विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेताना
शालेय शिक्षणाची अंतिम उद्दिष्टे आणि त्यांचे इयत्तावार टप्पे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी समानच असतात. तरीही शिक्षणात समानता दिसत नाही, याचे कारण शेवटचा टप्पा ठरलेला असला, तरी प्रत्येक मुलाची सुरवात वेगळ्या बिंदूपासून होते आणि वाटचालही वेगवेगळ्या प्रकारे होत राहते. हे वेगळेपण लक्षात घेऊन प्रत्येक मुलाला त्याच्या शिक्षणात आवश्यक ती मदत मिळावी, अशी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील महत्त्वाकांक्षी अपेक्षा आहे. शिक्षकांच्या हाताशी असलेल्या अपुऱ्या साधनसुविधा आणि इतर अडचणी लक्षात घेतल्या, तरी त्या दृष्टीने सुरवात तर नक्कीच करायला हवी आहे. आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाच्या स्वतंत्र आरंभबिंदूचा, गरजांचा अभ्यास ही त्यातील पहिली पायरी आहे.
शिक्षण ही सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे, असे धरले, तर गरजांचा अभ्यासही सर्वांगीण असायला हवा. भौतिक, शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक सर्व प्रकारच्या गरजांचा परिणाम शिकण्यावर होत असतो. भुकेलेले, आजारी, दुःखी, अस्वस्थ, कंटाळलेले, चिडलेले मूल शिकण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, हे उघडच आहे. यावर उपाय करणे बऱ्याचदा शिक्षकांच्या हातात नसते. एखाद्या मुलाच्या बाबत सतत असे काही दिसत असेल, तर त्याची दखल घेऊन समुपदेशन, पालकांशी चर्चा असे काही उपाय शिक्षक करू शकतात, करत असतात. ही टोकाची उदाहरणे झाली. गरजांचा विचार यापेक्षा अधिक व्यापक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया जास्तीत जास्त फलदायी व्हावी, म्हणून प्रत्येक मुलाच्या परिस्थितीचे शिक्षकाने काढलेले मानसचित्र म्हणजे गरजांचा अभ्यास. पारंपरिक स्वरूपाची परीक्षा घेऊन मुलांना अभ्यासातील काय येते, काय येत नाही, हे स्पष्ट होते. त्यापुढे जाऊन, ते का येत नाही, याचा शोध म्हणजे गरजांचा अभ्यास. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि गटवार प्रकल्प, उपक्रम, चर्चा, सर्वेक्षणे, क्षेत्रभेटी, छोटे शोधनिबंध, सादरीकरण असे पारंपरिक अभ्यासापेक्षा निराळे मार्ग हाताळायचे आहेत. ते हाताळताना प्रत्येक मूल कसा प्रतिसाद देते, त्याला कुठे मदतीचा हात हवा आहे, त्याचा अभ्यास म्हणजे गरजांचा अभ्यास. सर्वसाधारण विद्यार्थ्याला तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यालाही आणखी पुढे जाण्यासाठी काय आवश्यक आहे, ते पाहणे म्हणजे गरजांचा अभ्यास.
अंकिताकडे तिला दिलेल्या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे, पण तिला वर्गासमोर उभे राहून बोलण्याची भीती वाटते. तिचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. कोणती कृती करायची, हे तेजसला नीटसे कळलेले नाही, पण ते इतरांना किंवा शिक्षकांना पुन्हा विचारण्यात त्याला कमीपणा वाटतो. त्याला थोडी भावनिक समुपदेशनाची गरज आहे. गटात चर्चा करताना वरद एकटाच जोरात बोलत राहतो, त्याची सामाजिक कौशल्ये सुधारण्याची गरज आहे. अस्मिताने पुस्तकातील गणिते केव्हाच सोडवून टाकली आहेत. बाई वर्गात शिकवत असताना ती टिवल्याबावल्या करत बसते. तिला आव्हानात्मक वाटेल, असे काम देण्याची गरज आहे. आर्यन प्रत्यक्षात प्रयोग नीट करून दाखवतो, पण ते शब्दांत लिहिताना त्याचा गोंधळ होतो. त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी त्याच्या लेखनक्षमतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. क्षेत्रभेटीत काय पाहिले, हे सोहम व्यवस्थित लिहितो, पण त्यावरून स्वतःचे निरीक्षण, निष्कर्ष सांगणे त्याला जड जाते. त्याच्या विचारशक्तीला थोडी चालना द्यायला हवी आहे. आशयकेंद्री अध्यापनात अशा बाबींकडे लक्ष दिले जात नसे. पण तो साचा बदलायचा असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला नेमक्या कोणत्या आधाराची गरज आहे, हे पाहून त्यानुसार कृती करण्याचे अवघड काम शिक्षकांना करावे लागेल. हे जर करता आले, तर वर्गातील अध्ययन-अध्यापन मुलांना खरोखरच आपलेसे वाटू लागेल. गरजांचा अभ्यास मुलांची गुणवत्ता कमीजास्त ठरवण्यासाठी नाही, तर सर्वांना आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी करणे महत्त्वाचे.
प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात ‘अध्ययन निष्पत्ती’ म्हणून मुलांच्या बौद्धिक विकासाचे अपेक्षित टप्पे दिले जातात. त्यासोबत भावनिक, सामाजिक, मनोकारक (सायकोमोटर) विकासाचे अपेक्षित टप्पेही स्वतंत्रपणे नोंदवले, तर शिक्षकांना आपल्या मुलांच्या गरजा ठरवणे सोपे जाईल. वर्गातील अध्ययन-अध्यापनाचा आतापर्यंतची चाकोरी मोडून नवे शैक्षणिक वातावरण तयार करायचे असेल, तर मुलांची प्रगती ठरवण्याचे नवे आयाम लक्षात घ्यावे लागतील.
- धनवंती हर्डीकर
(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, ०४ सप्टेंबर २०२४)
No comments:
Post a Comment