अमेरिकी शिक्षणपद्धतीतील घेण्याजोगे ...
केंद्र शासनाने नेमलेल्या कस्तुरीरंगन समितीने ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला. अंतिम धोरणात व्यवहार्यतेचा विचार करून अनेक बदल केले असले, तरी कस्तुरीरंगन समितीचा अहवालच त्याचा मूळ गाभा आहे. “कस्तुरीरंगन समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करताना कोणत्या देशाच्या शिक्षणपद्धतीचा आदर्श नजरेसमोर ठेवला असावा? फिनलंड? सिंगापूर?” असा प्रश्न अनेकजण विचारतात. केवळ पन्नास लाख लोकसंख्या असलेले हे देश कितीही प्रगत असले, तरी त्यांचा आदर्श भारतासारख्या खंडप्राय देशासाठी फारसा उपयोगी ठरू शकत नाही. प्रचंड क्षेत्रफळ, लोकसंख्या, भौगोलिक, वांशिक आणि सांस्कृतिक विविधता, लोकशाहीवर आधारलेली मूल्ये अशी अनेक साधर्म्यस्थळे असलेल्या अमेरिकेच्या शिक्षणपद्धतीच बहुधा समितीच्या नजरेसमोर असावा.
अमेरिकेतील सुमारे ९० टक्के मुले सरकारी शाळांत शिकतात. उत्कृष्ट शिक्षक, भरपूर मोकळा परिसर असलेली आकर्षक वास्तू, वर्गखोल्यांचे बदलते शैक्षणिक सुशोभन, भरपूर शैक्षणिक साधने, अशा साधन-सुविधांनी सज्ज असलेल्या या शाळांच्या दर्जाबद्दल पालक समाधानी असतात. मुलांना गटांत काम करणे आणि आपसात चर्चा करणे सोयीचे व्हावे, यासाठी वर्गांत गोल टेबले आणि त्यांच्याभोवती चार किंवा पाच खुर्च्या अशी बैठकव्यवस्था असते. सर्वसाधारणपणे शिक्षकांना एका वेळी एकाच इयत्तेला शिकवावे लागते. अमेरिकेत विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर जास्तीत जास्त तीस असते. कॅलिफोर्नियात ते सर्वाधिक, म्हणजे सरासरी २२ एवढे आहे. इतर राज्यांत ते यापेक्षा खूपच कमी आहे.
कॅलिफोर्नियामधील एका प्रातिनिधिक सरकारी प्राथमिक शाळेचे उदाहरण पाहूया. पूर्वप्राथमिक ते पाचवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत प्रामुख्याने चिनी, भारतीय, गोरे अमेरिकन, हिस्पॅनिक, आफ्रिकन अशा विविध वंशांचे विद्यार्थी शिकतात. विविध संस्कृतींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी शाळेत ‘इंडिया डे’ आणि ‘चायना डे’ आयोजित केले जातात. शिक्षक आणि पालक ईमेलच्या माध्यमांतून मुलांच्या वर्तनाबद्दल एकमेकांच्या संपर्कात असतात. पालक त्यांची मुले ज्या वर्गांत शिकतात, त्या वर्गांच्या शिक्षकांना शिकवताना, सहशालेय कार्यक्रम आयोजित करताना मदत करतात. नित्या ही दिव्याची पहिलीत शिकणारी मुलगी. नित्याचे पाढे पाठ होते; शब्दांची स्पेलिंग्स अचूक लिहायची, वाचन चांगले होते. आपली मुलगी एवढी हुशार असूनही तिच्या बुद्धिमत्तेची योग्य ती दखल घेतली जात नाही; वांशिक पूर्वग्रहामुळे असे होत असावे, असे दिव्याला वाटायचे. पण तिने शाळेत मदत करायला सुरुवात केल्यापासून पाठांतर आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच नवीन कल्पना सुचणे, स्वत:ला प्रश्न पडणे, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे, एकमेकांना मदत करणे, हेसुद्धा महत्त्वाचे असते; तसेच स्वावलंबन, स्वयंशिस्त हे गुणसुद्धा अभ्यासक्रमाचेच भाग असतात, हेही दिव्याच्या लक्षात आले.
“वाचायला शिका; वाचून शिका.” अशा आशयाची वाचनाला महत्त्व देणारी बोधवाक्ये अमेरिकेत ठिकठिकाणी वाचायला मिळतात. केजीपासूनच सर्व प्रकारच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षिका मुलांना पुस्तके निवडायला मदत करतात. एखादे मूल एकाच वेळी पाच पुस्तके स्वत:च निवडून आठवडाभरात वाचते. केजीपासूनच विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात स्वयंमूल्यमापन, सहाध्यायांनी केलेले मूल्यमापन आणि शिक्षकांनी केलेले मूल्यमापन अशा तीन पद्धती वापरल्या जातात. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना श्रेणी दिल्या जात नाहीत. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले काम, त्यांनी स्वत:चे केलेले मूल्यमापन, त्यांच्याबद्दलचे इतर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिप्राय शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एक दिवस सर्व पालकांना पाहण्यासाठी खुले ठेवले जातात. शेवटच्या दिवशी मुलांचे पोर्टफोलिओ पालकांना दिले जातात. पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना श्रेणी दिल्या जातात, पण त्या मार्कांच्या आधारे दिल्या जात नाहीत. बारावीपर्यंत कोणत्याही सार्वजनिक परीक्षा नसतात; विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. नववी ते बारावीपर्यंत मिळालेल्या श्रेणी उच्च शिक्षणसंस्थांतील प्रवेशांचा महत्त्वाचा आधार असतात.
कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याच प्रकारच्या अध्ययन-अध्यापनविषयक अपेक्षा आहेत. आपल्याकडे असे घडू शकेल का? असे घडण्याच्या आड आर्थिक टंचाई, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, व्यावसायिक निष्ठेचा अभाव, निष्क्रियता, अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार यांपैकी कोणत्या अडचणी येतात? की आणखी काही कारणे आहेत?
- डॉ. वसंत काळपांडे
(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, १४ फेब्रुवारी २०२४)