Saturday, 27 July 2024

समरसतेसाठी भाषाशिक्षण

 

समरसतेसाठी भाषाशिक्षण  

महाराष्ट्र राज्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदीखेरीज इतर कोणतीही भाषा शिकण्याची सक्ती नाही. तरीदेखील त्या त्या भाषेवरील प्रेमामुळे, आवडीमुळे शालेय शिक्षणाचाच एक भाग म्हणून लोक निरनिराळ्या भाषा शिकतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणाऱ्या अमराठी भाषक मुलांना आपली मातृभाषा शिकता यावी म्हणून अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये - विशेषतः माध्यमिक स्तरावर - गुजराती, कन्नड, उर्दू वगैरे आधुनिक भारतीय भाषा शिकण्याचीही सोय असते. या माध्यमिक शाळा बहुधा त्या त्या समाजाच्या लोकांनी चालवलेल्या असल्याने ही सोय तेथे आवर्जून उपलब्ध करून दिली जाते. इतर शाळांमध्ये ती सहज पाहायला मिळत नाही. अभिजात भाषांबद्दलही तसेच म्हणता येईल. मराठी, हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये संस्कृत, काही मराठी शाळांमध्ये पाली आणि अर्धमागधी, तर उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये पर्शियन आणि अरेबिक भाषा लोकप्रिय असल्याचे दिसते. फ्रेंच, जर्मन, रशियन अशा 'परकीय' भाषा शिकण्याची सोय इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असते, तशी इतर शाळांत अपवादानेच आढळते. थोडक्यात सांगायचे तर या निरनिराळ्या भाषा विशिष्ट चौकटींमध्ये बांधल्या गेल्या आहेत. या चौकटी मोडून भाषा शिक्षण खऱ्या अर्थाने खुले आणि समृद्ध करायचे असेल, तर त्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांचा पुढाकार फार महत्त्वाचा ठरेल.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुभाषिकतेवर भर देण्यात आला आहे. योग्य अध्यापन पद्धती वापरल्यास मुले लहान वयात अनेक भाषा शिकू शकतात, आणि त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावरही चांगला परिणाम दिसून येतो; मातृभाषा शिक्षणावरचा भर कमी न करता मुलांना लहान वयापासूनच इतर भाषांची ओळख करून देण्यात येईल असे धोरणात नमूद केलेले आहे. हीच बाब पुढे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातही अधिक विस्ताराने मांडली आहे. अनेक भाषा शिकल्यामुळे मुले बौद्धिक आणि सांस्कृतिक दृष्ट्‍या अधिक समृद्ध होतात, अनेक भाषांतील शब्दरचना, अभिव्यक्तीची धाटणी, साहित्य त्यांच्या हाताशी असल्याने ती अनेक अंगांनी विचार करू शकतात, अधिक लोकांशी संवाद साधू शकतात -- या सर्व गोष्टी अधिक चांगले शिक्षण आणि राष्ट्रीय समरसता या दोन्हींसाठी श्रेयस्कर आहेत, अशी राष्ट्रीय आराखड्यातील सर्वसाधारण भूमिका आहे. ती फक्त मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषा डोळ्यासमोर ठेवून घेतलेली नाही. सर्वच भारतीय भाषांमध्ये प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याचा प्रचंड साठा आहे. त्याचा परिचय झाला, तर आपला राष्ट्रीय वारसा मुलांना अधिक चांगल्या रीतीने उमजेल अशी त्यामागची अपेक्षा आहे. ती प्रत्यक्षात उतरायची असेल, तर वर दिल्याप्रमाणे चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्वीपासूनच संस्कृत शिकवले जाते, त्याची गणना आता ‘आधुनिक भारतीय भाषा’ म्हणून करण्यात आली आहे. संस्कृत शिकण्याचे अनेक फायदे आहेत, यात शंका नाही. त्याचबरोबर इतर आधुनिक भारतीय भाषांचाही विचार करायला हवा. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शेजारी राज्यांच्या भाषा म्हणजे गुजराती, कन्नड, तेलुगु, कोंकणी शिकण्याची सोय का नसावी? आपल्या शेजाऱ्यांची भाषा शिकणे किती सोपे, मजेचे आणि नव्या जाणीवा विकसित करणारे असते! महाराष्ट्राच्या विविध भागांत स्थायिक झालेले जे तमिळ, बंगाली, सिंधी असे इतर भाषक समुदाय आहेत, त्यांच्यासाठीही स्थानिक मराठी शाळांनी पुढाकार घेऊन या भाषा शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली, तर ते एक आकर्षण ठरेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरी उर्दू किंवा उर्दू-हिंदी-मराठी अशी मिश्र भाषा बोलणारी कितीतरी मुले मराठी माध्यमाच्या शाळांत जातात. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मराठी घरांतील मित्रमैत्रिणींसाठी उर्दू भाषा शिकण्याचा पर्याय तर नक्कीच उपलब्ध असायला हवा. (त्या निमित्ताने हिंदी चित्रपटांतील संवाद आणि गाण्यांचा अर्थही आणखी व्यवस्थित कळेल!) या भाषा शिकवण्यासाठी शिक्षक मिळणे फार अवघड नाही, आणि जास्तीची मदत पालकही आवडीने करतील. मराठी माध्यमाच्या शाळांचे हे सर्वसमावेशक स्वरूप महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेला साजेसे असेल.

या सगळ्या वेगवेगळ्या भाषांशी शब्दांचे, विचारांचे, संस्कृतीचे आदानप्रदान करतच मराठी भाषेला आजचे समृद्ध स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांना मराठीचेच अंतरंग आणखी चांगल्या प्रकारे उलगडेल हाही एक महत्त्वाचा फायदा आहे.

- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ १२ जून २०२४)

Wednesday, 24 July 2024

पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व

 पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व     

दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे कमी होत जाणारा पाऊस, त्यामुळे होणारी जागतिक तापमानवाढ, वाढत जाणारी लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, त्याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, मानवाचे कमी होत चाललेले आयुर्मान, सजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची विविध कारणे जाणून घेण्यासाठी पर्यावरणीय शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. ती एक काळाची गरज बनली आहे.

         पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जनजागृती वाढविणे, संभाव्य उपाय शोधणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण आणि तर्कशुद्ध वापर करण्यासाठी, व्यक्तीच्या पूर्ण माहितीसाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी पाया घालणे हे पर्यावरणीय शिक्षणाचे

महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच पर्यावरण अभ्यासात मनुष्याला आणि त्याच्या परिसराला उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबवण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे हे सुद्धा पर्यावरणीय शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. 

         पर्यावरण शिक्षणात सध्याच्या काळात कोणत्या समस्यांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे तर ते म्हणजे हवामान बदल. आज जगाला तापमान वाढीचा धोका सतावत आहे. बेसुमार जंगलतोड, लोकसंख्या वाढीमुळे वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, पर्यायाने होणारे प्रदूषण पृथ्वीच्या ओझोनच्या संरक्षक थराच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येऊन पोहोचत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात भारतात असणारे ४०-४२ अंश सेल्सिअस तापमान आज ४५ अशांच्या पुढे जाऊन पोहोचले आहे. उत्तर ध्रुवावरील बहुतांश हिमनग पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे वितळत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बहुतांश देशांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवली आहे. हवामान बदलामुळे बऱ्याचशा प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हजारो वर्षांपूर्वी जसे बदलत्या हवामानाशी जुळवून न घेता आल्याने डायनासोरसारख्या प्रजाती जशा नष्ट झाल्या तसेच काही वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सन २०१७ साली कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात सुमारे ७००० हेक्टर जंगलांमध्ये वणवा पेटला होता. त्यामध्ये वन्यजीव व वनस्पतींचा नाश झाला होता. हवामान बदलाची ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. बदलत्या हवामानानुसार शेतातील पिकांचे उत्पादन ही घटत आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी, कमी पाण्यात जास्त उत्पादन देऊ शकतील अशा बियाण्यांच्या जातींचा शास्त्रज्ञ शोध लावत आहेत. अशी बियाणेही बाजारात उपलब्ध आहेत. 

  पर्यावरणाची दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे जलप्रदूषण. पृथ्वीचा २९ टक्के भाग पाण्याने व्यापला असला तरी फक्त ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे. पृथ्वीवर महासागर जरी असले तरी त्यांचे खारे पाणी पिण्यायोग्य नाही. मनुष्य शेतीच्या अधिक उत्पादनाच्या लालसेपोटी विविध खते, रासायनिक पदार्थ शेतांमध्ये वापरतो ही खते पाण्याबरोबर मिसळली जातात, तसेच शहरामध्ये कारखान्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक विषारी द्रव्ये मिसळलेली असतात, त्यावर प्रक्रिया केली तरी त्यातील काही घटक तसेच राहतात आणि हे पाणी नदीत मिसळल्याने जलप्रदूषण होते. काही समुद्र किनाऱ्यांवरच्या शहरातला घनकचरा हा समुद्रात टाकला जातो, गणेशोत्सवाच्या काळात मोठमोठ्या मूर्ती समुद्राच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात. मोठमोठी तेलवाहू जहाजे कधी कधी वादळात सापडल्याने अपघातग्रस्त होतात. पर्यायाने समुद्राच्या पाण्याचेही जलप्रदूषण होते. जलप्रदूषणामुळे समुद्री जीवांना धोका पोहोचत आहे. त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन समुद्री जीवांची संख्या कमी होत चाललेली आहे. त्यामुळे कोणत्या कारणांनी पाण्याचे प्रदूषण होते? पाण्याचे प्रदूषण होऊ नये, त्याची कारणे कोणती व त्यावर कोणते उपाय योजता येतील यासाठी पर्यावरणीय शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. 

      जागतिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत अनेक देश पर्यावरणाची हानी करत आहेत. रशिया, उत्तर कोरिया, अमेरिका यांसारख्या देशांनी मानवाच्या प्रजातिला हानिकारक असे अणुबॉम्ब बनवले आहेत. तिसऱ्या महायुद्धांमध्ये अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे तिथली हजारो एकर जमीन नापीक बनली होती तसेच मानवाच्या आनुवंशिकतेवरही त्याचा परिणाम झाला होता.      

पृथ्वीवरील खनिज तेलाचे साठे, वाढती लोकसंख्या व वाढते औद्योगिकीकरण यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. पेट्रोल, डिझेल, खनिज तेल यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल तसेच कारखान्यातून निघणाऱ्या रसायनांच्या धुरांमुळे वायुप्रदूषण होत आहे. याला पर्याय म्हणून सौर उर्जेवर चालणारी उपकरणे, तसेच विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढवणे, इथेनॉल सारख्या प्रदूषण कमी उत्सर्जित करणाऱ्या वाहनांचा वापर करणे गरजेचे ठरणार आहे. आज हवेतील रासायनिक घटक वाढल्याने तसेच मोबाईलच्या टॉवरमुळे पशुपक्ष्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत चालला आहे. वायु प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत.     

      प्लॅस्टिकचा सर्रास वापर हे पर्यावरणाच्या हानीचे एक मुख्य कारण आहे. आज शहरांमधून लाखों टन कचरा गोळा केला जातो. त्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त असते. प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. तो जाळला जात नाही किंवा नष्टही होत नाही. जमिनीवर जिथे पडेल तिथेच तो राहतो. नद्यानाल्यांच्या प्रवाहात प्लॅस्टिक अडकल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. प्लॅस्टिक बंदीचे कायदे नियम जरी असले तरी पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी केल्याशिवाय समस्या सोडवली जाणार नाही. त्यासाठी पर्यावरण शिक्षणात प्लॅस्टिकला पर्यायी पदार्थांचा वापर कसा करता येईल? प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल याविषयी विचार केला जातो. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याच्याबाबत बरीचशी जनजागृती झाली आहे. शहरांमध्ये या कचऱ्यावर प्रक्रिया करून विविध वस्तू बनवणे, सेंद्रिय खत बनवून त्याचा शेतीसाठी वापर करणे असे विविध प्रयोग केले जात आहेत. उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यांमुळे रोगराई पसरण्याचा जास्त धोका संभवतो. उघड्यावर पडणारा कचरा सडतो, त्यातून दुर्गंधी येते. पर्यायाने डास,माशा तसेच साथीचे आजार बळावतात. यासाठी पर्यावरण शिक्षणात कचऱ्याचे व्यवस्थापन हा घटक महत्वाचा ठरतो.            

नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. पर्यावरण शिक्षणात नैसर्गिक आपत्तींना कसे सामोरे जावे, हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात याचा अभ्यास केला जातो. आज विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाचे आयुर्मान कमी होत आहे. मनुष्याला त्वचेचे, श्वसनाचे आजार होत आहेत. काही देशांत भीषण पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. यासाठी जगातील सर्व देश एकत्र येऊन बदलते हवामान व जागतिक तापमानवाढ यासाठी ठोस पावले उचलत आहेत. 

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध कायदे अमलात आणत आहेत. भारत सरकारने सुद्धा जैवविविधतेच्या नियंत्रणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि परदेशी व्यापार (विकास आणि नियमन ) कायदा १९९२ पारित केला. १९८८ च्या राष्ट्रीय वन धोरणामध्ये संरक्षण हे त्याचे मूलभूत तत्व होते. भारतातील काही राज्यांनी प्लास्टीक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याविषयी कायदे केले आहेत. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनामार्फत विविध कार्यक्रम तसेच अभियान दरवर्षी राबवले जातात. यामध्ये वृक्षलागवड, वन्यजीव सप्ताह, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन याविषयी जनजागृती केली जाते. बदलत्या परिस्थितीनुसार पर्यावरण शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच जाणारे आहे. त्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाविषयी आपणही सजग राहायला हवे.  

 - गीतांजली बाबासाहेब काशीद 

शाळा – जिल्हा परिषद शाळा पाचघर, ता. मोखाडा, जि. पालघर 

ईमेल – geetanjalikashid.26 @gmail.com

Saturday, 20 July 2024

महाराष्ट्रातील भाषिक समृद्धी

 महाराष्ट्रातील भाषिक समृद्धी

भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषेची ओळख घेऊन स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षणातील प्रमुख भाषा मराठीच असावी असे वाटणे साहजिकच आहे. ती राजभाषा आहे, म्हणूनच केवळ नाही, तर तिचा कित्येक शतकांचा समृद्ध इतिहास, भौगोलिक विस्तार, दर्जेदार साहित्यपरंपरा हे सर्व लक्षात घेता मुलांच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मराठी हे उत्तम माध्यम आहे, यात शंका नाही.

मराठीच्या विविध बोलींनी तिच्या वैभवात भर घातली आहे, आणि तिचा अंगभूत गोडवा आणखीच वाढवला आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी मराठीची प्रशस्ती करताना फादर स्टीफन्स यांनी केलेले 'जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी, परिमळांमाजि कस्तुरि, पखियांमध्ये मयोरु, ब्रुखियांमध्ये कल्पतरु' इत्यादी वर्णन वाचताना आजही मराठी माणसाला 'हे तो प्रचितीचे बोलणे' असेच वाटते.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणक्रमात मराठीला अग्रस्थान असले, तरी इतर उपलब्ध भाषांची संख्या आणि त्यांतील वैविध्यही लक्षणीय आहे. परंतु त्याबद्दल फारसे लिहिले, बोलले जात नाही.

अगदी सुरवातीपासूनच महाराष्ट्र राज्याने त्रिभाषा सूत्र मनःपूर्वक राबवल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीन भाषा शिकतात. येथे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरपूर संख्येने आहेतच, पण उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या शाळांची संख्याही मोठी आहे. उर्दू माध्यमाच्या शाळा तर बहुधा इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात अधिक संख्येने आहेत. याखेरीज शेजारी राज्याच्या सीमावर्ती भागांत आणि महानगरांत गुजराती, तेलुगू, तमिळ आणि कन्नड माध्यमाच्या काही शाळा आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर भागांत स्थायिक बंगाली भाषक लोकांसाठी बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळाही चालवल्या जातात. इतकेच काय, पण भारतात स्वतःचे असे कुठलेच राज्य नसलेल्या सिंधी भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याने सिंधी भाषा माध्यमातून शिकण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. अशी सोय बहुधा इतर कोणत्याही राज्यात नाही. दहा भाषा माध्यमांच्या शाळा हे महाराष्ट्र राज्याचे भाषिक वैभवच आहे.

या विविध माध्यमांच्या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातीलच स्थानिक शिक्षक आणि तज्ज्ञ त्यांची पाठ्यपुस्तके तयार करतात. भाषा विषयाची पाठ्यपुस्तके स्वतंत्रपणे तयार केली जातात, तर भाषेतर विषयांची पाठ्यपुस्तके आधी राजभाषा मराठीत तयार केली जातात. नंतर त्यांचे इतर भाषांमध्ये भाषांतर केले जाते. पृष्ठसंख्या, रंगसंगती, चित्रांकन अशा बाबतीत ही इतर भाषांतील पाठ्यपुस्तके मराठी पाठ्यपुस्तकांपेक्षा कोणत्याही प्रकारे उणी नसतात. इतकेच नाही, तर त्यांच्या निर्मितीसाठी कितीही अधिक खर्च आला, तरी ती मराठी माध्यमाइतक्याच माफक किमतीला उपलब्ध करून दिली जातात. महाराष्ट्र राज्याच्या आजवरच्या प्रागतिक, सर्वसमावेशक आणि सहिष्णू धोरणाचा तो एक भाग आहे.

शालेय शिक्षणातील भाषांचे वैविध्य फक्त माध्यम भाषांपुरते सीमित नाही. माध्यमिक स्तरावर ज्या अधिकच्या भाषा शिकता येतात, त्यात संस्कृत, पाली, अर्धमागधी, पर्शियन, अरेबिक यांसारख्या अभिजात भाषा; गुजराती, सिंधी, कन्नड, तेलुगू, बंगाली, आदी अनेक आधुनिक भारतीय भाषा; फ्रेंच, जर्मन, रशियन, अशा कित्येक परकीय भाषांचा समावेश आहे. कितीही कमी विद्यार्थी असले, तरी राज्य मंडळ त्यांच्यासाठी बोर्ड परीक्षेचे आयोजन करते. मराठी, इंग्रजी माध्यमातील मुले पहिलीपासून दोन भाषा शिकतात, तर इतर भाषा माध्यमांतील मुले पहिलीपासूनच तीन भाषा शिकतात - त्यांची मातृभाषा, मराठी आणि इंग्रजी. पाचवीपासून त्यात हिंदीची भर पडते आणि पुढे तर वर दिल्यानुसार अनेकानेक पर्याय खुले होतात. दोन भाषांच्या संयुक्त अभ्यासक्रमाची तरतूद असल्याने मुले एक वेळी चार भाषाही शिकतात, शिकू शकतात.

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 आणि आताचा प्रस्तावित राज्य अभ्यासक्रम आराखडा या सर्वांनी सहावीपासूनच इतर भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची करण्याची शिफारस केली आहे, ती स्वागतार्ह आहे. पण शालेय स्तरावरील भाषायोजनेतील सध्याचे वैविध्य आणि समृद्धी यांची दखल प्रस्तावित भाषायोजनेत घेतलेली नाही, ती सुधारित आराखड्यात घेतली जाईल आणि महाराष्ट्र राज्याची आजपर्यंतची भाषिक समृद्धी टिकून राहील अशी आशा करूया.

-धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, ०६ जून २०२४)

Wednesday, 17 July 2024

शिक्षक - सर्जनाचा धागा

 शिक्षक - सर्जनाचा धागा

    संस्कृतच्या वर्गामध्ये शिक्षिका मुलांना उपपद तत्पुरुष समास समजावून सांगत होत्या, जसे गायक - गायन करीसी, नर्तक- नृत्य करीसी, वादक - वादन करीसी मग शिक्षक म्हणजे काय? त्यावर एका विद्यार्थिनीने उत्तर दिले, शिक्षक- शिक्षा करीसी, उत्तर ऐकून हसावे की रडावे अशी अवस्था झाली. शिक्षक म्हणजे जो माहिती देतो, विद्यार्थ्यांना जे माहिती नाही ते त्यांना सांगतो, थोडक्यात माहितीचा स्रोत उपलब्ध करून देणारा तो शिक्षक. आपण जरी शिक्षक, आचार्य, गुरु हे शब्द एकाच अर्थाने वापरत असलो, तरी त्या प्रत्येकाचा अर्थ हा वेगवेगळा आहे.

      शिक्षकांच्या पुढचा टप्पा आहे, ‘गातुवित’ म्हणजे जाणणारा, एखाद्या संभाव्य किंवा ठराविक ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग ज्याला कळतो, तो गातुवित. त्यानंतरचा पुढील टप्पा येतो, तो म्हणजे ‘मार्गदर्शक’ आपल्यासमोर हजारो विद्यार्थी येतात. प्रत्येक जण वेगळा असतो त्यातील योग्य क्षमता, कलागुण ओळखून त्यांना वेगवेगळ्या वाटा सांगणारा तो मार्गदर्शक. उदाहरणच द्यायचे झाले तर बालगंधर्वांचे घेवू - भास्करबुवा बखले हे बालगंधर्व ( नारायण श्रीपाद राजहंस ) व मास्टर कृष्णराव यांचे गुरु होत. एकदा भास्कर बुवांनी कृष्णरावांना गायनातील एक चीज शिकविली, आणि ते जाण्यास निघाले, तेवढ्यात तिथे बालगंधर्व आले, त्यांनी आपल्या गुरूंना प्रणाम केला, त्यांची विचारपूस केली, आणि त्यांचे मित्र मास्टर कृष्णरावांकडे गेले. कृष्णराव व नारायण यांचे मध्ये संवाद झाला, तुला काय शिकविले? वगैरे,वगैरे आणि बालगंधर्व कृष्णरावांना शिकवलेले गीत गायला लागले, ते ऐकून भास्कर बुवा लगेचच वर आले, आणि म्हणाले, “नारायण ही चीज तुझ्यासाठी नाही तुझ्या गळ्यात नाट्यसंगीत आणि कृष्णाच्या गळ्यात शास्त्रीय संगीत शोभून दिसते”, ज्याला जो दागिना चांगला दिसतो त्याने तोच परिधान करावा.गुरु एकच पण वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळ्या वाटा दाखवितो म्हणजेच आजच्या भाषेत मार्गदर्शन करतो. 

    त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे ‘आचार्य’- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जो बोलतो, त्याचप्रमाणे आचरण करतो, तो आचार्य होय. आणि शेवटचा टप्पा म्हणजे ‘गुरू’ जो आपल्या शिष्याला जाणीव करून देतो, याच्याही पलीकडे अजून काहीतरी आहे, नेणिवा समृद्ध करतो तो गुरु होय. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्या हाताला धरून गुरूकडे घेऊन जातो तो ‘सद्गुरु’ होय.

   आजच्या प्रत्येक शिक्षकाने, वरील टप्प्यांचे चिंतन करून, आपण नेमके कोणत्या टप्प्यावर आहोत, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. जुन्या मळलेल्या वाटा सोडून नवीन शिखरे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणामागे विज्ञान असते आणि शिकविणे ही एक कला. दोन्हीही क्षेत्रात अनिश्चितता आणि सर्जनशीलता ठासून भरलेली असते. जसे की पुढचा शोध कोणता लागेल, हे विज्ञानाला माहीत नसते आणि प्रतिभा संपन्न साहित्यिकाच्या हातून पुढील कोणती ओळ लिहिली जाईल हे त्यांनाही माहित नसते. याउलट तंत्रज्ञानामध्ये तोचपणा, साचेबद्धपणा असतो. जसे की एका विशिष्ट आकाराचा साबण तयार करण्यासाठी, ठरविलेल्या कृतीप्रमाणे हजारो लाखो सारखेच साबण यंत्राद्वारे निर्माण होतात. पण शिक्षकाचा संबंध येतो तो साजीवंत चैतन्याशी, शिकवितांना तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा, पण त्यामुळे यंत्राप्रमाणे काम न करता, प्राप्त परिस्थितीशी समन्वय साधून स्वतःची अध्यापनाची वेगळी प्रतिमा आणि प्रतिभा शिक्षकाला तयार करता यायला हवी. फिनलंडमध्ये ज्याप्रमाणे शिक्षक हा संशोधक वृत्तीचा असावा लागतो. तशी संशोधकता स्वतःमध्ये कायम जिवंत ठेवणारा शिक्षक असावा. त्याचे निरीक्षण हे देशाचे भावी शास्त्रज्ञ घडविणारे असले पाहिजे- जसे की ढगांचे निरीक्षण पुढील मुद्द्यांच्या आधारे करा त्यांचा आकार मग तो लाटांप्रमाणे, पुजक्यासारखा, थरांप्रमाणे किंवा धाग्यांसारखा असेल, ढगांचा रंग- शुभ्र, काळा, फिकट काळा, किंवा पांढरा, वाहणारा वारा कसा वाहतो- हलका, जोराचा किंवा एकदम शांत. तापमान मग ते थंड, गरम, उबदार किंवा खूप थंड. ढगांची घनता- म्हणजेच जाडी अति दाट, विरळ किंवा पसरलेले ढग, आणि मुलांना या प्रकारे पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंदी करायला लावून 22 सप्टेंबर ज्यादिवशी बारा तासांचा दिवस आणि बारा तासाचीच रात्र असते किंवा मकर संक्रांतीला किंवा ऋतू बदलताना, त्यांना त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारे ढगांच्या प्रकाराविषयी माहिती सांगितली, त्याचप्रमाणे ढगांचे वेगवेगळे प्रकार, फोटो, शाळेच्या काच फलकामध्ये लावले तर, न जाणो यातूनच एखादा विद्यार्थी हा हवामानाशास्त्रज्ञ किंवा हवामान विश्लेषक होईल.

    त्याचप्रमाणे पूर्ण दिवस किंवा चार तास, दोन तास मुलांना डोळे बंद करून वावरायला लावले, त्यांच्यासोबत काय काय घडलं, याची निरीक्षण नोंदवायला लावली, आणि मग त्यावर साधक बाधक चर्चा केली तर, विज्ञानातील एक साधा संशोधनाचा नियम सहज त्यांच्या लक्षात येईल की एखाद्या घटकाच्या अनुपस्थितीमुळे नेमके काय घडते हे त्यावेळी ते सांगू शकतील किंवा मग त्याची त्यांना नंतरही प्रत्यक्ष प्रचिती येऊ शकते. 

    विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फुले कधी उमलतात, किती काळ टिकतात, झाडावरून कधी गळून पडतात, त्या फुलांना किती पाकळ्या असतात, त्यांचा सुवास कसा असतो, त्यांचा उमलण्याचा कालावधी कोणता, ते कोणत्या हंगामात येतात असे निरीक्षण सहज जाता येता करायला लावले तर, त्यातून खूप माहिती विद्यार्थ्यांना मिळते. त्याला फक्त योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करायचे आहे.

   फिनलंड देशामध्ये पारंपारिक सण उत्सव एवढ्या छान प्रकारे शिक्षण प्रणालीमध्ये गुंफले आहेत की मुलांना तो सण व उत्सव का साजरा करायचा? कशासाठी करायचा? आणि कशाप्रकारे करायचा? याची माहिती आपोआप कळते नवीन ज्ञानाची रचना म्हणजेच Learn, Unlearn आणि Relearn हे अतिशय सुंदर पद्धतीने फिनलंड होते. फिनलंड मध्ये ईस्टर या सणाच्या निमित्ताने तेथील विद्यार्थी शाळेमध्ये गवत वर्गीय वनस्पतींची लागवड करतात त्यामुळे ऋतुचक्रातील बदल आणि त्याचा लागवडीवर होणारा परिणाम हे विद्यार्थी एकाच वेळी शिकतात. आपल्याला सुद्धा परसबागेच्या निमित्ताने असा उपक्रम शाळेमध्ये सहज राबविणे शक्य आहे. गणित विषय खेळातून शिकविला, त्यासाठी वेगवेगळ्या शारीरिक क्रिया किंवा निसर्गातील घटना आपण वापरू शकतो, वर्गात गणिताची भीती घट्ट धरून बसलेला मुलगा मैदानावर खेळताना मात्र पायांचा व हातांचा योग्य कोन साधून दिलेल्या लक्ष्यावर योग्य प्रकारे योग्य अंशात भाला फेकतो, किंवा बॉलवर कोणत्या कोनातून मारले म्हणजे तो कोणत्या दिशेला जातो हे प्रात्यक्षिकातून शिकतो. 100 मीटर धावताना किती वेळ लागेल याचे गणित तो स्वतःच करतो. आपण फक्त वर्गात याची उजळणी करून घ्यायची.

 उत्तमता जन्मजात नसली तरी ती प्रयत्नपूर्वक रुजविता येते. हे एक शिक्षक चांगल्या प्रकारे जाणतो. असो उपक्रम अनेक आहेत, असतात आणि भविष्यातही येतील. आपले काम सर्जनाचा धागा हाती धरून उत्तमाची नक्षी मातीवर उमटविण्याचे. कविवर्य ना धो महानोर यांनी म्हटल्याप्रमाणे, एका शिक्षकाने पुढील प्रमाणे कार्य करीत राहावे-

'सूर्यनारायण नित नेमान उगवा

अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा.'


-निता निवृती शेटे

( DEd, BEd ,MEd, DSM )

  उपशिक्षिका, न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, वडगाव मावळ, पुणे.

Mail ID: neetakhodade@gmail.com

 परिचय

Study of Status of Women in Mythological Novels of Amish Tripathi या विषयात Ph.D. अंतिम टप्यात ( पुणे विद्यापीठ )

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर लेख प्रसिद्ध ( इंग्रजी साहित्य )

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (२०२४ ) साठी निवड.

 संदर्भ ग्रंथ सूची

 १. डॉ. चित्रा सोहनी ( २००८ ), सर्जनशीलतेचा विकास, नित्य नूतन प्रकाशन, पुणे.

२. जगताप ह. ना. (संपादक) (२००७), "शैक्षणिक मानसशास्त्र"; तिसरी आवृत्ती, नरेंद्र प्रकाशन, पुणे.

३.. कुंडले म. बा. (१९९१) "सर्जनशीलता" नूतन प्रकाशन, पुणे.

४. पानसे रमेश, क्षीरसागर राज्यश्री, देशमुख-बेल्हेकर अनिता (२००६), "कर्ता-करविता, आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन", भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी, पुणे.

५. निरफराके अशोक (१९९५), "कल्पक बनूया', ज्ञानप्रबोधिनी, पुणे.

६. शिरीन कुलकर्णी , हेरंब कुलकर्णी ( २०२१ ), “ शिक्षणगंगा फिनलंड मधून आपल्या दारी”,

Saturday, 13 July 2024

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील अमेरिकी प्रभाव

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील अमेरिकी प्रभाव

       एखाद्या देशाचे कोणतेही नवीन धोरण ठरवताना विविध देशांच्या चांगल्या-वाईट गोष्टी जाणून घेऊन त्यांचा उपयोग करणे, ही सर्वमान्य प्रक्रिया आहे. कस्तुरीरंगन समितीचा अहवाल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सार्थक, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडे आणि राष्ट्रीय श्रेयांक आराखडा हे दस्तऐवज पाहिल्यास आपल्या धोरणावरील अमेरिकेचा प्रचंड प्रभाव जाणवतो. राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यांत भारतीय ज्ञानप्रणाली केंद्रस्थानी असेल असे म्हटले असले, तरी संपूर्ण दस्तऐवजात आकृतिबंधासह सर्व शिक्षणपद्धतीवर अमेरिकन प्रभावच जाणवतो.

“आधी वाचायला शिका; नंतर वाचून शिका” या तत्त्वावर विश्वास असलेल्या अमेरिकेन शिक्षणपद्धतीचे आकलनासह वाचन-कौशल्य हे प्राथमिक शिक्षणाचे अधिष्ठानच आहे. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही मुलांच्या वाचनावर खूप भर दिला आहे. अमेरिकेत पहिलीच्या आधीचे एक वर्षाचे पूर्वप्राथमिक शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचाच अविभाज्य भाग मानले जाते. नवीन धोरणातही प्राथमिक शाळांमध्ये बालवाटिकेचा वर्ग सुचवला आहे. अमेरिकेत नववी ते बारावीचे सलग माध्यमिक शिक्षण आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालातही नववी ते बारावी असे चार वर्षांचे माध्यमिक शिक्षण राहील; मागील पाच दशके अस्तित्वात असलेल्या उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालये या संकल्पना हद्दपार होतील, असे स्पष्टपणे म्हटले आहे. अंतिम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तडजोड म्हणून +४ स्तराचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे दोन उपस्तर केले असले तरी पुढील दहा वर्षांत नववी ते बारावीपर्यंतचा माध्यमिक शिक्षणाचा चार वर्षांचा एकच सलग स्तर असावा, अशी स्पष्ट शिफारस शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात केली आहे. भारतात या बाबी अनुसरणे शक्य आहे.

जॉन ड्युई यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव असलेल्या अमेरिकन शिक्षणपद्धतीची अनुभवसिद्ध अध्ययन, कृतीतून अध्ययन, प्रकल्प पद्धती, सांघिक कार्य, चिंतनशील विचारप्रक्रिया, माहितीपेक्षा कौशल्यांवर भर, अध्ययनाची जीवनानुभवांशी सांगड, माध्यमिक स्तरावर आंतरशाखीय आणि बहुशाखीय दृष्टिकोन, भरपूर वैकल्पिक विषय, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या गरजेनुसार वर्गाची बदलणारी बैठक-व्यवस्था, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातसुद्धा या बाबींवर भर दिलेला आहे.  

अमेरिकेत सातत्यपूर्ण सर्वंकष आणि अंतर्गत मूल्यमापनावर प्रचंड भर आहे; इतका की तिथे बारावीच्या अखेरीलासुद्धा सार्वजनिक परीक्षा नसतात. नवीन धोरणातही तेवढा नसला तरी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि अंतर्गत मूल्यमापनावर भरपूर भर दिलेला आहे. ‘परख’ने तयार केलेल्या, त्याचप्रमाणे अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या ‘होलिस्टिक प्रोग्रेस कार्डां’चे स्वरूप एकमेकांशी बरेचसे मिळतेजुळते आहे.   

श्रेयांक या मूळ अमेरिकन संकल्पनेची अंमलबजावणी भारतात उच्च शिक्षणात सुरू झाली आहे. सीबीएसई २०२४पासून पथदर्शी तत्त्वावर श्रेयांक पद्धत अंमलात आणणार आहे. इतर बोर्डांच्या शाळांनाही फारशी वाट पाहावी लागेल, असे दिसत नाही. आता २०२२च्या राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यातील शिफारशीनुसार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय वर्गोन्नतीप्रमाणेच विषयनिहाय वर्गोन्नतीही देणे शक्य होणार आहे. या संकल्पनेचे मूळ अमेरिकन शिक्षणपद्धतीतच आहे.  

 अमेरिकेत १९८०च्या दशकापासून गृहशिक्षणाची चळवळ सुरू झाली. आज अमेरिकेत सहा टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी गृहशिक्षण घेत आहेत. भारतात आपल्या मुलांना गृहशिक्षण देणाऱ्या पालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही गृहशिक्षणाला नवीन धोरणात स्थान मिळाले आहे. अमेरिकेतील पालक, परिसरातील समाज, सार्वजनिक ग्रंथालये, विद्यापीठे, उद्योगधंदे यांचा शाळांशी उत्कृष्ट समन्वय असतो आणि त्यांच्याकडून शाळांना मिळणारी शैक्षणिक मदत खूपच मोलाची असते. यातून निर्माण झालेली ‘शैक्षणिक परिसंस्था’ ही संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने स्वीकारली आहे.

 एखाद्या देशाच्या चांगल्या बाबी स्वीकारण्यात काहीही गैर नाही. मात्र भारत आणि अमेरिका या देशांतल्या लोकांच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्तरांत कमालीची तफावत आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धती लागू करताना भारतीय परिस्थितीचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. या संदर्भात विनोबांचे ‘शिक्षणविचार’ हे पुस्तक आजही खूप उपयोगी आहे. आधुनिक भारताचा संदर्भ डोळ्यापुढे ठेवून असे आणखी खूप काम व्हायला हवे आहे. आधुनिक भारताला सक्षम बनवण्यासाठी ज्या विवेकनिष्ठ विचाराची आणि कामाची गरज आहे, ते न झाल्यास अमेरिकन’ संकल्पनांची भ्रष्ट नक्कलच आपल्या पदरी पडेल.

-डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, २९ मे २०२४)

Saturday, 6 July 2024

घरातली शाळा

 घरातली शाळा

२००९चा शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांनी पूर्णवेळ शाळांतच शिक्षण घेणे अनिवार्य आहे, इतर कोणत्याही प्रकारचे शिक्षण बेकायदेशीर आहे; असा कायद्यातील तरतुदींचा अर्थ घेतला गेला. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेले अनौपचारिक शिक्षणाचे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनौपचारिक आणि नावीन्यपूर्ण शिक्षणकेंद्रांचे पर्याय पुन्हा सुचवले आहेत. गृहशिक्षण – होमस्कूलिंग हा त्यांतलाच एक पर्याय आहे. मात्र धोरणात सुचवलेल्या पर्यायांसाठी शिक्षण हक्क कायद्यातही स्पष्ट तरतूद करणे आवश्यक आहे. ज्यांना नियमित शाळांत जाणे शक्य नाही अशी सहा हजारांपेक्षा जास्त दिव्यांग मुले समग्र शिक्षा अभियानाखाली सध्या महाराष्ट्रात गृहशिक्षण घेत आहेत. त्याचवेळी ज्यांच्या मुलांना कोणतीही विशेष गरज नाही, असेही काही पालक आपल्या मुलांना गृहशिक्षण देत आहेत. मात्र त्यांची संख्या आपल्याकडे अगदीच कमी आहे.

‘How Children Fail’, ‘How Children Learn’ आणि ‘Growing Without Schooling या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक जॉन होल्ट यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन अमेरिकेत १९८०च्या दशकापासून गृहशिक्षणाची चळवळ सुरू झाली. आज अमेरिकेत सहा टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी गृहशिक्षण घेत आहेत. कॅनडा, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया या देशांतही गृहशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. जगातील इतर बहुसंख्य देशांत मात्र गृहशिक्षण बेकायदेशीर आहे किंवा ते देणे जवळपास अशक्य व्हावे, इतकी त्यावर बंधने आहेत किंवा तिथे गृहशिक्षणाबद्दल काही विचारच झालेला नाही. भारतात या संदर्भात कायदे आणि नियम करताना पालक त्यांच्या मुलांना सुकरतेने गृहशिक्षण देऊ शकतील, हे पाहिले जावे.

शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाबद्दल वाटणारे असमाधान किंवा शिक्षणाबद्दलच्या स्वत:च्या काही ठाम कल्पना प्रत्यक्ष वापरून पाहण्याची इच्छा, ही पालकांनी गृहशिक्षणाची निवड करण्याची प्रमुख कारणे असतात. गृहशिक्षणासाठी पालक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. शाळेतल्या पद्धती जशाच्या तशा वापरुन शिकवणे, हे या पद्धतींच्या पटाचे एक टोक आहे, तर मुलांनी काय शिकायचे याबद्दलचा निर्णय पालकांनी घेण्याऐवजी मुलांना वाटेल ते त्या त्या वेळी शिकू देणे हे दुसरे टोक. कोणतीही एकच पद्धत वापरण्यापेक्षा सारग्राही पद्धतींचा वापर करणे केव्हाही चांगले असते. गृहशिक्षणात इतर संदर्भ-साहित्याइतकाच स्मार्टफोन आणि संगणक यांचा वापरही खूपच प्रभावी रीतीने करता येतो. पालकांचे स्वमदत गट, तज्ज्ञ, जाणकार आणि संस्था यांची गरजेनुसार मदत आणि गरज असेल तिथे त्यांनी एकत्रित काम करणे, परिसरातील मोठ्या वयाच्या इतर मुलांची मदत, पालकत्वाचे शिक्षण, यांमुळे गृहशिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. मात्र पालकांची मुलांच्या शिक्षणासाठी भरपूर वेळ देण्याची, धीर धरण्याची आणि गृहशिक्षणातील सातत्य टिकवून ठेवण्याची तयारी हवी.

अनेक पालकांना आपली मुले योग्य दिशेने प्रगती करत आहेत की नाही, हे एखाद्या विश्वसनीय संस्थेमार्फत तपासून घ्यावेसे वाटते. मुख्य प्रवाहातील संस्थांत प्रवेश घेण्याची गरज पडली तर त्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक असतेच. अशा प्रसंगी ‘एनआयओएस’ने तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या अखेरीस घेतलेल्या किंवा एसएससी बोर्डाचा १७ नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा उपयुक्त ठरतात. एसएससी बोर्डाच्या २०१५मध्ये स्थापन झालेल्या मुक्त शाळेचे कामकाज अपेक्षेप्रमाणे सुरू झाले तर शाळांच्या बाहेर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी मदत होऊ शकेल.

   जागतिक पातळीवर झालेल्या अनेक संशोधनांत गृहशिक्षण घेतलेली मुले स्वयंअध्ययन, सहशिक्षण, स्वयंशिस्त, कुतूहल, शैक्षणिक कामगिरी, सामाजिक जाणिवा आणि कौशल्ये, यांबाबतींत नियमित शाळांतील मुलांपेक्षा सरस असतात, असे आढळून आले आहे. भारतातही अशा प्रकारचे संशोधन झाले पाहिजे. योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तर नियमित शाळा आणि गृहशिक्षण या दोन्ही पद्धती मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी आहेत, हे वास्तव मान्य करण्याची आज गरज आहे. पूर्णवेळ शाळा आणि गृहशिक्षण यांच्या संकरातून गृहशिक्षणाचे एखादे संमिश्र प्रारूप (मॉडेल) विकसित करून विद्यार्थ्यांना कदाचित आणखी सहजतेने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होईल. त्या दिशेने प्रयत्न व्हायला पाहिजेत.

- डॉ. वसंत काळपांडे 

(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २२ मे २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...