Saturday, 10 February 2024

निपुण भारत’साठी आवश्यक पूर्वतयारी

 

निपुण भारत’साठी आवश्यक पूर्वतयारी 


 मुलांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार करावे म्हणून आखलेल्या ‘निपुण भारत मिशन’च्या अंमलबजावणीची  जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या शासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज आहेत का? त्यांची पुरेशी तयारी नसेल तर अंमलबजावणी चाचपडत होईल आणि मुलांचे नुकसान करणाऱ्या अनेक चुका होतील. अंमलबजावणीपूर्वी ज्यांची सिद्धता असलीच पाहिजे अशा - मुलांना शिकण्यासाठी वर्गखोल्या, त्यांच्या विश्रांतीसाठी, जेवणासाठी आणि खेळण्यासाठी जागा, बाग, शैक्षणिक साहित्य या - किमान भौतिक सुविधा आणि मनुष्यबळ या बाबींचा ऊहापोह या लेखात केला आहे. या सुविधा पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर मिळायला हव्या; त्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असली पाहिजे; त्यांचा योग्य वापर व्हायला पाहिजे आणि त्यांची निगा आणि दुरुस्ती वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण असले पाहिजे. अन्यथा संपूर्ण यंत्रणेतच असंतोष निर्माण होऊन कामावर विपरीत परिणाम होतो. तुटपुंजे मानधन मिळत असल्यामुळे अंगणवाडी ताईंना संप करावा लागला. शिक्षकांकडे सोपवण्यात येणारी वारेमाप शिक्षणेतर कामे हे शिक्षणक्षेत्रातील असंतोषाचे असेच आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. 

शाळेचा संपूर्ण परिसर हेसुद्धा एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन असते. पायाभूत स्तरावरील मुले प्रामुख्याने खेळ, खेळणी, गाणी, गोष्टी, कृती, निरीक्षण, गटकार्य अशा माध्यमांतून शोध घेत शिकत असतात. त्यांना या गोष्टी सहजपणे करता येतील अशी बैठकव्यवस्था करावी लागेल. मुलांवर लहान वयापासूनच स्वच्छतेचे आणि पाण्याच्या योग्य वापराचे संस्कार होण्यासाठी शाळा हे एक प्रभावी माध्यम आहे. पिण्याच्या पाण्याची सोय महत्त्वाची आहेच; पण शाळा, स्वच्छतागृह आणि बाग यांच्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोयसुद्धा महत्त्वाची आहे. शाळेच्या इमारतीची निगा आणि दुरुस्ती यांसाठी उपलब्ध असलेला निधी अपुरा पडतो, अशी अनेक शाळांची तक्रार असते. वीजेची बिले थकल्यामुळे शाळेची वीज तोडल्याची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. अशा गोष्टी घडायला नकोत.  

पालक आणि समाज यांचा सहभाग या मिशनचे एक महत्त्वाचे अंग आहे. पाल्यांच्या बाबतीत पालकांची काय भूमिका असावी, हे मिशनच्या दस्तऐवजात विस्ताराने सांगितले आहे. या संदर्भात एसएमएस, व्हाट्सअॅप मेसेजेस आणि प्रत्यक्ष भेटी ही शिक्षक आणि पालक यांच्यातील संपर्काची प्रमुख माध्यमे असतील. मुलांचे लेखन आणि इतर कार्य गावात सार्वजनिक ठिकाणी सर्वांना पाहण्यासाठी ठेवता येईल. या स्तरावरील मुलांच्या शिक्षणाबद्दल अनेक पालकांच्या अवास्तव आणि चुकीच्या कल्पना असतात. त्यासाठी पालकांचे उद्बोधन होणे गरजेचे आहे. काही पालक आणि समाजातील सुजाण व्यक्ती स्वयंसेवक म्हणून शिक्षकांना मदत करू शकतील. यामुळे शाळा आणि पालक यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतीलच, पण पालकांना या स्तरावरील शिक्षण कसे दिले जाते आणि कसे दिले जावे, याचे यथार्थ आकलन व्हायलासुद्धा मदत होईल. 

या मिशनमध्ये केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळा या सर्वच स्तरांवरील संशोधनाला विशेष महत्त्व दिले आहे. डिजिटल कार्यक्रमांचे मूल्यमापन, मुलांसाठी विविध खेळांची आणि खेळण्यांची संग्रहपुस्तके आणि उपयुक्त पुस्तकांची यादी तयार करणे, हे उपक्रम अग्रक्रमाने हाती घेण्यात यावेत. कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी शाळांकडून माहिती गोळा केली जाते, पण या माहितीचे पुढे काय होते, हे समजत नाही. आधी गोळा केलेली माहितीच शिक्षकांकडून परत परत मागितली जाते. ती भरण्यातच त्यांच्या शिकवण्याचा बराचसा वेळ वाया जातो. बरीचशी माहिती आणि तिचे विश्लेषण लोकांसाठी आणि शिक्षकांसाठीसुद्धा खुले नसते. ते असायला पाहिजे. 

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत प्रशासकीय यंत्रणेची भूमिका खूपच महत्त्वाची असते. केवळ ठरावीक कालावधीनंतर घेण्यात येणाऱ्या माहितीवर विसंबून न राहता प्रत्येक स्तरावर काय चालले आहे, याची माहिती अधिकाऱ्यांनी डोळे आणि कान कायम उघडे ठेवून स्वत: आणि विश्वसनीय व्यक्तींशी अनौपचारिकरीत्या बोलून घेत राहिले पाहिजे. जिथे काही चुकत असेल तिथे विनाविलंब हस्तक्षेप करायला पाहिजे. कायम विद्यार्थिहिताचा विचार करणाऱ्या, अखंड ‘सावधान’ असणाऱ्या, “आळसें आळस केला। तरी मग कारबारचि बुडाला।“ हे कायम लक्षात ठेवणाऱ्या, खंबीर, पण संवेदनशील नेतृत्वामुळेच लक्ष्यप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.


- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ ३१ जानेवारी २०२४)

1 comment:

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...