Saturday, 28 December 2024

सार्वजनिक परीक्षांचा चक्रव्यूह

सार्वजनिक परीक्षांचा चक्रव्यूह

अभ्यासक्रमात अपेक्षिल्याप्रमाणे शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, नैतिक अशा सर्वांगांनी स्वयंपूर्ण झालेले, देशाचे नागरिक म्हणून स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता असलेले विद्यार्थी त्यांची वर्षे वाया न जाता परीक्षापद्धतीतून बाहेर पडावेत, हे शिक्षणव्यवस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाप्रमाणेच अप्रत्यक्षपणे शिक्षणव्यवस्थेच्या कामगिरीचेही मूल्यमापन करत असतात. आज बोर्डाच्या परीक्षा इतक्या सोप्या झाल्या आहेत की विद्यार्थ्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत किंवा शिक्षकांनी त्यांच्यावर विशेष मेहनत घेतली नाही तरी ते दहावी-बारावीच्या परीक्षा सहजपणे पास होतात. विद्यार्थ्यांचे योग्य रीतीने मूल्यमापन न करताच अप्रामाणिकपणाने दिलेले भरमसाठ अंतर्गत गुण हे निकालाच्या फुगवट्याचे एक कारण आहे. प्रश्नपत्रिकांच्या अतिसुलभीकरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा कितीतरी जास्त गुण मिळतात. भेदभाव क्षमतेचा अभाव असलेल्या या परीक्षापद्धतीत बुद्धिमान आणि सर्वसाधारण अशा दोन्ही प्रकारच्या अनेक विद्यार्थ्यांना ९०टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळत असल्यामुळे गुणांचा अन्वयार्थ लावणे अशक्यप्राय होते. अभ्यासक्रमात अपेक्षित असलेल्या अनेक क्षमता साध्य न करताच विद्यार्थी पास होत असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षांची विश्वासार्हता आणि शिक्षणव्यवस्थेची कामगिरी या दोन्हींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळेच उच्च शिक्षणाच्या विविध शाखांच्या व्यावसायिक प्रवेशांसाठी बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आधार घेण्याऐवजी विविध चाळणी परीक्षा सुरू झाल्या. एकीकडे बोर्डाच्या अतिशय सोप्या परीक्षा, तर दुसरीकडे उच्च शिक्षणाच्या अनेक शाखांमधील प्रवेशांसाठी असलेल्या भरपूर कठीण अशा चाळणी परीक्षा अशा कोंडीत अकरावी-बारावीचे विद्यार्थी सापडले आहेत. या कोंडीतून मार्ग काढल्याशिवाय विद्यार्थ्यांची परवड थांबणार नाही.

खासगी शिकवणी वर्ग आणि परीक्षांची तयारी करून घेणारी गाईड्स या परिस्थितीचा गैरफायदा घेतात. गाइड्स आणि खासगी शिकवणी वर्ग हे घोकंपट्टी, परीक्षेत येऊ शकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येणे आणि त्यांचा सराव करणे यांवरच भर देतात. विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करता यावा, शोधकवृत्ती आणि कुतूहल यांची जोपासना व्हावी, योग्य काय आहे हे त्यांना समजावे आणि त्याप्रमाणे त्यांनी वागावे यादृष्टीने त्यांची मूल्ये विकसित व्हावीत, पुढचे अभ्यासक्रम आणि व्यवसाय यांची निवड करण्याच्या दृष्टीने आपली आवड, तसेच आपल्या क्षमता आणि मर्यादा यांचा त्यांना अंदाज घेता यावा, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, समानुभूति, ताणताणावाचे समायोजन, नेतृत्वगुण, संभाषणकौशल्य, टीमवर्क अशी जीवनोपयोगी कौशल्ये विकसित व्हावीत, या माध्यमिक शिक्षणाच्या स्तरावरच्या अपेक्षा असतात. बोर्डाच्या परीक्षांचे सध्याचे स्वरूप, गाईड्स आणि शिकवणी वर्ग यांमुळे पूर्वतयारी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याव्यतिरिक्त इतर कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतच नाहीत. माध्यमिक स्तरावर आणि त्यानंतरही प्रचंड मेहनत आणि पैसा खर्च करूनही इतर कौशल्ये नसल्यामुळे बहुसंख्य तरुणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे नोकऱ्या मिळत नाहीत; मिळाल्या तरी अगदीच तुटपुंजे वेतन मिळते. स्वयंरोजगारासाठी तर ते अगदीच कुचकामी असतात. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या आड येणारे खासगी शिकवणी वर्ग आणि गाइड यांच्यावर कायद्याने निर्बंध घालून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. माध्यमिक स्तरापासूनच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायांशिवाय इतरही चांगले व्यवसाय असतात, याची कल्पना विद्यार्थ्यांना यावी, त्यांना आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत व्हावी यादृष्टीने मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, विधी, खेळ, कला, स्वयंरोजगार, अशा विविध क्षेत्रांच्या विविध शाखांचा परिचय देणारे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, तज्ज्ञांच्या मुलाखती, क्षेत्रभेटी, आंतरवासिता असे उपक्रम आयोजित करता येतील. शिक्षकांनी लेखी परीक्षेची तयारी करवून घ्यायची आणि विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिण्याचा सराव करायचा या पद्धतीमुळे विद्यार्थी पंगू होतात. हे थांबवून विद्यार्थ्यांचा सर्वच शालेय उपक्रमांच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.  

राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यात या दुहेरी कोंडीतून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी संबंधितांचे प्रबोधन करून, त्यांना विश्वासात घेऊन प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. हा बदल होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे तो प्रामाणिकपणा आणि विद्यार्थिहिताबाबतची कळकळ. प्रसंगी अनिष्ट पद्धती मोडीत काढण्यासाठी कठोर पावलेही उचलावी लागतील. शिक्षणव्यवस्थेला वरकरणी सोयीचा वाटणारा, पण विद्यार्थ्यांना भरडून टाकणारा सध्याचा चक्रव्यूह भेदता आला तरच बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे खरेखुरे मूल्यमापन करणाऱ्या ठरू शकतील.

- डॉ. वसंत काळपांडे 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १३ नोव्हेंबर २०२४)

Saturday, 21 December 2024

पुन्हा एक नवी संधी

पुन्हा एक नवी संधी 

हॅरी पॉटर या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक कादंबरी म्हणजे मुलांना आवडणाऱ्या tv हॉगवॉर्ट्स शाळेतील एकेका शैक्षणिक वर्षाची गोष्ट आहे. त्यातील जादूचा अद्भुतरम्य भाग आणि त्या अनुषंगाने आलेले अद्भुतरम्य शालेय विषय बाजूला ठेवले, तर बाकी अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापनाची पद्धत इतर कोणत्याही शाळेशी तुलना करता येईल अशीच आहे. त्यात विद्वान, साधेसुधे, दांभिक, कडक शिस्तीचे, प्रेमळ, निःपक्षपाती आणि दुजाभाव करणारे असे सगळ्या प्रकारचे शिक्षक आहेत. बरेवाईट सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आणि पालक आहेत. शाळेत उगीच ढवळाढवळ करणारे प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी आहेत. तरी उत्तम शिक्षण देणारी शाळा अशीच तिची ख्याती आहे. तिथे मुलांना काही भाग पुस्तकांतून, तर काही वर्गात वयानुरूप प्रात्यक्षिके देऊन आणि त्यांचा सराव करायला लावून, नीट आत्मसात होईपर्यंत शिकवला जातो. मुलांना सुरवातीला अनेक प्रकारचे विषय शिकवले जातात आणि नंतर त्यांचा कल बघून त्यांना त्यांतील प्रगत अध्ययनासाठी निवडले जाते. सुरवातीपासूनच आपण काय शिकत आहोत, वर्षभरात काय साध्य करायचे आहे, याची मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना स्पष्ट कल्पना असते. मुलांना नियमितपणे छोटामोठा गृहपाठ करावा लागतो. ग्रंथालयाचा वापर करावा लागतो. खेळ आणि स्पर्धांत भाग घ्यावा लागतो. कुलपद्धती असल्याने लहानमोठ्या वयाचे विद्यार्थी एकत्र येतात आणि एकमेकांकडून शिकतात. मुख्य म्हणजे स्पर्धा वैयक्तिक स्तरावर नसून कुलांमधे असते. अभ्यास चुकवणे, नियमबाह्य वागणे, गैरवर्तन करणे यांसाठी कुलाचे मार्क कापले जातात आणि इतरांना मदत करणे, सचोटी, प्रामाणिकपणा, धाडस, कसोटीच्या प्रसंगी दाखवलेले धैर्य यांसाठी कुलाला मार्क मिळतात. त्यामुळे संघभावना आणि नैतिकता दोन्ही गोष्टी विकसित होतात. त्यासाठी जादू करावी लागत नाही. आपल्याकडील सर्वसाधारण शाळांमध्येही मुलांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास घडवणारे हे किंवा यासारखे चित्र दिसणे अशक्य नाही. ते न दिसण्याची कारणे कोणती?

पाठ्यपुस्तकांत सुरवातीलाच अपेक्षित अध्ययन निष्पत्ती, क्षमता इत्यादींच्या याद्या दिलेल्या असतात. पण ‘परीक्षेला काय आहे?’ या प्रश्नाचे उत्तर अमुक अमुक धडे, कविता, प्रकरणे या स्वरूपातच मिळते. त्यांच्यासोबत जे उपक्रम, प्रकल्प, जास्तीच्या अभ्यासासाठी सूचना दिलेल्या असतात तो भाग परीक्षेच्या तयारीत जमा होत नसल्याने बाजूला पडतो.

 क्षमताविकासासाठी सर्व मुलांकडून वर्गात करून घेण्याच्या ज्या कृती, प्रयोग दिलेले असतात, त्यांसाठी प्रत्यक्षात वेळ दिला जात नाही. फार तर दोन-पाच मुलांना एकदा बोलावून त्यांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. मुलांना दिलेल्या गृहपाठाचे स्वरूप शाळेत सांगितल्यानुसार किंवा पुष्कळदा एखाद्या वर्कबुक, गाईडमधील साच्यानुसार उत्तरे लिहून आणणे असे असते. पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचा भाग विषयाशी संबंधित असला तरी अभ्यासक्रमाच्याच बाहेरचा समजला जातो. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा भाषेतर विषयांवरील अधिक वाचनासाठी याद्या तयार करून मुलांना द्यायच्या, तर शिक्षक स्वतःच्या वाचनाअभावी त्या तयार करू शकत नाहीत; शाळेच्या ग्रंथालयात अशा पुस्तकांची वानवा असते; पुस्तके असली, तरी ती तिथे बसून वाचण्याची, घरी नेण्याची मोकळीक मुलांना नसते, असे अनुभव अनेक ठिकाणी येतात.

कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण अशा ‘श्रेणी’ विषयांचे बरेचसे तास तर इतर ‘महत्त्वाच्या’ विषयांसाठीच वापरले जातात. मूल्यमापन पद्धती आजही कागदोपत्री ‘सर्वंकष’ आहे, त्यात लेखी पेपरव्यतिरिक्त तोंडी काम, प्रयोग, प्रात्यक्षिके, गृहपाठ आणि प्रकल्प, खेळ, कलात्मक अभिव्यक्ती, व्यावहारिक कौशल्ये, सगळे काही तपासण्याची तरतूद आहे. नवीन धोरणातही पुन्हा ती अधोरेखित केलेली आहे. पण मूल्यमापनाच्या नोंदी करताना, प्रत्यक्षात या तोंडी, ‘अंतर्गत’ कामाचा उपयोग कशासाठी होतो, हे उघड गुपित आहे. मुलांच्या कार्यात्मक, सामाजिक, मानसिक विकासासाठी आखलेल्या आणि शिक्षकांना तो पद्धतशीरपणे अजमावण्याची संधी देणाऱ्या कृती मुळात जर शाळेत घडतच नसतील, तर त्यांचे यथायोग्य मूल्यमापन कसे करणार? आणि मग नैतिक विकासाबाबत कशाच्या आधारे बोलणार? 

कोणतेही शैक्षणिक धोरण काही सगळ्या बाबतीत आमूलाग्र धारणाबदल घेऊन येत नाही, पण न घडलेले बदल करण्याची, व्यवस्थेतील अनिष्ट, कालबाह्य गोष्टी दूर करण्याची, एक नवी संधी घेऊन येते. ती सर्व स्तरांवर प्रामाणिकपणे घ्यायची की नाही, हे आपल्यावरच अवलंबून आहे.

- धनवंती हर्डीकर

( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ६ नोव्हेंबर २०२४)

Saturday, 7 December 2024

बदल – प्रतीकात्मक आणि खरेखुरे

बदल – प्रतीकात्मक आणि खरेखुरे  

शिक्षण हक्क कायद्याच्या कलम 29 मधे शिक्षणप्रक्रिया म्हणजेच अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धती कशी असावी, हे नमूद केले आहे. मुलांकडे असलेले ज्ञान, सुप्त क्षमता, गुण यांना पूर्ण वाव मिळावा; मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा; मुलांना कृतींच्या माध्यमातून तसेच जिज्ञासा, स्वतः घेतलेला शोध यांच्या माध्यमातून शिकता यावे; तणावरहित, मोकळ्या, ‘बालस्नेही’, ‘बालकेंद्रित’ वातावरणात शिकता यावे; शक्यतो स्वतःच्या मातृभाषेतून शिकता यावे हे त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही ते अधोरेखित केलेले आहेत.  

हे सगळे मुद्दे कायदा करताना पहिल्यांदाच पुढे आले असे नाही. महाराष्ट्रापुरता विचार केला, तर त्याआधीही शासकीय आणि बिगरशासकीय पातळीवर, मुलांची मानसिकता ओळखून त्याला पोषक शिक्षण देण्याचे प्रयत्न होत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षण विद्यार्थिकेंद्रित असावे, हे नमूद केलेले आहे, आणि पाठ्यपुस्तकांतही त्या अनुषंगाने वेळोवेळी खूप सुधारणा, बदल करण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायदा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यात अपेक्षित असलेल्या अध्ययन-अध्यापन पद्धतीची वैचारिक दिशा महाराष्ट्राला नवीन नाही. त्या दृष्टीने आजचे वास्तव मात्र उत्साहवर्धक नाही. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत तरी योग्य ते अध्ययन-अध्यापनविषयक बदल खरोखरच घडून येतील, की शिक्षणव्यवस्थेचा अंगभूत भाग न होता अजूनही ते ‘नवे बदल’ म्हणूनच साजरे केले जातील, हा प्रश्नच आहे. 

मोठ्या प्रमाणावर घडवून आणायचा कोणताही बदल करायला वेळ लागतो, हे जरी मान्य केले, तरी आज असे दिसते, की प्रत्यक्षात आमूलाग्र बदल घडवण्यापेक्षा बदलाची तुरळक उदाहरणे किंवा प्रतीके तयार करणे आपल्याला पुरेसे वाटू लागले आहे. काही उदाहरणे पाहू. स्थानिक बोलीभाषा, आदिवासी भाषा यांना शिक्षणक्रमात सन्मानाचे स्थान द्यायचे आहे, हा संदेश देण्यासाठी मराठीच्या पाठ्यपुस्तकांत एखादी कविता समाविष्ट केली जाते. पाठ्यपुस्तकाच्या मर्यादा लक्षात घेता हा समावेश प्रतीकात्मक स्वरूपातच करता येतो. पण त्याच धर्तीवर प्रत्यक्षात किती बोलींतील, भाषांतील स्थानिक कथाकवितांना असे स्थान मिळते? खरे तर जिल्हयाजिल्ह्यांत असलेल्या शासकीय शैक्षणिक संस्थांना या संदर्भात खूप काम, खूप संकलन करून ते शिक्षकांना पुरवता येईल. पण तसे घडत नाही. प्रतीकात्मक समावेश आणि एखाद्या शिक्षकाने स्वयंप्रेरणेने केलेले काही प्रयत्न एव्हढ्यापुरताच हा भाग मर्यादित राहतो. 

अनिवार्य इंग्लिशची पाठ्यपुस्तके कृती आणि उपक्रमांच्या मालिका या स्वरूपात तयार केलेली होती. प्रत्यक्ष अध्यापनाच्या वेळी मात्र त्यातील श्रवण, भाषण-संभाषण, चिकित्सक चर्चा, सर्जनशील लेखन किंवा सादरीकरण अशा बऱ्याचशा कृती आणि प्रकल्प बाजूला राहतात. पुस्तकात ‘धडे’, कविता या स्वरूपात जे दिसेल, त्याचे पारंपरिक पद्धतीने म्हणजे शब्दार्थ, स्पेलिंग, प्रश्नोत्तरे आणि व्याकरण यांपुरते अध्यापन केले जाते. हा विषय अपेक्षित पद्धतीने हाताळण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ, सुविधा, सततचे मार्गदर्शन, प्रोत्साहन दिले पाहिजे, काही ठिकाणी विद्यार्थिसंख्या मर्यादित ठेवली पाहिजे याची निकड शासकीय स्तरावर राहिलेली दिसत नाही. एखाद्या शिक्षकाने एखादाच खेळ घेतला, तरी त्याची गणना ‘नवोपक्रमात’ होते आणि कृतियुक्त अध्यापन पद्धतीच्या बदलाचे उदाहरण म्हणून ते दाखवले जाते. 

गणित, विज्ञान हे विषय शिकवताना मुलांना प्रत्यक्ष वस्तू हाताळून, स्वतः प्रयोग करून, मॉडेल्स बनवून, स्वतःच्या अनुभवातून शिकू द्यावे, यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य वर्गाच्या दर्शनी भागात कायमस्वरूपी मांडून तयार केलेले ‘गणित कोपरे’, ‘विज्ञान कोपरे’ हा त्याच प्रयत्नांचा भाग होता. पण त्यांतून या विषयांकडे पाहण्याची पूर्ण दृष्टी बदलली का, वर्गातील प्रत्येक मूल त्यातील साहित्य हाताळून स्वतःच्या प्रयत्नाने, शोधक वृत्तीने शिकते का, याचा विचार आपण कधी करणार? असे घडत नसेल, तर ‘कोपरा’ हे कृतियुक्त, अनुभवजन्य शिक्षणाचे फक्त एक दर्शनी प्रतीक ठरते. 

अध्ययन-अध्यापन पद्धतीत हवे ते बदल घडण्यात ज्या अनेक अडचणी येतात, त्यांमगे पुष्कळ व्यावहारिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कारणे आहेत. पण त्यांचा शोध न घेता फक्त वरवर बदलाची प्रतीके आणि तुरळक उदाहरणे तयार करून त्यावर समाधान मानणे, हे स्वतःचीच फसवणूक करून घेण्यासाराखे आहे.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ३० ऑक्टोबर २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...