Wednesday, 25 September 2024

एका शिक्षकाची दैनंदिनी

 एका शिक्षकाची दैनंदिनी

                 बरीच वर्षे नोकरी केल्यानंतर अलीकडं मी जरा अधिकच प्रेमळ शिक्षक बनलो आहे. मी बऱ्याचदा घरीच ठरवून जातो, की आज कोणत्याही मुलाला चापटीसुद्धा मारायची नाही, रागवायचेसुद्धा नाही. ठरवले की जमते आणि जमवताही येते. शिक्षा करण्याचा प्रसंग आला, की त्या मुलाचे जिव्हाळ्याच्या शब्दांनी भरमसाठ प्रबोधन करायचे. आधी त्याचा चांगुलपणा सांगायचा आणि मग हलक्या हाताने दोष दूर करत न्यायचे. कान झोडण्यापेक्षा असे कान पकवणे बरे! जग बदलतंय, शिक्षण बदलतंय, कायदे बदलतात, अभ्यासक्रम बदलतोय, पाठ्यक्रम बदलतोय मग आपण नको का बदलायला! असे थोडेफार आत्मचिंतनही घडते आहे. शिक्षक सतत बदलत राहिला पाहिजे. अहो, एवढा सर्वशक्तिमान निसर्ग तोही दर चार महिन्यांनी आपले रूप बदलतो. उन्हाळ्यातील सृष्टीपेक्षा पावसाळ्यातील सृष्टी केवढी अलग असते. मुलांना असं पाठिशी घालणं सहकारी शिक्षकांना कदाचित खटकतही असेल,पण गुपचूप आपण आपले बदलाचे प्रयोग चालू ठेवायचे. निष्कर्षांची घाई करायची नाही. तेवढाच आपल्यातला उतावीळपणा कमी होतो. 

 मागच्या आठवड्यात सातवीतल्या उबेद आणि सादने वर्गातल्या पंख्याची वाकलेली पाती सरळ केली. ऑफिसातून वर्गात अक्षरशः हाताला ओढत नेत,"अभी हवा देखो सर कैसी जोरसे आ रही है।" असे सांगत त्यांनी केलेली कामगिरी कथन केली. वाकड्या पात्यांमुळं पंखा बहुतेक हवा वरती फेकत असावा. मी त्यांचे कौतुक केले.शाळा सुटल्यावर घरी जातांना नवा फॅन घेण्याचा खर्च वाचवला म्हणून त्यांनी माझ्या गाडीजवळ येत माझ्याकडे पार्टी मागितली. गावात चिकनशोरमा भारी मिळतो अशी माहिती पुरवत 'रोटी में मिलता वो साठ को और पाव के साथ मिलता है वो पचास को!' अशी फरमाईशपण सांगून टाकली.मी विचारात पडलो, ' मुलांना अशी पार्टी वगैरे द्यावी की नाही?' विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा म्हणून उद्या बघू म्हटलो. दुसऱ्या - तिसऱ्या दिवशीही शाळा सुटली की दोघांचे पार्टीचे टुमणे असायचेच. अखेर एके संध्याकाळी पन्नास रुपये देऊन टाकले. बच्चोने खुशी खुशी में बहुत बढिया चिकनशोरमा बनानेवाले का घर भी दिखाया। देखो सर अभी बना रहा है। छह बजे चौक में गाडी लगवायेगा। चिकनशोरमा पोटात जाण्याआधीच 'आनंद मनात माझ्या माइना.... माइना आनंद मनात माझ्या माइना ' अशी पोरांची अवस्था झालेली. मलाही मजा आली. गंमतीने म्हणालो, "दोनों मे एक प्लेट लेने की और सुनो बाकी बच्चों को बोलना नही , वरना मेरी जेब पूरी खाली हो जाएगी।" लाळ गिळत पोरं हसली. एकाच प्लेटचे पैसे दिल्यामुळं मिळूनवाटून खाण्याचा संस्कार देता आला आणि पोरांशी दोस्ती पक्की झाली. अर्थात दोन दोस्तांतली दोस्ती आणि शिक्षक विद्यार्थ्यांमधली दोस्ती यातले अंतर समजून घेतच असली दोस्ती करावे लागते. काही दिवसांनी वर्गातली अडगळ साफ केल्यावर त्या दोघांनी पुन्हा तोच फंडा वापरला. ' तुम्ही आता जास्तच लाडावलेत ' असं म्हणत मी बधलो नाही. पार्टी कधीतरी मूडमूड मध्ये करायची गोष्ट असते तो रिवाज नाही हे पोरांच्याही ध्यानात आले. मलाही प्रेमळ बनण्याचे शिक्षक- विद्यार्थी नात्यावर कसे कसे परिणाम होतात याची प्रचिती आली. 

 आता मला पहिलीपासून सातवीपर्यंतची कोणतीच मुलं घाबरत नाहीत. मी ऑफिसमध्ये असलो की पहिलीची पोरंपोरीही बिनधास्त माझ्या टेबलसमोरच्या खुर्च्यांवर बसतात. मला भीती वाटते. कुणी पाहिलं तर ह्या मास्तरकडं काही शिस्तबिस्त नावाची गोष्ट आहे की नाही असा पाहणाऱ्याचा गैरसमज होईल याची. पहिलीच्या पोरांना शाळेची घंटा वाजवून, तो आवाज ऐकण्याची कोण हौस असते. पूर्वी मी त्या आवाजाने त्रासिक व्हायचो. आता वाजवू देतो. बघा एकाच आवाजाची गंमत: एकाला आनंद वाटतो तर दुसऱ्याला त्रास! आहे की नाही मौज! आपल्या आतलं ते खट्याळ मूल जागं करतात ही मुलं! आपल्याला पाहिलं की मुलं कशी थर्रर्र घाबरतात याचा मला पूर्वी कोण अभिमान वाटायचा. पालकाबिलकांनी पाहिलं तर तेही करड्या शिस्तीचा मास्तर म्हणून कौतुक करायचे. किती वेडगळ होतो आपण! ते आत्ता कळतंय.तो वेडेपणा बऱ्यापैकी मावळत चाललाय. खरंतर शाळेच्या आणि बाहेरच्याही या जगात कुणीच कुणाला घाबरू नये, कुणालाच कुणाची भीती वाटू नये यासारखी सुंदर गोष्ट कोणती असणार? नाही का? धाक, दरारा, शिस्त वगैरे असावी लेकीन ये डरना और डरवाना क्यों भई? निर्भय,सुंदर, सर्वांना मजेत जगता येईल असं जग का असू नये?अशा कविकल्पनाही जन्मतात हल्ली डोक्यात! बघूत निदान आपला भोवताल तरी असा निर्भय- सुंदर करणं जमतंय का! घाबरणं आणि घाबरवणं दोन्हीही तशी मानवी वैगुण्यच म्हणायची. या बदलत्या प्रेमळ स्वभावामुळं शिक्षा करण्याचे प्रसंग येतील अशा दुसऱ्यांच्या शेकडो तक्रारी पोरं सुटीत सांगतात. आता काय करायचे? प्रश्न पडतो. पण अशावेळी मी 'ज्यानं तुला मारलं त्याच्याकडं शाळा भरल्यावर बघतोच!' अशा खोट्या खोट्या वल्गना करतो. तक्रारदाराला दिलासा मिळतो. काम भागते. तक्रारदार खेळायला जातो आणि खेळता खेळता मूळ तक्रारही विसरून जातो. किंवा तुमच्या सरांना / मॅडमना सांगतो असे आश्वासित करतो किंवा आणखी काही सुचेल ते! पण एक गोष्ट लक्षात आलीय की बऱ्याचवेळा दिलाशावर आणि आश्वासनावर काम भागून जाते. त्या तक्रारी हो अशा असतात तरी केवढुशा!उलट थोडं दुर्लक्ष केलं की भारी वाटतं. 

दुसऱ्याला मार बसावा म्हणून आपल्याला गंडवणाऱ्यांना मीही आत्ता चांगलाच गंडवतोय. एखाद्याने चूक केली, विशेषतः शिकवतांना दुर्लक्ष केले की अचानक व्होल्टेज एकदम हाय होते. तिरीमिरीत हात उचलला गेलाच तर तो खाली यायच्या आत त्या पोरासह साऱ्या वर्गाला, ' चांगला धुतला असता पण आज मी रागवायचे आणि मारायचे नाही अशी प्रतिज्ञा केलीय' हे सांगून टाकतो. मग हळूहळू पोरंही दुर्लक्ष करायचे नाही,खोड्या करायच्या नाही अशा छोट्या छोट्या प्रतिज्ञा करतात.तसा राग संपवणं अशक्यच वाटतं;परंतु प्रयत्नांनी नियंत्रणात मात्र ठेवता येतो याचा अनुभव मिळतो. गरम व्हायचं पण तव्याइतकं नाही. भाकरी भाजली की पुरे, चटका बसायला नको. म्हणतात ना राग आवरायचा नसतो तर राग हाताळायचा असतो. हाताळणं शिकतोय. आताशा आपलं कामापुरतंच रागवावं असं मनात येतं. कामापुरतं गोड बोलण्यापेक्षा कामापुरतं रागवावं आणि कायम गोड बोलावं. मध्यंतरी , इतकंही गोड बोलू नका , की पोरांना लहानवयातच 'साखर' होईल असा एका सहकाऱ्याने हसतहसत सल्ला दिला. पटला... उगीच पटवून घ्यायचा म्हणून नाही , तर खरंच पटला! शिकायचं आणि बदलायचं ठरवलं की प्रत्येक चांगली बाब ' गोष्ट छोटी डोंगराएवढी ' च वाटू लागते. पाण्याची बाटली टेबलावरच ठेवायची, आग भडकतेय असं वाटताच आपले दोन घोट पोटात टाकायचे. मनातल्या मनात केलेल्या १०० ,९९,९८ अशा उलट गिणतीचाही प्रभाव पडतो पण अधिक सराव करण्याची गरज जाणवते. थोडं फार आकांडतांडव करतो पण छडीबिडी नाही वापरत. मॉनिटरने देऊ केली तरी आपल्याला ' निशस्त्र क्रांती ' करायचीहे वगैरे लेक्चर झोडतो. तेवढेच गांधीबाबा आठवून जातात. महात्म्याच्या सहवासात खूपच हलकं वाटतं कारण काही क्षण की होईना आपल्या मनातला हलकटपणा कमी होतो. का कुणास ठाऊक अशांत होण्यापेक्षा शांत व्हायलाच आपल्याला जास्त कष्ट पडतात बॉ! शोध घ्यावा लागेल. 

 शिक्षा केल्याने मूल बचावासाठी प्रयत्न करते आणि शारीरिक प्रक्रिया घडून बचावासाठी शरीर मेंदूच्या मॅमेलियन या भागाकडे रक्त पुरवठा वळवते, की जो मेंदूच्या निओ - कार्टेक्स या भागाला व्हायला हवा. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया थांबते व बचावाचे उपाय शोधले जातात. अशी काही शास्त्रीय माहितीही मिळवलीहे! प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. वर्गात खूप गडबडगोंधळ झाला की वर्ग एकदम शांत होतो असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. थोडा निचरा व्हायलाच हवा. पूर येऊन गेल्याशिवाय सुपीक मातीचं सपाट मैदान तयार होत नाही. गोंगाट सहन करावाच लागेल. मोठी माणसं गोंधळ घालतात, भांडणं- मारामाऱ्या करतात त्यापेक्षा मुलांचा गोंगाट परवडला. सैन्य पोटावर चालतं आणि शाळा छड्यांवर हे गृहीतक सोडावे लागेल. कायदा हातातली छडी काढेल पण मनातली छडी आपली आपल्यालाच काढावी लागेल. शिक्षक मातृहृदयी असावा असं म्हणतात.... देवा मला तसं हृदय दे!

-डॉ. संजय गोर्डे

( पदवीधर प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा कुरण ता . संगमनेर जि अ.नगर )

6 comments:

  1. ओघवती व बिनधास्त भाषेतलं रागाला हाताळण्याचं शास्त्र शिकायला मिळालं.खूप छान लेख

    ReplyDelete
  2. खूप सुंदर अनुभव कथन, प्रत्येकाने प्रयत्न करावा असे!
    आपल्या लेखन शैलीलाहि सलाम!

    ReplyDelete
  3. अप्रतिम👌👌👌

    ReplyDelete
  4. Best article.Really as a teacher it inspired me.

    ReplyDelete

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...