श्रेयांक किती श्रेयस्कर?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात श्रेयांक पद्धतीची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. उच्च शिक्षणात तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सीबीएसई २०२४पासून पथदर्शी तत्त्वावर सहावी, नववी आणि अकरावीमध्ये श्रेयांक पद्धत अंमलात आणणार आहे. श्रेयांक ही मूळ अमेरिकन संकल्पना अमेरिकेत माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे या ठिकाणीच प्रचलित आहे; आठवीपर्यंत तिचा वापर होत नाही. भारतातसुद्धा आठवीपर्यंत या संकल्पनेचा वापर केल्यामुळे कोणताही वेगळा फायदा दिसत नाही.
भारतातली श्रेयांक पद्धत नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क २०२२ या दस्तऐवजावर आधारलेली आहे. हा राष्ट्रीय श्रेयांक आराखडा शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, एआयसीटीई, एनसीईआरटी, एनसीव्हीईटी, एनआयओएस आणि सीबीएसई अशा केंद्रीय संस्थांनी एकत्रितरीत्या तयार केला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विषयांच्या निवडीत लवचिकता यावी, वेगवेगळ्या क्षेत्रांतील शैक्षणिक पात्रतांची समकक्षता ठरवणे सोपे जावे, व्यवसाय शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून सामान्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमाकडे आणि उलट, असा प्रवास सोपा व्हावा, निवडलेला विषय इच्छा असल्यास मध्येच बदलणे सोयीचे व्हावे, जागतिक शिक्षण प्रवाहांशी जुळवून घेणे सोपे व्हावे, भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी विद्यापीठांतील प्रवेश सुकरतेने व्हावेत, अशी अनेक उद्दिष्टे या आराखड्यात दिली आहेत. श्रेयांक पद्धतीत वैद्यकीय क्षेत्राचा उल्लेख नाही.
श्रेयांक हे अभ्यासक्रम मापनाचे एकक आहे. जगभरात श्रेयांक वेगवेगळ्या पद्धतींनी मोजले जातात; परंतु त्यांचे परस्पर रूपांतर सहजपणे करता येते. सर्वसाधारण विद्यार्थ्याला एका शैक्षणिक वर्षात ३० तासांत, म्हणजेच प्रत्येक सत्रात १५ तासांत, शिकता येईल एवढा अभ्यासक्रम म्हणजे एक श्रेयांक अशी व्याख्या राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यात दिली आहे. विद्यार्थ्याने एका शैक्षणिक वर्षात सर्व विषयांचा मिळून १२०० तासांचा, म्हणजेच ४० श्रेयांक एवढा किमान अभ्यासक्रम शिकणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वर्गाध्यापन, गट-चर्चा, डिजिटल अध्ययन, प्रात्यक्षिके, प्रकल्प, अनुभवजन्य अध्ययन, ट्यूटोरिअल, कला, खेळ, प्रश्नमंजूषा, क्षेत्र-भेटी, समाजसेवा, आंतरवासिता, उमेदवारी, परीक्षा, अशा वर्गातील आणि वर्गाबाहेरील सर्व प्रकारच्या अध्ययन-अनुभवांचा समावेश आहे. विषयाच्या स्वरूपानुसार विविध अध्ययन-अनुभवांना द्याव्या लागणाऱ्या एकूण वेळेवरून विषयाचे श्रेयांक ठरतात. सीबीएसईच्या पायलट प्रकल्पात नववी ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांचे श्रेयांक २ ते ७ एवढे आहेत. नववी ते बारावीपर्यंत किमान १६० श्रेयांक मिळवणे आवश्यक असेल.
प्रत्येक विषयाची परीक्षा पास झाल्याशिवाय विद्यार्थ्याच्या खात्यावर श्रेयांक जमा होणार नाहीत, ही दुसरी आवश्यक अट आहे. विविध विषयांत परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या श्रेणी दिल्या जातील. विषयांचे श्रेयांक आणि विद्यार्थ्यांनी त्यांत मिळवलेल्या श्रेणी यांच्या आधारे त्यांची संपादणूक पातळी ठरेल. लवचिकतेसाठी अभ्यासक्रमाची मोड्यूलमध्ये विभागणी हा आणखी एक महत्त्वाचा बदल आहे. मोड्यूल म्हणजे अभ्यासक्रमाचा एखादा भाग शिकण्यासाठी तयार केलेला स्वयंपूर्ण घटक. अनेक छोटी मोड्यूल एकमेकांना जोडून अभ्यासक्रम तयार होतो. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाला कधी एखादे अतिरिक्त मोड्यूल जोडावे लागते किंवा गरज नसेल, तेव्हा एखादे मोड्यूल काढून टाकता येते.
श्रेयांक पद्धतीची अंमलबजावणी महाराष्ट्रातील ज्या महाविद्यालयांत सुरू आहे, तिथली माहिती घेतल्यावर बहुतेक शिक्षक चाचपडतानाच दिसताहेत. बहुतेक ठिकाणी अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन दोन्ही पारंपरिक पद्धतींनीच सुरू आहे. त्यांच्याशी संबंधित माहिती मात्र श्रेयांक आणि श्रेणी या पद्धतीत बसवून मांडली जाते. शालेय स्तरावर श्रेयांक पद्धत सुरू केल्यास यापेक्षा वेगळे काही घडेल असे समजायला कोणतेच कारण दिसत नाही. ‘आगीतून फुफाट्यात’ अशी अवस्था तर होणार नाही ना?
जगभरातील प्रगत देशांचे आराखडे सहजपणे उपलब्ध असल्यामुळे आपल्यालाही श्रेयांक पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी कागदावर उत्कृष्ट नियोजन करणे कठीण नाही. त्यासाठी आपली प्रसिद्धी आहेच. पण उत्कृष्ट नियोजनाची वाईट अंमलबजावणी करणारे अशीही आपली कुप्रसिद्धी आपणच सांगत असतो. ही प्रतिमा कोण आणि कशी पुसून काढणार? श्रेयांक ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अतिशय चांगली पद्धत आहे; पण तिची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच. आपल्या हातात आलेली ही चांगली संधी गमावून अपश्रेयाचे धनी होऊ नये, यासाठी शासन आणि धोरणकर्ते यांनी सजग राहायला पाहिजे.
- डॉ. वसंत काळपांडे
(पूर्व प्रसिद्धी: दैनिक सकाळ, २४ एप्रिल २०२४)
No comments:
Post a Comment