एकात्मिक, आंतरविद्याशाखीय शिक्षण
मागच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात ‘एकात्मिक’ पाठ्यपुस्तकांचा प्रयोग चालू आहे. वेगवेगळ्या विषयांच्या आधीपासून वापरात असलेल्या पाठ्यपुस्तकांचे चार तुकडे करून, त्यांत कोणताही सहसंबंध न लावता, ते नुसते चार भागांत एकत्र बांधून तयार केलेल्या या पुस्तकांत ‘एकात्मिक’ काय आहे, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर नाही. एकात्मिक ही संकल्पना त्याहून खोलात जाणारी आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (2020) आणि शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात (2023) शिक्षणातील एकात्मता, आंतरविद्याशाखीय शिक्षण, बहुविद्याशाखीय शिक्षण या बाबींचा वारंवार उल्लेख येतो. त्यामागचा विचारही त्यात सविस्तरपणे दिला आहे. तो समजून घेण्याची गरज आहे.
शिक्षण देण्याघेण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे मुलांना आपल्या परिसराचे ज्ञान व्हावे, परिसराचा एक सुज्ञ, जबाबदार घटक म्हणून त्यात सहभागी होता यावे. मुलांच्या वयानुसार या परिसराची व्याप्ती स्थानिक – प्रादेशिक – राष्ट्रीय -वैश्विक - अशी वाढत जाते. त्यातील भौतिक, जैविक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या पैलूंचे बारकावे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात. शिकवण्याच्या सोयीसाठी आपण ते भाषा, गणित, भूगोल, विज्ञान अशा विषयांच्या कप्प्यांत विभागले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात आपण एकाच वेळी अनेक विषय हाताळत असतो. साधे भाजी आणण्याचे उदाहरण घेतले, तरी तेव्हा संवाद करताना भाषा, हिशोब करताना गणित, भाज्या निवडताना आणि पिशव्यांत ठेवताना वनस्पतिशास्त्र, भौतिकशास्त्र अशा खूप विषयांचा वापर आपण सहजतेने एकाच वेळी करत असतो. शिकवताना मात्र त्यांपैकी भाषेचे व्याकरण, गणितातील आकडेमोड, वनस्पतींची नावे आणि उपयोग, आकारमान, घनता आणि इतर भौतिक गुणधर्म हे सगळे भाग सुटे करून स्वतंत्रपणाने शिकवले जातात. असे करण्यात त्यांचा संदर्भ हरवतो आणि मग मुलांना शिकण्याचा अनुभव कृत्रिम, नीरस वाटू लागतो. एकात्मिक शिक्षण पद्धतीत प्रत्येक अध्ययन घटक त्याच्या प्रत्यक्षातील संदर्भासह शिकवला जाईल, मुलांना तो जीवनाशी सहजतेने जोडता येईल, अर्थपूर्ण वाटेल असा प्रयत्न केला जातो. हे करण्याचे दोनतीन मार्ग आहेत. एक म्हणजे शालेय विषयांची विज्ञान, भूगोल, इतिहास, भाषा, कला, क्रीडा अशी पारंपरिक विभागणी बाजूला ठेवायची. त्याऐवजी ‘अन्न’, ‘पाणी’, वाहतूक’, ‘व्यवसाय’ अशा काही थीम्स किंवा केंद्रविषय ठरवून घेऊन त्यांच्याच भोवती संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना करायची. सुरवातीच्या टप्प्यावर म्हणजे फार तर चौथीपाचवीपर्यंत हे करणे तुलनेने सोपे जाते. याचे कारण बहुतेक ठिकाणी एकच शिक्षक सर्व विषय हाताळत असतात. अध्ययन घटकही संख्येने कमी, प्राथमिक स्वरूपाचे असतात. त्यांना एकत्र गुंफणे तसे सोपे असते. तरी भाषा, गणित यांतील काही मूलभूत बाबी स्वतंत्रपणेच शिकवाव्या लागतात. उदाहरणार्थ, लेखनाचे नियम किंवा दशमान पद्धतीतील स्थानिक किंमत हा घटक. हे लक्षात घेऊन, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात असे सुचवण्यात आले आहे, की पहिलीदुसरीत दोन भाषा, गणित यांचा पाया पक्का करावा, इतर ‘अभ्यासविषय’ नसावे. तिसरी ते पाचवी या टप्प्यावर दोन भाषा, गणित, कला-हस्तव्यवसाय आणि शारीरिक शिक्षण यांखेरीज फक्त ‘द वर्ल्ड अराऊंड अस’ – ‘आपल्या भोवतीचे जग’ असा एकच एकात्मिक विषय असावा.
पुढच्या टप्प्यांवर मात्र सगळे अध्ययन घटक काही ठराविक केंद्रविषयांत (थीम्स) बसवणे जिकिरीचे होते. शिवाय हे काहीसे प्रगत शालेय विषय हाताळणारे शिक्षकही वेगवेगळे असतात. म्हणून सहावीपासून पुढे सामाजिक शास्त्रे, विज्ञान अशी विषयांची विभागणी केली जाते. मात्र हे विषय जरी स्वतंत्रपणे शिकवले तरी शिकवताना, आशय निवडताना, त्या विषयांचा इतर विषयांशी असलेला सहसंबंध वेळोवेळी स्पष्ट होईल असा बहुविद्याशाखीय दृष्टिकोण ठेवणे आता अपेक्षित आहे. पुढे नववी-दहावीच्या टप्प्यावर तर ‘आंतरविद्याशाखीय क्षेत्रे’ हा एक विषयच नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. सामाजिक शास्त्रांच्या शिक्षकाने हाताळायचा ‘इंडिव्हिज्युअल इन सोसायटी’ – ‘समाजात (सहभागी) व्यक्ती’ आणि विज्ञान शिक्षकाने हाताळायचा ‘पर्यावरण शिक्षण’ असे दोन भाग त्यामधे असतील. त्यामुळे दोनतीन संबंधित विद्याशाखांचा (उदाहरणार्थ, इतिहास-राज्यशास्त्र-अर्थशास्त्र) एकाच वेळी विचार करणे शक्य होईल..
हे सर्व खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवायचे असेल, तर आधी या विचाराचे मर्म समजून घेऊन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, वर्गातील अध्यापन, मूल्यमापन या सगळ्यांची मुळापासून फेरबांधणी करावी लागेल.
- धनवंती हर्डीकर
( पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, २५ सप्टेंबर २०२४)
No comments:
Post a Comment