Saturday, 28 October 2023

तरुणाई आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी भाषा

 तरुणाई आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी भाषा

       भाषा केवळ गुणांसाठी शिकायची नसते. एक अनिवार्य अथवा ऐच्छिक विषय म्हणून किंवा एक माध्यम म्हणून तर नाहीच. मग भाषा आपण कशासाठी शिकतो? भाषेतूनच तर आपलं व्यक्तिमत्त्व घडतं. भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर म्हणत ‘भाषाच आपल्याला विचारांची शिस्त शिकवत राहते.’ तर भाषेमुळेच आपल्या आकलनाची, विचार करण्याची, मनातल्या विविध भावना समर्थपणाने कागदावर मांडताना भाषेवरची पकड आवश्यक असते. भाषेतील मूलभूत, पायाभूत गोष्टींकडे मात्र तरुणाई कमालीचे दुर्लक्ष करते आहे. परिणामकारक संवादासाठी आणि सर्जनशील, वैशिष्ट्यपूर्ण लिखाणासाठी भाषेचे अध्ययन अधिक उपयुक्त आणि गरजेचे आहे. प्रवेशासाठी लिहिलेल्या साध्या अर्जातून आपले भाषा कौशल्य आणि क्षमतांची पारख होते. ज्यांच्याकडे उत्तम भाषिक कौशल्ये असतात ना त्यांचा साधा प्रवेश अर्ज, त्यांची उत्तर पत्रिका, त्यांचं साधं लेखनही वाचनीय होतं. खरं म्हणजे आपण सर्व जण जन्मापासूनच भाषा शिकण्याची, बोलण्याची, लिहिण्याची अंत: प्रेरणा घेऊन येतो.

     मनातील विविध छटा कागदांवर उतरवण्यासाठी गरजेची असते ती भाषाच! महाविद्यालयीन तरुण म्हणून आपण मराठी बोलण्यासाठी संकोच करतो, इंग्रजी बोलण्यासाठी न्यूनगंड बाळगतो, हिंदी सरमिसळ करत बोलतो आणि संस्कृतपासून दूर राहतो. धरसोडवृत्तीमुळे कोणत्याही एका भाषेवर आपली पकड राहत नाही. म्हणूनच भाषा अभ्यासाची खरीखुरी सुरुवात उजळणीतल्या मूळाक्षरांपासूनच करायला हवी. आपण सर्वजण वेगवेगळ्या भाषांमधून शिकतो; मात्र भाषा शिकण्यासाठी खरोखर, मनापासून आसूसलेलो असतो का आपण? डॉ. केळकर म्हणत, 'बारावीनंतर कोणत्याच विद्यार्थ्याला भाषा शिकवण्याची गरज पडू नये'. भाषेतून शिकावे; पण तसं होत नाही आपल्याकडे. भाषा शिकण्यासाठी तरुणाईकडे अधिक गांभीर्य असण्याची गरज आहे. रविवारच्या साहित्यिक पुरवण्यांमधून आलेले लेख तर आवर्जून वाचले पाहिजेत. अशा भाषाविषयक उणिवा दूर करण्यासाठी अनेक भाषाविषयक उपक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंतर्भूत आहेत. मातृभाषेतून शिकण्यासाठी हे धोरण अधिक प्रोत्साहित करते. 

    तरुणाईवर समाज माध्यमांच्या भाषांचा अधिक पगडा असल्याचे जाणवते. व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यांतल्या भाषा मनोरंजन करू शकतील, पण भाषिक कौशल्ये, प्रभुत्व कितपत रुजवू शकतील, याबद्दल शंका आहे. या माध्यमांनी काही छोटे-मोठे लघु अभ्यासक्रमाही कोरोना काळात सुरू केले, त्यावेळी देखील अशा विविध भाषांकडे आकृष्ट झाले. स्वप्नजा वालवडकर ही विद्यार्थिनी सांगते की तिला संस्कृतमधून यूपीएससी करायचे आहे. मुलं आता पारंपरिक साच्यांमध्ये अडकत नाही तर स्वतःची स्वतंत्र पायवाट निर्माण करण्यासाठी धडपड करतात हेही खरंय.

   कानात हेडफोन, डोळ्यांपुढे सतत स्क्रीन, आपण समाज माध्यमांवर आपली चुणूक दाखवली नाही तर आपण स्पर्धेच्या जगात मागे पडतो की काय असा भ्रम आणि भास तरुणाईला होत राहतो, असं व्हायला नको; पण होतंय खरं! आपलं काही चुकतंय हेच लक्षात येत नाही.. तरुणांच्या. उत्कर्षाच्या काळातला बराचसा वेळ यात घालवतात. समाज माध्यमं गरजेपुरती वापरली तर ठीकच. पण फावला वेळ घालवताना त्याचं रूपांतर व्यसनात होत चाललंय.

      परिणामकारक अभिवाचन करणारी यशश्री मुळे लिहिते अभिवाचनासाठी भाषेतील चढउतारांबरोबरच वाचन कौशल्यदेखील अवगत असावं लागतं. प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत तोंडी परीक्षेचे चार निकष असतात: वाचन, लेखन, संभाषण आणि भाषण.... ही कौशल्ये स्थूल मानाने प्राथमिक जरी वाटत असली तरी यात पारंगत होण्यासाठी अभ्यासच लागतो. अनेकदा असं होतं की विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिकतानादेखील अचूक असं वाचन कौशल्य रुजलेलं नसतं, गंमत म्हणजे मराठीमध्ये उत्तम गुण मिळवलेले असतात. मात्र भाषिक कौशल्यांबाबत कमालीची उदासीनता! हीच गोष्ट लेखन कौशल्यांच्या बाबतीत.. लेखन कौशल्यांमध्ये गती मिळवण्यासाठी गरज असते ती अचूक विराम चिन्ह वापरण्याची, प्रमाण लेखन नियमांच्या ओळखीची, अचूक हस्तक्षराची, परिणामकारक लेखनाची. विद्यार्थ्यांनी ही सुरुवात अगदी आपल्या आवेदन पत्रापासून, प्रवेशासाठीच्या अर्जापासून करायला हवी. 

          विद्यार्थी बरेचदा अनौपचारिक संवाद सादर करतात, पण औपचारिक संवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांच्याकडे कमी असतात, याचे एकमेव कारण म्हणजे सरावाचा अभाव. लिखाणाचा कंटाळा, म्हणून भाषेतून विविध विषय शिकण्यासाठी प्राथमिक अभ्यास असणे गरजेचे आहे. अनेकदा असं होतं की शालेय स्तरावर पत्र लेखन झालेलं असतं. वाक्यांचे प्रकार शिकवलेले असतात. विरामचिन्हांची ओळख झालेली असते, या चारही कौशल्यांची ओळख झालेली असते; परंतु लेखन उत्तम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करणे गरजेचे ... प्रत्येक विद्यार्थी त्याची स्वतःची एक बोली घेऊन आलेला असतो, हे काही गैर नाही; पण ही बोली मर्यादित परिसरात वापरली जाते, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक सभांमधून बोलण्यासाठीची कौशल्ये प्राप्त करावी लागतात. डॉ.मिलिंद जोशींनी लिहिलेलं ‘कथा वक्तृत्वाची ‘हे अलीकडे आलेलं पुस्तक आवर्जून वाचायला हवं. प्राचार्य हे पुस्तकही जरूर पहावं. प्रबोधनकारांचं वक्तृत्व शास्त्रावरचं पुस्तक तर अतिशय मार्गदर्शक! अभिव्यक्ती कौशल्य अतिशय सैल रीतीने वापरल्या जाणाऱ्या आजच्या काळात अभिरुचीसंपन्न, शैलीदार, नीटनेटक्या आणि पद्धतशीर वक्तृत्वाची निकड अधिक जाणवते आहे. यासाठी महाविद्यालयांमधून होणाऱ्या वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, कविता वाचन, परिसंवाद, साहित्यविषयक संमेलनं व इतर उपक्रम हे पूरक उपक्रम आपल्या कौशल्यांना अधिक परिणत करत राहतात. आपल्या ग्रंथालयांतील मराठीची नियतकालिके, दिवाळी अंक, विशेष अंक, साहित्यिक पुरवण्या, आवर्जून चाळायला हवीत.

     खरं म्हणजे अलीकडे युट्युबवर अनेक चांगल्या वक्त्यांची भाषण आहेत. ती नियमितपणे विद्यार्थ्यांनी ऐकायला हवीत. मला आठवतं आम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या कॅसेट घेऊन त्या टेप रेकॉर्डमध्ये ऐकलेल्या आहेत. त्या तुलनेने आता विद्यार्थ्यांना त्यांची अनेक भाषणे युट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. 

भाषा कुठलीही असो भाषाभ्यास हा गरजेचाच असतो. मराठी ही इतर भाषांच्या तुलनेत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे ( उदाहरणार्थ, 'कर' या शब्दाचे एकापेक्षा अनेक अर्थ.) असे मला वाटते. कारण एखादे वाक्य लिहिण्यात वा बोलण्यात एखादी छोटीशी जरी चूक झाली तरी पूर्ण वाक्याचा अर्थच बदलतो. स्पर्धा परीक्षा यूपीएससीचा अभ्यास करणारी अकरावीची स्वराली जोशी लिहिते,भाषाभ्यासामुळे माणसाच्या भाषाज्ञानात भर पडते. भाषा अधिक प्रगल्भ होते. आपले भाषाज्ञान किती आहे हे आपल्याला समजावे असे वाटत असेल तर शब्दकोडे सोडवताना आपले भाषा ज्ञान उघडे पडते'. कोणतीही शाखा अभ्यासा, शास्त्रांचा अभ्यास करा; मात्र भाषेवरच्या प्रभुत्वासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. एवढं नक्की!


डॉ. नागेश अंकुश,(भाषाअभ्यासक)

Nageshankush12@gmail.com

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय ,औरंगाबाद.

Saturday, 21 October 2023

शब्देविण संवादु

 शब्देविण संवादु

भाषा अनौपचारिक असते, भाषा प्रेमाची असते, भाषा भांडणाची असते,भाषा तोडण्याची असते, भाषा जोडण्याची असते. भाषा संगीताची असते, भाषा नाटकी असते, भाषा राजकारणी असते, नर्तकाची नृत्याची भाषा असते. भाषा ग्रामीण असते. भाषा शहरी असते. भाषा खूप काही असू शकते, केवळ संवादाची भाषा असते असे नाही. आदिमानवाने गुहेत चित्र काढून सुरुवातीस चित्रांच्या भाषेतून त्याच्या भावना व्यक्त केल्या. लहान बाळाची रडण्याची भाषा असते. 

डोळ्यांची भाषा असू शकते . दात दाबत नाक उडवत नाक फुगवत भुवई उडवत व्यक्त होत असते चेहर्‍याची भाषा. मुके, बहिरे यांची हातवाऱ्यांची भाषा असते.              

पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे काही समूहात सांकेतिक आवाजाची भाषा होती. उदाहरणार्थ शिवाजी महाराज बाजीप्रभूला म्हणाले होते "आम्ही किल्ल्यावर पोहोचल्यावर तोफांचा आवाज करू" म्हणजे तोफांचा आवाज हीसुद्धा सांकेतिक खूण होती, नाही का? गुन्हेगारी जगतात डिकोडिंगची भाषा असते तर मोबाईल संगणकावरील ईमोजीची भाषा. 

आपण हल्लीचे युग विज्ञानाचे युग म्हटले तर वावगे ठरणार नाही. विज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी माहिती, नियम, निष्कर्ष व निरीक्षण वगैरे बाबी व्यक्त करण्यासाठी चिन्ह सूत्र समीकरणं संकेत वापरले जातात याला विज्ञानाची भाषा म्हणतात. तसेच गणिताचीही भाषा असते. नट नट्यांची अभिनयाची भाषा असते. मारुती चित्तमपल्ली अरण्य ऋषी म्हणतात 'निसर्गाची भाषा असते'. पावसाळ्यापूर्वी निसर्गसृष्टीत होणाऱ्या बदलांचे आश्चर्यजनक बदल म्हणजे निसर्गाची एक भाषाच असते. 

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागतात. कावळ्यांची निरीक्षणे ही तर यापेक्षाही आश्चर्यकारक आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली स्निग्ध झाडे-आंबा, करंज तसेच काटेरी झाडे यांचा व कावळ्यांचा पूर्वापार संबंध आहे. कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, ही जंगलाची

भाषा आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात. यापेक्षाही मनोरंजक बाब डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागतात. जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवींचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागतात. दुसरे म्हणजे बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागतात. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

मधमाशीला फुलातील मध साठवण याबद्दल माहिती मिळाली की ती विशिष्ट इंग्रजी आठ आकारात नृत्य करून इतर मधमाशांना सूचना देते तिचे हे नृत्य तिच्या समूहाची भाषाच आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी शरीरातून वेगवेगळे रासायनिक द्रव सोडतात ही इतर मुंग्यांसाठी एक प्रकारची भाषाच आहे. मोराला पावसाचे संकेत आधीच लक्षात येतात त्यामुळे तो आकाशात ढग जमा झाले की पिसारा फुलवून नाचतो, तर पावशा पक्षी शेतकऱ्याचा मित्र पेरते व्हा- पेरते व्हा ओरडू लागतो. चातक पक्षी 'पिऊ पिऊ' त्याच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागतो. कोकिळेची कुहूकुहू कुंजन तर बेडकाचे डरावणे हेही पक्षी आणि प्राण्यांच्या निसर्गातील बदलाविषयीच्या भाषा आहेत .

वाघ एखाद्या झाडावर आपल्या धारदार नखांनी ओरखडे मांडून इतर प्राण्यांना आपली हद्द दाखवण्याचा प्रयत्न करतो हीसुद्धा वाघाची हद्द दाखवण्याची एक भाषाच आहे नाही का? दोन बलशाली वाघ एकाच ठिकाणी वावरत असतील तर आपले सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी वाघ झाडाच्या खोडावर मूत्रविसर्जन करून ठेवतो त्याच्या वासाने दुसऱ्या वाघाला त्याच्या आकाराची कल्पना येऊन तो परिसर सोडतो ही वाघाची सामर्थ्य व्यक्त करण्याची एक वेगळीच भाषा आहे नाही का ?

वृक्ष वेलींची ही भाषा असते जसे आंब्याच्या झाडाला बहर येणे, खैर शमीच्या वृक्षांना फुलोरा येणे म्हणजे कमी पाऊस पडण्याचे संकेत दर्शवले जातात. मित्रांनो या शिवाय आणखीन एक वेगळी भाषा म्हणता येईल ती म्हणजे जहाजांना सूचना देणारा दिपस्तंभ यांचीही भाषा असते ती भाषा म्हणजे दिव्यांच्या हालचालींची भाषा. 

तुमच्या लक्षात आले असेल बोलणे म्हणजेच भाषा नव्हे तर चित्र काढणे, रडणे, नजरेने खुणावते, हातवारे करणे, डिकोडिंग, संकेत दर्शवणे, संगणकावरील इमोजी, पक्षी-प्राण्यांचे संकेत, निसर्गाचे संकेत अशा या वेगवेगळ्या प्रकारे संवाद निर्माण करू शकणार्‍या भाषाच आहेत. आपल्या संतांनी म्हटलेच आहे "शब्देविण संवादू". पण मंडळी काही शब्दप्रभूंमुळे नाटक, कथा, गाणी, पोवाडा, ओव्या, अभंग, दोहे हे ही भावना, मत, विचार, भक्ती व्यक्त करण्याची साधने आहेत. त्यांनी भाषेला अधिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.

- सायली घाग

आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा, गोरेगाव (पूर्व), मुंबई.

Sayalig2710@gmail.com

Saturday, 14 October 2023

वाचन म्हणजे काय ?

 

वाचन प्रेरणादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



वाचन म्हणजे काय ? 

याबाबत आपण सहज असं म्हणू की अक्षरं वाचता येणं. शब्द वाचता येणं. वाक्यं वाचता येणं. गोष्ट , पुस्तक वाचता येणं. 

जे वाचलं त्याचा अर्थ समजणं. त्या अर्थातून बोध होणं. त्यातून माहिती मिळणं.

यालाच मग आपण ज्ञानात भर पडली असं म्हणतो.                      

चार-पाच वर्षांच्या मुलांबाबतही अक्षर ओळख झाली आणि मूल शब्द वाचायला लागले की आपण धन्य होतो. मूल वाचायला लागले असं म्हणतो.

पण जर जगण्याला भिडायचं असेल तर माणूस वाचता येणं, परिसर वाचता येणं, घटना वाचता येणं, प्रसंगावरून संदर्भ वाचता येणं, समग्रपणे एखाद्या गोष्टीचा बोध होणं, समस्या काय आहे ते वाचता येणं, एकूणच आपल्या आजूबाजूचे जग वाचता येणं हे अत्यावश्यक असं हे वाचनच आहे. या वाचनासाठी आपण संवेदनक्षम असायला हवं. पण अक्षर आणि शब्दांच्या वाचनाच्या दुनियेत हे वाचन महत्त्वाचं राहत नाही आणि हळू हळू हरवून जातं. 

० ते ६ वर्षांची मुलं ही निसर्गाच्या जवळ असतात. अत्यंत संवेदनशील असतात. ज्ञानेंद्रियांमार्फत आजूबाजूचं जग सतत वाचत असतात. म्हणजेच वाचन या प्रक्रियेत मूल उपजतच असतं. मूल आपल्या सभोवतालची माणसं सतत वाचतं. आजूबाजूच्या माणसांचे, वस्तूंचे स्पर्श वाचतं, चवी वाचतं. विविध आवाज वाचतं. आणि या वाचनातून स्वतःची समज घडवतं. तसंच मुलांनी स्वतःहून काढलेली विविध चित्र हे सुध्दा मुलांनी वाचलेले आजूबाजूचे जगच असतं. ती चित्रं मूल छान वाचतं. त्यात कधी कधी ते समस्या मांडतात, त्या वाचतात. काही प्रसंगाची मांडणी करतात म्हणजे त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाचे वाचनच होय. 

पण संवेदनशील वयातील मुलांच्या या वाचनाला आपण वाव न देता, मुलांच्या दृष्टीने निरर्थक अशा अक्षरांच्या गाडीतून शब्दांच्या दुनियेत नेत असतो. आपल्याला महत्त्वाच्या वाटणा-या औपचारिक वाचनाच्या वाटेला लावण्याची घाई करतो. 

जगण्यास आवश्यक वाचन मूल करत असताना त्या वाचनाला पोषक आणि समृध्द वातावरण न देता, मुलांचं वाचन म्हटलं की फक्त आणि फक्त अक्षरांच्या ओळखीतून शब्दांच्या दुनियेत अडकून ठेवतो. आणि नंतर पुढे मात्र त्याला माणसं कळत नाहीत, जग वाचता येत नाही असा दोष देतो.

म्हणूनच मुलांना औपचारिक वाचनाकडे नेताना आपलं काही बाबतीत आत्मपरीक्षण करणं जरुरी आहे. जसं मुलांच्या प्रत्यक्ष जग वाचण्याच्या दिवसांत आपण त्यांना शब्द अक्षरे यांच्यात अडकवत आहोत का? 

त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो, तिथे नुसंत वर्णन करत आहोत का? 

त्यांना खरं खरं बघायचे असतं तर कल्पित त्यांच्यापुढे ठेवतो का? त्यांची समग्र समज आपण टप्प्यात विभागतो का? त्यांच्या संदर्भसह जगण्याला आपण संदर्भरहित करतो का? प्रत्यक्ष अनुभव न देता कल्पना करायला लावतो का? 

मग या वाचन प्रेरणादिनी --

मूलाला वाचायला लावण्याआधी मूल स्वत: काय, कसं व का वाचतंय हे समजून घेऊया का? म्हणजेच 

एक उत्तम ‘मूल वाचक’ होऊया. का? मुल काय ‘वाचू पहातेय’ हे समजून घेऊन त्याला वाव देऊया का? त्याच्या या वाचनासाठी समृध्द आणि पोषक वातावरण तयार करूया का? त्याच्या वाचनासाठी त्याचा त्याला अवकाश देऊया का? 

चला तर मग या वाचन प्रेरणादिनाला ‘मूल वाचनाच्या’ नव्या प्रवासाची सुरुवात करू

आणि 

या आगळ्यावेगळ्या वाचन प्रेरणादिनाच्या एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देऊ! 

रती भोसेकर

Saturday, 7 October 2023

आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत?

 आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत?



      एक पालक काहीसे नाराजीच्या सुरात मला भेटायला आले होते. त्यांच्या मुलाचा जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी काळजी जास्त वाटत होती. "सर पुण्यामुंबईकडच एखादं चांगलं कॉलेज मिळेल अशी अपेक्षा होती ,पण हे मिळालं. आता नाईलाजाने स्वीकारावं लागत आहे. मुलगा खूप नाराज आहे पण इलाज नाही. पुढे काहीच पर्याय नसल्यामुळे जावंच लागेल. इंटरनॅशनल रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकावर असलेले एखादे नावाजलेले कॉलेज आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु आपलं नशीबच असं..... " मी हे सर्व शांततेनं ऐकत होतो.आपल्याला काय मिळालं नाही, याची खडानखडा माहिती ते मला सांगत होते. परंतु जे मिळालं त्यातल्या अनेक चांगल्या गोष्टींपर्यंत मात्र ते पोहोचलेले नव्हते. मी म्हटलं,"अहो, जे कॉलेज मिळालं ते काही कमी नाही. तिथे तुमच्या मुलासारखे अनेक मुले शिकून मोठी झालीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पाल्य तुमच्यापासून फार लांब न जाता उच्च शिक्षण घेणार आहे." 

      थोडक्यात सांगायचं हे की, पालकांना काळजी करण्यासाठी किंवा चिंतातूर राहण्यासाठी पाल्यांनी फार मोठा अपेक्षाभंग करण्याची गरज नसते. मुलांनी खूप चांगली अचिव्हमेंट केल्यानंतरही पालक चिंतेत राहू शकतात, हे बरेचदा लक्षात येते. यावरून पालकांचे काही प्रकार लक्षात आलेले आहेत. या प्रसंगात वर्णन केलेले पालक हे 'चिंतातूर पालक ' आहेत. आपल्या पाल्याची प्रत्येक कृती यांना चिंतेच्या अथांग सागरात ढकलत असते. मुलाला फर्स्ट क्लास मिळाला तर मेरिट का आले नाही? मेरीट आले तर टक्केवारी कमी मिळाली, या चिंतेत असतात . एखाद्या नावाजलेल्या कॉलेजला प्रवेश निश्चित झाला तर त्याहीपेक्षा चांगले कॉलेज का मिळाले नाही ? ही चिंता त्यांना झोपू देत नाही.मग सतत मुलांच्या पुढे काळजीच्या सुरात अडचणींचा पाढा वाचत जाणे,अशा प्रकारचे वर्तन.त्यामुळे हा 'चिंतातूर पालक' वर्ग मुलांना त्रासदायक ठरू लागतो.आपण कितीही प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्या काळजीतच आपण भर टाकतो अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होऊ शकते .

     यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे 'अनभिज्ञ पालक'. हे चिंतातूर पालकांच्या अगदी विरुद्ध प्रकरण जवळजवळ बिनधास्त. मुलांचं आपण काही देणं लागतो, ही जाणीवच यांच्यामध्ये फारशी दृढ झालेली नसते. मुलं त्यांची कामं करतील किंवा घरातील कोणी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेईल, अशी यांची धारणा असते. त्यामुळे चुकून एखादेवेळी मुलांच्या शैक्षणिक बाबीविषयी बोलण्याचा प्रसंग आला तर अगदी घरातल्या मुलांनाही, 'तू कोणत्या वर्गात आहेस ?' किंवा 'तुझ्या शाळेचं नाव काय ?' असे प्रश्न विचारायला मागेपुढे पाहणार नाहीत. चारचौघांमध्ये मुलांच्या शिक्षणाचा विषय निघाला तर, 

"आपण त्यात काही लक्ष घालत नसतो. ती सगळी जबाबदारी त्यांच्या आईकडे दिलेली आहे." असं म्हणून हे 'अनभिज्ञ पालक ' मोकळे होतात .

         यानंतर पालकांचा तिसरा प्रकार एटीएम पालक. हे गरजेपेक्षा जास्त जागरूक पालक. मुलांना कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू नये, यासाठी ते सदैव दक्ष असतात. अगदी खिशातल्या एटीएम कार्डप्रमाणे. स्वाईप करा, पैसे घ्या. मुलांना गरज निर्माण होण्याअगोदर त्या गरजेची पूर्तता करून ठेवण्यामध्ये ह्या 'एटीएम पालकांना'पुरुषार्थ वाटतो. आपल्या वेळी कठीण परिस्थिती होती, आपल्या मुलांना कोणत्याही साधनांची कमतरता पडू नये, त्यांना कधीही अपयश येऊ नये, अशी यांची धारणा असते. समजा मुलाला वर्षभरात दहा नोटबुकची गरज असेल तर हे वर्षाच्या सुरुवातीलाच वीस-पंचवीस वह्या घरात आणून ठेवतील आणि आपण मुलांना कधी कशाची कमी पडू देत नाही, हे अभिमानाने सांगतील. मुलांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्यच आहे. पण त्यांना त्या साधन सुविधांची एवढया मोठया प्रमाणात आवश्यकता खरंच आहे का? तसे मार्ग स्वतःच्या बळावर ते निर्माण करू शकणार नाहीत का? गरज नसलेल्या मागणीला नकार देऊन मुलांना काटकसर शिकविता येणार नाही का? असे प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी हे 'एटीएम पालक ' तयार नसतात. त्यामुळे ह्या पालकांच्या पाल्याला नकार ही संकल्पना परिचित होत नाही. क्वचित अपयश आलंच तर अतिशय टोकाची प्रतिक्रिया अशा पालकांच्या मुलांकडून येण्याचा धोका जास्त असतो.

      पालकांमधील चौथा आणि मोठ्या प्रमाणात समाजामध्ये आढळणारा प्रकार म्हणजे 'हुकूमशहा पालक.' "संध्याकाळी कामावरून घरी पोहोचताना आपली चाहूल लागली की, घरात 'पिनड्रॉप सायलेन्स'. मुलं पटापट अभ्यासाची पुस्तकं हाती घेतात. इतर वेळी घरातील मुलंमुली आपल्यासमोर मान वर करून बोलत नाहीत. कोणीही आपल्या शब्दापुढे जात नाही. आपली कधीही अवज्ञा होत नाही. घरात शिस्त म्हणजे शिस्तच." अशा गोष्टी हे आपल्या मित्रमंडळींमध्ये अभिमानाने सांगत असतात, हे 'हुकूमशहा पालक.' त्यांना वाटते ती घरामधली शिस्त नसून यांच्या उपस्थितीत निर्माण झालेली दहशत असते. घरच्यांना पर्याय नाही म्हणून यांची हिटलरशाही सहन केली जाते, यांना ते प्राऊड फील होतं. हे घरातून बाहेर पडताच त्या घरात अक्षरशः जल्लोष होतो. या हुकूमशहांनी घरात पाय ठेवताच घरातील आनंद, हास्य, सहजता घराबाहेर निघून जाते. घरातील कर्ता या नात्याने सर्वांना आपण कसे शिस्तीत ठेवतो, हा यांचा पुरुषार्थ असतो. मुळात अशा पालकांमुळे घराघरात मुलांचे बालपण नैसर्गिकरित्या बहरू शकत नाही .

       यानंतर पालकांचा पाचवा प्रकार हा सर्व पालकांसाठी अनुकरणीय आहे. मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजून घेणारी मोठी माणसं ज्या ज्या घरांमध्ये आहेत ते सर्व 'मित्र पालक' आहेत. मुलांच्या लहान लहान गोष्टींमधून त्यांना आनंद मिळवण्याची प्रेरणा देतात. सतत यश मिळवण्याइतकेच अपयशातून मार्ग काढण्यासाठी संवादाच्या माध्यमातून मुलांना पाठबळ देतात,असे हे 'मित्र पालक ' सातत्याने मुलांसोबत संवाद साधतात. प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे इतरांसोबत आपल्या मुलांची अनावश्यक तुलना न करणारे हे 'मित्र पालक' पालकत्वाच्या शृंखलेतील अभिमानास्पद माणसं असतात. 'मित्र पालक' आहेत त्या परिस्थितीत मुलांना स्वीकारून त्यांचे आधारवड म्हणून भूमिका पार पडतात. दिवसातून मुलांसोबत किमान एकवेळचे जेवण, शाळेत दिवसभर झालेल्या गोष्टींची चर्चा, मुलांच्या आनंदात आपला आनंद मानणारे हे 'मित्र पालक ' असतात. एखादवेळी अपयश आलं तर मुलांना धीर देऊन पुन्हा ते येऊ नये यासाठी मदतीची खात्री देत असतात. पालक म्हणून मुलांचे सोबती ज्यांना होता येतं, ते सर्व 'मित्र पालक ' असतात.

         पालकत्वाच्या श्रृंखलेतील पराकोटीची संवेदनशील, निःस्वार्थी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणारी काही मोठी माणसं असतात, ती *'समाज पालक '* म्हणून आपली कर्तव्ये पार पाडतात. समर्पणाच्या भावनेतून काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी सामाजिक पालकत्वाची संकल्पना आपल्या समाजात रुजविली आहे. हे 'समाज पालक ' आपल्या समाज व्यवस्थेचे भूषण असतात. मुलींना, वंचितांना शिकता यावं म्हणून तळमळीने विद्यादानाचे काम करताना महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले प्रस्थापितांचा रोष ओढवून घेतला. पण त्यातही आनंद मानणारं फुलेदाम्पत्य 'समाज पालक' ठरते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मूहूर्तमेढ रोवणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून विदर्भातील लाखो मुलांच्या अंध:कारमय आयुष्यात उजेड पेरणारे शिक्षणमहर्षी भाऊसाहेब डॉ . पंजाबराव देशमुख, समाजप्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगणारे लोकशिक्षक संत गाडगेबाबा आणि आताच्या काळात शेकडो आदिवासी पारधी समूहातील वंचित मुलांना ' प्रश्नचिन्ह ' च्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मतीन भोसले यांच्यासारखी अनेक माणसं 'समाज पालक ' असतात . 

        पालकत्वाच्या या प्रवासात आपण या विभूतींच्या समर्पणाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून पालकत्वाची वाट समृद्ध करणे, ही खरी पालकनीती आहे .

------------------------------

-अरविंद शिंगाडे ( शिक्षक / समुपदेशक )

खामगाव जि . बुलढाणा

arvind.shingade@gmail.com


(पूर्वप्रसिद्धी: पालकनीती, दै. सकाळ, नागपूर आवृत्ती दि. २२/०९/२०२३)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...