Wednesday, 17 April 2024

गृहपाठ हवाच, विपर्यास नको

 गृहपाठ हवाच, विपर्यास नको

 राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये चौथीपर्यंतच्या वर्गांना शाळांनी गृहपाठ देणे बंद करण्याबाबत विधान केले होते. परिणामी शिक्षण वर्तुळात त्याबाबत बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर शिक्षणतज्ज्ञ विचार करून पुढील दिशा ठरवतील इतपत ती चर्चा थांबली. अलिकडेच राज्यपाल रमेश बैस यांनी देखील एका कार्यक्रमात शाळांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना गृहपाठ देऊ नये असे म्हटले आहे. अनेक प्रगत देशांतील शाळांमध्येही गृहपाठ दिले जात नाही. मात्र ऐतिहासिक वारसास्थळे, गड किल्ले, नद्या, उद्याने इत्यादींना क्षेत्रभेटी देऊन शिक्षकांनी ती गरज भरुन काढण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. मुलांना मोबाईलपासून दूर कसे करता येईल याचा शिक्षकांनी विचार करावा, नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारताना गृहपाठ व अभ्यासाचा ताण कसा कमी करता येईल या बाबींचा अंतर्भाव करण्यास राज्यपालांनी सुचविले आहे. जबाबदार व्यक्तींकडून अशी विधाने आल्यानंतर शाळेतील गृहपाठ हा विषय ऐरणीवर येणे स्वाभाविकच आहे. याविषयावर सर्वच माध्यमे आणि शिक्षकांमध्ये साधकबाधक चर्चांना सुरुवात झाली आहे. 'त म्हणता तलवार समजून टोकाची भूमिका घेणारा ' बराच मोठा वर्ग आपल्याकडे अस्तित्वात आहे. विद्यार्थी, पालक आणि काही अंशी शिक्षकही त्यास अपवाद नाहीत. आता गृहपाठच बंद होणार इतक्या टोकाचा विपर्यास तत्काळ डोकावू लागला. असे होणे तितकेसे योग्य ठरणार नाही.  

      गृहपाठ, स्वाध्याय, घरचा अभ्यास, होमवर्क, सेल्फ स्टडी , असाईंमेंट, हया एकाच अर्थाच्या परंतू सूचक असे वेगळेपण दाखविणाऱ्या विद्यार्थीकेंद्री, आनंददायी, उत्स्फूर्त अशा कृतींमधील परमोच्च आनंदाची गाठभेट विध्यार्थ्यांना घडवून देण्याची जबाबदारी प्रत्येक विषय शिक्षक, पालक, वर्गमित्र, समाज या सर्वांची आहे. शिक्षकांचे अभ्यास घटकांचे कल्पक नियोजन, विध्यार्थी सहभाग मिळविण्याचे कसब, पालकांशी सुसंवाद राखून अध्ययन अध्यापनाचा समतोल साधणे अत्यंत महत्वाचे आणि जिकिरीचे सुद्धा आहे. कारण वर्गातील प्रत्येक मुलाची अभिक्षमता, आवड निवड, आर्थिक परिस्थिती, स्वभाव, वैगुण्ये, मर्यादा, गुणविशेष आणि बुद्ध्यांक सगळेच भिन्न आहेत. 

     नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांकडून इयत्ता सहावीपासूनच विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्ये ओळखणे, त्यांचा परिपोष करणे, त्यात आवड निर्माण करणे आणि उद्योजकता मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणे अभिप्रेत आहे. भाषा, संख्याज्ञान, कला, छंद, तंत्रज्ञान, परिसर यांची गृहपाठाशी डोळस सांगड घालणारे शिक्षकच धोरणातील तरतुदींना न्याय देऊ शकतील. त्यासाठी त्यांनीं स्वतःच अद्ययावत राहण्याची गरज भासणार आहे. कारण चॅट-जीपीटी, कोडींग, झपाट्याने सर्वच क्षेत्राला दंड थोपटून गवसणी घालणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकालची शाळकरी मुले लिलया हाताळताना दिसत आहेत. केरळच्या शाळेत ए आय टीचर सुद्धा दाखल झाली आहे. महाविद्यालयीन शिक्षणात ६०/४० % प्रमाणात अनुक्रमे ऑफलाईन + ऑनलाईन धोरण स्वीकारले जात आहे. शाळेतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परिणामी अध्यापनासाठी मिळणारा मर्यादित वेळ आणि साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती यांचा मेळ घालणे प्रचंड आव्हानात्मक ठरत आहे. ते पूर्ण करण्यासाठी बदलत्या काळातील गृहपाठाची संकल्पना अमुलाग्रपणे बदलत जाणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी शिक्षकांना स्वतःस आंतरबाह्य बदलावे लागणार आहे.          

 "शिक्षकांनी वर्गाध्यापनच इतके दर्जेदार करावे की मुलांना कोणत्याही गृहपाठाची गरजच उरू नये, गृहपाठाच्या कारणास्तव दफ्तराचे ओझेही वहावे लागू नये "असे शिक्षण मंत्री केसरकर यांचे मत होते. 

  मुळात अशी विधाने का बरे यावीत? यामागील कोणती नकारात्मक पार्श्वभूमी राज्यपाल आणि शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मतांमधून प्रतिबिंबित होताना दिसते? याचा विचार केला असता एक प्रांजळ कबुली ' गृहपाठ ' हया एकूणच प्रकरणाशी संबंधित सर्वचजण देतील. ती म्हणजे उठसूठ चार पाच वेळा हे लिहून आणा, धड्याखालचे प्रश्न लिहून आणा, वर्कबुक पूर्ण करा, अनाकलनीय घोकंपट्टी करुन हे तोंडपाठ करा, असे न केल्यास धाकधपटशा वा कठोर शिक्षा करुन, सारखे तेचतेच टूमणे लावून एक प्रकारे सावकारी वसूली धोरण कुचकामी ठरत आहे. गृहपाठ आणि तो पूर्ण न केल्यास शिक्षा ही भिती मुलांच्या मनात तिटकारा निर्माण करते. याची दुसरी बाजू म्हणजे संध्याकाळी दमूनभागून आलेल्या पालकांचा गृहपाठ या टास्कवर नको तितका हस्तक्षेप हेही आहे. मुलांमधील सर्जनशीलतेला पुरेपूर वाव मिळेल यासाठी गृहपाठ हे उत्तम माध्यम आहे. मात्र पालकांनादेखील आपण एक सुलभक असायला हवे या अपेक्षित भूमिकेचा विसर पडतो. यातून मुलांच्या बुद्धीचातुर्याचा, कलागुणांचा, भावनिक विकासाचा कंगोरा दुर्लक्षिला जातो. मुलांचा घरचा अभ्यास कोणी घ्यायचा? कधी घ्यायचा ? यावरून घरोघरी शीतयुद्धाची परिस्थिती पाहायला मिळते. जेमतेम आठवी किंवा दहावीपर्यंत पालक गृहपाठ या विषयावर सजगता दाखवू शकतात. पुढे मात्र पालकांचे हात टेकले जातात आणि मग उगम पावते ती कोचिंग क्लास संस्कृती. 

    वर्गात आपण प्रत्येक विषयाचे जे काही शिकलो त्याचा दैनंदिन जीवनात कुठे कसा उपयोग होतो? हे ज्यातून मुलांमध्ये मर्मदृष्टी विकसित करेल ते सर्वच काम म्हणजे गृहपाठ असा सरळ साधा अर्थ लावला की गृहपाठाचा हेतू सुफळ संपूर्ण होईल. समजले की आवडते, आवडले की पुनरावृत्ती करावीशी वाटते, असे झाल्यास विषय घटकाचे दृढीकरण होते आणि शिकण्यातील आनंद गवसू लागतो. त्यातुन किती क्षमता विकसित होऊ शकल्या हे पाहता येण्यासाठी गृहपाठ हा एक चांगला पर्याय आहे. अलिकडे खुली पुस्तक परीक्षा पद्धती स्वीकारण्याचा विचार पुढे येत आहे. तो पाठ्यपुस्तकात ही अंतर्भूत असल्याचे लक्षात येईल. त्या अर्थाने गृहपाठाचे मूल्यांकन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अविभाज्य हिस्सा आहे. म्हणून गृहपाठ हवाच आहे. 

 इतिहासातील एखादा रोमांचक प्रसंग शिक्षकांनी वर्गात सांगितल्यानंतर ग्रंथालयात जावून त्यावरील आणखी साद्यंत माहिती मिळविण्याची उत्सुकता वाढली पाहिजे. ती कुठे कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल, किंवा सुट्टीत गावी जाताना हया ठिकाणाला कशी प्रत्यक्ष भेट देता येईल याविषयी ओघवत्या शब्दात सांगता येईल. इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील अनेक घटना, नाट्यप्रसंग साभिनय करवून किंवा दृकश्राव्य पद्धतीने वर्गात घेतल्यास संवाद वाचन, लेखन, नृत्य, अभिनय, कथाकथन याची जोड देता येईल. वर्गात शिकलेल्या भौमितिक आकृत्या, सूत्रे, प्रमेय, विविध आकाराच्या वस्तू, त्यांची क्षेत्रफळे घर, मैदाने, शेतात, रस्त्यावर, वर्गात, रोजच्या कामात आवर्जून बघण्याची डोळस वृत्ती विकसित करु शकतो. तेच वस्तू खरेदी विक्री करताना, किराणा दुकानात, बँक किंवा बाजारात गणिती क्रियांचा कसा, कुठे आणि किती उपयोग होतो हे ध्यानी येऊ लागेल. 

   वानगीदाखल अनेक धडपड्या, नाविन्यपूर्ण उपक्रमांनी मुलांना शाळा, अभ्यास, विषय आणि गृहपाठाची गोडी निर्माण करणारे सृजनशीलतेचे हात लाभलेले शिक्षक इतरांना दिशादर्शक ठरत आहेत. सोलापूरच्या श्री समर्थ विद्यालयातील राजकिरण चव्हाण आपल्या आयकॉनिक क्लबच्या माध्यमातून प्रत्येक मुलाची खासियत ओळखून त्यांना त्यांच्या आदर्श क्षेत्रातील उत्तमोत्तम व्यक्ती आणि संस्कारांची नाळ जोडण्याचे काम करतात. ते वारली पेंटिंगचे नुसते रेखाटन शिकवून थांबत नाहीत तर त्या चित्र शैलीतील भावबंध मुलांना उलगडून दाखवतात. दहिवडीच्या शाळेतील बालाजी जाधव सरांनी मोडी लिपीचा परिचय करून देत थेट शिवकालीन दस्तावेज काय सांगतात हे मुलांकरवी वदवून दाखविले आहे. मालवणच्या गणेश विद्यालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतरही बालवर्गातील मुलांना अक्षरांचा लळा लावणाऱ्या मुख्याध्यापिका मेघना जोशी अक्षरांच्या रंजक कविता रचून अभ्यासातील नादमाधुर्य आणू पाहतात. त्यांचा 'अक्षरांच्या कविता ' हा काव्यसंग्रह बालसाहित्य आणि बालवाडीतील शिक्षणाचा मानबिंदू ठरावा इतका सुरेख आहे. बीडच्या उमेश खोसे या प्राथमिक शिक्षकांनी बोलीभाषेत पाठ्य पुस्तकांचा अनुवाद करुन प्रमाण भाषेचा वापर करताना येणारा न्यूनगंड घालविण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. बारामतीच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील वर्षा गायकवाड या विज्ञान शिक्षेकेने मुलांना 'स्वयंपाक घरातून संशोधनाकडे ' या प्रकल्पातून विज्ञानाभुती देण्याचा आगळावेगळा प्रयोग केला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर शाळेच्या समुपदेशिका प्रज्ञा बापट यांनी परिसरातील पब्जि, ब्यू व्हेल इत्यादी घातक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यातील व्यसनाधिन मुले आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधुन मुलांमधील डिजिटल इंटेलिजन्स अभ्यासात कामी आणले आहे. पुण्यातील आपटे प्रशालेच्या हर्षा पिसाळ यांनी दैनंदिन तासिकेत एक ते दोन मिनिटांच्या प्रकट वाचन प्रकल्पाचा प्रयोग केला आहे. अतुल सवाखंडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्पाबद्दल गैरसमज दुर करण्याचा धाडसी प्रयोग केला आहे. तर कृष्णात जाधव यांनी विद्यार्थांच्या मदतीने वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वर्तमानपत्राच्या सहाय्याने रद्दीतून ग्रंथालय बनवून शेकडो पुस्तकांचे दालनच उभे केले आहे. डॉ. शिवानी लिमये यांनी उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या इतिहास विषयातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी क्षेत्रभेट ही पद्धती वापरली आहे. 

 उपक्रमशील शिक्षक आणि गृहपाठाधारीत प्रयोगांची यादी भली मोठी होईल. 

       गृहपाठ देण्याची, त्याचे मूल्यमापन करुन सातत्याने नोंदी ठेवण्याची शिक्षकांची एक स्वतंत्र स्वायत्त भूमिका अबाधित कशी राहील? त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक प्रत्यक्ष सहवासात कसे राहू शकतील याची खबरदारी प्रशासन आणि सरकारने घेतली पाहिजे. नुसताच मूल्यमापनाचा वरपांगी दिखावा करु नये. असर सारख्या अहवाल प्रसिध्दी नंतर गुणवत्ता, त्याला जबाबदार असणारा शिक्षक आणि शाळा किती रसातळाला गेल्या आहेत असा गळा काढून काहीच हासिल होणार नाही. शिक्षकांना आधी नीट शिकवू द्या, वर्गव्यवस्थपनाचे सूत्रधार राहू द्या. परीक्षाच नको ते घ्या आता परीक्षा, नापासच करायचे नाही पासून आता पुन्हा पाचवी आणि आठवीला ढकलगाडी बंद करा, तद्वत गृहपाठ नको पासून तो तर घ्यावाच लागेल अशा धरसोड वृत्तीने देशाचे शैक्षणिक कंबरडे मोडले आहे. गरज आहे ती विपर्यास थांबविण्याची, शिक्षक, विद्यार्थी संवाद वाढविण्याची, शिक्षकांच्या मुक्त अध्यापन स्वायत्तेतेची. त्यांच्याशी सल्लामसलत न करता कुठलीही संकल्पना शेखचिल्ली अविर्भावात राबविणे राज्यकर्त्यांनी आता थांबवावे.


-जयवंत कुलकर्णी (शिक्षक समुपदेशक, गांधी बाल मंदिर हायस्कूल, कुर्ला)(

पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ १६ मार्च २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...