Saturday, 7 October 2023

आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत?

 आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत?



      एक पालक काहीसे नाराजीच्या सुरात मला भेटायला आले होते. त्यांच्या मुलाचा जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी काळजी जास्त वाटत होती. "सर पुण्यामुंबईकडच एखादं चांगलं कॉलेज मिळेल अशी अपेक्षा होती ,पण हे मिळालं. आता नाईलाजाने स्वीकारावं लागत आहे. मुलगा खूप नाराज आहे पण इलाज नाही. पुढे काहीच पर्याय नसल्यामुळे जावंच लागेल. इंटरनॅशनल रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकावर असलेले एखादे नावाजलेले कॉलेज आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु आपलं नशीबच असं..... " मी हे सर्व शांततेनं ऐकत होतो.आपल्याला काय मिळालं नाही, याची खडानखडा माहिती ते मला सांगत होते. परंतु जे मिळालं त्यातल्या अनेक चांगल्या गोष्टींपर्यंत मात्र ते पोहोचलेले नव्हते. मी म्हटलं,"अहो, जे कॉलेज मिळालं ते काही कमी नाही. तिथे तुमच्या मुलासारखे अनेक मुले शिकून मोठी झालीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पाल्य तुमच्यापासून फार लांब न जाता उच्च शिक्षण घेणार आहे." 

      थोडक्यात सांगायचं हे की, पालकांना काळजी करण्यासाठी किंवा चिंतातूर राहण्यासाठी पाल्यांनी फार मोठा अपेक्षाभंग करण्याची गरज नसते. मुलांनी खूप चांगली अचिव्हमेंट केल्यानंतरही पालक चिंतेत राहू शकतात, हे बरेचदा लक्षात येते. यावरून पालकांचे काही प्रकार लक्षात आलेले आहेत. या प्रसंगात वर्णन केलेले पालक हे 'चिंतातूर पालक ' आहेत. आपल्या पाल्याची प्रत्येक कृती यांना चिंतेच्या अथांग सागरात ढकलत असते. मुलाला फर्स्ट क्लास मिळाला तर मेरिट का आले नाही? मेरीट आले तर टक्केवारी कमी मिळाली, या चिंतेत असतात . एखाद्या नावाजलेल्या कॉलेजला प्रवेश निश्चित झाला तर त्याहीपेक्षा चांगले कॉलेज का मिळाले नाही ? ही चिंता त्यांना झोपू देत नाही.मग सतत मुलांच्या पुढे काळजीच्या सुरात अडचणींचा पाढा वाचत जाणे,अशा प्रकारचे वर्तन.त्यामुळे हा 'चिंतातूर पालक' वर्ग मुलांना त्रासदायक ठरू लागतो.आपण कितीही प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्या काळजीतच आपण भर टाकतो अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होऊ शकते .

     यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे 'अनभिज्ञ पालक'. हे चिंतातूर पालकांच्या अगदी विरुद्ध प्रकरण जवळजवळ बिनधास्त. मुलांचं आपण काही देणं लागतो, ही जाणीवच यांच्यामध्ये फारशी दृढ झालेली नसते. मुलं त्यांची कामं करतील किंवा घरातील कोणी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेईल, अशी यांची धारणा असते. त्यामुळे चुकून एखादेवेळी मुलांच्या शैक्षणिक बाबीविषयी बोलण्याचा प्रसंग आला तर अगदी घरातल्या मुलांनाही, 'तू कोणत्या वर्गात आहेस ?' किंवा 'तुझ्या शाळेचं नाव काय ?' असे प्रश्न विचारायला मागेपुढे पाहणार नाहीत. चारचौघांमध्ये मुलांच्या शिक्षणाचा विषय निघाला तर, 

"आपण त्यात काही लक्ष घालत नसतो. ती सगळी जबाबदारी त्यांच्या आईकडे दिलेली आहे." असं म्हणून हे 'अनभिज्ञ पालक ' मोकळे होतात .

         यानंतर पालकांचा तिसरा प्रकार एटीएम पालक. हे गरजेपेक्षा जास्त जागरूक पालक. मुलांना कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू नये, यासाठी ते सदैव दक्ष असतात. अगदी खिशातल्या एटीएम कार्डप्रमाणे. स्वाईप करा, पैसे घ्या. मुलांना गरज निर्माण होण्याअगोदर त्या गरजेची पूर्तता करून ठेवण्यामध्ये ह्या 'एटीएम पालकांना'पुरुषार्थ वाटतो. आपल्या वेळी कठीण परिस्थिती होती, आपल्या मुलांना कोणत्याही साधनांची कमतरता पडू नये, त्यांना कधीही अपयश येऊ नये, अशी यांची धारणा असते. समजा मुलाला वर्षभरात दहा नोटबुकची गरज असेल तर हे वर्षाच्या सुरुवातीलाच वीस-पंचवीस वह्या घरात आणून ठेवतील आणि आपण मुलांना कधी कशाची कमी पडू देत नाही, हे अभिमानाने सांगतील. मुलांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्यच आहे. पण त्यांना त्या साधन सुविधांची एवढया मोठया प्रमाणात आवश्यकता खरंच आहे का? तसे मार्ग स्वतःच्या बळावर ते निर्माण करू शकणार नाहीत का? गरज नसलेल्या मागणीला नकार देऊन मुलांना काटकसर शिकविता येणार नाही का? असे प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी हे 'एटीएम पालक ' तयार नसतात. त्यामुळे ह्या पालकांच्या पाल्याला नकार ही संकल्पना परिचित होत नाही. क्वचित अपयश आलंच तर अतिशय टोकाची प्रतिक्रिया अशा पालकांच्या मुलांकडून येण्याचा धोका जास्त असतो.

      पालकांमधील चौथा आणि मोठ्या प्रमाणात समाजामध्ये आढळणारा प्रकार म्हणजे 'हुकूमशहा पालक.' "संध्याकाळी कामावरून घरी पोहोचताना आपली चाहूल लागली की, घरात 'पिनड्रॉप सायलेन्स'. मुलं पटापट अभ्यासाची पुस्तकं हाती घेतात. इतर वेळी घरातील मुलंमुली आपल्यासमोर मान वर करून बोलत नाहीत. कोणीही आपल्या शब्दापुढे जात नाही. आपली कधीही अवज्ञा होत नाही. घरात शिस्त म्हणजे शिस्तच." अशा गोष्टी हे आपल्या मित्रमंडळींमध्ये अभिमानाने सांगत असतात, हे 'हुकूमशहा पालक.' त्यांना वाटते ती घरामधली शिस्त नसून यांच्या उपस्थितीत निर्माण झालेली दहशत असते. घरच्यांना पर्याय नाही म्हणून यांची हिटलरशाही सहन केली जाते, यांना ते प्राऊड फील होतं. हे घरातून बाहेर पडताच त्या घरात अक्षरशः जल्लोष होतो. या हुकूमशहांनी घरात पाय ठेवताच घरातील आनंद, हास्य, सहजता घराबाहेर निघून जाते. घरातील कर्ता या नात्याने सर्वांना आपण कसे शिस्तीत ठेवतो, हा यांचा पुरुषार्थ असतो. मुळात अशा पालकांमुळे घराघरात मुलांचे बालपण नैसर्गिकरित्या बहरू शकत नाही .

       यानंतर पालकांचा पाचवा प्रकार हा सर्व पालकांसाठी अनुकरणीय आहे. मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजून घेणारी मोठी माणसं ज्या ज्या घरांमध्ये आहेत ते सर्व 'मित्र पालक' आहेत. मुलांच्या लहान लहान गोष्टींमधून त्यांना आनंद मिळवण्याची प्रेरणा देतात. सतत यश मिळवण्याइतकेच अपयशातून मार्ग काढण्यासाठी संवादाच्या माध्यमातून मुलांना पाठबळ देतात,असे हे 'मित्र पालक ' सातत्याने मुलांसोबत संवाद साधतात. प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे इतरांसोबत आपल्या मुलांची अनावश्यक तुलना न करणारे हे 'मित्र पालक' पालकत्वाच्या शृंखलेतील अभिमानास्पद माणसं असतात. 'मित्र पालक' आहेत त्या परिस्थितीत मुलांना स्वीकारून त्यांचे आधारवड म्हणून भूमिका पार पडतात. दिवसातून मुलांसोबत किमान एकवेळचे जेवण, शाळेत दिवसभर झालेल्या गोष्टींची चर्चा, मुलांच्या आनंदात आपला आनंद मानणारे हे 'मित्र पालक ' असतात. एखादवेळी अपयश आलं तर मुलांना धीर देऊन पुन्हा ते येऊ नये यासाठी मदतीची खात्री देत असतात. पालक म्हणून मुलांचे सोबती ज्यांना होता येतं, ते सर्व 'मित्र पालक ' असतात.

         पालकत्वाच्या श्रृंखलेतील पराकोटीची संवेदनशील, निःस्वार्थी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणारी काही मोठी माणसं असतात, ती *'समाज पालक '* म्हणून आपली कर्तव्ये पार पाडतात. समर्पणाच्या भावनेतून काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी सामाजिक पालकत्वाची संकल्पना आपल्या समाजात रुजविली आहे. हे 'समाज पालक ' आपल्या समाज व्यवस्थेचे भूषण असतात. मुलींना, वंचितांना शिकता यावं म्हणून तळमळीने विद्यादानाचे काम करताना महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले प्रस्थापितांचा रोष ओढवून घेतला. पण त्यातही आनंद मानणारं फुलेदाम्पत्य 'समाज पालक' ठरते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मूहूर्तमेढ रोवणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून विदर्भातील लाखो मुलांच्या अंध:कारमय आयुष्यात उजेड पेरणारे शिक्षणमहर्षी भाऊसाहेब डॉ . पंजाबराव देशमुख, समाजप्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगणारे लोकशिक्षक संत गाडगेबाबा आणि आताच्या काळात शेकडो आदिवासी पारधी समूहातील वंचित मुलांना ' प्रश्नचिन्ह ' च्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मतीन भोसले यांच्यासारखी अनेक माणसं 'समाज पालक ' असतात . 

        पालकत्वाच्या या प्रवासात आपण या विभूतींच्या समर्पणाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून पालकत्वाची वाट समृद्ध करणे, ही खरी पालकनीती आहे .

------------------------------

-अरविंद शिंगाडे ( शिक्षक / समुपदेशक )

खामगाव जि . बुलढाणा

arvind.shingade@gmail.com


(पूर्वप्रसिद्धी: पालकनीती, दै. सकाळ, नागपूर आवृत्ती दि. २२/०९/२०२३)

1 comment:

  1. मनःपूर्वक धन्यवाद ' शिक्षण विकास मंच . '

    ReplyDelete

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...