Wednesday, 2 October 2024

सफर नवोपक्रमांच्या नवलनगरीची

 सफर नवोपक्रमांच्या नवलनगरीची                                                                ('शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' या उपक्रमांतर्गत डॉ. वसंत काळपांडे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरने प्रकाशित केलेल्या ‘नवोपक्रमांची नवलनगरी’ या पुस्तकाविषयी माहिती देणारा हा लेख) 

कामाच्या निमित्ताने मी माझा मित्र अजित वांडरे याच्या शाळेत गेलो होतो. त्याची शाळा द्विशिक्षकी प्रकारातील वस्ती शाळा होती. भेटीदरम्यान त्याने मला दुसरीच्या वर्गात नेले आणि मुलांना ABCD म्हणण्यास सांगितले. त्याबरोबर ती मुले A for Attitude, B for Business, C for Career असे म्हणत होती. मी अचंबित झालो. 

“अरे हे काय? ही कोणती ABCD”? मी म्हणालो. “A for Ant, B for Ball हे तर सर्वांनाच पाठ असते. हे त्यापेक्षा वेगळे आहे आणि त्यानिमित्ताने नवीन शब्दांची ओळख होते”, अजित म्हणाला. 

“अरे पण एवढे अवघड शब्द ?” मी म्हटलं. 

“ती आपली अडचण असते. मुलांची नाही. आणि आमचा A for Attitude हा काही फिक्स नाही तो नेहमी बदलत राहतो त्यामुळे आमची ABCD सतत नवीन असते", अजितने सांगितले. 

हा अजित असेल किंवा गणितातील केवळ सूत्रे न सांगता त्यामागील गोष्ट सांगणारा एन. डी. पाटील असेल, मला वाटते त्यांचे हे सर्व नवोपक्रमच आहेत. जेंव्हा एखादा शिक्षक त्याला व त्याच्या विद्यार्थ्यास रूचेल अथवा पचेल असे नवीन अध्ययन अनुभव देवून आपले कार्य साधत असतो, तेव्हा तो त्याचा नवोपक्रमच असतो. त्यादृष्टीने मला ‘नवोपक्रमांची नवलनगरी’ पुस्तक महत्त्वाचे वाटते. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या प्रमुख बाबींवर भर दिला आहे, त्यापैकी काही महत्त्वपूर्ण बाबींना समर्पक असे विविध नवोपक्रम या पुस्तकामध्ये आहेत. तसे पाहिले तर स्वयंपाक घर हे प्रत्येकाच्या घरात असतेच, मग ते घर मोठे असो अथवा छोटे. त्याचाच वापर शैक्षणिक साधन म्हणून नवीन अनुभव देण्यासाठी कसा करता येईल याचा वस्तुपाठ वर्षा गायकवाड यांच्या "स्वयंपाकघरातून संशोधनाकडे" या उपक्रमातून दिला आहे. पुस्तकापलीकडचे जग दाखवायचे तर प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत हे सांगताना त्यांनी योजलेले उपक्रम व दिलेल्या भेटी पाहता या उपक्रमाचा त्यांनी कृती, कृतीमागील शास्त्र, त्यांचे आहारमूल्य आणि त्यामागील अर्थशास्त्र इथपर्यंत विस्तार केला आहे. थोडक्यात हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

नवीन शैक्षणिक धोरणात शालेय स्तरावर ग्रंथालये समृद्ध करणे करणे अपेक्षिलेले आहे. त्यासाठी अत्यंत सोप्या, स्वस्त, व सहज उपलब्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीतून ग्रंथालय कसे विकसित करता येते हे कृष्णात जाधव यांनी आपल्या “रद्दीतून ग्रंथालय" या उपक्रमातून दाखवून दिले आहे. प्रत्येक शाळेस महागडी पुस्तके विकत घेता येतीलच असे नाही. पण शिक्षक जर कल्पक असेल तर काय अशक्य आहे ? अगदी रोजचे वर्तमानपत्रही चांगले ग्रंथालय ठरू शकते. कसे ते कृष्णात जाधव यांचा नवोपक्रम वाचला की लक्षात येते. 

गजानन निवळे यांनी ओरिगामीचा वापर दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कसा करता येईल याचे प्रात्यक्षिकच आपल्या उपक्रमातून सादर केले आहे. बौद्धिकदृष्ट्या सौम्य आणि मध्यम दिव्यांग मुलांमध्ये कारक कौशल्यांच्या विकासासाठी हात व डोळा यांचा समन्वय का आवश्यक आहे हे विविध उदाहरणांद्वारे समजावून दिले आहे. ओरिगामीद्वारे दिव्यांग मुलांच्या जीवनात नवी दृष्टी निर्माण करता येते हे आपणांस या नवोपक्रमातून लक्षात येईल. 

आपल्या आंतरिक तळमळीने स्थलांतराचा प्रश्न सोडणारा जगदीश कुडे असो किंवा मुलांच्या शालेय अभ्यासात पालकांना सामावून घेणारे रामकृष्ण वाटेकर असोत, या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांचे उपक्रम आपल्याला नवी दृष्टी देतात. इतिहासाचा अभ्यास शाळेत बसून करण्याऐवजी जर प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारा केला तर काय परिणाम साधता येतो हे डॉ. शिवानी लिमये यांनी त्यांच्या उपक्रमात सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. 

संगीत व कला यांचे स्वतंत्र महत्त्व आपण जाणतो. मात्र यांचा  वापर अध्यापनामध्ये केला तर मुलांच्या अभिव्यक्तीमध्ये किती लक्षणीय बदल घडून येतात, मुलांच्या कला कशा फुलून येतात व त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनाबाबत गोडी वाढून त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, हे सोमनाथ वाळके यांनी आपल्या उपक्रमातून सिद्ध केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सर्जनशील विचारांना खूपच महत्त्व दिले आहे. त्यादृष्टीने राजकिरण चव्हाण यांनी आपल्या Iconic Club या सर्जनशील उपक्रमाने चकित केले आहे. आदर्शांचे केवळ अनुकरण न करता ते आदर्श का आहेत? आपण त्यांचे का अनुकरण करायचे? याची माहिती विद्यार्थीदशेतच जर विद्यार्थ्याना मिळाली तर भविष्यात उत्तम नागरिक निर्माण होण्यास कसा फायदा होईल हे त्यांच्या नवोपक्रमातून शिकायला मिळते. तर मुलांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या विकासास कशी चालना द्यावी हे राम जाधव यांच्या उपक्रमातून पाहाण्यास मिळते. 

शाळेत शिकण्याची प्रमाण भाषा मराठी असली तरी जवळपास बावन्न ते पंचावन्न बोली भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात. बहुसांस्कृतिकत्व व बहुभाषिकत्त्व हे सूत्र पकडून उमेश खोसे यांनी पालावरच्या मुलांसाठी मराठीबरोबरच त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत शब्दकोश तयार केला आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. स्थानिक मुलांना शिकण्याची गोडी लावणारा हा उपक्रम हा महत्वाचा वाटतो.

जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर व आपला विद्यार्थी उद्याचा केवळ भारताचा नव्हे तर संपूर्ण विश्वाचा नागरिक बनणार आहे. त्या दृष्टीने इंग्रजीचे वाढते महत्त्व लक्षात घेवून किशोर भागवत व मंगेश कडलग यांनी ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजीचे ज्ञान वाढावे व इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठीचे उपक्रम आपणास या पुस्तकात वाचायला मिळतात. 

कृतीतून विज्ञान व जलसाक्षरता हे विषय मांडणारे प्रवीण शिंदे व डॉ. नंदकिशोर बोकाडे तर खूप काही शिकायचे तर काही विसरायलाही हवे व पुन्हा शिकायला हवे, याबद्दल बोलतात. लर्निंग टू अनलर्न अँड रीलर्न ही आधुनिक संकल्पना प्रत्यक्षात कशी राबवता येईल हे मांडणाऱ्या शिल्पा पाटील यांचा उपक्रम आपणास खूप काही शिकवून जातो.

‘मेंदूचा पासवर्ड’ या पुस्तकाद्वारे सर्वदूर परिचित असणाऱ्या या पुस्तकाच्या संपादक डॉ. श्रुती पानसे यांनी उद्या चांगले हवे असेल तर, आज सकस द्यावे लागेल हे आपल्या नवोपक्रमाचे योगदान यात अगदी मुद्देसूद व तार्किकपणे मांडले आहे. त्यांचा लेख हा या पुस्तकास वैचारिक अधिष्ठान मिळवून देतो. 

एकूणच सर्व शिक्षकांनी केलेले नवोपक्रम केवळ काहीतरी वेगळे व नवीन करायचे म्हणून केलेले नाहीत तर उपक्रमाच्या नाविन्याबरोबरंच त्याची उपयुक्तताही लक्षात घेतली आहे. हे सर्व नवोपक्रम म्हणजे केवळ आकडेवारीचा मारा न होता प्रत्येक उपक्रम हा सहज, सुलभपणे आकलन होईल असे याचे स्वरूप ठेवले आहे. वाचणाऱ्या प्रत्येकास हे उपक्रम वाचावेत, कृतीत आणावेत अशी रचना करण्यात डॉ. वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकाचे संपादक महेंद्र गणपुले व डॉ. श्रुती पानसे आणि नवोपक्रमशील शिक्षक यशस्वी झाले आहेत. 

आजपर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरने दरवर्षी शिक्षण विकास मंच, मुंबई यांच्यामार्फत होणाऱ्या ‘शिक्षण कट्टा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करून त्यांचे प्रकाशन केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उपक्रम वेचक वेधक, कट्टा शिक्षणाचा, शिक्षणव्रती डॉ. कुमुद बन्सल, WhatsApp चर्चा - शिक्षण विकासाच्या, सेमी इंग्रजी का व कसे? ही काही निवडक पुस्तके सांगता येतील. गतवर्षी प्रसिद्ध केलेले ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे पुस्तक अल्पावधीत लोकप्रिय झाले असून चौथ्या आवृत्तीच्या मार्गावर आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकजण या नवलनगरीची सफर करेलच, पण सर्वसामान्य वाचक सुध्दा या नवलनगरीत रमतील असा विश्वास वाटतो.  

पुस्तकाचे नाव – नवोपक्रमांची नवलनगरी

प्रकाशक – सतीश पवार 

(डिजिटल वर्क्स एलएलपी, पुणे)

संपर्क - ७२१८७७७७२१ 

पृष्ठे - ११६ किंमत – ₹३५० /-   


- अजय महादेव काळे

(लेखक परिचय: जिल्हा परिषद शाळा, सिद्धेवाडी, ता. तासगाव जि. सांगली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून ‘QR code चा अध्ययन-अध्यापनात उपयोग’ या नवोपक्रमास NCERT, नवी दिल्लीने सन २०१९ चा ‘नॅशनल अवार्ड फॉर इनोव्हेशन – २०१९’ हा राष्ट्रीय पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला आहे. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, साधना, लोकप्रभा, शिक्षणगाथा आदी मासिकांत त्यांचे जवळपास चाळीसच्यावर लेख प्रकाशित झाले आहेत.)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...