जिभेची वळकटी
चुलबुल एक छोटीशी खार होती, आज मात्र चुलबुल थोडीशी आजारी होती. त्यामुळे शाळेत जाऊ शकली नाही. तिला तिच्या आईने बोंबो डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी सर्वप्रथम चुलबुलची 'आ' करून तिची जीभ तपासली. चुलबुलला थोडेसे आश्चर्य वाटले. घरी आल्यावर थोडे बरे वाटल्यावर तिने तिच्या मैत्रिणीला शाळेतल्या अभ्यासाविषयी फोन केला तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली," आज शाळेत खूप मज्जा आली. आज वर्गशिक्षकांनी जिभेची वळकटी हा खेळ घेतला". चुलबुलला काही समजले नाही.ती म्हणाली," जीभेची वळकटी म्हणजे काय?" मैत्रीण म्हणाली," जिभेची वळकटी म्हणजे टंग ट्विस्टर गेम. हा गेम खेळता खेळता आमची हसून
पुरेवाट झाली".
चुलबुल मात्र संभ्रमात पडली तिने फोन ठेवून आईला या संदर्भात विचारले. आई म्हणाली , "जिभेची वळकटी यासारख्या खेळामुळे जीभ कठीण शब्द उच्चारण्यास तरबेज होते आणि मुलांना गंमतही वाटते म्हणून घेतला असेल शिक्षकांनी हा खेळ."
आई म्हणाली," तुझी जीभ पकड बघू आणि बघ तुला बोलता येते का ?" पण चुलबुलला जीभ पकडून काही बोलता आले नाही.
आईने चुलबुलला जवळ घेतले आणि जिभेविषयी माहिती सांगू लागली-
जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. जीभ ही ५ ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी मदत करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य निरनिराळे आवाज (ध्वनी) काढू शकतो. मानवी जिभेची सरासरी लांबी सुमारे १० सें.मी. असते. रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग, स्वरूप आणि ओलसरपणा याबाबी लक्षात घेण्यात येतात. मानवी जीभेवरील चवीनुसार भाग १ कडू, २ आंबट, ३ खारट, ४ गोड. जिभेद्वारे अन्न तोंडात फिरवून दाताखाली आणले जाते आणि अन्नाचे गोळ्यात रूपांतर केले जाते. दातामध्ये , गालफडामध्ये साचलेले अन्न जिभेने काढून तोंड स्वच्छ ठेवले जाते. जिभेमुळे अन्न घशात ढकलले जाते. अन्न गिळताना जीभ टाळूवर दाबली जाते आणि आतील बाजूंना पसरते. परिणामी तोंडातील अन्न बाहेर न पडता घशाकडे सरकवले जाते.
माणसाची जीभ त्याचे आरोग्य कसे आहे याचे संकेत देत असते. त्यामुळेच डॉक्टर माणसाच्या जिभेची तपासणी करीत असतात. जर शरीरात कसली कमतरता असेल तर त्याची तपासणी जिभेवरून होत असते. विटामिन बी – १२ जर शरीरात कमी असेल तर जिभेच्या रंगावर होऊ शकतो परीणाम. जिभेचा उपयोग अन्न गिळण्यापासून ते मेंदूत चाललेले विचार व्यक्त करण्याचे कामही जीभ करते. जिभेचा पोत वा रंगात होणारा कोणताही बदल म्हणजे आजार होण्याचा संकेत असतो. अन्य सस्तन प्राण्यांपैकी कुत्रा, मांजर, जिभेने अंग साफ करतात. त्यामुळे अंगावरील तेल आणि परजीवी दूर होतात.
कुत्र्याची जीभ त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी उपयोगी पडते.. म्हणून तू बऱ्याचदा पाहिलेली असशील कुत्रे बऱ्याचदा जीभ बाहेर काढून श्वास घेत असतात.
मांजरींना दररोज भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. जेव्हा त्यांना पाणी पिण्याची इच्छा असते, तेव्हा ते जीभ अवतल आकारात ठेवतात, एक "चमचा" तयार करतात जे पाणी तोंडाच्या पोकळीपर्यंत घेऊन जाते. मांजरीच्या जिभेवर काटे असतात. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मांजरी जीभ, घसा आणि तोंडाच्या श्लेष्मल त्वचेत निर्माण होणाऱ्या आर्द्रतेने उष्णता बाहेर काढतात. या कारणास्तव, आपण कधीकधी मांजरीचे तोंड उघडे पहातो.
साप जीभ बाहेर काढून भक्ष्याचे गंधकण गोळा करतो. गंधकणांच्या ज्ञानावरून त्याला भक्ष्य पकडणे सोपे जाते. साप आपल्या जीभेच्या मदतीनेच वातावरणात होत असलेले बदल टिपतो. यात प्रामुख्याने तापमान आणि इतर बदलांचा समावेश आहे. साप सारखा आपली जीभ बाहेर काढून परिसरातील संकटाचा अंदाज घेत असतो.सापाच्या जीभेचे टोकाला दोन भाग झालेले असतात. त्यामुळेच त्यांना आपल्या चहुबाजूंच्या परिस्थितीचा अंदाज लावतो येतो. याशिवाय सापाला पाहण्याची क्षमता कमी असते. म्हणूनच ते आपल्या बचावासाठी जीभेचा उपयोग करतात. गायींची जीभ खूप लांब, रुंद आणि त्याच वेळी खडबडीत असते. लांबीमध्ये, ते ४५ सेंटीमीटरपर्यंत पोहोचू शकते! गायीच्या जातीवर जीभ अवलंबून असते. लांब जिभेमुळे, गायी सहजपणे वनस्पतींचे अन्न ग्रहण करू शकतात.
रुईला अस्वलाची निळी जीभ असते. सूर्याची उष्णता त्या जिभेमुळे शोषली जाते आणि त्याचे शरीर उबदार ठेवण्यास मदत होते.
खवले मांजराचे प्रमुख खाद्य म्हणजे मुंग्या, वाळवी, आणि लहान किडे. त्याला दात नसतात, पण लांबट तोंड आणि खूप चिकट अशी जीभ असते. वारूळाच्या बिळामध्ये जीभ आत घालून ते मुंग्यांना खाते.
सुतारपक्षी मुंग्या आणि वाळवी खाऊ शकतात आणि हिवाळ्यात ते झाडाच्या बिया खाऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सुतारपक्षाची जीभ एका विशेष टेपच्या मदतीने बाहेर ढकलली जाते जी कवटीच्या आतील पोकळीभोवती जाते आणि पक्ष्याच्या नाकपुडीला जोडलेली असते.या पक्ष्याची जीभ अतिशय संवेदी असते. जिभेच्या सहाय्याने तो झाडाच्या सालीखालील कीटक गोळा करतो.
हंसाची जीभ काटेरी असते तो त्याच्या जिभेने गवत सोलून खातो आणि नंतर गवत चघळतो.
फ्लेमिंगो पक्षाची जीभ केसाळ असते त्यामुळे तो शेवाळ कोलंबी साफसूफ करून खाऊ शकतो.
गिरगीट भक्ष पकडण्यासाठी शरीराच्या लांबीच्या २.५ पट जीभ लांब करू शकतात. ते त्यांची जीभ वास घेण्यासाठी देखील वापरतात, गिरगिटांची जीभ कोणत्याही सरड्यापेक्षा लांब असते. जीभ फुलातून अमृत काढण्यासाठी एक "पंप" असू शकते, जसे की हमिंगबर्ड, हनीसकर याची जीभ.
फुलपाखरांना जीभ नसते, त्यांच्याकडे एक प्रोबोस्किस असते. बरेच लोक त्याला जीभ समजतात परंतु ते आपले तोंड लांब नळीमध्ये वाढवण्यासारखे आहे. त्यांच्या प्रोबोस्किसवर काही चव कळ्या असतात आणि काही त्यांच्या अँटेनावर देखील असतात, परंतु बहुतेक चव कळ्या त्यांच्या पायावर केंद्रीत असतात. मधमाशांची जीभ लांब, पातळ, केसाळ जीभ संरक्षक आवरणाने वेढलेली असते. जेव्हा मधमाशी फुलावर येते, तेव्हा हे आवरण उघडते आणि जिभेच्या केसांमधील उभ्या फाट्यांमध्ये अडकलेले अमृत गोळा करण्यासाठी आत बाहेर फिरते.
'ब्ल्यू व्हेल' या माशाची जीभ जड असते त्याचे आवडते मासे जिभेखाली ठेवून तो सावकाश चघळत बसतो. शार्कला जीभ असते आणि तिला जीभ न म्हणता "बसिह्यल" असे संबोधले जाते.
शार्कची जीभ मानवी जीभेसारखी हलू शकत नाही कारण ती स्नायू नाही. शार्कच्या तोंडाच्या तळाशी कूर्चाचा हा छोटासा जाड भाग असतो आणि त्यात चव कळ्या नसतात किंवा कोणतेही कार्य करत नाहीत. म्हणून, जेव्हा शार्क तोंड उघडतात, तेव्हा आपल्या लक्षात येते ते त्यांचे भयानक दात.
इतक्यात चुलबुलचे बाबा घरी आले ते म्हणाले, वा..! आज भाजी खूपच छान झाली होती. भाजीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. चुलबुल म्हणाली, म्हणजे काय बाबा? बाबा म्हणाले ,"आजची भाजी फारच छान झाली होती. आज काय दोघी मायलेकींच्या गप्पा चालल्या आहेत." चुलबुल म्हणाली ,"काही नाही हो जिभेवर". बाबा म्हणाले, "सगळे शरीराचे अवयव थकतात पण हा अवयव असा आहे की जो कधी थकतच नाही. पण हो जिभेवर मात्र नियंत्रण ठेवता आले पाहिजे." चुलबुल म्हणाली म्हणजे काय? म्हणजे अरबट चरबट जर जिभेला खायची सवय लागली तर त्याचे नुकसान शरीराला फार होते. शिवाय काही समजपूर्वक न बोलता बडबड करत राहिलो तरीही जिभेमुळे इतरांची मने दुखावली जाऊ शकतात. म्हणूनच आई म्हणते,"उचलली जीभ आणि लावली टाळ्याला." ती एक म्हण आहे ग आपली. जीभ नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते म्हणून ती नेहमी आपल्या टाळ्याला चिकटून असते म्हणूनच त्याच्यावरून म्हण पडली आहे. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' याचा अर्थ विचार करूनच बोलले पाहिजे वाटेल ते बोलू नये. आईने स्पष्टीकरण केले. आणि कधी कधी मी तुला उलटे-सुल्टे खूप बोलल्यावर तू मला म्हणतेस, "तुझ्या जिभेला काही हाड आहे का?" म्हणजे काय ग? अगं याचा अर्थही असाच होतो "विचारपूर्वक बोलावे", आई म्हणाली.
आज चुलबुलला 'टंग ट्विस्टर गेम' जिभेच्या म्हणी आणि विविध प्राण्यांच्या जिभेची वैशिष्ट्ये समजली होती.
-सायली घाग.
(पूर्वप्रसिद्धी : विज्ञानधारा मासिक ऑगस्ट २०२३)
नाविण्यपूर्ण माहिती आहे. सुतार पक्षी आणि इतर पक्षी यांच्या जीभेबद्दल नवीन माहिती मिळाली.
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली आहे.
ReplyDeleteInformative & intresting .
ReplyDeleteप्रत्यक्ष प्राण्यांच्या जिभा पाहायला मिळाल्या, जाणीवपूर्वक सहसा पाहणे होत नाही. 👌👌अभ्यासपूर्ण माहिती. 👍
ReplyDeleteखूप छान ,अभ्यासपूर्ण माहिती 👍
ReplyDelete