Saturday, 16 May 2026

तणावमुक्त मूल्यांकन तंत्रे : मूल्यांकनाच्या नव्या दिशा

 तणावमुक्त मूल्यांकन तंत्रे : मूल्यांकनाच्या नव्या दिशा

इयत्ता नववीतील विद्यार्थिनी श्रेया, तोंडी परीक्षेसाठी माझ्यासमोर उभी होती. ती माझ्या वर्गातील कायम उत्साही, खेळकर, बोलक्या, मोकळेपणाने संवाद साधणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक होती. त्यामुळे तिच्याकडून मला आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी उत्तरांची अपेक्षा होती. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला परीक्षेसाठी बोलावले असता ती अचानक स्तब्ध झाली. तिचा चेहरा फिकट पडला, थरथरत होती, तिच्या देहबोलीतून ती घाबरली आहे हे कळत होते. तिची ही अवस्था लक्षात येताच मी तिचा ताण थोडा कमी करण्यासाठी तिला सुरुवातीला कोणता प्रश्न घ्यायचा हे निवडण्याची मुभा दिली. तरीही ती शांतच होती... आणि तिने तयारीसाठी थोडा वेळ मागितला. दहा मिनिटांनी ती परत आली, परंतु तिचा ताण अजूनही स्पष्ट दिसत होता.

या प्रसंगाने मला विचार करायला भाग पाडले. श्रेयाने अभ्यास केलेला असल्याची मला पूर्ण खात्री होती. परीक्षेची तारीख महिनाभर आधी जाहीर केली होती आणि त्याची अनेकदा आठवणही करून दिली होती. तरीही भीतीमुळे तिला उत्तरे येत असूनही देता आली नाहीत. ती आपली क्षमता सिद्ध करू शकली नाही. ही घटना माझ्या मनावर खोल परिणाम करून गेली आणि मला आपल्या परीक्षा पद्धतीबद्दल गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त केले.

बऱ्याचदा अनेक शिक्षक परीक्षा घेताना आत्मविश्वासाने बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचेच कौतुक करतात. पण हे खरेच विद्यार्थ्याच्या शिकण्याचे योग्य मोजमाप आहे का? आपण खरोखर विद्यार्थ्यांना किती कळले आहे, शिकवलेले किती समजले आहे, त्यातून ते किती शिकले आहेत, याचे मूल्यांकन करतो आहोत का? की केवळ औपचारिक जबाबदारी पार पाडत आहोत? नक्की महत्त्वाचे काय - विद्यार्थ्याची त्या क्षणातील कामगिरी, की त्याचे प्रत्यक्ष शिकणे? आपण मूल्यांकन नेमके कशाचे करतो आहोत - शिकण्याचे, स्मरणशक्तीचे की तात्कालिक कामगिरीचे? या प्रश्नांनी मला विद्यार्थ्यांचे तणावमुक्त पद्धतीने मूल्यांकन करण्याच्या पर्यायांचा शोध घ्यायला प्रेरित केले.

दीर्घकाळापासून मूल्यांकन म्हणजे ताणतणाव, असे समीकरण बनले आहे. पारंपरिक समज असा होता की ताणामुळे विद्यार्थी अधिक अभ्यास करतात. मात्र काळ बदलत आहे - विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) म्हणजेच बदललेल्या शैक्षणिक धोरणानंतर ही धारणा योग्य वाटत नाही. आज मूल्यांकन हे विद्यार्थ्यांना घाबरवण्याऐवजी त्यांच्या शिकण्याला सहाय्य करणारी प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे तणावमुक्त मूल्यांकनाची कल्पना केवळ योग्यच नाही तर अत्यावश्यक ठरते.

अत्याधिक ताणामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होतो आणि याच जाणिवेतून तणावमुक्त मूल्यांकनाची गरज निर्माण होते. दडपणाखाली विद्यार्थी आत्मविश्वास गमावतात आणि आपली खरी क्षमता दाखवू शकत नाहीत. NEP 2020मध्ये “Assessment of Learning” म्हणजे केवळ निकालासाठी मूल्यांकन यावर नव्हे तर “Assessment for Learning” म्हणजेच ‘शिकण्यासाठी मूल्यांकन’ यावर भर दिला आहे. या बदलामुळे मूल्यांकन हे निर्णय देणारे नसून, सुधारणा करण्यास वाव देणारे साधन म्हणून वापरण्याचा दृष्टिकोन विकसित होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही अलीकडेच प्रकल्प, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक काम यांच्या माध्यमातून सतत व सर्वांगीण मूल्यांकनाची दिशा स्वीकारली आहे. यामुळे परीक्षेचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज शिक्षणाचा उद्देश केवळ पाठांतर तपासणे नसून समज, सर्जनशीलता आणि ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता तपासणे हा आहे.

शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांनी दीर्घकाळ अभ्यास करून दाखवले आहे की, थोड्या प्रमाणात असणारा ताण प्रेरणा देऊ शकतो, परंतु जास्त प्रमाणात असणारा ताण भीती, चिंता निर्माण करून कार्यक्षमता कमी करतो. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना झोप न लागणे, सतत चिंताग्रस्त असणे, अतिविचारात असणे, आणि काही वेळा तर शारीरिक त्रासही जाणवतो. अनेक सक्षम विद्यार्थी तयारी असूनही भीतीमुळे चांगली कामगिरी करू शकत नाहीत - जसे श्रेयाच्या बाबतीत घडले. विशेषतः इयत्ता ९ ते १२ मधील विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या भीतीमुळे त्यांची एकाग्रता कमी होते आणि आत्मविश्वासावर देखील परिणाम होतो. त्यामुळे मूल्यांकन पद्धती अशी असावी की विद्यार्थ्यांमध्ये भीतीऐवजी आत्मविश्वास निर्माण होईल.

तणावमुक्त तंत्रांची भूमिका आणि परिणाम

तणावमुक्त मूल्यांकन तंत्रामुळे मूल्यमापन हे शिकण्याच्याच प्रक्रियेचा एक भाग होते. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन विविध आणि रंजक उपक्रमांद्वारे नियमितपणे होत असेल तर त्यांना परीक्षा ही भयंकर आणि भीतिदायक गोष्ट वाटत नाही. या उलट ती सुधारणा आणि प्रगतीची संधी वाटते. अशा मूल्यांकन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित करतात जे NEP 2020चे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

शिक्षक म्हणून आपल्याला हे जाणवते की प्रत्येक विद्यार्थ्याची कार्यक्षमता वेगळी असल्याने, त्यांचे मूल्यांकन एकाच पद्धतीने करणे योग्य ठरणार नाही. काही विद्यार्थी लेखनातून उत्तम व्यक्त होतात, काही बोलण्यातून, काही चित्रकलेतून किंवा काही अभिनयातून. ही जाणीव लक्षात घेऊन तोंडी, लेखी आणि प्रकल्पाधारित मूल्यांकन यांचा संगम करण्याचा विचार मी केला.

पारंपरिक अंतिम परीक्षा विद्यार्थ्यांवर मोठा ताण निर्माण करतात, कारण त्यात एका कामगिरीवर सर्व काही अवलंबून असते. याउलट, रचनात्मक मूल्यांकन (formative assessment) हे शिकण्याच्या प्रक्रियेबरोबरच अविरत सुरू राहते. यात वर्गातील चर्चा, छोट्या चाचण्या, गटप्रकल्प आणि मौखिक अभिव्यक्ती यांचा समावेश असतो. या अनौपचारिक व सातत्यपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो आणि विद्यार्थ्यांना एकाच मोठ्या परीक्षेची भीती वाटत नाही. तसेच सतत मूल्यांकन होत असल्याने विद्यार्थीसुद्धा उपस्थिती आणि वर्गातील सहभागाला अधिक महत्त्व देतात.

तणावमुक्त मूल्यांकनाच्या काही पद्धती

१. पोर्टफोलिओ मूल्यांकन

विद्यार्थी संपूर्ण सत्रभर केलेले काम म्हणजेच निबंध, चित्रे, प्रकल्प, उपक्रम आणि आत्मपरीक्षण याचा संग्रह तयार करतात. त्यामधून त्यांच्या प्रगतीचे सर्वांगीण चित्र दिसते.

२. सहकारी व स्वयंमूल्यांकन

विद्यार्थी स्वतःच्या किंवा सहाध्यायांच्या कामाचे सोप्या निकषांच्या आधारे मूल्यांकन करतात. यामुळे विद्यार्थ्यांची स्वतःबाबतची जागरुकता, जबाबदारी आणि चिंतनशीलता वाढते.

३. प्रकल्पाधारित शिक्षण (PBL)

प्रकल्पांमुळे शिक्षण वास्तव जीवनाशी जोडले जाते. विद्यार्थी सहकार्याने काम करतात आणि शिकतानाच मूल्यांकनही नैसर्गिकपणे घडते.

४. पर्यायाधारित मूल्यांकन

मूल्यांकनाच्या पद्धतींमध्ये काही प्रमाणात निवडीची संधी दिल्यास विद्यार्थ्यांचा ताण कमी होतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या क्षमतांना मान्यता मिळते.

५. ‘बेस्ट ऑफ’ पद्धत

श्रेयासारख्या अनुभवांमधून मला ‘बेस्ट ऑफ’ पद्धतीचा विचार सुचला. उदाहरणार्थ, दर पंधरवड्याला ४० गुणांची एक परीक्षा घेण्याऐवजी १० गुणांच्या सात छोट्या चाचण्या घेऊन त्यातील सर्वोत्तम चार गुण अंतिम गणनेत धरता येतात. त्यामुळे एका खराब दिवशीची कामगिरी विद्यार्थ्याच्या एकूण निकालावर परिणाम करत नाही.

६. डिजिटल व खेळाधारित मूल्यांकन

Quizizz किंवा Google Forms सारख्या साधनांमुळे मूल्यांकन अधिक रंजक होते. तत्काळ अभिप्राय आणि खेळातून अभ्यासाचा अनुभव विद्यार्थ्यांचा ताण कमी करतो.

७. निरीक्षण व नोंदी

शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून, त्यांचा सहभाग, जिज्ञासा आणि प्रगतीबाबत छोट्या नोंदी ठेवू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाचे व्यापक चित्र मिळते.


NEP 2020शी सुसंगती

या सर्व पद्धती NEP 2020च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत. या धोरणात कौशल्यावर आधारित, बहुआयामी आणि सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर दिला आहे. पाठांतराऐवजी समज, अनुप्रयोग आणि सर्जनशीलतेवर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या धोरणात ३६० अंशांचा सर्वांगीण प्रगती अहवाल सुचविण्यात आला आहे, ज्यात शैक्षणिक प्रगतीसोबत कौशल्ये, मूल्ये, वृत्ती आणि सहभाग यांचाही समावेश असतो. महाराष्ट्र राज्य मंडळानेही अंतर्गत मूल्यांकन, तोंडी परीक्षा आणि उपक्रमावर आधारित चाचण्यांद्वारे या दिशेने पावले उचलली आहेत.

आव्हाने

तणावमुक्त मूल्यांकन लागू करताना येणाऱ्या काही अडचणींचा विचार करणेसुद्धा आवश्यक आहे. शिक्षकांना प्रभावी निकष (rubrics) तयार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. तसेच अनेक पालक अजूनही कठोर परीक्षेलाच शिस्तीचे प्रतीक मानतात, त्यामुळे त्यांनाही जागरूक करणे आवश्यक आहे. मोठ्या वर्गसंख्येमुळे सुरुवातीला शिक्षकांना ही प्रक्रिया वेळखाऊ वाटू शकते. मात्र योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास त्याचे फायदे अधिक आहेत.

श्रेयासोबतचा अनुभव मला एक महत्त्वाचा धडा देऊन गेला - मूल्यांकन ही धैर्याची परीक्षा नसून समजुतीचे प्रतिबिंब असावे.

रवींद्रनाथ टागोर म्हणतात,

“उच्चतम शिक्षण तेच आहे जे केवळ माहिती देत नाही, तर आपल्या जीवनाच्या सर्व अनुभवांना सुसंगत बनवते.”

या भावनेतून पाहिले तर तणावमुक्त मूल्यांकन ही केवळ पद्धत नसून शिक्षणाकडे पाहण्याची मानवी दृष्टी आहे. ज्यात विद्यार्थी आनंदाने शिकतात आणि निर्भयपणे स्वतःला व्यक्त करतात, तेव्हा मूल्यांकन ही वाढीची आनंददायी प्रक्रिया बनते.

यासाठी शिक्षकांना आपली भूमिका नव्याने विचारात घ्यावी लागेल. आपण केवळ परीक्षक नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि जिज्ञासेला पोषण देणारे मार्गदर्शक आहोत. विज्ञान प्रयोग, कथा सांगणे, भूमिकानाट्य किंवा चिंतनात्मक लेखन - यापैकी प्रत्येक गोष्ट ही योग्य नियोजनाने प्रभावी मूल्यांकन ठरू शकते.

मूल्यांकनाचे भविष्य भीतीवर नव्हे तर विश्वासावर आधारित आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षकांवर विश्वास वाटतो की त्यांची क्षमता योग्यरीत्या समजून घेतली जाईल, तेव्हा शिक्षण आनंददायी बनते. वर्गातले वातावरण अधिक उत्साही आणि सकारात्मक होते.

तणावमुक्त मूल्यांकन विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीही अध्यापन अधिक समाधानकारक करते. NEP 2020च्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मंडळही या बदलाचा स्वीकार करत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने भीतीतून शिकू नये, ही शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाची नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारी आहे. 

रचनात्मक मूल्यांकन शिकण्यातील त्रुटी ओळखून सुधारणा करण्यास मदत करते. तथापि, या पद्धतीचा उद्देश विद्यमान प्रणाली पूर्णपणे बदलणे नसून पारंपरिक मूल्यांकन आणि तणावमुक्त रचनात्मक मूल्यांकन यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. 

तसेच विद्यार्थ्यांनीही हे समजून घ्यावे की तणावमुक्त मूल्यांकन म्हणजे अभ्यास टाळण्याची संधी नाही. प्रत्येक मूल्यांकन ही शिकण्याची आणि स्वतःची क्षमता दाखविण्याची संधी आहे.

शेवटी, प्रत्येक शिक्षकाने हे लक्षात ठेवावे - श्रेयासारख्या थरथरणाऱ्या हातामागे अमर्याद क्षमता दडलेली असते. त्या क्षमतेला प्रकाशात आणणारी व्यवस्था निर्माण करणे ही एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. जेव्हा तणावाची जागा आधार घेईल आणि भीतीची जागा स्वातंत्र्य घेईल, तेव्हा ते खऱ्या अर्थाने मूल्यांकन असेल. हे मूल्यांकन विकासाचे निदर्शक असेल, सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि शिकण्यातील मौज वाढवेल. 


- अनिरुद्ध अजित किल्लेदार

( सदर लेख हा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मध्ये इंग्रजी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त निबंधाचे भाषांतर आहे.)

No comments:

Post a Comment

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मूल्यमापन

  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मूल्यमापन प्रस्तावना : मूल्यमापनाच्या बदलत्या आरशाकडे दोन दशकांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्...