Saturday, 28 December 2024

सार्वजनिक परीक्षांचा चक्रव्यूह

सार्वजनिक परीक्षांचा चक्रव्यूह

अभ्यासक्रमात अपेक्षिल्याप्रमाणे शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, नैतिक अशा सर्वांगांनी स्वयंपूर्ण झालेले, देशाचे नागरिक म्हणून स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता असलेले विद्यार्थी त्यांची वर्षे वाया न जाता परीक्षापद्धतीतून बाहेर पडावेत, हे शिक्षणव्यवस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाप्रमाणेच अप्रत्यक्षपणे शिक्षणव्यवस्थेच्या कामगिरीचेही मूल्यमापन करत असतात. आज बोर्डाच्या परीक्षा इतक्या सोप्या झाल्या आहेत की विद्यार्थ्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत किंवा शिक्षकांनी त्यांच्यावर विशेष मेहनत घेतली नाही तरी ते दहावी-बारावीच्या परीक्षा सहजपणे पास होतात. विद्यार्थ्यांचे योग्य रीतीने मूल्यमापन न करताच अप्रामाणिकपणाने दिलेले भरमसाठ अंतर्गत गुण हे निकालाच्या फुगवट्याचे एक कारण आहे. प्रश्नपत्रिकांच्या अतिसुलभीकरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा कितीतरी जास्त गुण मिळतात. भेदभाव क्षमतेचा अभाव असलेल्या या परीक्षापद्धतीत बुद्धिमान आणि सर्वसाधारण अशा दोन्ही प्रकारच्या अनेक विद्यार्थ्यांना ९०टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळत असल्यामुळे गुणांचा अन्वयार्थ लावणे अशक्यप्राय होते. अभ्यासक्रमात अपेक्षित असलेल्या अनेक क्षमता साध्य न करताच विद्यार्थी पास होत असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षांची विश्वासार्हता आणि शिक्षणव्यवस्थेची कामगिरी या दोन्हींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळेच उच्च शिक्षणाच्या विविध शाखांच्या व्यावसायिक प्रवेशांसाठी बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आधार घेण्याऐवजी विविध चाळणी परीक्षा सुरू झाल्या. एकीकडे बोर्डाच्या अतिशय सोप्या परीक्षा, तर दुसरीकडे उच्च शिक्षणाच्या अनेक शाखांमधील प्रवेशांसाठी असलेल्या भरपूर कठीण अशा चाळणी परीक्षा अशा कोंडीत अकरावी-बारावीचे विद्यार्थी सापडले आहेत. या कोंडीतून मार्ग काढल्याशिवाय विद्यार्थ्यांची परवड थांबणार नाही.

खासगी शिकवणी वर्ग आणि परीक्षांची तयारी करून घेणारी गाईड्स या परिस्थितीचा गैरफायदा घेतात. गाइड्स आणि खासगी शिकवणी वर्ग हे घोकंपट्टी, परीक्षेत येऊ शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येणे आणि त्यांचा सराव करणे यांवरच भर देतात. विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करता यावा, शोधकवृत्ती आणि कुतूहल यांची जोपासना व्हावी, योग्य काय आहे हे त्यांना समजावे आणि त्याप्रमाणे त्यांनी वागावे यादृष्टीने त्यांची मूल्ये विकसित व्हावीत, पुढचे अभ्यासक्रम आणि व्यवसाय यांची निवड करण्याच्या दृष्टीने आपली आवड, तसेच आपल्या क्षमता आणि मर्यादा यांचा त्यांना अंदाज घेता यावा, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, समानुभूति, ताणताणावाचे समायोजन, नेतृत्वगुण, संभाषणकौशल्य, टीमवर्क अशी जीवनोपयोगी कौशल्ये विकसित व्हावीत, या माध्यमिक शिक्षणाच्या स्तरावरच्या अपेक्षा असतात. बोर्डाच्या परीक्षांचे सध्याचे स्वरूप, गाईड्स आणि शिकवणी वर्ग यांमुळे पूर्वतयारी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याव्यतिरिक्त इतर कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतच नाहीत. माध्यमिक स्तरावर आणि त्यानंतरही प्रचंड मेहनत आणि पैसा खर्च करूनही इतर कौशल्ये नसल्यामुळे बहुसंख्य तरुणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे नोकऱ्या मिळत नाहीत; मिळाल्या तरी अगदीच तुटपुंजे वेतन मिळते. स्वयंरोजगारासाठी तर ते अगदीच कुचकामी असतात. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या आड येणारे खासगी शिकवणी वर्ग आणि गाइड यांच्यावर कायद्याने निर्बंध घालून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. माध्यमिक स्तरापासूनच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायांशिवाय इतरही चांगले व्यवसाय असतात, याची कल्पना विद्यार्थ्यांना यावी, त्यांना आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत व्हावी यादृष्टीने मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, विधी, खेळ, कला, स्वयंरोजगार, अशा विविध क्षेत्रांच्या विविध शाखांचा परिचय देणारे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, तज्ज्ञांच्या मुलाखती, क्षेत्रभेटी, आंतरवासिता असे उपक्रम आयोजित करता येतील. शिक्षकांनी लेखी परीक्षेची तयारी करवून घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिण्याचा सराव करायचा या पद्धतीमुळे विद्यार्थी पंगू होतात. हे थांबवून विद्यार्थ्यांचा सर्वच शालेय उपक्रमांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.  

राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यात या दुहेरी कोंडीतून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी संबंधितांचे प्रबोधन करून, त्यांना विश्वासात घेऊन प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. हा बदल होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे तो प्रामाणिकपणा आणि विद्यार्थिहिताबाबतची कळकळ. प्रसंगी अनिष्ट पद्धती मोडीत काढण्यासाठी कठोर पावलेही उचलावी लागतील. शिक्षणव्यवस्थेला वरकरणी सोयीचा वाटणारा, पण विद्यार्थ्यांना भरडून टाकणारा सध्याचा चक्रव्यूह भेदता आला तरच बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे खरेखुरे मूल्यमापन करणाऱ्या ठरू शकतील.

- डॉ. वसंत काळपांडे 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १३ नोव्हेंबर २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...