डोळे हे जुलमी गडे!
चुलबुल, एक मस्तीखोर खार. तिच्या गावात आज एका पंडित मांजराचे आगमन झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी सर्व प्राण्यांनी गावात गर्दी केली होती. चुलबुलचे आई वडील आणि चुलबुलही पंडित मांजरांना भेटण्यासाठी त्यांच्या प्रवचनाला रात्री गेले. प्रवचनकारी पंडित मांजराचे भेदक आणि गोटीसारखे डोळे पाहून चुलबुल खार थोडी घाबरली. आईच्या कुशीतच शिरली. प्रवचन संपेपर्यंत ती आईच्या कुशीतून बाहेरच आली नाही. आईच्या लक्षात आले. आईने चुलबुलला उचलून घेतले आणि आई चुलबुलला म्हणाली,
"रात्रीच्या वेळी मांजरीचे चमकणारे डोळे कधीकधी भीतीदायक वाटतात. मांजरीचे डोळे चमकतात कारण ते इतर अनेक निशाचर प्राण्यांच्या डोळ्यांसारखेच प्रकाश प्रतिबिंबित करतात. सर्व डोळे प्रकाश परावर्तित करतात, परंतु काही डोळ्यांमध्ये एक विशेष परावर्तित रचना असते .ज्याला टॅपेटम ल्युसिडम म्हणतात जे रात्रीच्या वेळी चमकते. टॅपेटम ल्युसिडम (चमकणारा थर) हा मूलत: अनेक प्रकारच्या निशाचर प्राण्यांच्या डोळ्यांच्या पाठीमागे एक लहान आरसा आहे. हे मुळात या प्राण्यांना रात्री अधिक चांगल्या रितीने पाहण्यास मदत करतात. मांजरीप्रमाणेच वाघ, चित्ता, बिबट्या या प्राण्यांचे डोळे रात्री चमकताना दिसतात. याशिवाय अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या प्राण्यांचे डोळे रात्री चमकतात त्या सर्वांच्या डोळ्यांची चमक एकसारखी नसते. ज्या प्राण्यांच्या डोळ्यात रक्तातील नसांची संख्या जास्त असते त्यांची चमक लाल असते. ज्या प्राण्यांच्या डोळ्यातील नसांची संख्या कमी असते त्यांचे डोळे पिवळे किंवा पांढरे चमकताना दिसतात.
जलचरांचा विचार केल्यास ‘तारा माशा’च्या प्रत्येक भुजेच्या टोकाला लहान डोळे असतात. जरी त्यांना खूप डोळे असले तरीही ते चांगल्या प्रकारे पाहू शकत नाहीत. डॉल्फिन जेव्हा झोपतात तेव्हा फक्त एक डोळा बंद करतात. जेव्हा मेंदूचा उजवा अर्धा भाग झोपतो तेव्हा डावा डोळा बंद होतो. याउलट मेंदूचा जेव्हा मेंदूचा डावा अर्धा भाग झोपतो तेव्हा उजवा डोळा बंद होतो. या झोपेला 'युनिहेमिस्फेरिक स्लीप' (Unihemispheric sleep) असे म्हणतात. झोपेत असताना श्वासोच्छवास चालू ठेवण्यासाठी, अनेक जलचर सस्तन प्राणी युनिहेमिस्फेरिक स्लीपचा वापर करतात.
सुमारे 99% कोळ्यांना आठ डोळे असतात. काहींना सहा, चार किंवा दोन असतात. काही प्रजातींना एकही डोळा नसतो.
कोळ्यांचे डोळे दोन प्रकारचे असतात. प्राथमिक डोळ्यांची मोठी जोडी प्रतिमा बनवते. दुय्यम डोळे कोळ्याच्या हालचाली आणि अंतर मोजण्यात मदत करतात. कोळ्याच्या डोळ्यांची संख्या आणि मांडणी अर्कनोलॉजिस्टला कोळ्याच्या प्रजाती ओळखण्यास मदत करते. कोळ्याला खूप डोळ्यांची आवश्यकता असते कारण तो पाहण्यासाठी त्याचे डोके फिरवू शकत नाही. उलट, डोळे जागी स्थिर असतात. भक्ष्य मिळविण्यासाठी आणि भक्षकांपासून दूर राहण्यासाठी, कोळी त्यांच्या सभोवतालच्या हालचाली जाणवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. मोठा डोळा असलेला दृष्टिहीन लांडगा स्पायडर गुहांमधील भेगा आणि खड्ड्यांमधून हळू हळू रेंगाळतो, स्पर्श, वास आणि चव या संवेदनांमधून आपली शिकार शोधतो. याला मोठ्या फॅन्ग (दात)असतात ज्याने त्याच्या शिकारला त्याच्या विषाने (विष) टोचतात आणि प्राण्यांना वश करतात.
सरडे पहिल्या दृष्टिक्षेपात आळशी वाटू शकतात आणि फार हुशार नसतात, कारण त्यांचे डोळे जवळजवळ नेहमीच बंद असतात. ते एका डोळ्याने एका बाजूने आणि दुसर्या डोळ्याने वेगळ्या प्रकारे पाहू शकतात. करेलिया नावाचा सरडा हा एकाच वेळी वेग वेगळ्या दिशेने पाहू शकतो. तिसरा डोळा सामान्यतः पॅरिएटल डोळा म्हणून ओळखला जातो, हा एक दृश्य नसलेला, प्रकाशसंवेदनशील पॅरापाइनल अवयव आहे जो बहुतेक सरडे , बेडूक, तुतारा आणि माशांच्या काही प्रजातींमध्ये आढळतो. विशेष म्हणजे, पॅरिएटल डोळा देखील अनेक सरड्यांसाठी एक प्रकारचा कंपास म्हणून काम करतो ! तो प्रकाश जाणू शकतो म्हणून, तिसरा डोळा सरड्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास आणि निवारा, अन्न आणि त्यांच्या वातावरणातील परिचित क्षेत्र शोधण्यात मदत करतो. सरड्यांचे डोळे माणूस पाहू शकत नाही असे रंग पाहू शकतात आणि ते जवळच्या आणि दूरच्या वस्तूंवर सहजतेने लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांना ‘तिसरा डोळा’ देखील असतो, जो सामान्यतः डोक्याच्या वर असतो, जो प्रकाश आणि अंधारातील बदल जाणण्यास मदत करतो. विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सरड्यांना एकंदरीत सर्वोत्तम दृष्टी असते. त्यांच्या डोळ्यांमध्ये अद्वितीय फोटोरिसेप्टर्स आहेत जे त्यांना माणसापेक्षा अधिक विस्तृत रंग पाहण्यास मदत करतात. यामध्ये स्पेक्ट्रमच्या अतिनील श्रेणीतील रंगांचा समावेश होतो.
शिकारी पक्ष्यांना उत्कृष्ट दृष्टी असते, गरुडाचे मोठे डोळे, जवळजवळ मानवी डोळ्यांइतके मोठे असतात, म्हणूनच हे पक्षी उत्कृष्ट शिकारी असतात. फोव्हिया डोळ्यातील 2 बिंदू आहेत, ज्यामुळे गरुडांना एकाच वेळी समोर आणि बाजूंना पाहता येते. त्यांचे दृष्टीचे क्षेत्र 340º आहे, आणि त्यांची रात्रीची दृष्टी देखील मानवांपेक्षा चांगली आहे. शहामृगाचा डोळा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो ज्याचा आकार पाच सेंटीमीटर असतो.
बेडकाला अन्न गिळण्यासाठी त्याचेच डोळे मदत करतात. बेडकाने तोंडात भक्ष्य पकडल्यानंतर डोळ्यांचे गोळे डोक्यात मागे सरकतात. अन्न खाली ढकलून बेडूक अन्न गिळतो. बेडकाला दात आणि माणसासारखी जीभ असली तरी ते दातांचा वापर अन्नाला तोंडात ठेवण्यासाठी करतात चघळण्यासाठी नाही. बेडकाची जीभ तोंडाच्या पुढच्या बाजूला जोडलेली असते म्हणूनच बेडकाला डोळ्यांच्या मदतीशिवाय गिळणे शक्य होत नाही. या व्यतिरिक्त, झोपलेला बेडूक त्याच्या पापण्या बंद करतो आणि तो विश्रांती घेत असताना स्वतःचे संरक्षण करतो. बेडकांना तीन पापण्या असतात. खालची पापणी स्थिर असते, तर वरची पापणी अधूनमधून लुकलुकते आणि बेडकाच्या डोळ्याला ओलसर ठेवण्यास मदत करते. मगरीचे डोळे तीक्ष्ण असतात. रात्री त्यांची दृष्टी दिवसापेक्षा चांगली असते. रात्रीच्या वेळी मगरीचे डोळे चमकलेले दिसतात. हे त्यात असलेल्या चमकदार पदार्थामुळे त्यांचे डोळे रात्री चमकतात. रात्री मगरी पाण्याखाली दिसतात तेव्हा त्यांचे डोळे लाल ठिपक्या सारखे दिसतात. मगर जेव्हा एखादे भक्ष्य खाते किंवा गिळते तेव्हा ती रडते. कारण मगरी प्राणी खाताना भरपूर हवा गिळतात आणि जेव्हा ही हवा अश्रू निर्माण करणाऱ्या अश्रू ग्रंथींच्या संपर्कात येते तेव्हा अश्रू निर्माण होतात. म्हणून बऱ्याचदा मगर रडताना दिसतो.
मानवी डोळे एका मिनिटात जवळपास सतरा वेळा उघडझाप करतात. डोळे मिचकाण्याची दोन कारणे आहेत. डोळ्यांत आर्द्रता राखण्यासाठी आणि बाहेरील कणांपासून डोळे सुरक्षित राहण्यासाठी. निळे डोळे असणारे लोक जास्त सूर्य प्रकाश सहन करू शकत नाहीत. ज्यावेळेस माणूस रडतो तेव्हा त्याच्या नाकातून पाणी येते कारण त्याचे अश्रू हे नाकावाटे निघत असतात. माणसे एखाद्याशी बोलतात तेव्हा,त्यांच्या पापण्या अधिक उघडझाप करतात, परंतु जेव्हा माणूस एखाद्या संगणकाच्या पडद्यावर किंवा कागदावर काही वाचत असतो, तेव्हा पापण्यांची कमी उघडझाप करतात, म्हणून माणसाला अधिक थकल्यासारखे वाटते.
नुकत्याच जन्मलेल्या मानवी बाळाचा चार ते तेरा आठवड्यांपर्यंत रडण्याचा आवाज येतो पण त्यांच्या डोळ्या मधून अश्रू येत नाहीत. पाच महिन्यानंतर माणसाला पापण्या नवीन येतात पण माणसाच्या डोक्याचे केस येण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतात.
कुत्र्यांना लाल आणि हिरव्या रंगाचा फरक कळत नाही.
कीटकांचे वैशिष्टे म्हणजे कीटक त्यांच्या उजव्या आणि डाव्या डोळ्याचा वापर करून त्यांचे भक्ष्य नक्की किती अंतरावर आहे याचा अंदाज बांधू शकतात आणि त्याचा अचूक वेध घेवू शकतात. म्हणजे भक्ष्याची अचूकता कीटकांमध्ये इतर कोणत्याही सजीवापेक्षा जास्त असते. कीटक हवेत उडतात त्यावेळी त्यांचे संयुक्त डोळे आणि त्या मधील फोटोरीसेप्टर हे अचूकपणे भक्ष्याचा वेध घेवू शकतात. त्याच बरोबर कीटकांमध्ये काही प्रमाणात रंग ओळखण्याचीसुद्धा क्षमता दिसून आली आहे. तसेच अचूकता हेसुद्धा कीटकांमध्ये दिसून येते म्हणजे प्रकाश कोणत्या बाजूला आहे तसेच पाणी कोणत्या बाजूला आहे हेसुद्धा कीटकांना समजू शकते.
ओसिली किंवा आपण त्याला साधे डोळे म्हणू. हे कीटकांमध्ये तीन असतात. कीटकांच्या दोन्ही संयुक्त डोळ्यांच्या मध्ये आणि मस्तकावर तीन लहान ठिपके दिसून येतात ते ओसिली होय. ओसिली हे मात्र एकच नेत्रभिंग असलेले साधे डोळे असतात. त्याचा वापर कीटक प्रकाश टिपण्यात करतात. म्हणून ओसिली डोळ्यांना फोटो रिसेप्टर असेही संबोधले जाते. संयुक्त डोळ्याप्रमाणे ओसिली डोळे जरी जटील प्रतिमा चा अर्थबोध करीत नसली तरी आजूबाजूच्या लहान सहान हालचाली टिपण्यात ओसिली डोळे मदत करतात. तसेच उड्डाण क्षितिज ठरवणे आणि उड्डाण नियंत्रण यात ओसिली महत्वाची भूमिका पार पाडतात. तसेच कीटकांच्या संयुक्त डोळ्यांच्या बाजूला एक आयलेट्स म्हणजे सूक्ष्म छिद्र डोळे असते ते सुद्धा कीटकांचे डोळे म्हणून आणि संयुक्त डोळ्यांना पूरक म्हणून कामकाज करत असतात. मात्र आयलेट्स प्रत्येक कीटकांमध्ये विकसित झालेली असेलच नाही.
माणसाच्या डोळ्यासारखी अत्यंत स्पष्ट आकृती जरी कीटकांच्या डोळ्याला दिसत नसली तरी दिसणाऱ्या अस्पष्ट आकृतीचे विश्लेषण तो जलद गतीने करू शकतो आणि निर्णय घेवू शकतो त्यामुळे कीटकांच्या हालचाली आपल्याला जलद गतीने पहावयास मिळतात. साहजिकच मानवी उत्क्रांती होत असतांना कीटकांच्या विविध प्रजातीमध्येही काही उत्क्रांती झालेली पाहायला मिळते. त्यामुळे दोन संयुक्त डोळे, तीन साधे डोळे आणि दोन सूक्ष्म छिद्र डोळे या आधारे कीटकांच्या पूर्ण विकसित प्रजाती आपला जीवनक्रम आत्मविश्वासाने पूर्ण करतात.
ही सर्व चर्चा चालू असतानाच चुलबुल खारीच्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या आणि चुलबुलला म्हणाल्या,"चल ग चुलबुल आपण आंधळी कोशिंबीर नाहीतर गाढवाला शेपूट काढणे हे खेळ खेळूया." चुलबुलला हे सर्व खेळ नवीन होते. ती म्हणाली," हे खेळ कसे खेळायचे?" तिची मैत्रीण म्हणाली," अगं सोप्पं आहे. डोळे मिटायचे आणि गाढवाचे चित्र असते त्या चित्राला डोळे मिटून अंदाजाने शेपूट काढायची. बरोबर गाढवाला शेपूट काढले तो जिंकला. चुलबुल म्हणाली," डोळे मिटून हे कसे काय शक्य आहे?" यावर चुलबुलची आई म्हणाली," का नाही? काही काही माणसे अंध असतात त्यांना जन्मताच दिसत नाही पण अंदाज घेत ते आयुष्यभर काम करतात जसे की मानवी अंध त्यांना लिहिता वाचण्यासाठी येण्याकरिता ब्रेल लिपी तयार केली गेली आहे. शिवाय लिफ्ट मध्ये सुद्धा ब्रेल लिपी त्याच्यासाठी असते. चुलबुल मानवा व्यतिरिक्त काही समुद्रातील प्राणी आहेत ज्यांना डोळे नसताात.
अट्रेटोचोआना हा प्राणी अलीकडेच ॲमेझॉन नदीत सापडला आहे. तो सापासारखा दिसतो. तो सापासारखा सरकतो आणि पाण्याखाली श्वासही घेऊ शकतो. सभोवतालचे वातावरण पाहण्यासाठी त्याला डोळे नसतात परंतु त्वचेचा वापर करून तो आजूबाजूची परिस्थिती जाणून घेऊ शकतो.
हायड्रास हे तंबू असलेल्या जेलीफिशचे नातेवाईक आहेत. त्यांनाही डोळे नसतात, पण प्रकाशाला प्रतिसाद देण्याची क्षमता असते.
इतक्यात शाळेत गेलेली चुलबुलची मोठी ताई घरी आली ती आज एकदम खुश होती .ताई आईला म्हणाली,"आई आज आमच्या शाळेत डोळ्यांचे डॉक्टर आले होते. त्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी त्याचे आम्हाला मार्गदर्शन केलेच पण, आम्हाला मार्गदर्शन करताना इतके हसवले की काय सांगू. ते म्हणाले, कोणत्याही मैत्रिणीला डोळा मारायचा नाही आणि मैत्रिणीने आपल्या मित्राच्या पाकिटावर डोळा ठेवायचा नाही. आपल्या मैत्रिणीच्या डोळ्यातले कुसळ पाहायचे नाही. मित्राच्या डोळ्यात मुळीच अंजन घालायचे नाही. मैत्रिणीच्या बोलण्याकडे काना डोळा करायचा नाही आणि आपल्या मैत्रिणीवर तर मुळीच डोळे वटारायचे नाहीत, नाहीतर डोळ्यांवर फार वाईट परिणाम होऊ शकतात. अशा विविध डोळ्यांच्या म्हणींचा वापर करत त्यांनी आम्हाला खो-खो हसवले सुद्धा."
इतक्यात चुलबुलचे बाबा आले. बाबा म्हणाले, "नयन हे बोलके असतात. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही कधी कधी गरज वाटत नाही. ते डोळे व्यक्त करतात. मनातील भाव डोळ्यांमध्ये वाचता येतात. पण चुलबुल, तुला माहिती आहे का? अनेक लोक डोळे असून आंधळे असतात. तुला बिरबलाची गोष्ट माहिती आहे का?” गोष्ट म्हणताच चुलबुलचे डोळे चमकले! ती म्हणाली, “सांगा ना बाबा, मला नाही माहिती!” बाबांनी बिरबल अकबराची गोष्ट सांगितली ती अशी: अकबराने बिरबलाला विचारले की त्यांच्या राज्यात आंधळे किती असतील? बिरबलाने उत्तरासाठी आठ दिवस मागितले आणि दुसऱ्या दिवशी तो दरबाराच्या बाहेरच्या दरवाजावर बाज (खाट)विणू लागला. दरबारात येणारा प्रत्येक सरदार- दरकदार त्याला विचारू लागला, “बिरबल, तू हे काय करतो आहेस?” अकबर राजानेही तोच प्रश्न केला. , बिरबलाने हा प्रश्न विचारणाऱ्यांची नावे एका कागदावर लिहिली. त्या कागदावर शीर्षक लिहिले, आंधळ्यांची यादी! पहिले नाव अकबर राजाचे होते! राजाने आश्चर्याने विचारले, “मला तर डोळे आहेत, मग मी आंधळा कसा?” बिरबल उद्गारला, “महाराज, मी बाज(खाट) विणतो हे पाहूनही तुम्ही विचारले की, बिरबल, तू हे काय करतोस?, मग तुमच्या डोळ्यांचा काय उपयोग?”
राजाला चूक समजली!
“चुलबुल, बिरबलाची आंधळ्यांची यादी संपलेली नाही!” सर्व जण हसू लागले. चुलबुलला बाबांचे म्हणणे पटले, आणि डोळ्यांचा योग्य वापर करण्याचा निश्चय तिने केला. तसा आपणही करूया!
- सायली घाग
आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा, गोरेगाव (पूर्व), मुंबई.
Sayalig2710@gmail.com
( पूर्वप्रसिद्धी: विज्ञानधारा मासिक सप्टेंबर 2023 )