शिक्षकांच्या स्वायत्ततेचे महत्त्व
ज्या व्यावसायिकांची स्वायत्तता अतिशय महत्त्वाची असते, त्यांत शिक्षकांचा क्रमांक डॉक्टरांइतकाच वरचा आहे. शिक्षक हे अभ्यासक्रम राबवणारे कर्मचारी नाहीत, तर चिंतनशील व्यवसायी असतात, असे जॉन ड्युई यांनी म्हटले आहे. परिस्थिती आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धतींची निवड करू शकण्याचे स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता. स्वायत्तता असणारे शिक्षकच स्वावलंबी, स्वयंअध्ययनाची क्षमता असलेले विद्यार्थी घडवू शकतात.
स्वायत्त शिक्षकांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा, तसेच त्यांची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी विचारात घेऊन परिस्थितीनुरूप आपल्या कार्यपद्धतींत बदल करण्याची त्यांच्यांत क्षमता असते. शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि शिक्षणक्षेत्रातील इतर नवनवीन प्रवाह विविध मार्गांनी खुल्या मनाने आत्मसात करून स्वत:ची व्यावसायिक उंची वाढवण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. नवीन कार्यपद्धती विकसित करून त्या वापरण्याचे ते स्वातंत्र्य घेतात. मात्र विद्यार्थ्यांना विपरीत संदेश जाईल असे स्वातंत्र्य ते घेत नाहीत. अशा वेळी आपली मते किंवा आवडती विचारसरणी ते बाजूला ठेवू शकतात. शिक्षकांची स्वायत्तता ‘स्वान्त सुखाय’ नाही, तर विद्यार्थिहितासाठी असते, याची त्यांना जाणीव असते.
अमेरिका, कॅनडा, फिनलंड, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स या देशांत सरकारी स्तरावर ठरलेवल्या अध्ययन-निष्पत्ती साध्य होतील असा अभ्यासक्रम, वर्गाध्यापनासाठीचे साहित्य, पद्धती आणि मूल्यमापन पद्धती, यांच्या निवडीबाबत शिक्षकांना स्वायत्तता असते. फ्रान्स, युनायटेड किंगडम, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांत अभ्यासक्रम आणि सार्वजनिक परीक्षा यांची आखणी प्रशासनाकडून होते, पण शिक्षकांना वर्गाध्यापनाबाबत स्वायत्तता असते. हे दोन्ही प्रकारचे देश शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहेत. या देशांतल्या समाजाच्या शिक्षणाबाबतच्या आकांक्षा आणि अपेक्षा खूपच उंचावलेल्या असतात. समाजाच्या गरजा विचारात घेऊन अतिशय विचारपूर्वक ठरवलेली शैक्षणिक धोरणे, शैक्षणिक कार्यक्रमांची नियोजनपूर्वक केलेली आखणी आणि शिक्षण-यंत्रणा आणि शिक्षक यांची सचोटी, नीतिमत्ता आणि विद्यार्थिहित केंद्रस्थानी ठेवून घेतलेली मेहनत यांचा या देशांच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वाचा वाटा आहेच, पण शिक्षकांना जेवढी जास्त व्यावसायिक स्वायत्तता, तेवढे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यांतले ताणतणाव कमी आणि समाधान जास्त, असाही सार्वत्रिक अनुभव आहे. शिक्षकांचे कर्तृत्व स्वायत्त वातावरणातच बहरते.
भारताच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी शिक्षकांच्या स्वायत्ततेचा मुद्दा नेहमीच उचलून धरला आहे. बोर्डाच्या परीक्षांत शिक्षकांनी केलेल्या मूल्यांकनात न्यायालये कधीच हस्तक्षेप करत नाहीत. असे असले तरी भारतात, विशेषत: महाराष्ट्रात, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, सहशालेय उपक्रम, परीक्षा यांच्याबाबतींत प्रशासनाकडून शिक्षकांच्या उपक्रमशीलतेच्या मुळावरच येईल इतका हस्तक्षेप सातत्याने होत असतो. सरकारी आणि अनुदानित शाळांच्या शिक्षकांवर अनावश्यक निर्बंध घालणारे आदेश शासनाचे आदेश एखाद्या आठवड्यात निघाले नाहीत, तर शिक्षणक्षेत्रात आश्चर्याचे वातावरण असते. एससीईआरटी, मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा पातळीवरील परीक्षा मंडळे प्रश्नपत्रिकांचे केंद्रीकरण करून या सरकारी हस्तक्षेपात आणखीच भर टाकतात. परिणामी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत उत्तरे लिहिता येतील, इतपतच शिक्षक शिकवतात. केंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी असतात. आयत्या प्रश्नपत्रिकांमुळे शिक्षकांचा कौशल्यऱ्हास होतो तो वेगळाच. अंतर्गत गुण देताना तर सर्रास खोटेपणा केला जातो. कर्मकांडे उरकल्यासारख्या शाळा चालत असतात. अशा वातावरणात शैक्षणिक गुणवत्तेची अपेक्षा तरी कशी करता येईल? काही शाळा आणि शिक्षक या परिस्थितीतूनही मार्ग काढतात. त्यांना कोणत्या दिव्यांतून जावे लागते, याच्या संघर्षकहाण्या प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणाऱ्या आणि इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकांच्या स्वायत्ततेला विशेष महत्त्व दिले आहे. अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती, मूल्यमापन, परीक्षापद्धती यांच्यातील लवचिकता हा या धोरणाचा गाभाच आहे. धोरणातील अपेक्षित बदल शिक्षकांना स्वायत्तता दिल्याशिवाय प्रभावीपणे अंमलात आणणे शक्य नाही. एनसीटीईने National Professional Standards for Teachers या पुस्तिकेत याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र कायम बंधनांची आणि सक्तीची सवय असलेले शिक्षक स्वायत्ततेसाठी तयार असतील का? शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांची मानसिकता बदलल्याशिवाय या बाबतीत कोणताही सकारात्मक बदल घडणे शक्य नाही. त्यासाठी नेटाचे प्रयत्न झाले पाहिजेत.
- डॉ. वसंत काळपांडे
(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ११ डिसेंबर २०२४)
No comments:
Post a Comment