माध्यमिक स्तरावरील विषय-योजनेचे स्वप्न
महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता पाहता तिच्याकडे शासन, प्रशासन आणि शिक्षणक्षेत्रांतील अभ्यासक यांचे खूपच दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शासन आणि प्रशासन यांचे प्रशासकीय अडचणी दूर व्हाव्यात एवढ्यापुरतेच माध्यमिक शाळांकडे लक्ष असते, तर अभ्यासकांचे कार्यक्षेत्र अनेक कारणांमुळे पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि उच्च शिक्षणापुरते सीमित झाले आहे. यामुळे निर्माण झालेली पोकळी व्यापारी संस्थांनी व्यापली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाची दिशाच भरकटली आहे. या दुरवस्थेतून बाहेर पडण्यासाठी शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याकडे एक सुसंधी म्हणून पाहता येईल.
शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात दिलेली विषय योजना (१) भाषा, (२) कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण, (३) सामाजिक शास्त्रे, आंतरशाखीय विषय/पर्यावरण, (४) गणित आणि विज्ञान अशा चार गटांत विभागलेल्या गाभा विषयांभोवती रचलेली आहे. नववी-दहावीसाठी पहिल्या गटातील तीन भाषा आणि उरलेल्या तीन गटांतील सात गाभा विषय, असे दहा विषय अनिवार्य असतील. अकरावी-बारावीत पहिल्या गटातील दोन भाषा आणि उरलेल्या गटांपैकी किमान दोन किंवा तिन्ही गटांतील चार किंवा पाच विकल्प विद्यार्थ्यांनी निवडणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रम आराखड्यात चारही गटांतील गाभा विषयांखाली विविध विकल्पांच्या सूचक याद्या दिल्या आहेत. शास्त्रीय संगीत, शिल्पकला, लोकचित्रकला, क्रीडा आणि पोषक आहार, मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, धान्योत्पादन, किरकोळ सेवा, भूशास्त्र, भारतीय ज्ञानप्रणाली, पत्रकारिता, ही या याद्यांतील विकल्पांची काही उदाहरणे. अभ्यासक्रम तयार झाल्यावर त्यांत आणखी भर पडेल आणि पडत राहील. विकल्पांची निवड करताना विद्यार्थ्यांनी त्यांची वैयक्तिक आवड, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी विकल्पांची उपयुक्तता आणि विकल्प शिकल्यामुळे उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या संधी, या बाबींचा विचार करावा. नव्या क्षेत्रांतील विकल्प शिकताना विद्यार्थ्यांकडे पुरेसे पूर्वज्ञान नसेल तर त्यावरील छोटी छोटी मोड्यूल तयार करण्यात यावीत; ती सेतू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.
नववीपासूनच विकल्पांच्या निवडीत लवचिकता यावी आणि संपूर्ण माध्यमिक स्तराचेच स्वरूप बहुशाखीय व्हावे, यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा दोन स्तरांऐवजी नववी ते बारावीपर्यंतचा माध्यमिक शिक्षणाचा चार वर्षांचा एकच सलग स्तर असावा, अशीही अभ्यासक्रम आराखड्यात शिफारस केली आहे. या बदलासाठी दहा वर्षे सुचवली असली, तरी तो शक्य तितक्या लवकर करणेच विद्यार्थ्यांच्या हिताचे होईल. या विषय-योजनेमुळे नवीन अभ्यासक्रमात कला, वाणिज्य, विज्ञान अशा शाखा असणार नाहीतच, पण त्याचवेळी विद्याविषयक विषय आणि व्यवसाय शिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयांत स्पष्ट विभाजनही असणार नाही. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण हे शाळापातळीवरील मूल्यमापनाचे विषय असले तरीही इतर विषयांइतकेच गांभीर्याने शिकवले जावेत आणि दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकांत सर्वच विषयांची विषयांची संपादणूक एकाच पद्धतीने दाखवली जावी, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या विषय-योजनेचा प्रमुख उद्देश आहे. बहुभाषिकत्व, आंतरशाखीय दृष्टिकोन, विषयांच्या निवडीतील लवचिकता, कला, क्रीडा, आणि विविध विषय यांतील एकात्मीकरण, अशी वैशिष्ट्ये असलेला अभ्यासक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे हे शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, संस्थाचालक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे. कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण या क्षेत्रांतील विकल्प शिकण्यासाठी सर्वच शाळांमध्ये आवश्यक सुविधा आणि शिक्षक उपलब्ध करून द्यावे लागतील. ‘विद्याविषयक’ गाभा विषयांखालील विकल्पांसाठीसुद्धा अशीच व्यवस्था करावी लागेल. विद्यार्थ्यांनी निवडलेले विकल्प त्यांना शक्यतो त्यांच्या शाळेतच शिकायला मिळावेत, यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. ते शक्य नसेल तरच इतर शाळांची आणि शिक्षकांची मदत घ्यावी. ‘माहितीवर कमी आणि क्षमतांवर अधिक भर’ या तत्त्वाचे पालन होईल, हे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके बदलताना तज्ज्ञांनी कटाक्षाने पाहायला हवे.
माध्यमिक स्तरावरील बहुशाखीय विकल्पांचा हा पट एक स्वप्नच वाटावा एवढा विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण आहे. पण विद्यार्थिहितासाठी हे स्वप्न साकार करावेच लागेल. त्यावर खूपच काम करावे लागेल; त्या बाबतीत मागे हटून, तडजोड करून चालणार नाही.
-डॉ. वसंत काळपांडे
(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १० एप्रिल २०२४)
खूप छान अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDelete