बदल – प्रतीकात्मक आणि खरेखुरे
शिक्षण हक्क कायद्याच्या कलम 29 मधे शिक्षणप्रक्रिया म्हणजेच अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धती कशी असावी, हे नमूद केले आहे. मुलांकडे असलेले ज्ञान, सुप्त क्षमता, गुण यांना पूर्ण वाव मिळावा; मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा; मुलांना कृतींच्या माध्यमातून तसेच जिज्ञासा, स्वतः घेतलेला शोध यांच्या माध्यमातून शिकता यावे; तणावरहित, मोकळ्या, ‘बालस्नेही’, ‘बालकेंद्रित’ वातावरणात शिकता यावे; शक्यतो स्वतःच्या मातृभाषेतून शिकता यावे हे त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही ते अधोरेखित केलेले आहेत.
हे सगळे मुद्दे कायदा करताना पहिल्यांदाच पुढे आले असे नाही. महाराष्ट्रापुरता विचार केला, तर त्याआधीही शासकीय आणि बिगरशासकीय पातळीवर, मुलांची मानसिकता ओळखून त्याला पोषक शिक्षण देण्याचे प्रयत्न होत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षण विद्यार्थिकेंद्रित असावे, हे नमूद केलेले आहे, आणि पाठ्यपुस्तकांतही त्या अनुषंगाने वेळोवेळी खूप सुधारणा, बदल करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायदा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यात अपेक्षित असलेल्या अध्ययन-अध्यापन पद्धतीची वैचारिक दिशा महाराष्ट्राला नवीन नाही. त्या दृष्टीने आजचे वास्तव मात्र उत्साहवर्धक नाही. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत तरी योग्य ते अध्ययन-अध्यापनविषयक बदल खरोखरच घडून येतील, की शिक्षणव्यवस्थेचा अंगभूत भाग न होता अजूनही ते ‘नवे बदल’ म्हणूनच साजरे केले जातील, हा प्रश्नच आहे.
मोठ्या प्रमाणावर घडवून आणायचा कोणताही बदल करायला वेळ लागतो, हे जरी मान्य केले, तरी आज असे दिसते, की प्रत्यक्षात आमूलाग्र बदल घडवण्यापेक्षा बदलाची तुरळक उदाहरणे किंवा प्रतीके तयार करणे आपल्याला पुरेसे वाटू लागले आहे. काही उदाहरणे पाहू. स्थानिक बोलीभाषा, आदिवासी भाषा यांना शिक्षणक्रमात सन्मानाचे स्थान द्यायचे आहे, हा संदेश देण्यासाठी मराठीच्या पाठ्यपुस्तकांत एखादी कविता समाविष्ट केली जाते. पाठ्यपुस्तकाच्या मर्यादा लक्षात घेता हा समावेश प्रतीकात्मक स्वरूपातच करता येतो. पण त्याच धर्तीवर प्रत्यक्षात किती बोलींतील, भाषांतील स्थानिक कथाकवितांना असे स्थान मिळते? खरे तर जिल्हयाजिल्ह्यांत असलेल्या शासकीय शैक्षणिक संस्थांना या संदर्भात खूप काम, खूप संकलन करून ते शिक्षकांना पुरवता येईल. पण तसे घडत नाही. प्रतीकात्मक समावेश आणि एखाद्या शिक्षकाने स्वयंप्रेरणेने केलेले काही प्रयत्न एव्हढ्यापुरताच हा भाग मर्यादित राहतो.
अनिवार्य इंग्लिशची पाठ्यपुस्तके कृती आणि उपक्रमांच्या मालिका या स्वरूपात तयार केलेली होती. प्रत्यक्ष अध्यापनाच्या वेळी मात्र त्यातील श्रवण, भाषण-संभाषण, चिकित्सक चर्चा, सर्जनशील लेखन किंवा सादरीकरण अशा बऱ्याचशा कृती आणि प्रकल्प बाजूला राहतात. पुस्तकात ‘धडे’, कविता या स्वरूपात जे दिसेल, त्याचे पारंपरिक पद्धतीने म्हणजे शब्दार्थ, स्पेलिंग, प्रश्नोत्तरे आणि व्याकरण यांपुरते अध्यापन केले जाते. हा विषय अपेक्षित पद्धतीने हाताळण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ, सुविधा, सततचे मार्गदर्शन, प्रोत्साहन दिले पाहिजे, काही ठिकाणी विद्यार्थिसंख्या मर्यादित ठेवली पाहिजे याची निकड शासकीय स्तरावर राहिलेली दिसत नाही. एखाद्या शिक्षकाने एखादाच खेळ घेतला, तरी त्याची गणना ‘नवोपक्रमात’ होते आणि कृतियुक्त अध्यापन पद्धतीच्या बदलाचे उदाहरण म्हणून ते दाखवले जाते.
गणित, विज्ञान हे विषय शिकवताना मुलांना प्रत्यक्ष वस्तू हाताळून, स्वतः प्रयोग करून, मॉडेल्स बनवून, स्वतःच्या अनुभवातून शिकू द्यावे, यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य वर्गाच्या दर्शनी भागात कायमस्वरूपी मांडून तयार केलेले ‘गणित कोपरे’, ‘विज्ञान कोपरे’ हा त्याच प्रयत्नांचा भाग होता. पण त्यांतून या विषयांकडे पाहण्याची पूर्ण दृष्टी बदलली का, वर्गातील प्रत्येक मूल त्यातील साहित्य हाताळून स्वतःच्या प्रयत्नाने, शोधक वृत्तीने शिकते का, याचा विचार आपण कधी करणार? असे घडत नसेल, तर ‘कोपरा’ हे कृतियुक्त, अनुभवजन्य शिक्षणाचे फक्त एक दर्शनी प्रतीक ठरते.
अध्ययन-अध्यापन पद्धतीत हवे ते बदल घडण्यात ज्या अनेक अडचणी येतात, त्यांमगे पुष्कळ व्यावहारिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कारणे आहेत. पण त्यांचा शोध न घेता फक्त वरवर बदलाची प्रतीके आणि तुरळक उदाहरणे तयार करून त्यावर समाधान मानणे, हे स्वतःचीच फसवणूक करून घेण्यासाराखे आहे.
- धनवंती हर्डीकर
(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ३० ऑक्टोबर २०२४)
No comments:
Post a Comment