तीनशेसाठ अंशांतून मूल्यमापन
महाराष्ट्रात एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या माध्यमिक शाळांत इयत्ता नववी ते बारावीमध्ये लेखी परीक्षांसोबतच या विषयांच्या प्रात्यक्षिके, तोंडी परीक्षा, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले काम अशा काही पैलूंचे मूल्यमापन करून २० टक्के गुण शाळेच्या स्तरावर दिले जातात. या विषयांव्यतिरिक्त शारीरिक शिक्षण व आरोग्य, समाजसेवा, स्काउट, कार्यशिक्षण अशा इतर सर्व विषयांना शाळेच्या स्तरावर श्रेणी दिल्या जातात. सध्याच्या मूल्यमापन पद्धतीत गेल्या पंधरा वर्षांपासून बदल होऊनही कुठेही समाधानाची भावना दिसत नाही. याची मुख्य कारणे म्हणजे शाळास्तरावर दिलेल्या गुणांत आणि श्रेणींत प्रामाणिकपणा नसतो आणि बोर्डाच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे यथायोग्य मोजमाप करण्यासाठी उपयोगाच्या नसतात. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण किंवा श्रेणी यांवरून ते नक्की काय शिकले, त्यांची बलस्थाने आणि मर्यादा काय आहेत, याचे वास्तव चित्र उभे राहत नाही.
पारंपरिक लेखी मूल्यमापनपद्धतीतील त्रुटी लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमाच्या सर्व क्षेत्रांचे सर्व अंगांनी - ३६० अंशांतून मूल्यमापन करण्यासाठी समग्र प्रगतिपत्रका(Holistic Progress Card)ची संकल्पना मांडली आहे. एनसीईआरटीच्या PARAKH या विभागाने पायाभूत, प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक या चारही स्तरांसाठी त्या त्या टप्प्यावरील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या गरजा विचारात घेऊन समग्र प्रगतिपुस्तकांची प्रारूपे तयार केली आहेत. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक विकास, समीक्षा, सर्जनशीलता, संवाद आणि सहयोग ही एकविसाव्या शतकाची कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि इतर सॉफ्ट स्किल्स अशा विद्यार्थिविकासाच्या सर्वच अंगांचा त्यांत विचार केलेला आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकणे ही कोणत्याही औपचारिक शिक्षणपद्धतीची लिटमस टेस्ट असते. त्यामुळेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या, त्यासाठीचे शिक्षण देणाऱ्या संस्था, प्रवेश परीक्षा, मुलाखत, बायोडेटा अशा बाबींची माहिती मिळवणे, आपल्या आवडीनिवडी आणि क्षमता कोणत्या व्यवसायासाठी योग्य आहेत, अशा अंगांनी समग्र प्रगतिपत्रकात नोंदी अपेक्षित आहेत. वैयक्तिक किंवा गटांतील प्रकल्प, शाळेत असतानाच शिकता येतील असे ऑनलाइन अभ्यासक्रम, वर्गाध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि वर्तन, वेळेचे व्यवस्थापन अशा विविध बाबतींत जागरूकता, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन अंगांनी मूल्यमापन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कोणती लक्ष्ये किती कालावधीत साध्य करायचे ठरवले आहे, त्यासाठी ते स्वत: कोणते प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना घरून, शाळेतून आणि समाजातून कोणती मदत मिळू शकेल, यांबाबतचे मुद्देही समग्र प्रगतिपत्रकात आहेत.
समग्र प्रगतिपत्रक भरताना शिक्षकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची असली तरी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या स्वयंमूल्यमापनालाही तेवढेच महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्याच्या सहाध्यायांची आणि पालकांची मतेसुद्धा योग्य त्या ठिकाणी या प्रगतिपत्रकात नोंदवली जातील. त्यामुळे इतरांमधील चांगल्या बाबींची नोंद घेण्याची सकारात्मक सवय सर्वच विद्यार्थ्यांना लागेल. पालकांनासुद्धा या प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे त्यांच्या आपल्या पाल्याबाबतच्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्या, त्याबाबतींत ते स्वत: काय करू शकतील आणि शाळेने काय करणे अपेक्षित आहे, याबद्दलची पालकांची जाण वाढायला, विविध अभ्यासक्षेत्रांतील पुढच्या संधींबाबतची स्पष्टता यायला मदत होईल आणि पालक आपल्या पाल्यांच्या विकासाकडे अधिक डोळस, वास्तव आणि खुल्या दृष्टिकोनातून पाहू शकतील.
मूल्यमापन हा शिक्षणपद्धतीतील बदलांसाठी कळीचा मुद्दा आहे. समग्र प्रगतिपुस्तक विद्यार्थ्यांना आपण कसे शिकतो, हे डोळसपणे जाणून घेण्यासाठीचे (मेटाकॉग्निशनचे) आपल्या अध्ययनाचे आरेखन करण्यास मदत करणारे एक महत्त्वाचे साधन ठरू शकते. शिक्षकांना अध्यापनाची योग्य दिशा ठरवण्यासाठीसुद्धा ते महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांसाठीच तीनशेसाठ अंशांतून मूल्यमापन हे सर्वार्थांनी बहुगुणी असे साधन आहे. भविष्यात महाविद्यालयीन प्रवेशांसाठीसुद्धा समग्र प्रगतिपत्रकाचा उपयोग केला जाऊ शकेल. सीबीएसईने आपल्या शाळांसाठी या विषयावर काम सुरू केले आहे. आपल्या इथे मात्र काहीच हालचाल दिसत नाही. अचानक होतील असे हे बदल नाहीत. वर सुरवातीला दिलेल्या कारणांची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर खूपच पूर्वतयारी करावी लागेल. त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी काय करता येईल, हे पुढच्या लेखात पाहू.
- डॉ. वसंत काळपांडे
( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २० नोव्हेंबर २०२४)
No comments:
Post a Comment