Saturday, 19 October 2024

खुले, बहुपेडी अध्यापन

खुले, बहुपेडी अध्यापन

वर्गातील प्रत्येक मुलाकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षण दिले पाहिजे, ही बाब अधोरेखित करताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात काही पद्धती आणि तंत्रे सुचवली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘डिफरन्शिएटेड’ (विभेदित) अध्यापन. याचा एक अर्थ म्हणजे वेगवेगळ्या मुलांची तोपर्यंतची एकूण तयारी किंवा क्षमता लक्षात घेऊन, त्यांना त्यानुसार कमीजास्त काठिण्यपातळीचा अभ्यास देणे. उदाहरणार्थ, गणित शिकवताना एकाच घटकावर काही मुलांना अवघड, तर ज्यांचे मूलभूत संबोध अजून पक्के नाहीत, त्यांना अगदी सोपी गणिते द्यायची. यामागची कल्पना अशी, की कोणताही घटक शिकताना प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने शिकता यावे, पुढे जाता यावे.

‘डिफरन्शिएटेड’ अध्यापन या कल्पनेची हाताळणी फार संवेदनशीलतेने, सक्षमपणे होणे गरजेचे आहे. एक तर प्रत्येक मुलाच्या क्षमतेचा स्तर त्याच्या शिक्षकांना नेमकेपणाने माहीत हवा. त्यात वेळोवेळी काय फरक होतो आहे, याची त्यांनी सतत दखल घ्यायला हवी आणि त्या मुलाला देण्याच्या कामात बदलही करायला हवा. डिजिटल स्वयं-अध्ययन प्रणालीत कदाचित हे करता येईल, पण वर्गातील थेट अध्यापनात हे करणे जिकिरीचे आहे. विशेषतः खूप विद्यार्थी असलेल्या वर्गात तर खूपच अवघड आहे. शिवाय वरील उदाहरणाप्रमाणे फक्त आकलनात्मक भाग विचारात घेतला, तर यामुळे शिक्षक-विद्यार्थी-पालक स्तरावर याबाबत गैरसमज निर्माण होण्याची, मुलांवर ‘प्रगत-अप्रगत’ असे शिक्के बसण्याची, वर्गातील वातावरण बिघडण्याची आणि मागे राहिलेल्या मुलांची शिकण्याची प्रेरणा नष्ट होण्याचीही शक्यता आहे.

‘डिफरन्शिएटेड’ अध्यापनाचा आणखी व्यापक अर्थ असा, की प्रत्येक मुलाची वेगळी आवडनिवड, अभ्यासाची वेगळी पद्धत, त्याला पूर्वी मिळालेल्या, न मिळालेल्या संधींमुळे तयार झालेला त्याच्या शिक्षणाचा बरावाईट आलेख, हे फरक लक्षात घेऊन, शिकण्याचे अनेक पर्याय वर्गात एकाच वेळी उपलब्ध करून देणे. 

दीपाली मॅडमना कविता शिकवायला फार आवडते. कवितेचे मर्म आणि सौंदर्य समजून ती कायम लक्षात राहणे हा मुलांसाठी आयुष्यभराचा ठेवा आहे, तो प्रत्येकाला मिळायला हवा असे त्यांना वाटते. त्यासाठी त्यांनी स्वतः कवितेची ओळख करून दिल्यानंतर, त्या अनेकदा वर्गात मुलांचे गट पाडतात. हे गट बदलत राहतात, पण दर वेळी प्रत्येक गटात भिन्न भिन्न आवडीनिवडी आणि वेगवेगळ्या क्षमता असलेली मुले असतील अशी काळजी त्या घेतात. प्रत्येक गटाला कवितेशी संबंधित अनेक वेगवेगळ्या कृती त्या देतात – कविता सुंदर अक्षरांत लिहिणे, त्याला चित्रे, नक्षी, वगैरे काढून समर्पक सजावट करणे, सोबत कवितेचा अन्वय लावून तो लिहिणे, त्याला कवितेच्या वैशिष्ट्यांचे टिपण किंवा रसग्रहण जोडणे, त्यावर एक छोटा नाट्यप्रसंग किंवा नृत्यनाट्य लिहून, बसवून तो सादर करणे, कवितेच्या अनुषंगाने स्वतःचे अनुभवकथन करणे, वगैरे. हा गृहपाठ नसतो. मुले वर्गातच ही कामे करतात. कोणते काम कोणी करायचे, हे गटांतील मुले स्वतःच ठरवतात. गटांचे काम पूर्ण झाल्यावर ते वर्गात सर्वांसमोर सादर करतात. मग त्यावर चर्चाही होते. कधी कधी सर्वोत्कृष्ट कामाची निवड होते. यात वेळ खूपच जातो, पण प्रत्येक मूल कवितेशी त्याच्या त्याच्या रुचीनुसार जोडले जाते. शिवाय संघभावना, आपल्यापेक्षा वेगळी मते, क्षमता जवळून पाहण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिळते. गटाच्या एकत्रित कामाची दखल मॅडम आकारिक मूल्यमापनात घेतात.

विज्ञान शिकवणाऱ्या मीनाक्षी मॅडमच्या वर्गातही असेच बहुपेडी अध्यापन चालते. आपण कोणता स्वाध्याय, उपक्रम किंवा प्रकल्प निवडायचा, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मुलांना असते. तसे भरपूर पर्याय त्या देतात – त्या घटकावर आधारित प्रयोग वर्गात सादर करायचे, त्याच्याशी संबंधित बातम्या गोळा करायच्या, त्या घटकाची थोडक्यात माहिती देणारे पोस्टर, टीव्ही-रेडिओ स्क्रिप्ट तयार करायचे, त्याच्याशी संबंधित प्रश्नमंजूषा तयार करायची, इतर इयत्तांमध्ये त्याबद्दल आलेला भाग शोधायचा, तो घटक इतरांना समजावून सांगायचा, वगैरे. हे काम एकट्याने, जोडीत की गटात करायचे, ते बरेचदा मुलेच ठरवतात. या सर्व कामांची तयारी करत असताना त्या घटकाची निरनिराळ्या माध्यमांतून उजळणी होतेच, शिवाय शिकण्याची प्रक्रियाही अधिक अर्थपूर्ण, उत्साहाची होऊ लागते. खुल्या आणि समावेशक अध्यापनाचे मार्ग स्वीकारले, तर कोणत्याही वर्गात असे बहुपेडी, समृद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकेल.

- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ११ सप्टेंबर २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...