शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन
व्याख्या, सूत्रे, माहिती आणि अशाच इतर तपशीलांवर प्रश्न काढणे आणि त्यांची उत्तरे बरोबर की चूक हे ठरवणे सोपे असते. पण शिकण्याची क्षमता ही अमूर्त गोष्ट आहे. तिचे मूल्यमापन कसे करणार? ती उपजतच असावी लागते अशीही एक समजूत असते. ती खरी धरल्यास दरवर्षी तिचे मूल्यमापन तरी काय करणार? ज्या गोष्टीचे मूल्यमापन होत नाही, तिला शिक्षणपद्धतीत महत्त्व राहत नाही. या संदर्भात शिक्षक, पालकांपर्यंत काही गोष्टी प्रभावीपणे पोचवण्याची गरज आहे - शिकण्याच्या, शिकत राहण्याच्या क्षमतेचा जाणीवपूर्वक विकास करता येतो, मूल्यमापनही करता येते, मात्र त्यासाठी पारंपरिक प्रश्न आणि परीक्षांपेक्षा वेगळे प्रश्न, वेगळी तंत्रे प्रामाणिकपणे वापरायला हवीत.
नेहमीच्या परीक्षांमध्ये मुले तोपर्यंत काय शिकली हे तपासले जाते. पण शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करताना पुढील भाग शिकण्याची मुलांची किती तयारी आहे, हे आजमावले जाते. या मूल्यमापनाचा उपयोग मुलांवर शिक्के मारण्यासाठी नाही, तर त्यांना लागणारे पुढील मार्गदर्शन देण्यासाठी होतो. याचा अर्थ त्या त्या विषयातील संबोधांची, आशयाची परीक्षा घ्यायचीच नाही, असा नाही. पण मुलांना त्या संबोधांचा उपयोग करता येणे जास्त महत्त्वाचे. उदाहरणार्थ, इतिहासाच्या परीक्षेत ‘उताऱ्यातील वर्णन वाचून त्याचा काळ निश्चित करा आणि तो कसा निश्चित केला, हेही लिहा’ असे सांगणे. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत लोकजीवनाचे – कपडे, अन्न, राहणी, चालीरीती यांचे - वर्णन देऊन तेथील हवामान, उद्योगधंदे, भौगोलिक वैशिष्ट्ये इत्यादींचा अंदाज बांधायला सांगणे. वैज्ञानिक उताऱ्यातील कोणत्या बाबी पडताळून पाहता येतील आणि कशा, ते विचारणे. अर्थात असे उतारे निवडताना, तयार करताना शिक्षकांचाही कस लागेल.
प्रश्नपत्रिकेतील असे बदल अगदी सुरवातीच्या इयत्तांपासूनच करणे शक्य आहे. अगदी सोपे उदाहरण घ्यायचे, तर गणितात नुसत्या सुट्या आकृत्या देऊन त्यांची चौकोन, त्रिकोण अशी नावे लिहायला सांगण्यापेक्षा, एखादे नेहमीच्या पाहण्यातील दृश्य देऊन त्यात आढळणारे आकार ओळखायला सांगणे. परिसर अभ्यासात ‘दिलेले वर्णन वाचून सजीव की निर्जीव, प्राणी की वनस्पती ते ओळखा आणि कसे ओळखले ते सांगा’ असा प्रश्न करणे.
मूल्यमापन फक्त सत्राअखेर किंवा वर्षाअखेर एकदाच न करता, दररोज वर्गात शिकवतानाही एकीकडे मुलांचे मूल्यमापन करत राहायचे ही कल्पना शाळांमध्ये नवीन नाही. शिकण्याच्या क्षमतेच्या विकासासाठी हे पद्धतशीरपणे घडणे फार महत्त्वाचे आहे. एक तर मुलांना त्या त्या स्तराला योग्य अशी अभ्यासाची वेगवेगळी तंत्रे शिक्षकांनी जाणीवपूर्वक सांगितली पाहिजेत, त्यावर चर्चा केली पाहिजे आणि स्वतःसाठी सगळ्यात जास्त उपयोगी तंत्रे मुलांना स्वतः निवडू दिली पाहिजेत. मग त्यासाठी छोटी छोटी उद्दिष्टे नेमून देऊन मुले ती पूर्ण करू शकतात की नाही, हे पाहता येईल. गृहपाठ, निबंध एकदाच तपासून न टाकता मुलांनी आपल्या चुका दुरुस्त करून, सुधारणा करून ते पुन्हा लिहावेत अशी संधी देता येईल. आपल्या वर्गातील मुलांच्या अभ्यासाच्या सवयी, त्यातील अडचणी याबाबत प्रश्नावली तयार करून शिक्षक एक छोटे सर्वेक्षण करू शकतात. वर्गातील प्रत्येक मुलाची वर्षातून किमान चार वेळा ‘अभ्यास’ या विषयावर मुलाखत घेऊन, त्याच्या नोंदी ठेवून मुलांच्या सवयींत, वृत्तींत किती, कसा फरक पडला, ते पाहता येईल. त्याचा उपयोग मुख्यतः मुलांना वैयक्तिक गरजेनुसार अभ्यासाचे टप्पे ठरवून देण्यासाठी, समजावून देण्यासाठी करणे महत्त्वाचे. मग हे टप्पे ती गाठू शकतात की नाही, याचे वैयक्तिक मूल्यमापन करता येईल. दिलेल्या भागावर मुलांना स्वतःलाच प्रश्नपत्रिका तयार करायला सांगणे, एखादा भाग इतरांना शिकवण्याची संधी देणे हीदेखील काही सुपरिचित उपयोगी तंत्रे आहेत.
सार्वजनिक किंवा बोर्डाच्या परीक्षांमध्येही ‘अभ्यासक्रमाच्या बाहेरील’ वाटू शकतील असे, संबोधांच्या खऱ्या आयुष्यातील उपयोजनावर आधारित प्रश्न येऊ शकतील; सविस्तर, चर्चात्मक, रसग्रहणात्मक उत्तरे लिहावी लागतील, यासाठीही शिक्षक, विद्यार्थ्यांना तयार करावे लागेल. मुख्य म्हणजे तयार उत्तरे, प्रकल्प वगैरे पुरवणे, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेत अवाजवी भरमसाठ गुण देणे अशा मार्गांनी आपण मुलांच्या शिकण्याच्या क्षमता पोखरून टाकत आहोत यांची प्रखर जाणीव सर्व संबंधितांच्या मनात निर्माण करावी लागेल.
- धनवंती हर्डीकर
( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २८ ऑगस्ट २०२४ )
No comments:
Post a Comment