वाचन प्रेरणादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचन म्हणजे काय ?
याबाबत आपण सहज असं म्हणू की अक्षरं वाचता येणं. शब्द वाचता येणं. वाक्यं वाचता येणं. गोष्ट , पुस्तक वाचता येणं.
जे वाचलं त्याचा अर्थ समजणं. त्या अर्थातून बोध होणं. त्यातून माहिती मिळणं.
यालाच मग आपण ज्ञानात भर पडली असं म्हणतो.
चार-पाच वर्षांच्या मुलांबाबतही अक्षर ओळख झाली आणि मूल शब्द वाचायला लागले की आपण धन्य होतो. मूल वाचायला लागले असं म्हणतो.
पण जर जगण्याला भिडायचं असेल तर माणूस वाचता येणं, परिसर वाचता येणं, घटना वाचता येणं, प्रसंगावरून संदर्भ वाचता येणं, समग्रपणे एखाद्या गोष्टीचा बोध होणं, समस्या काय आहे ते वाचता येणं, एकूणच आपल्या आजूबाजूचे जग वाचता येणं हे अत्यावश्यक असं हे वाचनच आहे. या वाचनासाठी आपण संवेदनक्षम असायला हवं. पण अक्षर आणि शब्दांच्या वाचनाच्या दुनियेत हे वाचन महत्त्वाचं राहत नाही आणि हळू हळू हरवून जातं.
० ते ६ वर्षांची मुलं ही निसर्गाच्या जवळ असतात. अत्यंत संवेदनशील असतात. ज्ञानेंद्रियांमार्फत आजूबाजूचं जग सतत वाचत असतात. म्हणजेच वाचन या प्रक्रियेत मूल उपजतच असतं. मूल आपल्या सभोवतालची माणसं सतत वाचतं. आजूबाजूच्या माणसांचे, वस्तूंचे स्पर्श वाचतं, चवी वाचतं. विविध आवाज वाचतं. आणि या वाचनातून स्वतःची समज घडवतं. तसंच मुलांनी स्वतःहून काढलेली विविध चित्र हे सुध्दा मुलांनी वाचलेले आजूबाजूचे जगच असतं. ती चित्रं मूल छान वाचतं. त्यात कधी कधी ते समस्या मांडतात, त्या वाचतात. काही प्रसंगाची मांडणी करतात म्हणजे त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाचे वाचनच होय.
पण संवेदनशील वयातील मुलांच्या या वाचनाला आपण वाव न देता, मुलांच्या दृष्टीने निरर्थक अशा अक्षरांच्या गाडीतून शब्दांच्या दुनियेत नेत असतो. आपल्याला महत्त्वाच्या वाटणा-या औपचारिक वाचनाच्या वाटेला लावण्याची घाई करतो.
जगण्यास आवश्यक वाचन मूल करत असताना त्या वाचनाला पोषक आणि समृध्द वातावरण न देता, मुलांचं वाचन म्हटलं की फक्त आणि फक्त अक्षरांच्या ओळखीतून शब्दांच्या दुनियेत अडकून ठेवतो. आणि नंतर पुढे मात्र त्याला माणसं कळत नाहीत, जग वाचता येत नाही असा दोष देतो.
म्हणूनच मुलांना औपचारिक वाचनाकडे नेताना आपलं काही बाबतीत आत्मपरीक्षण करणं जरुरी आहे. जसं मुलांच्या प्रत्यक्ष जग वाचण्याच्या दिवसांत आपण त्यांना शब्द अक्षरे यांच्यात अडकवत आहोत का?
त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो, तिथे नुसंत वर्णन करत आहोत का?
त्यांना खरं खरं बघायचे असतं तर कल्पित त्यांच्यापुढे ठेवतो का? त्यांची समग्र समज आपण टप्प्यात विभागतो का? त्यांच्या संदर्भसह जगण्याला आपण संदर्भरहित करतो का? प्रत्यक्ष अनुभव न देता कल्पना करायला लावतो का?
मग या वाचन प्रेरणादिनी --
मूलाला वाचायला लावण्याआधी मूल स्वत: काय, कसं व का वाचतंय हे समजून घेऊया का? म्हणजेच
एक उत्तम ‘मूल वाचक’ होऊया. का? मुल काय ‘वाचू पहातेय’ हे समजून घेऊन त्याला वाव देऊया का? त्याच्या या वाचनासाठी समृध्द आणि पोषक वातावरण तयार करूया का? त्याच्या वाचनासाठी त्याचा त्याला अवकाश देऊया का?
चला तर मग या वाचन प्रेरणादिनाला ‘मूल वाचनाच्या’ नव्या प्रवासाची सुरुवात करू
आणि
या आगळ्यावेगळ्या वाचन प्रेरणादिनाच्या एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देऊ!
रती भोसेकर
.jpg)
No comments:
Post a Comment