राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील अमेरिकी प्रभाव
एखाद्या देशाचे कोणतेही नवीन धोरण ठरवताना विविध देशांच्या चांगल्या-वाईट गोष्टी जाणून घेऊन त्यांचा उपयोग करणे, ही सर्वमान्य प्रक्रिया आहे. कस्तुरीरंगन समितीचा अहवाल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सार्थक, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडे आणि राष्ट्रीय श्रेयांक आराखडा हे दस्तऐवज पाहिल्यास आपल्या धोरणावरील अमेरिकेचा प्रचंड प्रभाव जाणवतो. राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यांत भारतीय ज्ञानप्रणाली केंद्रस्थानी असेल असे म्हटले असले, तरी संपूर्ण दस्तऐवजात आकृतिबंधासह सर्व शिक्षणपद्धतीवर अमेरिकन प्रभावच जाणवतो.
“आधी वाचायला शिका; नंतर वाचून शिका” या तत्त्वावर विश्वास असलेल्या अमेरिकेन शिक्षणपद्धतीचे आकलनासह वाचन-कौशल्य हे प्राथमिक शिक्षणाचे अधिष्ठानच आहे. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही मुलांच्या वाचनावर खूप भर दिला आहे. अमेरिकेत पहिलीच्या आधीचे एक वर्षाचे पूर्वप्राथमिक शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचाच अविभाज्य भाग मानले जाते. नवीन धोरणातही प्राथमिक शाळांमध्ये बालवाटिकेचा वर्ग सुचवला आहे. अमेरिकेत नववी ते बारावीचे सलग माध्यमिक शिक्षण आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालातही नववी ते बारावी असे चार वर्षांचे माध्यमिक शिक्षण राहील; मागील पाच दशके अस्तित्वात असलेल्या उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालये या संकल्पना हद्दपार होतील, असे स्पष्टपणे म्हटले आहे. अंतिम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तडजोड म्हणून +४ स्तराचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे दोन उपस्तर केले असले तरी पुढील दहा वर्षांत नववी ते बारावीपर्यंतचा माध्यमिक शिक्षणाचा चार वर्षांचा एकच सलग स्तर असावा, अशी स्पष्ट शिफारस शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात केली आहे. भारतात या बाबी अनुसरणे शक्य आहे.
जॉन ड्युई यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव असलेल्या अमेरिकन शिक्षणपद्धतीची अनुभवसिद्ध अध्ययन, कृतीतून अध्ययन, प्रकल्प पद्धती, सांघिक कार्य, चिंतनशील विचारप्रक्रिया, माहितीपेक्षा कौशल्यांवर भर, अध्ययनाची जीवनानुभवांशी सांगड, माध्यमिक स्तरावर आंतरशाखीय आणि बहुशाखीय दृष्टिकोन, भरपूर वैकल्पिक विषय, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या गरजेनुसार वर्गाची बदलणारी बैठक-व्यवस्था, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातसुद्धा या बाबींवर भर दिलेला आहे.
अमेरिकेत सातत्यपूर्ण सर्वंकष आणि अंतर्गत मूल्यमापनावर प्रचंड भर आहे; इतका की तिथे बारावीच्या अखेरीलासुद्धा सार्वजनिक परीक्षा नसतात. नवीन धोरणातही तेवढा नसला तरी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि अंतर्गत मूल्यमापनावर भरपूर भर दिलेला आहे. ‘परख’ने तयार केलेल्या, त्याचप्रमाणे अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या ‘होलिस्टिक प्रोग्रेस कार्डां’चे स्वरूप एकमेकांशी बरेचसे मिळतेजुळते आहे.
श्रेयांक या मूळ अमेरिकन संकल्पनेची अंमलबजावणी भारतात उच्च शिक्षणात सुरू झाली आहे. सीबीएसई २०२४पासून पथदर्शी तत्त्वावर श्रेयांक पद्धत अंमलात आणणार आहे. इतर बोर्डांच्या शाळांनाही फारशी वाट पाहावी लागेल, असे दिसत नाही. आता २०२२च्या राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यातील शिफारशीनुसार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय वर्गोन्नतीप्रमाणेच विषयनिहाय वर्गोन्नतीही देणे शक्य होणार आहे. या संकल्पनेचे मूळ अमेरिकन शिक्षणपद्धतीतच आहे.
अमेरिकेत १९८०च्या दशकापासून गृहशिक्षणाची चळवळ सुरू झाली. आज अमेरिकेत सहा टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी गृहशिक्षण घेत आहेत. भारतात आपल्या मुलांना गृहशिक्षण देणाऱ्या पालकांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही गृहशिक्षणाला नवीन धोरणात स्थान मिळाले आहे. अमेरिकेतील पालक, परिसरातील समाज, सार्वजनिक ग्रंथालये, विद्यापीठे, उद्योगधंदे यांचा शाळांशी उत्कृष्ट समन्वय असतो आणि त्यांच्याकडून शाळांना मिळणारी शैक्षणिक मदत खूपच मोलाची असते. यातून निर्माण झालेली ‘शैक्षणिक परिसंस्था’ ही संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने स्वीकारली आहे.
एखाद्या देशाच्या चांगल्या बाबी स्वीकारण्यात काहीही गैर नाही. मात्र भारत आणि अमेरिका या देशांतल्या लोकांच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्तरांत कमालीची तफावत आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धती लागू करताना भारतीय परिस्थितीचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. या संदर्भात विनोबांचे ‘शिक्षणविचार’ हे पुस्तक आजही खूप उपयोगी आहे. आधुनिक भारताचा संदर्भ डोळ्यापुढे ठेवून असे आणखी खूप काम व्हायला हवे आहे. आधुनिक भारताला सक्षम बनवण्यासाठी ज्या विवेकनिष्ठ विचाराची आणि कामाची गरज आहे, ते न झाल्यास अमेरिकन’ संकल्पनांची भ्रष्ट नक्कलच आपल्या पदरी पडेल.
-डॉ. वसंत काळपांडे
(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, २९ मे २०२४)
No comments:
Post a Comment