Saturday, 4 April 2026

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : विद्यार्थी संचिका (Portfolio)

 मूल्यांकनाच्या नव्या दिशा : विद्यार्थी संचिका (Portfolio)

प्रस्तावना

स्वातंत्र्याच्या काळात भारतातील शिक्षण पद्धती ही प्रामुख्याने परीक्षाधारित होती. फक्त लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची वर्गवारी ठरत होती. पूर्वी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे परीक्षण करताना केवळ बोधात्मक विकासावर भर दिला जात होता; पण भावात्मक व क्रियात्मक विकासाकडे दुर्लक्ष केले जात होते. फक्त लिखित ज्ञानावर भर असल्यामुळे विविध तंत्रांचा यांत्रिकपणे वापर केला जात होता, त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला. 

शिक्षणाच्या गुणवत्तेचा पाया म्हणजे मूल्यांकन. पारंपरिक परीक्षांमधून केवळ ज्ञानाचे मोजमाप होते; पण शिकण्याची प्रक्रिया, विद्यार्थ्याची प्रगती, त्याचे प्रयत्न आणि सर्जनशीलता या अनेक घटकांकडे दुर्लक्ष होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020)ने मूल्यांकनाला एक नवीन, विद्यार्थी-केंद्रित रूप दिले आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन शिक्षकांना मुलांच्या अध्ययन प्रगतीचे निरीक्षण करून वेळोवेळी आढावा घेऊन आलेल्या अडचणी दूर करण्यास मदत करते. 

शिकताना आणि शिकविताना विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्तीस वेळोवेळी संधी दिल्यास विद्यार्थ्यांकडून कधी कधी कल्पनेपेक्षा वेगळा प्रतिसाद मिळतो. विद्यार्थ्यांकडून मिळालेला हा प्रतिसादच त्यांचा सर्जनात्मक आविष्कार असतो. विद्यार्थ्यातील सुप्त शक्ती त्याला काहीतरी नवनिर्मिती करण्याची प्रेरणा देतात. नवनिर्माणाचे स्वागत करणे आणि त्यास प्रोत्साहन देणे हे डोळस शिक्षकाचे काम आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्या निवडक कलाकृती, नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रात्यक्षिके, स्वाध्याय, रंगकाम, कोलाज, प्रतिकृती, सर्जनशील लेखन, कविता, कात्रणे, चित्रे, फोटो यांचा वैविध्यपूर्ण संग्रह कुठेतरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘विद्यार्थी संचिका’ हे मूल्यांकनाचे साधन अतिशय महत्वपूर्ण ठरते. विद्यार्थी संचिकेचा उपयोग विद्यार्थ्यांची गुणात्मक, वर्णनात्मक नोंद नोंदवहीत करण्यासाठी करता येतो. विद्यार्थी संचिका अध्ययनात व्यापक अर्थाने वापरल्यास विद्यार्थ्यांचा शिकतानाचा आनंद व आत्मविश्वास वाढतो, अध्ययनातील रुची वाढते. त्यामुळे विद्यार्थी शालेय प्रवाहात टिकण्यास व रमण्यास निश्चितच मदत होते.  

संकल्पना आणि साधन 

विद्यार्थी संचिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाचे संकलन. त्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण कामाची दखल घेण्याचे माध्यम, त्यांनी केलेल्या कामाचा दृश्य पुरावा, त्यांच्या नावीन्यपूर्ण कामाला जपून ठेवण्याची सोय, त्यांना प्रेरणा देण्याचे माध्यम, आवड व कल ओळखून भविष्यातील शाखा निवडीचे साधन, पालक, बालक व शिक्षक यांच्या संवादाचे माध्यम, मूल्यमापनविषयक वर्णनात्मक नोंदी करण्यासाठीचे उपयुक्त साधन, विद्यार्थ्यांच्या बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक अंगांचा विचार व विकासास सहाय्य करणारे साधन, प्रत्याभरणाची दिशा देणारे साधन होय. संचिका विद्यार्थ्यांची प्रगती, विद्यार्थ्यांची अध्ययनातील बलस्थाने आणि संपादन यांविषयी सर्वंकष कल्पना देते. 

विद्यार्थ्यांचे अध्ययन म्हणजे त्यांना दिलेल्या सुनियोजित अनुभवांची जंत्री असते. शिकत असताना ते विविध कृती करतात. पाठ्यांशाच्या स्वरूपावरून शिक्षक कृती, उपक्रम, प्रात्यक्षिके इत्यादींचे नियोजन करत असतात. प्रत्येक विषयातील कृती, उपक्रम, प्रात्यक्षिके, स्वाध्याय यांचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येक घटकातील विद्यार्थी प्रतिसादाची, त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा संग्रह संचिकेत करता येतो. संचिकेमुळे विद्यार्थ्यांना स्वची जाणीव होऊन स्वतःचे मूल्यमापन करता येते. संचिका विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, सर्जनशीलतेचा आणि शिकण्यातील प्रवासाचा मागोवा घेते. हे साधन विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या प्रगतीबाबत विचार करायला शिकवते.

नवा दृष्टिकोन 

विद्यार्थी संचिका मूल्यांकनाला एक मानवी आणि रचनात्मक स्वरूप देते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, मूल्यांकन विद्यार्थ्याच्या आकलन, विश्लेषण, सर्जनशीलता आणि अनुप्रयोग या कौशल्यांवर आधारित असावे, केवळ पाठांतरावर नव्हे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या सवयी, अडथळे, त्यांचे छंद, शिकण्याचा कल, शिक्षणातील प्रगती यांचा आश्वासक व मूर्त पुरावा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासमोर असणे गरजेचे असते. या दृष्टिकोनातून संचिका विद्यार्थ्याच्या “learning journey”ला महत्त्व देते. यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगळेपणाची नोंद राहते. यात गुणांची संख्या कमी आणि अभिप्रायाचे मूल्य अधिक असते. म्हणूनच संचिका ही “Assessment as Learning” या तत्त्वाशी पूर्णतः सुसंगत आहे. या नव्या दृष्टिकोनातून विकसित झालेले एक महत्त्वाचे साधन म्हणजे विद्यार्थी संचिका किंवा Portfolio. हे तंत्र विद्यार्थ्याच्या सततच्या शिकण्याचा, प्रगतीचा आणि स्वमूल्यांकनाचा आरसा ठरते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020शी सुसंगतता 

NEP 2020नुसार मूल्यांकन हे Formative, Diagnostic, and Holistic असावे. विद्यार्थी संचिका ही या तिन्ही बाबींशी सुसंगत आहे, कारण 

Formative - ती शिकण्याच्या प्रवासात सतत अद्ययावत होते.

Diagnostic - ती विद्यार्थ्याच्या अडचणी ओळखून सुधारण्याचे मार्ग दाखवते.

Holistic - ती शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील पैलूंना समान महत्त्व देते.

त्यामुळे विद्यार्थी संचिका ही NEP 2020मधील मूल्यांकनाच्या नव्या दृष्टिकोनाचे सर्वात सशक्त व प्रत्यक्ष साधन म्हणता येईल. 

तंत्र आणि रचना

विद्यार्थी संचिकेचे तंत्र हे रचनात्मक मूल्यांकनावर आधारित आहे. यात Observation (निरीक्षण), Documentation (नोंद) आणि Reflection (स्वपरीक्षण) ह्या तीन मुख्य पायऱ्या असतात.

निरीक्षण : शिक्षक विविध क्रियाकलापांदरम्यान विद्यार्थ्याचे वर्तन, विचारशक्ती, सहकार्यभाव आणि समस्यांचे निराकरण करण्याची पद्धत निरीक्षणाद्वारे नोंदवतो.

नोंद : विद्यार्थ्याचे लेखनकार्य, प्रकल्प, चित्रकला, प्रयोग, सादरीकरण, प्रश्नोत्तरे इत्यादींच्या प्रती संचिकेत ठेवल्या जातात.

स्वपरीक्षण : विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीवर विचार करून ‘माझ्या शिकण्यात काय बदल झाला’ यावर विचार करतो. 

वरील घटकांमुळे संचिका ही केवळ शिक्षकाचे साधन न राहता विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही शिकण्याचे साधन बनते.

विद्यार्थी संचिकेबाबत लक्षात घ्यावयाच्या बाबी 

विद्यार्थ्याने केलेल्या प्रगतीच्या नोंदींसाठी शिक्षकांनी एकत्रितपणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र संचिका ठेवावी.

संचिकेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रवास असतो. विद्यार्थ्याची संचिका एका शैक्षणिक इयत्तेपुरती मर्यादित असते. पुढील वर्षी नवीन इयत्तेत नवीन संचिका तयार करावी.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संचिका तयार करावी.

विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती, सर्जनशीलता, नावीन्यपूर्ण कार्य करण्याची वृत्ती इत्यादी गोष्टींना संधी मिळावी, त्यातून त्यांची सर्जनशीलता, चिकित्सक वृत्तीचा भाव, वैशिष्ट्ये, कल, दृष्टिकोन इत्यादींचे तटस्थ मूल्यमापन करता यावे.

संचिका वर्गात विद्यार्थ्याला सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवाव्यात, जेणेकरून तो त्याचे उत्कृष्ट काम त्यात स्वतः जोडू शकेल. 

प्रत्येक विद्यार्थ्याच्या संचिकेत सुरुवातीला त्यांनी विषयानुसार जोडलेल्या कामाची अनुक्रमणिका असावी. 

वर्णनात्मक नोंदींसाठी संचिकेचा वापर करता येईल. वर्षअखेरीस संचिकांचे प्रदर्शन भरवावे. ते पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना दाखवावे. वर्षअखेरीस ही संचिका विद्यार्थ्यांना परत करावी. 

संचिका तयार करताना शिक्षकाने विचारात घ्यावयाचे टप्पे

सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना संचिकेचा उद्देश समजावून सांगावा. संचिकेत कोणते घटक असतील, कोणत्या प्रकारचे साहित्य ठेवता येईल हे स्पष्ट करावे.

विद्यार्थी विविध उपक्रमांतून तयार झालेले साहित्य संचिकेत कशाप्रकारे जोडतात याचे निरीक्षण करून शिक्षकांनी नोंदी ठेवाव्यात.  

शिक्षकांनी मूल्यांकनाचे स्पष्ट निकष तयार करावेत. उदाहरणार्थ – संकल्पनात्मक समज, सर्जनशीलता, लेखनशैली, सहकार्यभाव, प्रगती इत्यादी.

शिक्षकांनी प्रत्येक संचिकेवर नियमित अभिप्राय द्यावा. त्यानुसार विद्यार्थी तो अभिप्राय स्वीकारून सुधारणा करतील.

सत्रअखेर संचिकेतील सर्व नोंदींचा आढावा घेऊन शिक्षक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे एकत्रित मूल्यांकन करतील.

विद्यार्थी संचिका वापराविषयी माझा अनुभव 

अध्ययन-अध्यापन प्रक्रियेबरोबर चालणारी आणि बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेध सातत्याने घेणारी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती दि. 20 ऑगस्ट 2010च्या शासन निर्णयानुसार स्वीकारण्यात आली व सन 2010-11पासून या मूल्यमापन पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून विद्यार्थी संचिका या साधन तंत्राचा वापर करून मी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत आहे. 

माझ्या शाळेत जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणारा ‘एक तास वाचनाचा’ हा उपक्रम नियमितपणे घेतला जातो. यामध्ये विद्यार्थी एक तास वाचनालयातील पुस्तकांचे वाचन करतात व प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना अनुलेखन, श्रुतलेखन व अभिव्यक्ती लेखन करायला सांगितले जाते. विद्यार्थ्यांनी केलेले लेखन तपासून त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातात व ते लेखन विद्यार्थ्यांच्या संचिकेमध्ये संग्रहित केले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका संचिकेच्या माध्यमातून नजरेस पडत असतात व त्या दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थी नेहमीच प्रयत्न करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्धलेखनाची सवय झाली. अभिव्यक्ती लेखनातून विद्यार्थी अभिव्यक्त होऊ लागले. विद्यार्थी त्यांचे लेखन त्यांच्या संचिकेमध्ये जपून ठेवतात. यातून मीही लिहू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि मला माझे भविष्यातील साहित्यिक, ग्रंथकार निर्माण होताना दिसू लागले.  

इयत्ता सहावी व सातवीला मराठी विषयातील कविता शिकवत असताना कविता लेखन कसे करावे याविषयी मी नेहमीच मार्गदर्शन करत असते. विद्यार्थ्यांना तीन शब्द देऊन चारोळ्या लेखनाचा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांनी सुंदर अशा चारोळ्यांचे लेखन केले. काही विद्यार्थ्यांनी त्या चारोळ्यांचे संकलन करून कवितासुद्धा तयार केल्या. ह्या कविता मी विद्यार्थ्यांना त्यांच्या संचिकेमध्ये संग्रहित करण्यास सांगितल्या. आता विद्यार्थी स्वतःच्या भावना कवितेतून उतरवण्याचा प्रयत्न करू लागले.  

माझ्या शाळेत विद्यार्थ्यांचे त्यांच्याच हस्ताक्षरात लिहिलेले हस्तलिखित तयार करण्याचा उपक्रम प्रत्येक वर्षी घेतला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या व संचिकेत संग्रहित केलेल्या कविता, लेख, त्यांनी काढलेली चित्रे, शब्दकोडी, चारोळ्या, सुविचार संग्रह इत्यादींचा समावेश केला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्व-अभिव्यक्तीला वाव मिळाला, स्वतः लेखन केल्याचा आनंद मिळू लागला. आतापर्यंत चार हस्तलिखितांचे संपादन व प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते मी केले आहे. या हस्तलिखितांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी मी करत असते.  

शाळेत नेहमीच सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये शाळेतील जे विद्यार्थी सहभाग घेतात त्यांचे लेखन त्यांच्या संचिकेमध्ये संग्रहित केले जाते. त्यांनी काढलेली चित्रे, कागद काम, कोलाज काम, सुंदर हस्ताक्षरांचे नमुने, चाचण्यांचे पेपर संचिकेत संग्रहित केले जातात. पालक सभेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या संचिका त्यांच्या पालकांसमोर ठेवल्या जातात. पालकांना त्यांच्या पाल्यांविषयी, त्यांच्यातील सुप्त गुणांविषयी कल्पना दिली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विचार करूनच त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन मी नियमितपणे करत असते. अशाप्रकारे संचिकेचा उपयोग विद्यार्थी मूल्यमापनाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आकार देण्यासाठी होत असतो. वर्षअखेरीस विद्यार्थ्यांच्या संचिकांचे प्रदर्शन भरवले जाते. विद्यार्थी आपल्या सहाध्यायी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या संचिकांचेसुद्धा मूल्यमापन करतात. विद्यार्थी स्वतःमधील उणिवा तसेच त्यांच्या सहाध्यायी मित्रांच्या उणिवा एकमेकांच्या लक्षात आणून देतात व त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. सत्राअखेर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे एकत्रितरीत्या मूल्यमापन करताना संचिकेची खूप मोलाची मदत होते. 

उपयोगिता आणि परिणामकारकता 

विद्यार्थी संचिकेची उपयुक्तता अनेक स्तरांवर जाणवते. 

(अ) विद्यार्थ्यांसाठी :

स्वतःच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो.

आत्मविश्वास आणि जबाबदारी वाढते.

स्वतःच्या चुका ओळखून सुधारणा करण्याची सवय लागते.

शिकण्याचा आनंद वाढतो.

(ब) शिक्षकांसाठी :

प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण आढावा घेता येतो.

शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी आधार मिळतो.

सततचे अभिप्राय देणे सुलभ होते.

(क) पालक आणि शाळेसाठी :

पालकांना मुलाच्या प्रगतीचे खरे चित्र मिळते.

शाळेला विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाचे दस्तऐवजीकरण करता येते.

या सर्व घटकांमुळे संचिका हे मूल्यांकनाचे अत्यंत उपयुक्त आणि टिकाऊ साधन ठरते.

आव्हाने आणि उपाय

संचिकेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येऊ शकतात. वेळेअभावी नोंदी ठेवणे कठीण होणे, मोठ्या वर्गांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संचिका व्यवस्थापित करणे, निकषांमध्ये एकसंधता राखणे इत्यादी.

या अडचणींवर उपाय म्हणून :

डिजिटल पोर्टफोलिओचा वापर करता येईल.

शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये संचिकेच्या वापरावर मार्गदर्शन द्यावे.

शाळास्तरावर संचिका मूल्यांकनाचे वेळापत्रक आखावे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात Digital Learning and Assessmentवर भर दिला असल्याने संचिकेचे डिजिटल रूप (E-Portfolio) भविष्यात अधिक प्रभावी ठरू शकते.

 निष्कर्ष

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ने विद्यार्थ्याला शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यानुसार मूल्यांकन हे विद्यार्थ्याला काय माहीत आहे यापेक्षा तो कसा शिकतो आणि विचार करतो यावर आधारित असावे.

विद्यार्थी संचिका मूल्यांकनाचे एक जिवंत साधन आहे. ती केवळ नोंदींचा संच नाही, तर विद्यार्थ्याच्या शिकण्याची कहाणी सांगणारा जिवंत दस्तऐवज आहे. 

विद्यार्थी संचिका हेच त्या नव्या शिक्षण दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे. ती विद्यार्थ्याला आत्मपरीक्षण शिकवते, शिक्षकाला निरीक्षणाची दृष्टी देते आणि शिक्षणाला मानवी स्वरूप देते.

या नव्या मूल्यांकन पद्धतीमुळे शिकणे आणि मूल्यांकन या दोन्हींचे एकत्रीकरण घडते. म्हणूनच विद्यार्थी संचिका हे साधन 21व्या शतकातील शिक्षणात एक महत्त्वाचे वळण ठरते, एक असे वळण जे विद्यार्थ्याला केवळ परीक्षेत नाही, तर आयुष्यातही यशस्वी बनवते.

संदर्भ 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन भाग 2 व 3 (2011)

सर्वांगीण विकास सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन-शिक्षक मार्गदर्शिका (2013)

निष्ठा शिक्षक प्रशिक्षण संच (2019)

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका भाग 5 (2023)

नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षक मार्गदर्शिका (2024)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020


-मंगला नाथुजी गणवीर 

जि. प. उच्च प्राथमिक शाळा, चिचाळे, भंडारा

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील मराठी माध्यमातील उत्तेजनार्थ निवडलेला निबंध)


No comments:

Post a Comment

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मूल्यमापन

  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मूल्यमापन प्रस्तावना : मूल्यमापनाच्या बदलत्या आरशाकडे दोन दशकांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्...