शब्देविण संवादु
भाषा अनौपचारिक असते, भाषा प्रेमाची असते, भाषा भांडणाची असते,भाषा तोडण्याची असते, भाषा जोडण्याची असते. भाषा संगीताची असते, भाषा नाटकी असते, भाषा राजकारणी असते, नर्तकाची नृत्याची भाषा असते. भाषा ग्रामीण असते. भाषा शहरी असते. भाषा खूप काही असू शकते, केवळ संवादाची भाषा असते असे नाही. आदिमानवाने गुहेत चित्र काढून सुरुवातीस चित्रांच्या भाषेतून त्याच्या भावना व्यक्त केल्या. लहान बाळाची रडण्याची भाषा असते.
डोळ्यांची भाषा असू शकते . दात दाबत नाक उडवत नाक फुगवत भुवई उडवत व्यक्त होत असते चेहर्याची भाषा. मुके, बहिरे यांची हातवाऱ्यांची भाषा असते.
पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे काही समूहात सांकेतिक आवाजाची भाषा होती. उदाहरणार्थ शिवाजी महाराज बाजीप्रभूला म्हणाले होते "आम्ही किल्ल्यावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज करू" म्हणजे तोफांचा आवाज हीसुद्धा सांकेतिक खूण होती, नाही का? गुन्हेगारी जगतात डिकोडिंगची भाषा असते तर मोबाईल संगणकावरील ईमोजीची भाषा.
आपण हल्लीचे युग विज्ञानाचे युग म्हटले तर वावगे ठरणार नाही. विज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी माहिती, नियम, निष्कर्ष व निरीक्षण वगैरे बाबी व्यक्त करण्यासाठी चिन्ह सूत्र समीकरणं संकेत वापरले जातात याला विज्ञानाची भाषा म्हणतात. तसेच गणिताचीही भाषा असते. नट नट्यांची अभिनयाची भाषा असते. मारुती चित्तमपल्ली अरण्य ऋषी म्हणतात 'निसर्गाची भाषा असते'. पावसाळ्यापूर्वी निसर्गसृष्टीत होणाऱ्या बदलांचे आश्चर्यजनक बदल म्हणजे निसर्गाची एक भाषाच असते.
माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागतात. कावळ्यांची निरीक्षणे ही तर यापेक्षाही आश्चर्यकारक आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली स्निग्ध झाडे-आंबा, करंज तसेच काटेरी झाडे यांचा व कावळ्यांचा पूर्वापार संबंध आहे. कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, ही जंगलाची
भाषा आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात. यापेक्षाही मनोरंजक बाब डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागतात. जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवींचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागतात. दुसरे म्हणजे बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागतात. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.
मधमाशीला फुलातील मध साठवण याबद्दल माहिती मिळाली की ती विशिष्ट इंग्रजी आठ आकारात नृत्य करून इतर मधमाशांना सूचना देते तिचे हे नृत्य तिच्या समूहाची भाषाच आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी शरीरातून वेगवेगळे रासायनिक द्रव सोडतात ही इतर मुंग्यांसाठी एक प्रकारची भाषाच आहे. मोराला पावसाचे संकेत आधीच लक्षात येतात त्यामुळे तो आकाशात ढग जमा झाले की पिसारा फुलवून नाचतो, तर पावशा पक्षी शेतकऱ्याचा मित्र पेरते व्हा- पेरते व्हा ओरडू लागतो. चातक पक्षी 'पिऊ पिऊ' त्याच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागतो. कोकिळेची कुहूकुहू कुंजन तर बेडकाचे डरावणे हेही पक्षी आणि प्राण्यांच्या निसर्गातील बदलाविषयीच्या भाषा आहेत .
वाघ एखाद्या झाडावर आपल्या धारदार नखांनी ओरखडे मांडून इतर प्राण्यांना आपली हद्द दाखवण्याचा प्रयत्न करतो हीसुद्धा वाघाची हद्द दाखवण्याची एक भाषाच आहे नाही का? दोन बलशाली वाघ एकाच ठिकाणी वावरत असतील तर आपले सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी वाघ झाडाच्या खोडावर मूत्रविसर्जन करून ठेवतो त्याच्या वासाने दुसऱ्या वाघाला त्याच्या आकाराची कल्पना येऊन तो परिसर सोडतो ही वाघाची सामर्थ्य व्यक्त करण्याची एक वेगळीच भाषा आहे नाही का ?
वृक्ष वेलींची ही भाषा असते जसे आंब्याच्या झाडाला बहर येणे, खैर शमीच्या वृक्षांना फुलोरा येणे म्हणजे कमी पाऊस पडण्याचे संकेत दर्शवले जातात. मित्रांनो या शिवाय आणखीन एक वेगळी भाषा म्हणता येईल ती म्हणजे जहाजांना सूचना देणारा दिपस्तंभ यांचीही भाषा असते ती भाषा म्हणजे दिव्यांच्या हालचालींची भाषा.
तुमच्या लक्षात आले असेल बोलणे म्हणजेच भाषा नव्हे तर चित्र काढणे, रडणे, नजरेने खुणावते, हातवारे करणे, डिकोडिंग, संकेत दर्शवणे, संगणकावरील इमोजी, पक्षी-प्राण्यांचे संकेत, निसर्गाचे संकेत अशा या वेगवेगळ्या प्रकारे संवाद निर्माण करू शकणार्या भाषाच आहेत. आपल्या संतांनी म्हटलेच आहे "शब्देविण संवादू". पण मंडळी काही शब्दप्रभूंमुळे नाटक, कथा, गाणी, पोवाडा, ओव्या, अभंग, दोहे हे ही भावना, मत, विचार, भक्ती व्यक्त करण्याची साधने आहेत. त्यांनी भाषेला अधिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
- सायली घाग
आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा, गोरेगाव (पूर्व), मुंबई.
Sayalig2710@gmail.com
No comments:
Post a Comment