद्यार्थी त्यांना गती असलेल्या विषयाचा एक किंवा दोन इयत्ता पुढचा अभ्यासक्रम शिकू शकतात. शाळेत प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वर्गखोली असते. वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थी त्या त्या विषयाच्या वर्गखोल्यांत जातात. वर्गखोल्यांत सिंगल डेस्क आणि खुर्च्या असल्यामुळे त्या त्या तासाच्या अध्यापन-पद्धतीनुसार (उदाहरणार्थ, व्याख्यान, प्रात्यक्षिक, गटचर्चा किंवा गटकार्य, इत्यादी) बैठक व्यवस्था बदलणे सोपे जाते.

गाभा विषयांसाठी कार्यभारानुसार पूर्णवेळ शिक्षक नेमले जातात. इतर विषयांसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मानधन तत्त्वावर नेमणूक केली जाते. परिसरातील उद्योग, महाविद्यालये, विद्यापीठ आणि इतर संस्थांतील तज्ज्ञ अतिथी-शिक्षक म्हणून शाळेत येतात. सॉफ्टस्किल्सबाबत व्यवस्थापनशास्त्र आणि मानसशास्त्र या क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. इंटर्नशिप हे व्यवसाय शिक्षणाचे अनिवार्य अंग असते.

परिसरातील गरजा लक्षात घेऊन रविकिरण प्रशालेने आठवी ते बारावीसाठी पर्यटन, आतिथ्य, पाककला आणि ऑटोमोबाइल या क्षेत्रांतले व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कलाशिक्षणात शिल्प, उपयोजित कला, नाट्यविद्या; तर शारीरिक शिक्षणात कबड्डी, खो-खो, फूटबॉल, धावणे आणि मल्लखांब यांची निवड केली आहे. सहावी ते आठवीसाठीच्या वैकल्पिक विषयांसाठी एकेक सत्राची अनेक छोटी मोड्यूल आहेत.

शाळेत सहावीपासूनच हिंदी आणि संस्कृत या द्वितीय भाषा म्हणून शिकण्याची सोय आहे. उर्दू शिकल्यामुळे शायरी, गजल आणि रुबाई या काव्यप्रकारांची समज वाढायला मदत होते, म्हणून शाळेने नववी किंवा अकरावीपासून उर्दूचा दोन वर्षांचा वैकल्पिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. मन्सूर शेख हे सोमवार ते शुक्रवार नववी-अकरावीसाठी एक आणि दहावी-बारावीसाठी एक, याप्रमाणे दोन तास उर्दू शिकवतात. यापुढे सहावीपासूनच एक वैकल्पिक भाषा म्हणून उर्दू शिकवायचा शाळेचा विचार आहे.

प्रत्येक विषयासाठी किमान ९० टक्के उपस्थिती आवश्यक असते. त्यापेक्षा कमी उपस्थिती असल्यास जादा अभ्यास करून ती भरून काढावी लागते. नाहीतर परीक्षेला बसता येत नाही. बोर्डाने मागणीनुसार परीक्षा, पुस्तकासह परीक्षा, श्रेयांक, अशा अभिनव पद्धती सुरू केल्या आहेत. शाळास्तरावरील विषयांच्या तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिकांच्या मूल्यमापनासाठी बोर्डाने नेमलेल्या बाह्य परीक्षकांच्या पॅनलमधूनच परीक्षक नेमले जातात. मूल्यमापनात अप्रामाणिकपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आणखी दहा वर्षांनंतरची शाळा कशी असेल याचे हे कल्पनाचित्र आहे. ते वास्तवात येण्यासाठी गरज आहे ती अभ्यासक्रमात एकूणच भरपूर लवचिकता आणण्याची, अध्ययनाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडण्याची, विषयांच्या कौशल्यांवर भर देण्याची, विद्यार्थ्यांमधील कुतूहलवृत्ती कायम जागी ठेवण्याची, विद्यार्थी आणि शिक्षक यांना स्वातंत्र्य देण्याची आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणाची.

-डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १७ एप्रिल २०२४)

Wednesday, 24 April 2024

 टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन, आणि आपली क्रिएटीव्हिटी

सतराव्या शतकात इंग्लंडमधे थॉमस सेव्हरी नावाचा इंजिनियर वाफेच्या इंजिनाचं पेटंट मिळवण्यासाठी धडपड करत होता. त्यानंतर दीडशे वर्षांनी भारतात पहिली रेल्वे (मुंबई - ठाणे पॅसेंजर १८५३ साली) सुरु झाली. अमेरिकेत एटी-ऐन्ड-टी कंपनीनं १९४६ साली मोबाईल सेवा सुरु केली. त्यानंतर पन्नास वर्षांनी, ऑगस्ट १९९५ मधे पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी भारतातला पहिला ‘मोबाईल' कॉल केला. ‘आयफोन सेव्हन’ अमेरिकेत सप्टेंबर २०१६ मधे लाँच झाल्यानंतर एका महिन्यात, म्हणजे ऑक्टोबर २०१६ मधे भारतात विक्रीसाठी उपलब्ध होता.

या तीन उदाहरणांतून आपल्या असं लक्षात येईल की भारताबाहेर, युरोप किंवा अमेरिकेत लागलेल्या शोधांचा भारतात प्रत्यक्ष उपयोग केला जाण्याचा वेळ झपाट्यानं कमी होतोय. वाफेच्या इंजिनाला दीडशे वर्षं, मोबाईल फोनला पन्नास वर्षं, आणि आता ‘आयफोन’सारख्या लेटेस्ट फोनला फक्त एक महिना! एका बाजूनं ही तंत्रज्ञानातली प्रगती आपल्याला सुखावत असली तरी, त्याची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

ज्या देशांमधे तंत्रज्ञान विकसित झालं, नवनवे शोध लागत गेले, त्या देशांची ती त्या-त्या वेळची गरज बनली होती. नवीन तंत्रज्ञान, नवीन उपकरणं प्रत्यक्ष वापरण्याआधी त्यापूर्वीचा टप्पा तिथल्या लोकांनी पार पाडला होता. त्यामुळं, नवनवीन उपकरणं हाताळण्यात एक प्रकारचा सराईतपणा आणि त्या टेक्नॉलॉजीचे फायदे-तोटे समजण्याची नैसर्गिक प्रगल्भता (मॅच्युरिटी) आपसूक विकसित झाली होती. भारतासारख्या देशात मात्र, फक्त जागतिकीकरण, प्रचंड मोठी बाजारपेठ, आणि माहितीच्या साधनांची उपलब्धता यांमुळं नवनवीन तंत्रज्ञान चक्क येऊन आदळत गेलं. त्यासाठी ‘मॅच्युअर’ होण्याची सोडा, साक्षर होण्याचीसुद्धा संधी लोकांना मिळाली नाही. त्यामुळं जमेल तसा वापर करत आपण हा तंत्रज्ञानाचा विकास अंगावर घेत गेलो, घेत आहोत.

उदाहरणार्थ, पूर्वी घरामधे लॅन्डलाईन टेलिफोनसुद्धा सर्रास दिसत नसत. ज्यांच्या घरी किंवा ऑफीसमधे असे फोन होते, त्यांनी फोन वापराच्या काही सवयी किंवा मॅनर्स अंगी बाणवले होते. अशांच्या हातात मोबाईल फोन आले तेव्हा त्यांचा वापर बऱ्यापैकी मॅच्युअर्ड पध्दतीनं होत होता. पण ज्यांनी टेलिफोनच सोडा, कधी पोस्टानं पत्रसुद्धा पाठवलं नव्हतं, अशा लोकांच्या हातात थेट मोबाईल फोन आणि ई-मेल आल्यामुळं खरोखर गोंधळ माजलाय. या गोष्टींचे सगळे फायदे मान्य केले तरी त्याबरोबर होणारा गैरवापर आणि नुकसानसुद्धा दुर्लक्ष करण्याइतकं क्षुल्लक नाहीये, एवढं नक्की.

हे उदाहरण अगदीच साधं होतं. प्रत्यक्षात मुद्दा असा आहे की, टेक्नॉलॉजी, विशेषतः ऑटोमेशन, हे उपलब्ध आहे म्हणून वापरायचं की गरज असेल तरच वापरायचं? ज्या देशात लोकसंख्या कमी आहे, त्यामुळं कुठल्याही इंडस्ट्रीत काम करण्यासाठी माणसं कमी मिळतात, किंवा कच्च्या मालापेक्षा मजुरीवर जास्त खर्च करावा लागतो, अशा ठिकाणी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करून ऑटोमेशनचे पर्याय शोधून काढणं योग्य ठरेल. पण एकदा ऑटोमेशनचं तंत्र किंवा पर्याय उपलब्ध झाला की, जिथं त्याची फारशी गरज नसेल त्या देशात आणि उद्योगातसुद्धा ते वापरलं जातं. याला ‘पॅसिव्ह ऐप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी’ म्हणता येईल.

उदाहरणार्थ, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरूण बेरोजगार कुशल/अकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. मग पन्नास-शंभर लोकांचं काम एकजण करू शकेल किंवा आपोआप होईल, अशा टेक्नॉलॉजीची आपल्याला गरज आहे का? सामाजिकदृष्ट्या अशी गरज नसली तरी, गुंतवणूकदारांच्या किंवा उद्योजकांच्या दृष्टीनं अशी गरज आहे. एक तर, ऑटोमेशनमुळं कुठल्याही उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि वेळही कमी लागतो. मॅन्युअल कामामधे व्यक्तींवर (त्यांचं कौशल्य, ताकद, स्वभाव, भावना, इच्छा, प्रकृती, इत्यादी अनेक गोष्टींवर) अवलंबून रहावं लागतं. ऑटोमेशनमुळं उत्पादन प्रक्रियेवर मालकांचं नियंत्रण वाढतं. या वेगवान आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी खर्चही तुलनेनं कमी येतो. साहजिकच, अधिक नियंत्रित आणि फायदेशीर व्यवसायाच्या दृष्टीनं ‘ऑटोमेशन’ ही उद्योजकांची गरज आहे. आणि आज जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानामुळं हे सगळे पर्याय त्यांना सहज उपलब्धही आहेत.

आता ही परिस्थिती समजून घेतली तर, ऑटोमेशन अटळ आहे हे आपल्या लक्षात येईल. मग कामगारांच्या हितासाठी, सामाजिक समतेसाठी वगैरे ऑटोमेशनला विरोध करून, आंदोलनं करून काहीही उपयोग नाही, हेसुद्धा आता आपण मान्य केलं पाहिजे. ज्या गोष्टीमुळं निश्चित फायदा होणार आहे (उदाहरणार्थ, ऑटोमेशन), ती गोष्ट आज ना उद्या इंडस्ट्रीत वापरायला सुरु होणार, हे जितक्या लवकर आपण मान्य करू तेवढं आपल्याच फायद्याचं राहील. सामाजिक/राजकीय दबाव आणून आपण या गोष्टी फार काळ टाळू शकणार नाही. मग त्यापेक्षा आपण आजपासूनच तयारी ठेवणं उत्तम.

ही तयारी ठेवायची म्हणजे नक्की काय करायचं? आजपर्यंत ज्या उद्योगांमधे, कामांमधे ऑटोमेशन आल्यामुळं नोकरी-व्यवसायाच्या संधी कमी झाल्यात किंवा नाहीशा झाल्यात, त्या क्षेत्रांची माहिती तर आपल्याला आहेच. उदाहरणार्थ, बँकेमधे पूर्वी एका दिवसात पाचशे कस्टमर फक्त कॅश काढण्यासाठी येत होते. त्यांच्यासाठी सहा ते सात कॅशियर पूर्ण दिवसभर काउंटरमागे बसून राहत होते. आज एटीएम आणि कार्ड पेमेंटमुळं अशा कस्टमरची संख्या पाचशेवरून पन्नासवर आलीय आणि त्यासाठी एक कॅशियरसुद्धा पुरेसा आहे. आता कॅश काउंटर हाताळणारे इतर पाच-सहा लोक एका क्षणात बेरोजगार आणि (इतर कामांसाठी) अकुशल ठरले. इतरही जवळपास सर्व बँकांमधे ऑटोमेशन झाल्यामुळं त्यांना कॅशियरची नोकरी मिळणार नाही आणि इतर कामासाठी आवश्यक कौशल्यही त्यांच्याकडं असणार नाही.

या उदाहरणानुसार, इथून पुढं बँकेत कॅशियरच्या कामासाठी नोकरीच्या संधी कमी असणार, हे समजून त्यानुसार शिक्षण व कौशल्य विकासात बदल करणं आवश्यक आहे. पण ‘आज’ शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या मुलांसाठी एवढाच विचार पुरेसा नाही. त्यांना तर अशा कामांचा अंदाज आजच बांधायचा आहे, जी पुढच्या १०/१५/२० वर्षांत ऑटोमेशनच्या आवाक्यात येऊन पूर्णपणे बदलतील.

असा अंदाज लावणं तशी सोपी गोष्ट नाही. गेल्या पन्नास-शंभर वर्षांमधे कित्येक अनपेक्षित कामं आणि क्षेत्रं ऑटोमेशनखाली आली आहेत. पण एक गोष्ट या सगळ्यांत समान दिसून येते. ती म्हणजे, वारंवार तेच-तेच त्याच पद्धतीनं केलेलं काम पटकन ऑटोमेट होऊ शकतं. उदाहरणार्थ, निरनिराळ्या कस्टमरनी जमा केलेले चेक किंवा स्लिप तपासून त्यांना त्यावर लिहिलेली रक्कम मोजून देणं, हॉटेल किंवा दुकानांमधे ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणं यादी बनवून हिशोब करणं, ठराविक डिझाईनच्या साचेबद्ध वस्तूंचं उत्पादन करणं, इत्यादी. ही उदाहरणं आज ऑटोमेशन झालेल्या क्षेत्रातली असली तरी त्यावरुन भविष्यात ऑटोमेशन होऊ शकणाऱ्या कामांचा अंदाज लावता येईल.

आज मोठ्या प्रमाणावर बीपीओ (बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग) क्षेत्रात व्हॉईस (कॉल सेंटर) आणि नॉन-व्हॉईस (डेटा एन्ट्री) स्वरुपाची कामं उपलब्ध आहेत. पण थोडा विचार केला तर, ही दोन्ही प्रकारची कामं ऑटोमेशनखाली येऊ शकतात हे लक्षात येईल. कॉल करणाऱ्या व्यक्तीचा आवाज, शब्द, आणि अर्थ ओळखून प्रतिसाद देणारी ‘व्हॉईस रेकग्निशन सिस्टीम’ मार्केटमधे उपलब्ध आहेच. जास्तीत जास्त भाषा, बोलीभाषा, शब्दसंग्रह, वाक्यांची उदाहरणं, यांचा समावेश या टेक्नॉलॉजीमधे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. अशीच डेव्हलपमेंट ‘ओसीआर’ (ऑप्टीकल कॅरेक्टर रेकग्निशन) तंत्रातसुद्धा होत आहे. टाईप केलेले जवळपास सगळे फॉन्ट आतापर्यंत ओसीआर टूलमधून वाचता येतात. शिवाय हातानं लिहिलेला मजकूरदेखील बऱ्यापैकी वाचून आपोआप टाईप करून मिळतो. (टीप - हा हस्तलिखित सात पानांचा लेख ‘ओसीआर’ टेक्नॉलॉजी वापरून थेट वर्ड फाईलमधे कन्व्हर्ट केलेला आहे. नंतर त्यामधे थोड्याफार दुरुस्ती/सुधारणा केलेल्या आहेत.) व्हॉईस रेकग्निशन आणि ओसीआर तंत्रामुळं व्हॉईस आणि नॉन-व्हॉईस प्रोसेसमधल्या नोकऱ्या कित्येक पटीनं कमी होणार, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे.

रस्त्यावर चौकाचौकात सिग्नलवर लावलेले कॅमेरे आणि त्यात काढलेल्या फोटोवरून थेट घरी येणारी नियमभंगाच्या दंडाची पावती, हे ट्रॅफीक पोलिसांच्या कामाचं ऑटोमेशन आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून फक्त एक आकडा दाबून घरगुती गॅस सिलिंडर बुक करता येण्याच्या सोयीमुळं गॅस एजन्सीतल्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. इंटरऐक्टीव्ह ई-लर्निंग सॉफ्टवेअर आणि टॅबलेट, तसंच गुगल आणि विकीपिडीया यांच्या सहज उपलब्धतेमुळं, दरवर्षी तेच-तेच धडे, त्याच-त्याच कविता, तीच-तीच प्रमेयं शिकवणाऱ्या शिक्षकांची गरजही भविष्यात कमी होत जाणार आहे. ‘ऑनलाईन’ आणि 'कॅशलेस’ या दोन संकल्पनांच्या वावटळीत एकसुरी आणि पुन्हा-पुन्हा करायची कामं माणसांच्या हातून सुटून मशिन किंवा कॉम्प्युटरच्या पदरात जाऊन पडत आहेत, पडणार आहेत. त्यासाठीच्या संशोधन, प्रयोग, विकास, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खाजगी उद्योगांइतकेच सरकारी क्षेत्रातही प्रयत्न आणि गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येईल.

आजच्या घडीला भारतात कुशल-अकुशल कामगारांचं प्रमाण ५ टक्के विरुद्ध ९५ टक्के इतकं व्यस्त आहे. त्यात नवनवीन तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनची भर पडून, आजचे कुशल कामगार पटकन ‘अकुशल’ ठरत चाललेत. उद्या नोकरी शोधायला बाहेर पडलो तर काय ‘स्किल्स’ लागतील याचा आज अंदाज येत नाहीये. उद्या भारतात एखादा ऑनलाईन बिझनेस सुरू केला, तर स्पर्धा अमेरिकेतल्या गुगल आणि फेसबुकशी असू शकेल. अगदी अगरबत्ती बनवायचा व्यवसाय सुरु केला तरी चीनशी स्पर्धा करण्याची तयारी ठेवावी लागेल, अशी परिस्थिती आहे.

मग आज शिक्षण घेत असलेल्या पुढच्या पिढीनं शिकायचं तरी काय? कशाकशाची तयारी त्यांनी करून ठेवायची? अशी कोणती कामं असतील, जी काही झालं तरी ऑटोमेशनखाली येणार नाहीत? खरं तर आजच्या विद्यार्थ्यांपेक्षा आजच्या शिक्षकांपुढचं हे मोठं आव्हान आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आपण जे शिकलो ते आजच कालबाह्य झालंय. मग अजून दहा-पंधरा वर्षांनी मार्केटमधे उतरणाऱ्या या मुलांना काय शिकवायचं, जे त्यांना त्यापुढची तीस-पस्तीस वर्षं टिकून राहायला आणि प्रगती करायला उपयोगी पडेल?

कॅलक्युलेटर आणि कॉम्प्युटरपासून गुगल मॅप्स आणि युट्यूबपर्यंत सगळी अद्ययावत साधनं आजच लीलया हाताळणाऱ्या या पिढीला काही शिकवायचंच असेल तर ते इतिहास, भूगोल, गणित, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, नक्कीच नाही! त्यांना शिकवायची आहे - दूध आणि पाणी वेगळं करू शकणारी विचारपद्धती. त्यांना शिकवायची आहे - योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची युक्ती. त्यांना शिकवायची आहे - कुठल्या कामासाठी कुठलं तंत्रज्ञान वापरायचं आणि कुठलं वापरायचं नाही हे ओळखण्याची शक्ती. त्यांना शिकवायचं आहे - माणसांचं काम हलकं, सोपं, अचूक, आणि उपयुक्त होईल असं डिझाईन बनवण्याचं कौशल्य…

‘क्रिएटीव्हिटी’ या गोष्टीचं कधीच ‘ऑटोमेशन’ नाही होऊ शकणार. दिवसाला पाचशे गाड्या बनवणारी कंपनी ऑटोमेशन करुन दिवसाला दोन हजार गाड्या बनवू शकेल, पण कमीत कमी किंमतीची, जास्तीत जास्त ऐव्हरेज देणारी, शून्य प्रदूषण करणारी गाडी कशी बनवायची, हे कुठल्या तरी माणसालाच (किंवा माणसांच्या समूहाला) बसून, विचार करून ठरवावं लागेल. एका मिनिटात एका कागदाच्या दोनशे कॉपी काढणारं मशिन मिळू शकेल, पण त्या कागदावर काय लिहायचं हे कुठल्या तरी सुपिक डोक्यातनंच यावं लागेल. या क्रिएटीव्हिटीला कधीही मरण नाही, कितीही ऑटोमेशन झालं तरी.

आता प्रश्न असा आहे की, अशी क्रिएटीव्हिटी सगळ्यांकडं कशी असणार? आणि असे क्रिएटीव्ह कामाची गरज असणारे जॉब कितीसे आणि कुठं असणार?

झालंय काय, गेल्या कित्येक वर्षांत झापडबंद शिक्षण आणि साचेबद्ध कामाच्या पद्धतींमुळं आपला सगळ्यांचाच स्वत:च्या क्रिएटीव्हिटीवरचा विश्वास उडालाय. आपण हुशार असू शकतो, कष्टाळू असू शकतो, सिन्सियर आणि लॉयल असू शकतो, पण आपण ‘क्रिएटीव्ह’ मात्र कदापि असू शकत नाही, असं आपल्याला ठामपणे वाटतं. क्रिएटीव्ह माणूस वेगळाच दिसतो; तो क्लीन-शेव्ह न करता दाढी वाढवतो, भांग पाडण्याऐवजी लांब केसांचा ‘पोनी’ बांधतो, फॉर्मल शर्टऐवजी लांब कुर्ते घालतो, आणि ऑफीस बॅगऐवजी ‘शबनम’ घेऊन फिरतो, असं काहीतरी आपल्याला वाटतं. (ही काल्पनिक लक्षणंसुद्धा क्रिएटीव्ह ‘पुरुषां’बद्दलचीच आहेत, कारण ‘क्रिएटीव्ह’ आणि 'बाई' या दोन गोष्टींची एकत्रित कल्पनासुद्धा करणं आपल्याला शिकवलेलं नाही.) त्यामुळं ‘क्रिएटीव्हिटी’ या शब्दाची आपल्याला एकंदरीतच ऐलर्जी आहे.

प्रत्यक्षात, प्रत्येक मूल जन्मजात क्रिएटीव्हच असतं हे आपण विसरतोय. घरातून, शाळेतून, समाजातून ‘हे करू नकोस', 'तसं बोलू नकोस’, ‘असा विचारसुद्धा करू नकोस’, असं 'शिक्षण' आपण मुलांना देत असतो. हे शिक्षण देणं थांबवलं तर त्यांची क्रिएटीव्हिटी आपोआप विकसित होत जाईल आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी ते स्वतःच मार्ग शोधतील. त्यांना क्रिएटीव्हिटी ‘शिकवण्याच्या’ भानगडीत न पडणंच चांगलं! गेल्या काही पिढ्यांपासून आपण उत्पादन आकड्यांमधे आणि यश रुपयांमधे मोजायला इतके सरावलो आहोत की, आता ही क्रिएटीव्हिटी कशात मोजायची हा यक्षप्रश्न आपल्यासमोर उभा ठाकेल. त्यापेक्षा आपण या मुलांची विचार करण्याची शक्ती, ऊर्मी, आणि चुकांमधून शिकण्याची धडपड, या गोष्टींना फक्त प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे. उद्या आपली नोकरी टिकेल की नाही, याची खात्री नसलेल्यांनी मुलांच्या वीस वर्षांनंतरच्या करीयरमधे लुडबूड करणं थांबवलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्यासाठी, प्रयोगातून शिकण्यासाठी त्यांना पूरक वातावरण दिलं पाहिजे.

इतकी वर्षं औद्योगिकीकरणाच्या लाटेत वाहत आपण फक्त ठरवून दिलेल्या प्रोसेसप्रमाणं ‘प्रॉडक्शन’ करत राहिलो. आता या सगळ्या सिस्टीमचीच पुनर्रचना करण्याची वेळ आलीय, त्यामुळं सांगितलेलं काम करणाऱ्यांपेक्षा स्वत: विचार करून बदल घडवू शकणाऱ्यांना भविष्यात मोठी मागणी आणि खूप काम असणार आहे. माणसांच्या मुलभूत गरजा, जगण्याची क्वालिटी, या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आपण लाखो-करोडो वस्तूंचं उत्पादन करत राहिलो आणि त्यालाच आयुष्याचं ध्येय मानत गेलो. आता ऑटोमेशनमुळं, हे उत्पादनाचं पुन्हा-पुन्हा करायचं तेच-तेच काम आपोआप परस्पर होत राहील आणि खरंखुरं क्रिएटीव्ह, उपयोगी, ‘मानवी’ काम करायला माणूस पुन्हा मोकळा होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.


-मंदार शिंदे

E-mail: shindemandar@yahoo.com

Saturday, 20 April 2024

माध्यमिक स्तरावरील विषय-योजनेचे स्वप्न

 माध्यमिक स्तरावरील विषय-योजनेचे स्वप्न    

महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता पाहता तिच्याकडे शासन, प्रशासन आणि शिक्षणक्षेत्रांतील अभ्यासक यांचे खूपच दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शासन आणि प्रशासन यांचे प्रशासकीय अडचणी दूर व्हाव्यात एवढ्यापुरतेच माध्यमिक शाळांकडे लक्ष असते, तर अभ्यासकांचे कार्यक्षेत्र अनेक कारणांमुळे पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि उच्च शिक्षणापुरते सीमित झाले आहे. यामुळे निर्माण झालेली पोकळी व्यापारी संस्थांनी व्यापली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाची दिशाच भरकटली आहे. या दुरवस्थेतून बाहेर पडण्यासाठी शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याकडे एक सुसंधी म्हणून पाहता येईल.  

शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात दिलेली विषय योजना (१) भाषा, (२) कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण, (३) सामाजिक शास्त्रे, आंतरशाखीय विषय/पर्यावरण, (४) गणित आणि विज्ञान अशा चार गटांत विभागलेल्या गाभा विषयांभोवती रचलेली आहे. नववी-दहावीसाठी पहिल्या गटातील तीन भाषा आणि उरलेल्या तीन गटांतील सात गाभा विषय, असे दहा विषय अनिवार्य असतील. अकरावी-बारावीत पहिल्या गटातील दोन भाषा आणि उरलेल्या गटांपैकी किमान दोन किंवा तिन्ही गटांतील चार किंवा पाच विकल्प विद्यार्थ्यांनी निवडणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रम आराखड्यात चारही गटांतील गाभा विषयांखाली विविध विकल्पांच्या सूचक याद्या दिल्या आहेत. शास्त्रीय संगीत, शिल्पकला, लोकचित्रकला, क्रीडा आणि पोषक आहार, मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, धान्योत्पादन, किरकोळ सेवा, भूशास्त्र, भारतीय ज्ञानप्रणाली, पत्रकारिता, ही या याद्यांतील विकल्पांची काही उदाहरणे. अभ्यासक्रम तयार झाल्यावर त्यांत आणखी भर पडेल आणि पडत राहील. विकल्पांची निवड करताना विद्यार्थ्यांनी त्यांची वैयक्तिक आवड, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी विकल्पांची उपयुक्तता आणि विकल्प शिकल्यामुळे उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या संधी, या बाबींचा विचार करावा. नव्या क्षेत्रांतील विकल्प शिकताना विद्यार्थ्यांकडे पुरेसे पूर्वज्ञान नसेल तर त्यावरील छोटी छोटी मोड्यूल तयार करण्यात यावीत; ती सेतू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.  

नववीपासूनच विकल्पांच्या निवडीत लवचिकता यावी आणि संपूर्ण माध्यमिक स्तराचेच स्वरूप बहुशाखीय व्हावे, यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन स्तरांऐवजी नववी ते बारावीपर्यंतचा माध्यमिक शिक्षणाचा चार वर्षांचा एकच सलग स्तर असावा, अशीही अभ्यासक्रम आराखड्यात शिफारस केली आहे. या बदलासाठी दहा वर्षे सुचवली असली, तरी तो शक्य तितक्या लवकर करणेच विद्यार्थ्यांच्या हिताचे होईल. या विषय-योजनेमुळे नवीन अभ्यासक्रमात कला, वाणिज्य, विज्ञान अशा शाखा असणार नाहीतच, पण त्याचवेळी विद्याविषयक विषय आणि व्यवसाय शिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयांत स्पष्ट विभाजनही असणार नाही. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण हे शाळापातळीवरील मूल्यमापनाचे विषय असले तरीही इतर विषयांइतकेच गांभीर्याने शिकवले जावेत आणि दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकांत सर्वच विषयांची विषयांची संपादणूक एकाच पद्धतीने दाखवली जावी, हे अतिशय महत्त्वाचे आहे.  

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या विषय-योजनेचा प्रमुख उद्देश आहे. बहुभाषिकत्व, आंतरशाखीय दृष्टिकोन, विषयांच्या निवडीतील लवचिकता, कला, क्रीडा, आणि विविध विषय यांतील एकात्मीकरण, अशी वैशिष्ट्ये असलेला अभ्यासक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे हे शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, संस्थाचालक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण या क्षेत्रांतील विकल्प शिकण्यासाठी सर्वच शाळांमध्ये आवश्यक सुविधा आणि शिक्षक उपलब्ध करून द्यावे लागतील. ‘विद्याविषयक’ गाभा विषयांखालील विकल्पांसाठीसुद्धा अशीच व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थ्यांनी निवडलेले विकल्प त्यांना शक्यतो त्यांच्या शाळेतच शिकायला मिळावेत, यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. ते शक्य नसेल तरच इतर शाळांची आणि शिक्षकांची मदत घ्यावी. ‘माहितीवर कमी आणि क्षमतांवर अधिक भर’ या तत्त्वाचे पालन होईल, हे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके बदलताना तज्ज्ञांनी कटाक्षाने पाहायला हवे.

माध्यमिक स्तरावरील बहुशाखीय विकल्पांचा हा पट एक स्वप्नच वाटावा एवढा विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे. पण विद्यार्थिहितासाठी हे स्वप्न साकार करावेच लागेल. त्यावर खूपच काम करावे लागेल; त्या बाबतीत मागे हटून, तडजोड करून चालणार नाही.

-डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १० एप्रिल २०२४)

Wednesday, 17 April 2024

गृहपाठ हवाच, विपर्यास नको

 गृहपाठ हवाच, विपर्यास नको

 राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये चौथीपर्यंतच्या वर्गांना शाळांनी गृहपाठ देणे बंद करण्याबाबत विधान केले होते. परिणामी शिक्षण वर्तुळात त्याबाबत बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर शिक्षणतज्ज्ञ विचार करून पुढील दिशा ठरवतील इतपत ती चर्चा थांबली. अलिकडेच राज्यपाल रमेश बैस यांनी देखील एका कार्यक्रमात शाळांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना गृहपाठ देऊ नये असे म्हटले आहे. अनेक प्रगत देशांतील शाळांमध्येही गृहपाठ दिले जात नाही. मात्र ऐतिहासिक वारसास्थळे, गड किल्ले, नद्या, उद्याने इत्यादींना क्षेत्रभेटी देऊन शिक्षकांनी ती गरज भरुन काढण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. मुलांना मोबाईलपासून दूर कसे करता येईल याचा शिक्षकांनी विचार करावा, नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारताना गृहपाठ व अभ्यासाचा ताण कसा कमी करता येईल या बाबींचा अंतर्भाव करण्यास राज्यपालांनी सुचविले आहे. जबाबदार व्यक्तींकडून अशी विधाने आल्यानंतर शाळेतील गृहपाठ हा विषय ऐरणीवर येणे स्वाभाविकच आहे. याविषयावर सर्वच माध्यमे आणि शिक्षकांमध्ये साधकबाधक चर्चांना सुरुवात झाली आहे. 'त म्हणता तलवार समजून टोकाची भूमिका घेणारा ' बराच मोठा वर्ग आपल्याकडे अस्तित्वात आहे. विद्यार्थी, पालक आणि काही अंशी शिक्षकही त्यास अपवाद नाहीत. आता गृहपाठच बंद होणार इतक्या टोकाचा विपर्यास तत्काळ डोकावू लागला. असे होणे तितकेसे योग्य ठरणार नाही.  

      गृहपाठ, स्वाध्याय, घरचा अभ्यास, होमवर्क, सेल्फ स्टडी , असाईंमेंट, हया एकाच अर्थाच्या परंतू सूचक असे वेगळेपण दाखविणाऱ्या विद्यार्थीकेंद्री, आनंददायी, उत्स्फूर्त अशा कृतींमधील परमोच्च आनंदाची गाठभेट विध्यार्थ्यांना घडवून देण्याची जबाबदारी प्रत्येक विषय शिक्षक, पालक, वर्गमित्र, समाज या सर्वांची आहे. शिक्षकांचे अभ्यास घटकांचे कल्पक नियोजन, विध्यार्थी सहभाग मिळविण्याचे कसब, पालकांशी सुसंवाद राखून अध्ययन अध्यापनाचा समतोल साधणे अत्यंत महत्वाचे आणि जिकिरीचे सुद्धा आहे. कारण वर्गातील प्रत्येक मुलाची अभिक्षमता, आवड निवड, आर्थिक परिस्थिती, स्वभाव, वैगुण्ये, मर्यादा, गुणविशेष आणि बुद्ध्यांक सगळेच भिन्न आहेत. 

     नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांकडून इयत्ता सहावीपासूनच विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्ये ओळखणे, त्यांचा परिपोष करणे, त्यात आवड निर्माण करणे आणि उद्योजकता मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणे अभिप्रेत आहे. भाषा, संख्याज्ञान, कला, छंद, तंत्रज्ञान, परिसर यांची गृहपाठाशी डोळस सांगड घालणारे शिक्षकच धोरणातील तरतुदींना न्याय देऊ शकतील. त्यासाठी त्यांनीं स्वतःच अद्ययावत राहण्याची गरज भासणार आहे. कारण चॅट-जीपीटी, कोडींग, झपाट्याने सर्वच क्षेत्राला दंड थोपटून गवसणी घालणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकालची शाळकरी मुले लिलया हाताळताना दिसत आहेत. केरळच्या शाळेत ए आय टीचर सुद्धा दाखल झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षणात ६०/४० % प्रमाणात अनुक्रमे ऑफलाईन + ऑनलाईन धोरण स्वीकारले जात आहे. शाळेतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परिणामी अध्यापनासाठी मिळणारा मर्यादित वेळ आणि साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती यांचा मेळ घालणे प्रचंड आव्हानात्मक ठरत आहे. ते पूर्ण करण्यासाठी बदलत्या काळातील गृहपाठाची संकल्पना अमुलाग्रपणे बदलत जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी शिक्षकांना स्वतःस आंतरबाह्य बदलावे लागणार आहे.          

 "शिक्षकांनी वर्गाध्यापनच इतके दर्जेदार करावे की मुलांना कोणत्याही गृहपाठाची गरजच उरू नये, गृहपाठाच्या कारणास्तव दफ्तराचे ओझेही वहावे लागू नये "असे शिक्षण मंत्री केसरकर यांचे मत होते. 

  मुळात अशी विधाने का बरे यावीत? यामागील कोणती नकारात्मक पार्श्वभूमी राज्यपाल आणि शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मतांमधून प्रतिबिंबित होताना दिसते? याचा विचार केला असता एक प्रांजळ कबुली ' गृहपाठ ' हया एकूणच प्रकरणाशी संबंधित सर्वचजण देतील. ती म्हणजे उठसूठ चार पाच वेळा हे लिहून आणा, धड्याखालचे प्रश्न लिहून आणा, वर्कबुक पूर्ण करा, अनाकलनीय घोकंपट्टी करुन हे तोंडपाठ करा, असे न केल्यास धाकधपटशा वा कठोर शिक्षा करुन, सारखे तेचतेच टूमणे लावून एक प्रकारे सावकारी वसूली धोरण कुचकामी ठरत आहे. गृहपाठ आणि तो पूर्ण न केल्यास शिक्षा ही भिती मुलांच्या मनात तिटकारा निर्माण करते. याची दुसरी बाजू म्हणजे संध्याकाळी दमूनभागून आलेल्या पालकांचा गृहपाठ या टास्कवर नको तितका हस्तक्षेप हेही आहे. मुलांमधील सर्जनशीलतेला पुरेपूर वाव मिळेल यासाठी गृहपाठ हे उत्तम माध्यम आहे. मात्र पालकांनादेखील आपण एक सुलभक असायला हवे या अपेक्षित भूमिकेचा विसर पडतो. यातून मुलांच्या बुद्धीचातुर्याचा, कलागुणांचा, भावनिक विकासाचा कंगोरा दुर्लक्षिला जातो. मुलांचा घरचा अभ्यास कोणी घ्यायचा? कधी घ्यायचा ? यावरून घरोघरी शीतयुद्धाची परिस्थिती पाहायला मिळते. जेमतेम आठवी किंवा दहावीपर्यंत पालक गृहपाठ या विषयावर सजगता दाखवू शकतात. पुढे मात्र पालकांचे हात टेकले जातात आणि मग उगम पावते ती कोचिंग क्लास संस्कृती. 

    वर्गात आपण प्रत्येक विषयाचे जे काही शिकलो त्याचा दैनंदिन जीवनात कुठे कसा उपयोग होतो? हे ज्यातून मुलांमध्ये मर्मदृष्टी विकसित करेल ते सर्वच काम म्हणजे गृहपाठ असा सरळ साधा अर्थ लावला की गृहपाठाचा हेतू सुफळ संपूर्ण होईल. समजले की आवडते, आवडले की पुनरावृत्ती करावीशी वाटते, असे झाल्यास विषय घटकाचे दृढीकरण होते आणि शिकण्यातील आनंद गवसू लागतो. त्यातुन किती क्षमता विकसित होऊ शकल्या हे पाहता येण्यासाठी गृहपाठ हा एक चांगला पर्याय आहे. अलिकडे खुली पुस्तक परीक्षा पद्धती स्वीकारण्याचा विचार पुढे येत आहे. तो पाठ्यपुस्तकात ही अंतर्भूत असल्याचे लक्षात येईल. त्या अर्थाने गृहपाठाचे मूल्यांकन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अविभाज्य हिस्सा आहे. म्हणून गृहपाठ हवाच आहे. 

 इतिहासातील एखादा रोमांचक प्रसंग शिक्षकांनी वर्गात सांगितल्यानंतर ग्रंथालयात जावून त्यावरील आणखी साद्यंत माहिती मिळविण्याची उत्सुकता वाढली पाहिजे. ती कुठे कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल, किंवा सुट्टीत गावी जाताना हया ठिकाणाला कशी प्रत्यक्ष भेट देता येईल याविषयी ओघवत्या शब्दात सांगता येईल. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील अनेक घटना, नाट्यप्रसंग साभिनय करवून किंवा दृकश्राव्य पद्धतीने वर्गात घेतल्यास संवाद वाचन, लेखन, नृत्य, अभिनय, कथाकथन याची जोड देता येईल. वर्गात शिकलेल्या भौमितिक आकृत्या, सूत्रे, प्रमेय, विविध आकाराच्या वस्तू, त्यांची क्षेत्रफळे घर, मैदाने, शेतात, रस्त्यावर, वर्गात, रोजच्या कामात आवर्जून बघण्याची डोळस वृत्ती विकसित करु शकतो. तेच वस्तू खरेदी विक्री करताना, किराणा दुकानात, बँक किंवा बाजारात गणिती क्रियांचा कसा, कुठे आणि किती उपयोग होतो हे ध्यानी येऊ लागेल. 

   वानगीदाखल अनेक धडपड्या, नाविन्यपूर्ण उपक्रमांनी मुलांना शाळा, अभ्यास, विषय आणि गृहपाठाची गोडी निर्माण करणारे सृजनशीलतेचे हात लाभलेले शिक्षक इतरांना दिशादर्शक ठरत आहेत. सोलापूरच्या श्री समर्थ विद्यालयातील राजकिरण चव्हाण आपल्या आयकॉनिक क्लबच्या माध्यमातून प्रत्येक मुलाची खासियत ओळखून त्यांना त्यांच्या आदर्श क्षेत्रातील उत्तमोत्तम व्यक्ती आणि संस्कारांची नाळ जोडण्याचे काम करतात. ते वारली पेंटिंगचे नुसते रेखाटन शिकवून थांबत नाहीत तर त्या चित्र शैलीतील भावबंध मुलांना उलगडून दाखवतात. दहिवडीच्या शाळेतील बालाजी जाधव सरांनी मोडी लिपीचा परिचय करून देत थेट शिवकालीन दस्तावेज काय सांगतात हे मुलांकरवी वदवून दाखविले आहे. मालवणच्या गणेश विद्यालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतरही बालवर्गातील मुलांना अक्षरांचा लळा लावणाऱ्या मुख्याध्यापिका मेघना जोशी अक्षरांच्या रंजक कविता रचून अभ्यासातील नादमाधुर्य आणू पाहतात. त्यांचा 'अक्षरांच्या कविता ' हा काव्यसंग्रह बालसाहित्य आणि बालवाडीतील शिक्षणाचा मानबिंदू ठरावा इतका सुरेख आहे. बीडच्या उमेश खोसे या प्राथमिक शिक्षकांनी बोलीभाषेत पाठ्य पुस्तकांचा अनुवाद करुन प्रमाण भाषेचा वापर करताना येणारा न्यूनगंड घालविण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. बारामतीच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील वर्षा गायकवाड या विज्ञान शिक्षेकेने मुलांना 'स्वयंपाक घरातून संशोधनाकडे ' या प्रकल्पातून विज्ञानाभुती देण्याचा आगळावेगळा प्रयोग केला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर शाळेच्या समुपदेशिका प्रज्ञा बापट यांनी परिसरातील पब्जि, ब्यू व्हेल इत्यादी घातक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यातील व्यसनाधिन मुले आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधुन मुलांमधील डिजिटल इंटेलिजन्स अभ्यासात कामी आणले आहे. पुण्यातील आपटे प्रशालेच्या हर्षा पिसाळ यांनी दैनंदिन तासिकेत एक ते दोन मिनिटांच्या प्रकट वाचन प्रकल्पाचा प्रयोग केला आहे. अतुल सवाखंडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्पाबद्दल गैरसमज दुर करण्याचा धाडसी प्रयोग केला आहे. तर कृष्णात जाधव यांनी विद्यार्थांच्या मदतीने वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वर्तमानपत्राच्या सहाय्याने रद्दीतून ग्रंथालय बनवून शेकडो पुस्तकांचे दालनच उभे केले आहे. डॉ. शिवानी लिमये यांनी उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या इतिहास विषयातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी क्षेत्रभेट ही पद्धती वापरली आहे. 

 उपक्रमशील शिक्षक आणि गृहपाठाधारीत प्रयोगांची यादी भली मोठी होईल. 

       गृहपाठ देण्याची, त्याचे मूल्यमापन करुन सातत्याने नोंदी ठेवण्याची शिक्षकांची एक स्वतंत्र स्वायत्त भूमिका अबाधित कशी राहील? त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक प्रत्यक्ष सहवासात कसे राहू शकतील याची खबरदारी प्रशासन आणि सरकारने घेतली पाहिजे. नुसताच मूल्यमापनाचा वरपांगी दिखावा करु नये. असर सारख्या अहवाल प्रसिध्दी नंतर गुणवत्ता, त्याला जबाबदार असणारा शिक्षक आणि शाळा किती रसातळाला गेल्या आहेत असा गळा काढून काहीच हासिल होणार नाही. शिक्षकांना आधी नीट शिकवू द्या, वर्गव्यवस्थपनाचे सूत्रधार राहू द्या. परीक्षाच नको ते घ्या आता परीक्षा, नापासच करायचे नाही पासून आता पुन्हा पाचवी आणि आठवीला ढकलगाडी बंद करा, तद्वत गृहपाठ नको पासून तो तर घ्यावाच लागेल अशा धरसोड वृत्तीने देशाचे शैक्षणिक कंबरडे मोडले आहे. गरज आहे ती विपर्यास थांबविण्याची, शिक्षक, विद्यार्थी संवाद वाढविण्याची, शिक्षकांच्या मुक्त अध्यापन स्वायत्तेतेची. त्यांच्याशी सल्लामसलत न करता कुठलीही संकल्पना शेखचिल्ली अविर्भावात राबविणे राज्यकर्त्यांनी आता थांबवावे.


-जयवंत कुलकर्णी (शिक्षक समुपदेशक, गांधी बाल मंदिर हायस्कूल, कुर्ला)(

पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ १६ मार्च २०२४)

Saturday, 13 April 2024

मागाल तेव्हा, मागाल त्या विषयाची परीक्षा

  मागाल तेव्हा, मागाल त्या विषयाची परीक्षा  

विहान दहावीत शिकत होता. त्याला वाचायला आणि लिहायला खूपच आवडायचे. दहावीचे वर्ष असूनही फक्त परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यास कर, टीव्ही पाहू नकोस, खेळू नकोस, मित्रांशी गप्पा करू नकोस, अशी बंधने त्याच्यावर नव्हती. मराठी, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचे दहावीचे पेपर आपण देऊ शकू, असे त्याला ऑगस्टमध्येच वाटायला लागले. त्याचे शिक्षकसुद्धा त्याला म्हणाले, “तुझी या विषयांची तयारी झाली आहे. मग उगीच या पेपरांचं ओझं मनावर का ठेवतोस? ‘मला या विषयांची परीक्षा द्यायची आहे’, असं तू बोर्डाला शाळेमार्फत कळव. इतर विषयांची तयारी करणं तुला सोपं जाईल. परीक्षेबाहेरचं वाचनही करता येईल.” विहानने तसेच केले. बोर्डाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातल्या तारखा कळवल्या. या तारखांना विहान परीक्षा केंद्रावर गेला. वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या छापील प्रती केंद्रावरच संगणकातून कशा काढल्या जातात, या कामात गोपनीयता आणि पारदर्शकता कशी राखली जाते, विविध केंद्रांवर आयोजित झालेल्या एकाच विषयाच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची काठिण्यपातळी समान कशी असते, यांबद्दलची बोर्डाच्या संकेतस्थळावर दिलेली माहिती विहानने वाचली होती. परीक्षा केंद्रात परीक्षा देणारे इतरही विद्यार्थी विहानबरोबर होते. पण प्रत्येक दिवशी विहानच्या खोलीत किंवा केंद्रावर तेच विद्यार्थी असायचे असे नाही. पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर होता, तर दुसऱ्या दिवशी मराठीचा. पहिल्या दिवशी त्याच्या बरोबर इंग्रजीचा पेपर देणारी क्षितिजा त्याला दुसऱ्या दिवशीही केंद्रावर दिसली; पण ती त्याच्या खोलीत नाही, तर दुसऱ्या एका खोलीत गणिताचा पेपर देत होती. तीन विषयांचे हे पेपर दिल्यानंतर विहानला गणित, विज्ञान आणि हिंदी या तीनच विषयांची तयारी करायची होती. दरम्यानच्या काळात ऑक्टोबरमध्येच विहानला सप्टेंबरमध्ये दिलेल्या पेपरांचे गुण समजले होते. ते छानच होते. त्याच्या मनावर आता उरलेल्या परीक्षेचे फारसे दडपण नव्हते. या पेपरांसाठी मंडळाकडून वेगळ्या तारखा मागून न घेता, मार्च महिन्यात ज्यावेळी दहावीची सार्वजनिक परीक्षा झाली त्यावेळीच ते विहानने दिले.


“असेसुद्धा घडू शकते?” या प्रश्नाचे उत्तर, “हो, नक्कीच.” असेच आहे. २०२०च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बोर्डांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांत ज्या महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्यांत ‘मागणीनुसार परीक्षा - On-Demand Examination’ ही एक आगळीवेगळी सुधारणा आहे. भारताबाहेर युनायटेड किंगडम, सिंगापूर, न्यूझीलंड या देशांतही अशी व्यवस्था आहे. भारतातसुद्धा ‘मागणीनुसार परीक्षा’ आयोजित करणारे एक बोर्ड आहे; ते म्हणजे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग; NIOS. हे बोर्ड इतर परीक्षा मंडळांप्रमाणे वर्षातून दोनदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करत असतेच; पण त्याबरोबरच NIOSकडे नोंदणी केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची तयारी असेल, त्यांच्यासाठी त्यांच्या मागणीनुसार परीक्षाही आयोजित करते. सीबीएसई, आयसीएसई आणि विविध राज्य मंडळे यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ही परीक्षा NIOSने खुली ठेवली आहे. NIOS हे इतर बोर्डांच्या मानाने दुर्लक्षित बोर्ड असल्यामुळे त्यांच्या चांगल्या बाबीही दुर्लक्षित राहतात. पण ‘मागणीनुसार परीक्षा’ ही त्यांची व्यवस्था इतर बोर्डांनाही अनुकरणीय आहे.


‘मागणीनुसार परीक्षा’पद्धत सुरू करण्याआधी लेखी परीक्षेच्या सर्वच विषयांचे भरपूर प्रश्न असलेली एक प्रश्नपेढी तयार केली जाते. प्रश्नपेढीतील प्रत्येक प्रश्नाशी संबंधित विषय, घटक, तपासली जाणारी अध्ययन-निष्पत्ती, प्रश्नप्रकार (बहुपर्यायी/लघूत्तरी/दीर्घोत्तरी, इ.), काठिण्यपातळी, उत्तर लिहायला लागणारा वेळ, अशा तपशिलांची लेबले प्रश्नाला लावली जातात. प्रश्नपेढीतील प्रश्नांच्या लेबलांच्या आधारे आराखड्यानुसार विविध विषयांच्या अगणित प्रश्नपत्रिका तयार होऊ शकतात. अशा प्रश्नपत्रिका तयार करणारे सॉफ्टवेअर तयार करणे, पायलटिंग आणि सॉफ्टवेअरला अंतिम स्वरूप देणे, हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. प्रश्नपेढीचे सातत्याने अद्ययावतीकरण करावे लागते. या सर्व कामांत बोर्डाचे अधिकारी, अभ्यासू शिक्षक, विषयतज्ज्ञ, संगणकतज्ज्ञ यांच्यातील उत्कृष्ट समन्वय, गोपनीयता आणि त्याचवेळी पारदर्शकता या अत्यावश्यक बाबी असतात. महाराष्ट्राचे एसएससी बोर्ड हेसुद्धा एक सक्षम परीक्षा मंडळ आहे. त्यांना ‘मागणीनुसार परीक्षा’पद्धतीचे आव्हान कठीण वाटण्याचे काहीच कारण नाही.

- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, ०३ एप्रिल २०२४)

Wednesday, 10 April 2024

सर्जनशीलता कौशल्य विकसनात शिक्षकाची भूमिका

 सर्जनशीलता कौशल्य विकसनात शिक्षकाची भूमिका

 प्रचलित शिक्षण प्रणालीमध्ये ‘हे असंच पाहिजे’, ‘हेच बरोबर' हे धोरण असल्यामुळे चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करणे हे शिक्षकांना असाध्य वाटतं. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या साध्या साध्या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या तर त्या मागची दृष्टी बदलते आणि प्रसंगांचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात याची जाणीव होते. दोन ओळींच्यामध्ये किती आणि काय अर्थ दडला आहे हे ज्याला गवसले तो खरा प्रतिभा संपन्न होय. 

नवनिर्मितीचा आनंद मग तो प्रयोग करण्याचा वा चित्र रेखाटण्याचा असो की कविता करण्याचा वा विविधरंगी नात्यांच्या कॅलिडयोस्कोपचा सुलट्या भिंगातून बघायचा अथवा मोठा करून उपभोगायचा असो त्याची गंमत वेगळीच असते. ‘भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरु’ असे रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे. सर्जनशीलतेच्या विकासात शिक्षकांची भूमिका समजून घेण्याआधी आपण सर्जनशीलतेचा अर्थ घटक व विविध स्तर यांची माहिती घेऊ या. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या आवडी आणि क्षमतेनुसार वस्तूंची नवीन रचना किंवा वर्गीकरण करतो यालाच ब्रूनर सर्जनशीलता म्हणतो. सर्जनशीलतेमध्ये creative thinking, divergent thinking, productive thinking, adventurous thinking, lateral thinking म्हणजेच सर्जनशील, बहुदिश, उत्पादक, साहसी, वेगळ्या वाटेने जाणारे विचार यांचा समावेश होतो. वेबस्टरच्या न्यू वर्ल्ड डिक्शनरीनुसार ‘the ability to create’ अशी सर्जनशीलतेची व्याख्या केली आहे. नाविन्य असून उपयोगाचे नाही, ते उत्पादन वास्तव जीवनाशी समायोजन साधणारे हवे. मेंदू आधारित संशोधनामुळे तार्किकता व कल्पनारम्यता दोन्हींचा समन्वय साधणारी व्यक्ती सर्जनशील असते हे लक्षात आले. 

“ Successful people don't do different things, they do things differently”

हे वेगळेपण ज्याला गवसले त्याच्याकडे सर्जनशीलता असते. सर्जनशीलता या शब्दातील मूळ धातू सृज म्हणजे जन्मास घालणे, माझ्याकडून येणे हा आहे. चाकोरीबाहेरचा विचार यामध्ये अपेक्षित असतो १९५० साली प्रा.जे. पी. गिलफोर्ट यांनी सर्वप्रथम मांडलेल्या या संकल्पनेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो: समस्या संवेदन, पुनर्व्याख्या, पुनर्रचना- पुनर्मांडणी, स्पष्टीकरण आणि समस्यापुर्ती, विस्तार, मौलिकता, लवचिकता व प्रवाहित्व इ.

हॉवर्ड गार्डनर यांनी फ्रेंम्स ऑफ माईंड (१९८३) या पुस्तकात बुद्धिमत्तेचे आठ प्रकार मांडले आहेत. भाषिक बुद्धिमत्ता, गणिती/ तार्किक बुद्धिमत्ता, संगीतविषयक बुद्धिमत्ता, शारीर गतिविषयक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता असे ते प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीत विभिन्न प्रकारची बुद्धिमत्ता कमी जास्त स्वरूपात असते. दुसऱ्या भाषेत प्रत्येक व्यक्ती सर्जनशील असते. फक्त तिच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास होण्यासाठी अध्ययन अनुभव देण्यावर भर द्यावा, म्हणजेच शाळेत होणारी ‘हुशार’ व ‘ढ’ ही वर्गवारी थांबवून कोणत्या बाबतीत हुशार अशी वर्गवारी करावी.

सर्जनशीलतेचे तिच्या स्वरूपानुसार विविध स्तर पडतात –

 वैयक्तिक सर्जनशीलता ही व्यक्तीपरत्वे बदलते. जसे की खेळाडू आणि गायक. या प्रत्येकाची खेळण्याची पद्धती वा गायनाची शैली वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जण वेगळा असतो.

सामाजिक सर्जनशीलता म्हणजे समाजातील विशिष्ट समूहाने समाजाच्या विकासासाठी केलेली नाविन्यपूर्ण कृती. उदा. ऐतिहासिक वारसास्थळे जतन करण्यासाठी त्यांचा इतिहास दृकश्राव्य स्वरूपात समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करणे.

व्यावसायिक सर्जनशीलता या प्रकारात विविध व्यवसायानुसार नाविन्यपूर्ण योजनांची निर्मिती केलीजाते. उदा. फुटवेअर प्रक्रियेतील बदल किंवा बांधकाम क्षेत्रातील कमी जागेत अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणे. 

युगप्रवर्तक सर्जनशीलता यात वेगवेगळ्या कालावधीमध्ये लागलेले शोध व त्यामुळे झालेले बदल याचा समावेश केला जातो. उदा. छापखाना ते प्रिंटिंग प्रेस, न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध, वाफेच्या इंजिनाचा शोध, इत्यादी.  

सर्जनशीलता कौशल्य मुलांमध्ये विकसित व्हावे, यासाठी शिक्षकांची भूमिका पुढील प्रकारची असणे गरजेचे आहे. 

१) समुपदेशक: मुलांच्या प्रश्नांचा आदर करा. कुतूहल आणि जिज्ञासेपोटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. योग्य प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी विचारांना योग्य दिशा द्यावी. वर्गातील वातावरण मानसशास्त्रीय दृष्ट्या सुरक्षित ठेवावे. भाषाविविधता, शिक्षकांविषयी मोकळेपणा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. शिक्षकांनी अनपेक्षित प्रश्नांची मानसिक तयारी ठेवावी, तसेच प्रश्नांची उत्तरे कशी शोधावी? त्यासाठी आवश्यक कृती व प्रयोग करावेत. इंटरनेट आणि शब्दकोश यांचा वापर समजावून सांगावा. एखाद्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल, तर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन किंवा सहकारी शिक्षकांची किंवा काचफलकांमध्ये लावून पालकांची मदत घेता येईल. 

२) दूरदर्शी विचारकर्ता: मुलांच्या वेगळ्या कल्पनांचा आदर करा. उपक्रम आणि प्रकल्प देताना ते कशा पद्धतीने करता येतील, यासाठी आधी चर्चा करून ज्या कल्पना वेगळ्या आहेत त्यांची नोंद करून ठेवावी किंवा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, ‘वा! सुंदर ही कल्पना वापरून बघायला हवी’, नवीन विचार आहे, चाचणी करूया किंवा प्रकल्पाचे सादरीकरण करताना यात काही बदल करता येतील का, याचा विचार करा बरे, अशा सकारात्मक सूचना देऊन विविध पर्याय उपलब्ध करता येतील. 

३) संशोधक: मुलांनी सुचविलेल्या कल्पना अमूल्य आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. शिक्षकांनी मुलांच्या कल्पना ऐकताना त्यांना दाद देणे, एखाद्या कागदावर कल्पनेची नोंद करून घेणे, इतर मुलांना ऐकण्यास प्रवृत्त करणे, असामान्य कल्पना काच फलकात लावणे, त्यांना शाळास्तरावर प्रसिद्धी देणे, कल्पनेची व्यवहार्यता लक्षात घेऊन अंमलबजावणीसाठी वेळ देणे, त्यावर चर्चा घडविणे तसेच गरज पडल्यास आधीच्या नियोजनात बदल करून इतर पर्यायांचा विचार करणे. यामुळे आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण होऊन मुले मोकळेपणाने विचार मांडतील. 

४) मार्गदर्शक: मूल्यमापन विरहित सराव करून घ्यावा. मुलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला वाव देत असताना प्रारंभीच्या काळात मुलांच्या चुका निदर्शनास आणून देण्याची घाई करू नये. उदाहरणार्थ: मातीकाम, कागदकाम, रंगकाम, चित्रकला, प्रयोग, भाषिक अभिव्यक्ती इत्यादी. त्याने केलेल्या कृतींचा आनंद त्याला घेऊ द्या. समरसून, तल्लीन होऊन एखादे काम केले तर शिकण्याची प्रेरणा मिळते, म्हणून या टप्प्यावर मूल्यमापन विरहित सराव महत्त्वाचा असतो. अन्यथा चुका होऊ नये म्हणून मुले पुस्तकातले जसेच्या तसे उत्तर देणे, मोठ्या व्यक्तींची मदत घेऊन काम पूर्ण करणे यासारख्या गोष्टी करतात.

 ५) परीक्षक : वर्तन आणि प्रतिसादाचे मूल्यमापन यांचा संबंध जोडावा. वर्तन आणि परिणाम यांचा कार्यकारण भाव मुलांना समजावून दिल्यास स्वयं मूल्यमापनासाठी मुलं तयार होतात आणि नंतर शिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाचा त्यांना राग येणार नाही. शिक्षकांनी कोणत्याही प्रसंगात संदिग्ध शेरे देऊ नये. उदाहरणार्थ: वाचन करतो, पण कसे करतो योग्य आरोह-अवरोह, हावभाव याचा वापर करतो का, जोडशब्द वाचतो का, हे यातून कळत नाही. भरपूर माहिती व कल्पनाशक्तीचा विकास या दोन गोष्टींच्या जोरावर शिक्षक अध्ययन-अध्यापन प्रक्रिया रंजक करून सर्जनशीलतेचा विकास साध्य करू शकतो.

  सर्जनशीलता विकसन ही केवळ शिक्षकाची जबाबदारी नसून संपूर्ण शाळेचा त्यामध्ये सहभाग असायला हवा, त्यासाठी शालेय वातावरणात योग्य सुधारणा करून धमकी, धाक, दडपशाही यांचा वापर न करता विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त कशी लागेल यावर भर द्यावा, त्यासाठी पालकांचीही मदत घ्यावी. शाळेचे विविध उपक्रम ठरविणे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा अधिक घेता येईल, त्यांच्या कल्पनाशक्तीला कसा वाव मिळेल यासाठीचे वार्षिक नियोजन आधीच तयार करावे. शाळेचे प्रदर्शनी काचफलक विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. समजा शाळेमध्ये चार-पाच काच फलक असतील तर प्रत्येक फलक हा विद्यार्थ्यांना वाटून देऊन एका फलकावर निवडक बातम्या, त्या बातम्यांमुळे आठवलेली एखादी घटना, म्हण, वाक्प्रचार असे लिहून घ्यावे. दुसऱ्या फलकावर दिनविशेष मग तो साजरा करण्यासाठीच्या विविध कल्पना त्याही लिहायला सांगाव्यात. तिसऱ्या फलकावर विद्यार्थ्यांना पडलेले असामान्य प्रश्न आणि मग ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे सापडतील त्यांनी ती शिक्षकांकडे आणून द्यायची, तशाच प्रकारे चौथ्या फलकावर विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होता यावे यासाठी त्यांनी काढलेली व्यंगचित्रे, घोषवाक्य, कथा, कविता, किंवा विडंबन काव्य यासारख्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून करून त्या तिथे प्रदर्शनी भागात लावून घ्याव्यात किंवा शिक्षकांनी त्यांच्या कल्पकतेतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता विकसित होईल यासाठी विविध चातुर्य कथा असतील किंवा काही उद्योजकांनी त्यांना आलेल्या समस्या सोडवितांना त्या कशा प्रकारे सोडविल्या किंवा अपूर्ण कथा, अपूर्ण कविता किंवा इतर वैज्ञानिक समस्या, म्हणी, वाक्यप्रचार यावर आधारित विविध उदाहरणे त्यांना द्यावीत म्हणजेच ज्ञानरचनावादावर आधारित आनंददायी शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत.शिक्षकाची भूमिका ही Guide by a Side अशीच हवी, त्यासाठी त्यांनी सर्जनशीलतेची कास धरायला हवी. स्वविकासाबरोबर स्वतःच्या व्यवसायातील बदल आणि नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान आत्मसात करणे.ChatGPT, AI या साधनाचा उपयोग सर्जनशीलता विकसनात कसा करावा याचे ज्ञान मिळविणे हे ही अपेक्षित आहे. कारण हा एकच असा व्यवसाय आहे , ज्यामध्ये शिक्षकांचा संबंध उत्साह आणि प्रंचड जिज्ञासा असणाऱ्या निरागस मनाशी येतो. 

 एकविसाव्या शतकामध्ये विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता या कौशल्याच्या विकसनात शिक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे. समाजाच्या व राष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार हे काळाच्या प्रवाहासोबत नवविचारांचा स्वीकार करून सर्जनशील दृष्टिकोन धारण करतात. प्रत्येक विद्यार्थ्याची सर्जनशील शक्ती वेगळ्या प्रकारची असल्याने शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार करण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ: एखादा विषय मांडून त्याचे फायदे-तोटे, सकारात्मक व नकारात्मक बाजू यांचे वर्गीकरण करून त्यावर चर्चा घडवून आणणे महत्त्वाचे वाटते. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला कार्यप्रवण करण्यासाठी नाट्यीकरण, कविता लेखन, अभिवाचन, नृत्य, यांचा खुबीने वापर करण्याबरोबरच त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध सर्जनशील शक्तींमुळे कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ: अनुवाद, भाषांतर, व्हाईस ओव्हर, पॉवरकॉस्ट, ऑडिओ एडिटिंग, ब्लॉग लेखन, मार्केटिंग, इत्यादी बाबींचा यात समावेश करता येईल. 

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्यानुसार त्याला प्रोत्साहन देऊन, योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देता येईल. उदाहरणार्थ: चित्रकला, अभिनय क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक शिक्षण व संधींची ओळख करून देणे. याशिवायही वृत्तपत्र वाचन, दैनंदिन घडामोडी, यांचा वेगळा विचार करून अवलोकन करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या वेगळ्या विचारांचा सन्मान करून त्याला त्याच्या पद्धतीने काम करण्याची मुभा दिल्यास विद्यार्थी स्वतःची प्रतिभा व सर्जनशीलता ओळखून योग्य क्षेत्र निवडू शकतील. सृजन विचारांचे वाचन नक्कीच शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांची भूमिका यशस्वीपणे पार पाडतील यात शंका नाही.


-निता निवृती शेटे ( Ded, Bed ,Med, DSM )

उपशिक्षिका, न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, वडगाव मावळ, पुणे.

Mail ID: neetakhodade@gmail.com

Saturday, 6 April 2024

११-१२वीचे विद्यार्थी करतात तरी काय?

 ११-१२वीचे विद्यार्थी करतात तरी काय?  

महाविद्यालयांना जोडलेल्या अकरावी-बारावीच्या वर्गांत बहुतेक ठिकाणी विद्यार्थी फिरकतसुद्धा नाहीत, असा अनुभव आहे. अनेक महाविद्यालयांचे आणि विनाअनुदानित शाळांचे NEET, JEE, MHT-CET अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून देणाऱ्या शिकवणी केंद्रांबरोबर संधान असते. घटक चाचण्या आणि प्रात्यक्षिके एवढ्यापुरतेच विद्यार्थी वर्गांत येतात; एरव्ही शिकवणी केंद्रांतच असतात. अकरावी-बारावीतील गैरजेरीचे प्रमाण वेगळा विचार करावा लागेल इतके मोठे आहे.

हे गैरहजर विद्यार्थी वर्गाबाहेर करतात तरी काय? अकरावी-बारावीचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी बोलल्यावर पुढे येणारे चित्र खूपच चिंताजनक आहे. विज्ञान शाखेचे अनेक विद्यार्थी वर्गाच्या वेळेतच शिकवणी केंद्रांत जातात. इतर बहुतेक विद्यार्थी महाविद्यालयाच्या परिसरातच कॅंटीनमध्ये किंवा इतर कुठेतरी बसून आपसात गप्पा, मौज-मस्ती, स्मार्टफोनवर सर्फिंग, चॅटिंग, व्हिडिओ पाहणे अशा गोष्टींत वेळ घालवत असतात. प्रवेश एका गावात, तर वास्तव्य दूरवरच्या मुंबई, ठाणे, हैदराबाद, कोटा अशा शहरांत, असेही प्रकार ऐकिवात आहेत. या वयोगटात व्यसनाधीनता, दादागिरी आणि इतर समस्या आहेतच. ज्या वयात विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख व्हायला लागते, ज्या वयात त्यांनी भविष्याची स्वप्ने पाहायची असतात आणि ती साकारण्यासाठी प्रयत्न करायचे असतात, ज्या वयात त्यांची नैतिक मूल्ये पक्की व्हायला लागलेली असतात, त्या वयातच त्यांचे असे भरकटणे खूपच घातक आहे.  

विद्यार्थ्यांसमोर योग्य असे आदर्श उभे करण्यात, त्यांचे करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात, ते अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रमावेत असे वातावरण निर्माण करण्यात, त्यांचे शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था अपयशी ठरत आहेत, हाच याचा अर्थ. ही कोलमडलेली व्यवस्था नव्याने उभारायची असेल तर काय करावे लागेल? त्यासाठी शिक्षकांचे सखोल विषयज्ञान, विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळेल असे त्यांच्या सहभागातून आयोजित केलेले उपक्रम आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल वाटणारा जिव्हाळा, शिक्षणव्यवस्थेतील प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व हे सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. अकरावी-बारावीतील शिक्षणप्रक्रिया योग्य मार्गावर आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रामाणिक आणि नियमित तपासणीची पद्धत तातडीने सुरू करायला पाहिजे.

भारतासारख्या परीक्षाभिमुख शिक्षणव्यवस्था असलेल्या देशात अभ्यासक्रमांतील बदलांशी सुसंगत असे परीक्षापद्धतीतील बदल तेवढेच महत्त्वाचे असतात. भारताप्रमाणेच चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर या शेजारच्या प्रगत देशांतही सार्वजनिक परीक्षांना खूपच महत्त्व असते आणि तिथे त्या चांगल्या प्रकारे आयोजित होतात. या देशांकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील अनुपस्थितीचा एसएससी बोर्डाच्या बारावीच्या निकालावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही; उलट त्यात गेल्या बारा वर्षांत १२ टक्क्यांची वाढ होऊन २०२३मध्ये तो ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही समाधानाची नाही, तर चिंतेची बाब आहे. दहावीप्रमाणेच बारावीच्या परीक्षेतसुद्धा अप्रामाणिकपणे केलेले अंतर्गत मूल्यमापन, प्रश्नपत्रिकांचे अतिसुलभीकरण आणि जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे सपाटीकरण हे दोष आहेतच. परीक्षेची विश्वासार्हताच त्यांमुळे धोक्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशांच्या निवड प्रक्रियेसाठी परीक्षेतील गुण उपयोगी वाटत नसल्यामुळे MHT-CET ही चाळणी परीक्षा सुरू केली. आयसीएसई बोर्ड प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणारे अहवाल आपल्या संकेतस्थळावर टाकते. या अहवालांत प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, विद्यार्थ्यांच्या चुका आणि त्यांच्या मनांतील संभ्रम, अशा अंगांनी विश्लेषण असतेच; पण त्याबरोबरच शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे अभिप्रायसुद्धा असतात. त्याआधारे प्रत्येक प्रश्नाशी निगडित संबोध स्पष्ट व्हावेत, यासाठी विद्यार्थ्याना कोणते अध्ययन-अनुभव आणि कृती देण्यात याव्यात, याबद्दल शिक्षकांसाठी सूचना दिलेल्या असतात. बारावीच्या परीक्षापद्धतीतील दोष दूर करण्यासाठी एसएससी बोर्डालाही असे काही करता येईल. 

विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, मानसिक, नैतिक असा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर परीक्षापद्धतीसुद्धा विद्यार्थ्यांचे सर्वांगांनी मूल्यमापन करणारी असावी लागेल. २०२३च्या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यात याबद्दल तपशीलाने मार्गदर्शन केले आहे. हे साध्य करण्यासाठी शिक्षणव्यवस्थेतील निष्क्रियता आणि “शिक्षकांना हे जमेल का?”, “विद्यार्थ्यांना हे झेपेल का?” असा विचार करणारी, विद्यार्थ्यांचा विकास खुरटवणारी पराभूत मनोवृत्ती झटकून बोर्डाच्या परीक्षापद्धतीत बदल करणे, यापेक्षा चांगला आणि प्रभावी मार्ग असू शकत नाही.


- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २७ मार्च २०२४)

Wednesday, 3 April 2024

भाषेची शिस्त अन् अंतर्मनातील सहृदयता

 

शाळास्तरावर मराठी विषय सक्तीचा करण्यात आला. यानिमित्ताने नुकतेच ९० व्या वर्षात पदार्पण केलेले एक व्यासंगी आणि कुशल भाषा शिक्षक, मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या भाषिक व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख.


 भाषेची शिस्त अन् अंतर्मनातील सहृदयता


    अमानवी बुद्धिमत्तेने शब्दांच्या, तंत्र- भाषेच्या जोरावर मराठीचा पारंपरिक चेहरा कितीही बदलण्याचा प्रयत्न केला, भविष्यात मराठीचे कितीही परिणामकारक रूप आपल्याला वाचायला मिळाले, मोडतोड केली आणि जगासमोर मराठीचे नवे स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला तरीही विलक्षण भाषिक बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रदीर्घ वाचनातून, मननातून, चिंतनातून एक पक्व भाषिक समज असलेल्या-सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखकांकडून मराठी भाषेबद्दलचे विवेचन, चिंतन ऐकणे ही गोडी सदैव अवीट आणि आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे.

     रसाळसरांना ऐकताना, त्यांचा सहवास आणि परिचय लाभलेल्या तसंच लाभत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची हीच अनुभूती असणार आहे. वाचन-लेखन यांच्याबाबतीतली कठोर आणि अव्याहत शिस्त; मात्र व्यक्तिमत्त्वात कमालीची सहृदयता आहे. लेखन आणि वाचनात मग्न असताना कोणी भेटायला आलेल्या व्यक्तीशी तितक्याच आपुलकीने ते मनःपूर्वक संवाद साधतात. 

 भाषेचा विलक्षण समतोल, चित्तवेधक परंतु तितकाच संयत वापर, तर्कशुद्ध मांडणी, विवेचनाचा स्वाभाविक ओघ, मुद्देसूद, अत्यंत सूत्रबद्ध, पद्धतशीर आणि सुसंगत मांडणी, गरजेनुरूप विचारांमधील तितकीच तटस्थता, माणुसकी जपण्यातली तसंच स्वभावातली तितकीच सहृदयता, मनाचा निर्मळपणा,आणि स्नेह जपण्यातली बांधिलकी, हे सगळं एका लेखकाला सांभाळता येतं. याचा मानदंड रसाळ सर निर्माण करतात. ज्या विषयांवर सरांना बोलायचं आहे, लिहायचं आहे, त्या संकल्पनेचा नीटपणाने केलेले, जाणिवेत भर घालणारे आकलन, त्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू, त्या विषयाची पूर्वपरंपरा, पूर्वसूरींचे योगदान, एखाद्या लेखकाची नेमकी स्थान निश्चिती,वाङमयीन जगताचे सजग भान या साऱ्या गोष्टींची जाणीव सरांना ऐकताना आणि त्यांच्याशी बोलताना, लेखन वाचताना होत राहते. मराठीचा शिक्षक-प्राध्यापक कसा असावा? तर डॉ. रसाळ सरांसारखा आणि पुस्तकासारखंच माणसांवर विलक्षण प्रेम करणारा असा असावा. 

वाढत्या वयाच्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन अनेक लेखक लेखनिकांची मदत घेतात. राम शेवाळकर, रणजित देसाई, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, रा. रं. बोराडे सर आणि आत्ता नुकतंच निधन झालेले प्रभाकर मांडे सर अशा सर्वांनी वेळोवेळी लेखनिकांची मदत घेतलेली आहे. रसाळ सरांचं वयोमान ९२ वर्षं आहे. डोळ्यांची नैसर्गिक क्षमता कमकुवत होत चाललेली आहे. तरीसुद्धा लेखनाचे-वाचनाचे व्रत अखंड सुरू आहे. डोळ्यांच्या मर्यादेमुळे भिंगाच्या साह्याने ते वाचन करतात. स्मरणाचं कौशल्यही तितकंच नीटनेटके आहे. रसाळ सरांच्या व्यक्तिमत्त्वाला असे बहुविध पैलू आहेत. उदयोन्मुख आणि समकालीन लेखकांना आपुलकीने समजून घेत त्यांना लेखनाची दिशा देत, त्यांची दखल घेणारे आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे, ऋजूता जपणारे अनेकांचे चाहते, साहित्यात अत्यंत आदराचे, आदबीचे आणि अतिशय सौजन्यशील स्थान निर्माण करणारे आणि ते कसोशीने जपणारे ज्ञानधर्मी भाषाशिक्षक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना लिहित्या हातांना बळ देतात. त्यातून नवी उमेद उजागर होते. सरांच्या भेटीत उथळ गप्पांना वाव नसतो, ना कुणाविषयी कटुता असते. त्यांना भेटणाऱ्यांसाठी त्यांचं एक कुतूहल कायम राहिलेलं आहे ते म्हणजे-सध्या काय वाचत आहात? असा प्रश्न विचारण्यामागे त्यांचा हेतू वाचतं करणं-वाचनातलं सातत्य जपणं हा असतो. साहित्य आणि भाषा ही दोन टोकं नसतात तर ती परस्परपूरकच असतात, हेही जाणवत राहतं. बाळकृष्ण कवठेकर, ल.का. मोहरीर, डॉ.दासू वैद्य, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, यशवंत मनोहर या आणि अशा विविध साहित्यिकांच्या विद्यार्थी जीवनात सरांनी संस्कार केलेत. अनेक नव्या लिहित्या व्यक्तींना सरांचं सानिध्य अतिशय उमेद देणारे व प्रेरक ठरत आलेले आहे. प्रसिद्धीपासून कमालीचं अंतर बाळगणारे, वाड्.मयाची सखोल समीक्षा लिहिली जावी अशी वेळोवेळी अपेक्षा व्यक्त करणारे डॉ. रसाळ सर माणूसपण जपणारे एक थोर लेखक, एक श्रेष्ठ समीक्षक आणि एक थोर भाषा शिक्षक आहेत.

-डॉ.नागेश अंकुश

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...