Saturday, 30 November 2024

भारतकेंद्री शिक्षणासाठी काय हवे?

भारतकेंद्री शिक्षणासाठी काय हवे?

भारतातील मुलांना द्यावयाचे शिक्षण भारतकेंद्री हवे याबद्दल दुमत असायचे कारण नाही. तरीही ‘भारतकेंद्री’ या शब्दाभोवती चर्चा, वादविवाद, अस्मिता, अभिनिवेश, शंका, काळजी अशा अनेक गोष्टींचे वलय आहे. याचे कारण ‘भारतकेंद्री’ या शब्दाचे लावले जाणारे वेगवेगळे अर्थ. आजची शालेय शिक्षणाची व्यवस्था ब्रिटिश काळात जन्माला आली आणि रूजली. ती ब्रिटिश राज्यकर्त्यांना धार्जिणी होती, त्यामुळे औपचारिक शालेय शिक्षणातून भारतीय ज्ञानपरंपरा पुसल्या गेल्या आणि त्यांची जागा पाश्चात्त्य ज्ञानशाखांनी आपल्या संपूर्ण पाश्चात्त्य संदर्भासह घेतली. भारताला तत्त्वज्ञान, गणित, स्थापत्य, रसायनशास्त्र, धातुशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यक, अर्थशास्त्र, नौकाबांधणी आणि नौकानयन, खगोलविज्ञान, भाषाविज्ञान अशा कितीतरी ज्ञानशाखांमध्ये अतिशय समृद्ध वारसा आहे. पण या सर्व ज्ञानपरंपरांचा परिचय निदान महाराष्ट्रातील मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमातून होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या प्राचीन ठेव्याबद्दल दोन टोकाच्या भूमिका दिसतात. एक ‘आमच्याकडे सर्व होते,’ असा दुरभिमान किंवा मग दुर्लक्ष, उपहासाची भावना. त्यात धार्मिक, सामाजिक पैलू मिसळले की या ज्ञानपरंपरांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आणखीच अवघड होते. या परिस्थितीत शाळेच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांत हा भाग शक्य तितक्या कमी शब्दांत आणि संदिग्ध स्वरूपातच आला, तर नवल नाही. अभ्यासक्रमात हे विषय योग्य पद्धतीने आणायचे असतील, तर आधी त्यांची चिकित्सक, विवेकी, साधकबाधक चर्चा घडणे, त्यांना समाजमान्यता मिळणे फार महत्त्वाचे आहे. ‘भारतकेंद्री’ शिक्षण देण्यासाठी, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील भारतीय परंपरा, त्यांच्यावरचे प्राचीन आणि मध्ययुगीन प्रभाव आणि आज भारतात शिकवले जाणारे पाश्चात्त्य विज्ञान या सगळ्याचा एकत्र, सलग विचार करून भारतातील ज्ञानशाखांच्या जडणघडणीची, त्यातील चढउतारांसह वस्तुनिष्ठपणे मांडणी करावी लागेल. मात्र हे काम त्या त्या विषयांतील अभ्यासकांचे, तज्ज्ञांचे आहे. त्यांच्या अभ्यासातून तयार झालेल्या अधिकृत संदर्भांवरून मुलांसाठी पाठ्यपुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य तयार करणे ही नंतरची पायरी आहे.  

‘भारतकेंद्री’ शिक्षणात उलटा प्रवास करून आधुनिक शिक्षणाची जागा पुन्हा जुन्या ज्ञानपरांपरांना द्यायची असा अर्थ काढणे मात्र नक्कीच अपेक्षित नाही, आणि हिताचेही नाही. आधुनिक शिक्षणपद्धतीमुळेच सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळाला, आणि जगातील अद्ययावत ज्ञानाशी आपला देश जोडला गेला, कोणत्याही जागतिक स्पर्धेत उतरण्याइतका सक्षम झाला, हे कधीही विसरता येणार नाही. ‘भारतकेंद्री’ या शब्दातील भारत हा आजचा, वर्तमान भारत देश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तो केंद्रस्थानी आहे याचा अर्थ त्याची स्वतःची ओळख ही प्राथमिकता असली, तरी तो भोवतालच्या विश्वाचा भाग आहे, हे भानही महत्त्वाचे आहे.  

- आज आपल्या देशात वेगवेगळ्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या, तसेच शिक्षणाच्या अभावी चांगल्या जीवनापासून दूर राहिलेल्या मुलांच्या गरजांचा सविस्तर अभ्यास करून, त्या गरजा केंद्रस्थानी ठेवून वेळोवेळी योग्य त्या तरतुदी आणि बदल करणे, हे ‘भारतकेंद्री’ शिक्षणच आहे. 

- एक प्रगत देश म्हणून जगात स्थान मिळवण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रांची पायाभरणी शालेय शिक्षणात कशा प्रकारे करावी लागेल हा विचारही ‘भारतकेंद्री’च आहे. 

- भारतीय मुले पुढे उद्योगव्यवसायासाठी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात गेली, तरी ती स्वतःची आणि देशाची प्रतिमा उज्ज्वल ठेवतील अशा सवयी आणि वृत्ती शाळेपासून जोपासणे ही दक्षता ‘भारतकेंद्रीच’ आहे.

- आज वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न, अडचणी, गरजांचा अभ्यास करून त्यांच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण करून देण्याचे प्रयत्नही ‘भारतकेंद्री’च ठरतील. 

- आजच्या डिजिटल युगात भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात माहिती तंत्रज्ञानाचा होणारा यशस्वी वापर आणि भारतीयांच्या त्यातील कामगिरीची अद्ययावत माहिती शाळेपासूनच मुलांपर्यंत पोचवून त्यांना प्रेरित करणे, हेदेखील ‘भारतकेंद्री’ शिक्षणच आहे. अंतराळ विज्ञान, जैवतंत्रज्ञान, अशा अनेक विषयांबद्दलही हेच म्हणता येईल. 

- भारताच्या कानाकोपऱ्यातील नृत्य, नाट्य, चित्र, हस्तकला, वस्त्रनिर्मिती, भरतकाम, अशा अनेक अभिजात ते आदिवासी समृद्ध परंपरांचे शिक्षण घेण्याची उत्तम सोय शाळेपासूनच करणे हादेखील ‘भारतकेंद्री’ शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. नंतर मुलांनी त्याचा उपयोग स्वतःच्या आनंदासाठी केला किंवा व्यवसायासाठी केला, तरी त्यातून भारतीयत्वाच्या जाणिवा बहरतील, हे नक्की.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २३ ऑक्टोबर २०२४)

Saturday, 23 November 2024

'भारतीय’ असण्याचा अर्थ

'भारतीय’ असण्याचा अर्थ  

शालेय शिक्षणातून मुलांच्या मनात स्वतःची एक ‘भारतीय’ म्हणून असणारी ओळख नीट रुजावी, भारतीय असण्याचा रास्त अभिमान निर्माण व्हावा, हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील एक मार्गदर्शक तत्त्व आहे. ‘समृद्ध आणि विविधतेने नटलेली’ भारतीय संस्कृती, प्राचीन तसेच आधुनिक भारतीय ज्ञानपरंपरा हा यापुढे शालेय अभ्यासक्रमाचा आधार, अविभाज्य भाग असेल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात या अनुषंगाने भारतीय तत्त्वज्ञान आणि प्राचीन ज्ञानप्रणालींमधील काही संदर्भ स्पष्ट केले आहेत. त्याचबरोबर भारतीय परंपरांच्या अभ्यासाला वैज्ञानिक दृष्टिकोन, विविधतेचा आदर, लोकशाही भावना, न्याय, समता, सेवाभाव या सगळ्यांचीही बैठक असावी, असेही नमूद करण्यात आले आहे. हा आदर्शवादी हेतू तडीस नेणे हे नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील कदाचित सर्वात कठीण काम असेल. या विषयाशी लोकांच्या भावना, अस्मितांचे प्रश्न गुंतलेले असल्याने आणि त्यांचा राजकीय कारणांसाठी यथेच्छ वापर होत असल्याने प्रत्यक्ष व्यवहारात हा भाग हाताळणे सोपे नाही. त्यांतील समस्यांच्या हाताळणीची फारशी चर्चा धोरणात किंवा आराखड्यात केलेली नाही.

पंचांग हे कालगणनेचे प्राचीन भारतीय साधन आहे. वर्ष, महिना, तिथी, वार, दिवसाचे भाग यांच्या अचूक नोंदी त्यात दिल्या जातात. सूर्योदय, सूर्यास्त, आकाशात चंद्राची स्थिती अशा अनेक खगोलीय घटनांचा त्यात अचूक वेध घेतला जातो. पंचांग आखताना फार पूर्वीपासूनच गणितातील अतिशय प्रगत संकल्पना उपयोगात आणल्या जातात. पण त्यातील नोंदी या मुख्यतः शुभ-अशुभ विचाराशी, इतर कर्मकांडांशी, भविष्याचे ठोकताळे सांगण्याशी घट्टपणे जोडलेल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टीने हा भाग मान्य होण्यासारखा नाही. त्यामुळे अभ्यासक्रमात पंचांगाचा निव्वळ एक ज्ञानप्रणाली म्हणून जरी समावेश केला, तरी त्याला भरपूर विरोध होईल हे उघडच आहे. भारतीय ज्ञानपरंपरा शिकवताना अशा बऱ्याच विरोधाभासांचा गुंता आधी सोडवावा लागेल.

नव्या धोरणातील अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणे अशक्य नाही. मात्र त्यासाठी शालेय अभ्यासक्रमातील विषयांकडे वेगळ्या दृष्टीने पाहावे लागेल.

 संगीत हे शाळेत एक कला म्हणून शिकवले जाते. पण भारतीयत्वाची ओळख रुजवण्यासाठी, भारतीय संगीतपरंपरांच्या आजवरच्या प्रवासाचा अभ्यास हे एक चांगले उदाहरण होऊ शकते. भारतातील अभिजात संगीत आणि लोकसंगीत या दोन्ही परंपरा समृद्ध आणि अभिमानास्पद आहेत. काळाच्या ओघात या प्राचीन संगीतपरंपरांमधे इतर अनेक प्रवाह मिसळले, तरी त्यांचे भारतीय स्वरूप पुसले गेले नाही, उलट समृद्ध झाले. अलीकडील काळात सिनेमा आणि इतर आधुनिक माध्यमांच्या वाढत्या प्रभावाला संगीतक्षेत्राने नुसते तोंड दिले इतकेच नाही, तर सर्व प्रकारचे संगीत सर्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी या आधुनिक साधनांचा खूपच उपयोग झाला. धर्म, जात, पात, प्रांत, संगीतातील घराणी अशी बंधने शिथिल होत चालल्याने संगीतक्षेत्रात आज कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय समावेशकतेचे, सहजीवनाचे, सहसंवेदनशीलतेचे पदर इथे उलगडताना दिसतात.

गणित, विज्ञान अशा इतर ज्ञानशाखांमधे आपल्याला भारतीय परंपरांचा असा सलग समृद्ध प्रवास दिसतो का? त्याचा शोध कसा घेता येईल? तिथे असा प्रवास दिसत नसल्यास त्याची कारणे काय असतील? - शालेय स्तरावर या प्रश्नांची सगळी उत्तरे मिळाली नाहीत, तरी निदान त्यांच्या चिकित्सक विचाराची सुरवात होणे तरी आवश्यक आहे.

अफाट वैविध्य असलेले दुसरे क्षेत्र म्हणजे भारतीय खाद्यसंस्कृती. जगाच्या पाठीवरील अनेकानेक पदार्थ भारतात लोकप्रिय होऊ लागले असले, तरी वेगवेगळ्या भारतीय खाद्यसंस्कृतीदेखील आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहेत. शाळेच्या अभ्यासात फक्त त्यांच्या पोषणमूल्यांचा विचार होतो. त्यांच्या ‘भारतीय’ म्हणून असणाऱ्या ओळखीचा इतिहास, भूगोल, सामाजिक संदर्भ फारसा पाहिला जात नाही. भारतीय खाद्यपरंपरा अतिप्राचीन असल्या, तरी उपासाच्या दिवशी खाल्ले जाणारे साबुदाणा, बटाटा हे ‘सात्त्विक’ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लग्नसमारंभाच्या ताटात मानाची जागा घेणारी ‘जिलबी’ इराणमधून भारतात आली असे मानले जाते. आज अस्सल भारतीय समजल्या जाणाऱ्या अशा अनेक गोष्टी दुरून इथे आल्या आणि इथल्या झाल्या. त्यामुळे त्यांच्या भारतीयत्वाला कुठेही उणेपणा येत नाही. ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. ही समज निर्माण होण्यासाठी शाळेच्या अभ्यासातून वैज्ञानिक दृष्टी आणि लोकशाही मूल्ये जोपासली जाणे फार महत्त्वाचे आहे.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १६ ऑक्टोबर २०२४)

Saturday, 16 November 2024

मूल्यशिक्षणाचे मृगजळ

मूल्यशिक्षणाचे मृगजळ

शाळेत आणि घरीदेखील मुले फक्त नेमून दिलेले पाठ्यघटक शिकत असतात असे नाही. स्वतःच्या निरीक्षणातून आणि अनुभवातून ती इतरही पुष्कळ गोष्टी शिकत असतात. याविषयी एक गंमतीदार उदाहरण नेहमी दिले जाते. लहान मूल बोलायला शिकते, तेव्हा कोणी त्याला भाषेचे नियम ऐकवत नाही, ‘खरे सांग, खोटे बोलू नको,’ असे वर्तनाचे नियम मात्र सतत ऐकवतात. प्रत्यक्षात घडते असे, की मुले भाषेचे नियम आत्मसात करतात, पण खरे बोलतातच असे नाही! त्याबाबत त्यांचा स्वतःचा अनुभव, निरीक्षण वेगळे असते.

शाळेत गेल्यावर मुलांचे ‘मूल्यशिक्षण’ घडावे, यासाठीचे प्रयत्न मुख्यतः भाषा आणि सामाजिक शास्त्रांच्या माध्यमांतून केले जातात. प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या सुरवातीला ‘प्रतिज्ञा’, संविधानाची ‘उद्देशिका’ यांचा समावेश केला जातो. यापूर्वीच्या अभ्यासक्रमांत ‘गाभा घटकांवर’ आणि ‘जीवन कौशल्यांवर’ दिला जाणारा भर हे मूल्यशिक्षणासाठीचेच प्रयत्न होते. तरी अजूनही मूल्यशिक्षणाच्या बाबतीत बराच पल्ला बाकी आहे. 

लहान वयात मुलांना चांगल्या वर्तनाचे साधेसोपे नियम सांगून, ते न ऐकल्यास समज देऊन, थोडीफार शिक्षा करून त्या नियमांचे वळण लावणे निदान शाळेच्या आवारात, काही प्रमाणात तरी साध्य होऊ शकते. उदाहरणार्थ, कचरा इकडेतिकडे फेकू नये; पाण्याची, अन्नाची नासाडी करू नये; शाळेच्या फर्निचरचे, बागेचे नुकसान करू नये; इतर मुलांना त्रास देऊ नये; इत्यादी. पण आठवी-नववीपासून पुढे मुलांमधे रुजवण्याच्या मूल्यांचे स्वरूप अधिक अमूर्त, गुंतागुंतीचे होऊ लागते. घरातून, परिसरातून मुलांची स्वतःची एक मूल्यव्यवस्था आधीच त्यांच्या मनात आकार घेत असते. वयाच्या या टप्प्यावर आता ‘असे का करायचे किंवा करायचे नाही’ याची उत्तरे मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटू लागते. एकाच वेळी बंडखोरी आणि मनातल्या आदर्शांची पूजा अशा म्हटले तर परस्परविरोधी बाबींचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि वर्तनावरही वाढू लागतो. स्वतःचे विचार आणि वागणे तपासण्यासाठी, आवश्यक तर बदलण्यासाठी इष्ट त्या मूल्यांची चौकट किंवा तत्त्वांचा आधार मुलांना याच वेळी मिळणे महत्त्वाचे असते. तसे घडते का? 

मूल्यांची चर्चा, चिकित्सा हा भाग परंपरेने मुख्यतः सामाजिक शास्त्रे, भाषा या विषयांच्या अंतर्गत हाताळला जातो. पण माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर आज प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आधी विज्ञान, मग वाणिज्य, मग त्यानंतर भाषा आणि सामाजिक शास्त्रे अशी विषयांची उतरती भाजणी लागते. विज्ञान-गणितातील सिद्धांत, प्रात्यक्षिके, स्वाध्याय यांना जास्तीत जास्त वेळ आणि महत्त्व मिळू लागते. सामाजिक शास्त्रे, भाषा या विषयांतील तात्त्विक बैठक मुलांपर्यंत व्यवस्थित पोचावी, यासाठी कोणी क्लास लावल्याचे ऐकिवात नाही. मुलांना वैयक्तिक आणि सामाजिक स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची, चर्चेची कितीही गरज असली, तरी आज तो शाळेच्या अभ्यासाचा गांभीर्याने घ्यायचा भाग असल्याचे दिसत नाही.

नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हणूनच या संदर्भाने काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्या म्हणजे, आपल्यापुढील प्रश्न सोडवताना मुलांना इष्ट त्या मूल्यांची एक तार्किक बैठक मिळावी, यासाठी इयत्ता नववीमधे ‘मॉरल अँड एथिकल रीझनिंग – नीतिविषयक कारणमीमांसा, तर्कशास्त्र’ असा एक स्वतंत्र विषय सुरू करावा. त्यामधे वैयक्तिक चारित्र्य (सचोटी इत्यादी मूल्ये), समता इत्यादी लोकशाही व्यवस्थेतील मूल्ये आणि चिकित्सक, तर्काधिष्ठित विचार इत्यादी ज्ञानविषयक मूल्ये अशा विविध पैलूंचा समावेश असावा. शाळेत शिकवली जाणारी मूल्ये आणि घर-परिसरातील मूल्ये यांत तफावत असू शकते. अशा वेळी या विषयाच्या माध्यमातून त्या तफावतीकडे अधिक लक्ष द्यावे. शांततेने, सर्वांचा आदर राखून चर्चा करायला, आपल्या मतांना विरोध झाला, तरी धीर न सोडता अभ्यासपूर्वक आपली बाजू मांडायला मुलांना शिकवावे. या विषयात मुलांचे मूल्यमापन होणेही अपेक्षित आहे, पण ते धडे आणि प्रश्नोत्तरे स्वरूपात नाही, तर मुलांच्या वागण्याबोलण्याची सकारात्मक दृष्टीने नोंद घेऊन. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या मूल्यांचे कोरडे शिक्षण देणे अपेक्षित नाही. शिक्षकांच्या, शाळेच्या, शिक्षणव्यवस्थेच्या सर्व व्यवहारांत मुलांना सातत्याने या नैतिक मूल्यांचा अनुभव मिळणे अपेक्षित आहे. ग्यानबाची खरी मेख तिथेच आहे. अभ्यासक्रम कितीही उत्तम आखला, तरी मुले आपल्याकडून कोणती मूल्ये शिकतात, ते शेवटी आपल्यावरच अवलंबून आहे.

- धनवंती हर्डीकर 

( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ९ ऑक्टोबर २०२४)

Saturday, 9 November 2024

साचेबंद कप्प्यांच्या पलीकडे

 साचेबंद कप्प्यांच्या पलीकडे

आधुनिक काळात शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासविषयांची विभागणी विज्ञान, वाणिज्य, कला अशा वेगवेगळ्या कप्प्यांत झाल्यापासून काही साचेबंद प्रतिमाही तयार झाल्या. उदाहरणार्थ, विज्ञान विषयांत कलात्मकता, सर्जनशीलता, संवेदनशीलता यांना फारसा थारा नाही. कलाविषयांत तार्किक चिकित्सा, सांख्यिकी आणि गणिती विचार यांची गरज नाही. वाणिज्य म्हणजे पैशाचे व्यवहार आणि त्यांच्याशी संबंधित आकडेमोड. या कप्पेबंद विचारांचे प्रतिबिंब त्या त्या शाखांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांत दिसते आणि अनेक पालकही तसाच विचार करताना दिसतात. त्यात भर म्हणजे, विज्ञान आणि वाणिज्य या तुलनेने अधिक आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या शाखा आहेत असा एक समज असल्याने भाषा, कला, सामाजिक शास्त्रे हे विषय, त्यांच्याशी संबंधित घटक आणि क्षमता यांच्याकडे तर उपेक्षेनेच पाहिले जाते. विविध शाखांमधील अकरावी प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ म्हणजे शाखा आणि विषयांच्या उतरत्या भाजणीचे चित्रच असते. नववी ते बारावी या वयोगटातील मुलांना स्वतःची आवडनिवड थोडी स्पष्ट होऊ लागलेली असते आणि आकांक्षांनाही धुमारे फुटू लागलेले असतात. पण त्यांना नीट आकार येण्यापूर्वीच, या साचेबंद विचारांमुळे वेगवेगळ्या शाखांच्या कप्प्यांकडे मुलांची वाटचाल सुरू होते. 

प्रतीक सायन्सचा विद्यार्थी आहे. तो खूप कथा-कादंबऱ्या वाचतो, सिनेमे, वेबसीरिज पाहतो. त्याच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये ते त्यावर भरपूर आणि मनापासून चर्चा करतात. नाटके बसवतात. तो अभ्यासाचा वेळ वाया घालवतो आहे, असे त्याच्या आईवडिलांना वाटते. पण प्रतीकला वाटते, की त्याच्या अभ्यासविषयांपेक्षा या चर्चा, नाटके, त्या कादंबऱ्या, सिनेमे, सीरिज त्याच्या आयुष्याशी थेट जोडलेल्या आहेत. आजच्या जगातील प्रश्न, त्यांची काही उत्तरे खरे तर त्याला त्यांतून मिळत आहेत. हा त्याच्या अभ्यासाचाच भाग असता तर किती बरे झाले असते! स्वानंद स्वतःच्या आवडीने डिजिटल आर्ट शिकायला लागला, तेव्हा गणितातील कितीतरी अल्गोरिदम (गणनविधी) तो वापरायला लागला. त्याआधी कला शाखेचा विद्यार्थी म्हणून त्याने गणिताकडे लक्ष दिले नव्हते. स्पृहाला संगीत आवडते आणि विज्ञानही. पण तिला अकरावीच्या अभ्यासात त्यांपैकी एकच काहीतरी निवडता येईल. भूषणला इतिहास आणि विज्ञान हे दोन्ही विषय खूप आवडतात. पुढे भारतातील विज्ञानाच्या इतिहासावर एखादा चॅनेल सुरू करावा अशी त्याची खूप इच्छा आहे. पण अकरावीत त्याला या दोन विषयांतील एकाचीच निवड करावी लागेल. अशी खूप उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. 

या मुलांना उपलब्ध असलेल्या पर्यायांना ज्या मर्यादा पडत आहेत, त्यामागे खरेतर कोणतेही शैक्षणिक कारण नाही. त्या आजवरच्या जुन्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत. राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमात आज असलेली लवचिकतासुद्धा वापरली जात नाही, याचे कारण एकेका विद्यार्थ्याला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशा वेगवेगळ्या विद्याशाखांतील विषय घेऊ देणे शाळाकॉलेजांना सोयीचे नसते. पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यात बदल घडवणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाची आणि पुढील आयुष्याची दिशा स्वतःच्या मर्जीनुसार निवडता आली पाहिजे. त्यासाठी विद्याशाखांचे पारंपरिक कप्पे मोडून, भरपूर आणि वैविध्यपूर्ण पर्याय देऊन, विषययोजनेत लवचिकता आणणे अपेक्षित आहे. 

विषयांचे कप्पे न करण्याला शैक्षणिक आधार आहे का? प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी काही वेगळ्या क्षमता लागतात, हे जरी मान्य केले, तरी सर्वच विषय शिकताना स्वयंशिस्त, वेळेचे व्यवस्थापन, प्रामाणिक प्रयत्न अशा क्षमता आत्मसात करणे हा समान धागा असतोच. त्याखेरीज आजवर वेगळ्या काढलेल्या विषयांतही अनेक क्षमतांचा समान पाया असतो. उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे घटक आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव तपासून, समजून घेणे अशी विश्लेषणाची, चिकित्सेची क्षमता जशी वैज्ञानिक घटनांच्या  अभ्यासासाठी आवश्यक असते, तशी इतिहास-भूगोलातही आवश्यक असते; उद्योगव्यवसायाचे स्वरूप ठरवतानाही आवश्यक असते आणि कवितेचे रसग्रहण करतानाही आवश्यक असते. सर्जनशील विचार नव्या साहित्यरचना करताना लागतो, तसाच वैज्ञानिक समस्यांची नवी, अधिक चांगली उकल करतानाही लागतो. कलात्मक वस्तूचे सौंदर्य कशात लपले आहे, हे समजून घेताना गणिती प्रमाण, आकृतिबंध कळावे लागतात, तर गणिती विश्लेषण करताना त्यांतील आकृतिबंध, संकल्पनांतील सहसंबध दिसणे हा सौंदर्याचाच आविष्कार असतो. आशयापेक्षा क्षमताविकासावर भर हे तत्त्व स्वीकारले, तर विद्याशाखांच्या कृत्रिम भिंती मोडणे शैक्षणिकदृष्ट्‍या अवघड नाही.

-धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ०२ ऑक्टोबर २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...