वाचन वेग वाढवण्यासाठी
One minute reading activity
🌹उपक्रमाची उद्दिष्टे
- वाचन कौशल्य विकसित करणे.
- वाचनातील आत्मविश्वास वाढविणे.
- वाचनाचा वेग वाढविणे.
- समजपूर्वक मूक वाचन करणे.
- चिकित्सक मूक वाचन करणे.
- समजपूर्वक ,योग्य उच्चारांसह प्रकट वाचन करणे.
- सेमी इंग्रजीच्या वर्गातील गणित व विज्ञान विषय समजण्यासाठी वाचन कौशल्य विकसित करणे.
- अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे.
उपक्रमाची पार्श्वभूमी
करोनानंतरच्या काळात विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येऊ लागले तेव्हा विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्य कमी झाल्याचे दिसून आले.
वाचन हे अतिशय महत्त्वाचे भाषा कौशल्य आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना सर्वच विषयांच्या आकलनामध्ये अडथळे येतात. त्यामुळे त्यांचा शिकण्यातील वेगही कमी झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मला जाणवले. विद्यार्थ्यांचा वाचनातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी वर्गामध्ये इंग्लिश विषयासाठी वन मिनिट रीडिंग ऍक्टिव्हिटी सुरू केली.
उपक्रमाची कार्यवाही
शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांची प्रकट वाचनाची चाचणी घेतात. जे विद्यार्थी अडखळत वाचत आहेत, कमी वेगात वाचत आहेत त्या विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शक सूचना दिल्या. तुम्हाला वाचायला शिकायचे आहे ना असे आवाहन केले आणि मग उपक्रमाबद्दल माहिती दिली.वन मिनिट रीडींग ऍक्टिव्हिटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एक सोपा पाठ्यघटक त्यांच्याच आवडीचा निवडायला सांगितला. त्यानंतर वन मिनिट रीडिंग ऍक्टिव्हिटी कशी करायची याबद्दल सूचना दिल्या. एकूण या उपक्रमाला पाच मिनिटे वेळ लागेल हे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात आणि आवाहन करतात की द्याल ना तुम्ही वाचनासाठी पाच मिनिट वेळ!
शिक्षकाने एक मिनिट वेळ लावून एका मिनिटात जेवढे समजून घेऊन विद्यार्थी शब्द वाचतील तेवढे शब्द मोजून तो आकडा वहीमध्ये तक्ता तयार करून तारीख टाकून त्यासमोर प्रामाणिकपणे लिहायला सांगितले. असे सलग २१ दिवस रोज नियमितपणे हा उपक्रम शाळेत आणि घरी पालकांच्या मदतीने कसा करायचा अशा सूचना विद्यार्थी व पालक दोघांनाही दिल्या. शिक्षकांनी एक मिनिट वेळ लावल्यानंतर विद्यार्थी अतिशय आनंदाने वाचायला आपापल्या गतीने सुरुवात करतात. जेवढे शब्द वाचले तेवढे प्रामाणिकपणे शिक्षकांना अतिशय उत्साहात सांगतात. व वहीमध्ये तारखेनुसार नोंद करतात. पालकांना उपक्रमाबद्दलच्या सूचना व्हाट्सअप समूहावर शिक्षकांनी दिलेल्या असतात. घरी गेल्यानंतर विद्यार्थी पालकांना उपक्रमाबद्दल माहिती देतात व पालकांसमवेत पुन्हा एकदा stop watch वर एक मिनिट वेळ लावून तोच पाठ्य घटक पुन्हा वाचतात व पुन्हा त्याची नोंद करतात. पुन्हा वाचल्यानंतर शब्द संख्येमध्ये वाढ होते व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढू लागतो. समजून घेऊन वाचणे महत्त्वाचे आहे हे शिक्षकांनी सांगणे आवश्यक आहे त्याचबरोबर या उपक्रमाद्वारे स्पर्धेचे वातावरण तयार झाल्यामुळे वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण होते परंतु ही स्पर्धा स्वतःशीच आहे हे शिक्षकांनी सांगणे आवश्यक आहे. रोज स्वतःच्या वाचनाच्या शब्द संख्येमध्ये वाढ होणार म्हणजे स्वतःची वाचनातील प्रगती होणार हे विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक आहे. हा वाचन वेगाचा चढता आलेख विद्यार्थी स्वतः अनुभवतात. त्यांना या उपक्रमांमधून आनंदही भरपूर मिळतो. पाठ्य घटकांसोबतच त्या त्या वयोगटाच्या आवडीनुसार विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तक पेटी आणून त्यामधील पुस्तके वन मिनिट रीडींग ऍक्टिव्हिटीसाठी दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होते.
उपक्रमाची फलनिष्पत्ती
२१ दिवस सलग हा उपक्रम केल्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा मूक वाचनाचा व प्रकट वाचनाचा वेग वाढला.आकलनासह वाचन केल्यामुळे पाठ्य घटक समजतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाचनातीलच नाही तर शिकण्यातील आनंदही वाढतो.
वाचन वेग वाढवण्याच्या या उपक्रमासाठी केवळ पाच मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. एक मिनिटामध्ये वाचन, त्यानंतर वाचन केलेल्या शब्दांची संख्या मोजून लिहिणे. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. तसे वातावरण राहण्यासाठी शिक्षकांनी तशा प्रकारचा संवाद विद्यार्थ्यांशी करणे आवश्यक आहे. इंग्रजी विषयाचे वाचन विकसित झाल्यामुळे सेमी इंग्रजी वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषय समजण्यासाठी फायदेशीर ठरतो.
विद्यार्थ्यांची स्वतःची पुस्तकांची लायब्ररी तयार करण्यासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. वाढदिवसाला वाढदिवसानिमित्त एकमेकांना पुस्तके भेट देण्याच्या उपक्रमाची सुरूवात केली. पालकांकडूनही वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यायचे असे सुचविले. पुस्तक प्रदर्शनाला भेटी देणे, पुस्तकांच्या दुकानांची नावे सांगून विद्यार्थ्यांच्या वयोगटाची कोणकोणती पुस्तके वाचनीय आहेत ते त्यांना सांगितले. उदाहरणार्थ पाचवीच्या वर्गासाठी पंचतंत्राच्या गोष्टी, सहावीसाठी बिरबलाच्या गोष्टी, सातवीसाठी फेरी टेल्स, आठवीसाठी साहस कथा, नववीसाठी थोर व्यक्तींची आत्मचरित्रे, दहावीसाठी प्रेरणादायी पुस्तके. याशिवाय एक मिनिटाची गोष्ट सांगण्याचाही उपक्रम सुरू केला. आकलनासह वाचन करून पुस्तक परीक्षण करण्याचा उपक्रमही राबविला.या सर्वांमधून एक प्रकारची वाचनाची चळवळच निर्माण झाली. वर्गामध्ये एका कोपऱ्यामध्ये पुस्तकाचे स्टॅन्ड ठेवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थी स्वतःची पुस्तके आणून ठेवू लागले व रिकाम्या तासाला त्यातील आवडीचे पुस्तक घेऊन वाचू लागले त्यामुळे त्या तासिकेच्या वेळाचा सदुपयोग होऊ लागला. सहलीसाठी पालकांबरोबर भिलार या पुस्तकाच्या गावाला भेट देण्यासाठी ही प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर पुण्यातील विविध शासकीय वाचनालयांची माहिती दिली व त्यांना भेटी देण्यासाठी सांगितले . पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात नुकत्याच झालेल्या 'पुणेकर वाचत आहेत' या पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नेले. पालकांसोबत पुन्हा भेट देण्यासाठी सांगितले. तेथील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व पुस्तके खरेदी केली. स्वतःच्या वाढदिवसाला पुस्तक खरेदी करून 'सेल्फी विथ बुक' काढून पाठवण्याचे सुचविले. पालकांनी रोज स्वतः पंधरा मिनिटे तरी झोपण्यापूर्वी वाचायचे. त्यांचे पाहून मुलेही वाचतील असे आवाहन पालकांना केले. विद्यार्थी व पालक या दोघांमध्येही वाचनाविषयी जागृती होत आहे! चला तर मग वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवूयात!!
-सौ हर्षा बाळकृष्ण पिसाळ (निगडे)
आपटे प्रशाला पुणे
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका
No comments:
Post a Comment