गुण गाईन आवडी
शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्यांनी आपल्याला शिकवले आहे असे अनेक शिक्षक असतात. त्यांच्यापैकी काहीजण उत्कृष्ट शिकवणारेसुद्धा असतात. पण “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” या उक्तीप्रमाणे जे प्रत्यक्ष आपल्या सोबत नसले तरी सोबत असल्याप्रमाणेच कायम वाट दाखवत असतात असे आयुष्याला कलाटणी देणारे, त्याची दिशाच बदलवून टाकणारे, ज्यांना गुरू म्हणता येईल असे शिक्षक दुर्मीळ असतात. सुदैवाने मला असे अनेक गुरू लाभले. विद्यार्थ्यांना समजून घेणाऱ्या, त्यांना कान आणि वेळ दोन्ही देणाऱ्या, परंतु प्रयत्न मात्र विद्यार्थ्यांचेच असतील अशा वृत्तीने काम करणाऱ्या माझ्या शालेय जीवनातील काही गुरुंबद्दलच्या काही आठवणी या लेखात देत आहे.
परीक्षेची भीती घालवणारी शाळा
१९५६मध्ये मी पहिलीत गेलो. चौथीपर्यंत मी बुलढाणा जिल्हयातील खामगाव नगरपरिषदेच्या सहा नंबरच्या शाळेत शिकलो. या शाळेत गोष्टी, गाणी, खेळ, कोडी, चित्रे काढणे, मातीच्या आणि ज्वारीच्या धांड्यांच्या प्रतिकृती तयार करणे, अवांतर वाचन, पाढे आणि कविता यांचे पाठांतर यांवर भर असायचा. चौथीला शिकवणाऱ्या भारंबे सरांचा सुलेखनावर भर असायचा. आठवडी, तिमाही, सहामाही, वार्षिक अशा परीक्षा असायच्या. तिसरीला भालेराव बाई तर रोजच छोट्या छोट्या चाचण्या घ्यायच्या. एका विद्यार्थ्याने लिहिलेली उत्तरे दुसऱ्या विद्यार्थ्याला तपासायला द्यायच्या. गैरहजर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते शाळेत येतील तेव्हा घेतल्या जायच्या. घडयाळ पाहून वेळ सांगणे, दिशा सांगणे, नकाशा वाचन हे प्रत्यक्ष अनुभवांतूनच तपासले जायचे. भाषा आणि गणित यांची तोंडी परीक्षासुद्धा असायची. विद्यार्थी शाळेत जे काही करायचे त्या सर्व गोष्टींना गुण असायचे. विद्यार्थ्यांचा पोशाख, स्वच्छता, शाळेतील त्यांची वागणूक या गोष्टीसुद्धा पाहिल्या जायच्या. परीक्षा आणि अध्ययन-अध्यापन यांच्यातील फरक लक्षातच यायचा नाही. आज ज्याला आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, 360 अंश मूल्यमापन म्हणतो त्यात यापेक्षा वेगळे काय असते?
लेखनाची आवड निर्माण करणाऱ्या डांगे बाई
इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत मी अमरावतीच्या सायन्सकोअरमध्ये शिकलो. आठवीत कमलताई देशपांडे वर्गशिक्षिका होत्या, तर कमलताई डांगे मराठी शिकवायच्या. 1963 मध्ये शुद्धलेखनाचे नवीन नियम लागू झाले. त्यांचा सराव व्हावा म्हणून डांगे बाई आम्हाला रोज एक सुविचार किंवा कवितेचे कडवे यांचे श्रुतलेखन द्यायच्या. त्याच्या अर्थाबद्दल, उतारा ज्यातून घेतला तो मूळ लेख, कविता किंवा पुस्तक यांच्याबद्दल चर्चा घडवून आणायच्या. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भाषेत लिहावे याबद्दल त्या आग्रही असायच्या. निबंधांत वापरलेल्या नवीन कल्पनांचे कौतुक करायच्या. देशपांडे आणि डांगे बाईंनी शाळेच्या वार्षिकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. साहित्याची निवड, नियतकालिकाचे मुखपृष्ठ, शीर्षकपृष्ठ, अनुक्रमणिका, मजकुराचे शुद्धलेखन, व्याकरण, अचूकता, सजावट अशा विविध अंगांनी संपादन कसे करायचे हे आठवीत असतानाच मला शिकायला मिळाले.
27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांचे जाणे देशासाठी फार मोठा धक्का होता. त्यावेळी मला एक कविता लिहावीशी वाटली. ही कविता लिहून सुमारे साठ वर्षे झाली. मला ती जशी आठवते तशी पुढे देत आहे:
कोणी म्हणती नेहरू गेले
म्हणती ते दळभद्री सगळे
नेहरू म्हणजे काय तयांना
कधीच नाही मनी उमगले
देहाचे ते स्थान संकुचित
सोडुनि गेला आत्मा त्यांचा
एकरूप तद्देह नि आत्मा
कण नि कणाने भारतभूच्या
ही कविता कोणाला तरी दाखवावी असे मला सारखे वाटत होते. त्यावेळी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी होती. तरीही ही कविता मी डांगे बाईंना त्यांच्या घरी जाऊन दाखवली. त्यांना ही कविता खूपच आवडली. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचेही त्या कौतुक करायच्या. या कवितेबद्दलही तसेच काही झाले असावे असे मला वाटले. मी त्याच वर्षी शाळा बदलली होती. (पूर्वीच्या) शाळेच्या स्नेहसंमेलनात डांगे बाईंनी ही कविता वाचून दाखवली होती. त्यावेळी मी त्या शाळेत शिकत नसलो तरी मला खास बोलावून घेतले होते. त्यानंतर मी कधीही कविता लिहिली नसली तरी आपण लिहू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला.
कौशल्यशिक्षण देणारी शाळा
इयत्ता नववी ते अकरावीपर्यंत मी प्रशस्त आणि सुंदर इमारत, सुसज्ज कार्यशाळा आणि प्रयोगशाळा आणि समृद्ध ग्रंथालय असलेल्या अमरावतीच्या कलानिकेतन या तंत्रशिक्षण देणाऱ्या सरकारी शाळेत शिकलो. लोहारकाम, सुतारकाम, वायरिंग, फिटिंग, टर्निंग, पॅटर्न मेकिंग, मोल्डिंग, वेल्डिंग अशा प्रत्येक ट्रेडसाठी एक स्वतंत्र निदेशक असायचे. वर्कशॉप सुपरिंटेंडेन्ट हेडाऊ सर आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकवणारे जे. के. पाटील सर यांनी या क्षेत्रात कंटाळा न करता सराव करणे किती महत्त्वाचे असते हे बिंबवले. इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकताना सुरुवातीलाच (टी-स्क्वेअर आणि सेट स्क्वेअर्स वापरूनही) एक साधी ‘चांगली’ सरळ रेषा काढण्यासाठी मला किमान सत्तर वेळा प्रयत्न करावे लागल्याचे आठवते. एवढ्या सरावानंतर मी काढलेल्या रेषेच्या मीच प्रेमात पडलो. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्या प्रयोगांसाठी उपकरणे सज्ज करणे ही कामे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यानीच करणे अपेक्षित असायचे. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत वायुवाहक नळ्या कापणे, वाकवणे, बुचांना छिद्रे पाडणे, त्यांत वायुवाहक नळ्या घालणे, बुचे आणि परीक्षा नळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसने हवाबंद करणे, सांगितलेल्या तीव्रतेची द्रावणे तयार करणे ही कामे मला खूप आवडायची. ग्रंथालयातील पुस्तकांप्रमाणेच प्रयोगशाळेतील चुंबक, ताणकाटा, काचेच्या चिपा, भिंगे, आरसे आणि इतर अनेक गोष्टी घरी नेण्याची मुभा असायची. प्रयोग केवळ प्रयोगशाळेतच नाही तर घरीसुद्धा करता येतात ही दृष्टी त्यामुळे मिळाली. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक बाजू घाटोळ सर आणि सरदेशमुख सर यांनी खूपच समर्थपणे सांभाळल्या. गणित हा विषय अगदी सुरुवातीपासून मुळातच माझ्या आवडीचा विषय होता. फारसा न आवडणारा विज्ञान हा विषय मला या दोघांमुळे आवडायला लागला. ‘कारागिरी’च्या क्षेत्रांत अतिशय महत्त्वाची असलेलेली अचूकता, वेग, नीटनेटकेपणा आणि सुबकता ही हार्ड स्किल्स आणि वक्तशीरपणा, चिकाटी, कामातील आणि वागण्यातील सहजता आणि टीमवर्क ही सॉफ्ट स्किल्स जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रांत आयुष्यभर तेवढीच महत्त्वाची असतात. या गुणांची मौल्यवान देणगी कलानिकेतनने आम्हांला दिली.
स्वत:च्या भाषाशैलीचा शोध
लिहिताना मला आवडणाऱ्या लेखकांच्या लेखनशैलीचे मी बरेचदा अनुकरण करत असे. कलानिकेतनमध्ये राम दारव्हेकर सर आम्हांला मराठी शिकवायचे. सुप्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ते भाऊ. एकदा त्यांनी आम्हांला ‘उन्हाळ्याची सुट्टी’ या विषयावर विनोदी निबंध लिहायला सांगितला होता. माझा निबंध वाचल्यानंतर ते म्हणाले होते, “ निबंध छान झाला; पण आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाही; वसंत काळपांडे आहोत हे लक्षात ठेवावं.” दारव्हेकर सरांचा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भाषेत, स्वत:च्या शैलीत लिहिण्यावर भर असायचा.
मला माझ्या भाषाशैलीचा शोध लागला तो प्रामुख्याने भौतिकशास्त्राच्या सरदेशमुख सरांमुळे. साध्या, थेट, कमीतकमी शब्दांचा वापर असणाऱ्या, ओघवत्या, अनलंकृत आणि आपल्याला जे काही सांगायचे त्याचे स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे उभे करणाऱ्या भाषाशैलीवर त्यांचा भर होता. पुस्तकातला मजकूर पाठ करून जसाच्या तसा लिहिण्याऐवजी तो स्वत:च्या भाषेत लिहावा आणि भाषेच्या आणि अचूकतेच्या दृष्टीने नऊ वेळा तरी तपासावा अशी त्यांची शिकवण होती. एखादा विद्यार्थी पुस्तकातील बोजड वाक्ये जशीच्या तशी वापरू लागला तर ते म्हणायचे, “ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.” सरदेशमुख सर आणि दारव्हेकर सर यांच्यामुळे माझी भाषा घडली. Elements of Electrical and Mechanical Engineering, Statics, Dynamics, Probability, Permutations and combinations, Solid Geometry अशा विषयांसाठी इंग्रजी पुस्तकांचा आधार घ्यावा लागायचा. जे. के. पाटील सर आणि गणिताचे काळवीट आणि खिरे सर त्यासाठी इंग्रजी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन देत. गणित आणि विज्ञान या विषयांवर इंग्रजीतील इतरही अनेक पुस्तके त्या काळात मी वाचली. माझ्या शाळेत मला द्वैभाषिक अध्ययनपद्धती अनुभवायला मिळाली.
कलानिकेतनमध्ये भैयासाहेब निंबेकर आम्हाला शारीरिक शिक्षण शिकवायचे. त्यांच्याकडे शाळेच्या ग्रंथालयाचाही कार्यभार होता. त्यांनी मला कोणतीही पुस्तके घरी न्यायची परवानगी दिली होती. या काळात मी एका लेखकाची पुस्तके वाचायला सुरवात केली की, त्यांची सर्व पुस्तके वाचून काढत असे. त्यामुळे त्या लेखकाची लेखनशैली चांगली कळायची. मुन्शी प्रेमचंद, रामधारी सिंह ‘दिनकर’, मैथिली शरण गुप्त, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, सुभद्रा कुमारी चौहान हे हिंदीतील माझे आवडते लेखक आणि कवी होते. रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांचा माझ्या पिढीची वाचनाची आवड घडवण्यात मोठा वाटा होता. अर्थात बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या शाळेच्या ग्रंथालयात मिळायच्या नाहीत. त्या दुसरीकडून मिळवाव्या लागायच्या. याच काळात शाळेच्या ग्रंथालयात असलेली विज्ञान आणि गणितावरची अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके मी वाचून काढली. अनेक शास्त्रज्ञ आणि गणिततज्ज्ञ यांच्या जीवनावरील पुस्तके मी याच काळात वाचली. आकाशनिरीक्षणावरील पुस्तके, वेगवेगळ्या नक्षत्रांवरील भारतीय आणि ग्रीक पुराणकथा वाचल्या. भास्कराचार्यांच्या “लीलावती” या ग्रंथाचा मराठी अनुवाद आमच्या शाळेच्या ग्रंथालयात होता. त्यातील प्रश्न सोडवताना खूप मजा वाटायची. “लीलावती”वरून त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची बऱ्यापैकी कल्पना यायची. मी कोणती पुस्तके वाचावी यावर शाळेत किंवा घरी कोणतेही बंधन नव्हते. चांगले संस्कार व्हावेत यासाठी दर्जेदार पुस्तकेच वाच, असा आग्रह नव्हता. चांगल्या साहित्याबरोबरच सुमार दर्जाचेही साहित्य मी वाचले. तरीही चांगल्या आणि वाईट साहित्यांतील फरक कळण्यात मला कोणतीच अडचण आली नाही. इंग्रजीत वाचलेल्या माहितीच्या आधारे मी लिहिलेले विज्ञानावरचे काही लेख ‘अमृत’ आणि ‘श्रीयुत’ या मराठी डायजेस्टमध्ये छापून यायला लागले होते. पुढे महाविद्यालयाच्या वार्षिकात मी पुंज सिद्धांता(Quantum Theory)वर, तसेच मॅक्स प्लँक आणि अर्नेस्ट रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांच्या जीवनांवर मराठीत लेखही लिहिले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मार्पण
नववी ते अकरावीपर्यंत मराठी शिकवणारे राम दारव्हेकर सर उत्कृष्ट शिक्षक तर होतेच, परंतु सावरकरांचे अनुयायीसुद्धा होते. मराठीला पुरवणी वाचनासाठी नववी ते अकरावीपर्यंत अनुक्रमे 'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी', 'ती धन्य बंदिशाला' आणि 'उमाजी नाईक' ही पुस्तके आम्हाला पुरवणी वाचनासाठी होती. 'अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यसेनानी' ही कादंबरी तात्या टोपे यांच्या जीवनावर आधारलेली होती. 1857च्या लढ्याला पूर्वी 'शिपायांचे बंड' म्हणत. त्याला 'पहिले स्वातंत्र्यसमर किंवा स्वातंत्र्ययुद्ध' हे नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच दिले हे दारव्हेकर सरांमुळेच कळले. सर सावरकरांच्या पद्धतीप्रमाणे सर्व स्वर ‘अ’च्या बाराखडीत लिहीत. मीसुद्धा अनेक वर्षे तसेच लिहीत होतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. परंतु त्यांच्या 'स्वतंत्रते भगवती', 'सागरा प्राण तळमळला', 'माझे मृत्युपत्र' अशा कवितांतून भेटणारे भावनोत्कटता आणि प्रखर राष्ट्रभक्ती यांचा संगम असलेले प्रतिभाशाली कवी; तर त्यांच्या लेखांतून "गाय हा एक उपयुक्त पशु आहे, देव नाही.' , "एखाद्या वेळी थोडी गोहत्या झाली तरी चालेल, परंतु राष्ट्राची बुद्धिहत्या होऊन चालणार नाही." अशा जळजळीत शब्दांत विचार मांडणारे, पोथीनिष्ठेतून बाहेर पडण्याचे आवाहन करणारे विज्ञाननिष्ठ विचारवंत अशी दोन टोकांची त्यांची रूपे त्यांच्या साहित्यातून अनुभवली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर गेले त्यावेळी मी दहावीत होतो. 1966मध्ये सावरकरांनी प्रायोपवेशन (आत्मार्पण) करण्याचा निर्णय घेतला. एवढ्या शूरवीर व्यक्तीने अशी आत्महत्या का करावी? आम्ही आपापसांत चर्चा करत होतो. दारव्हेकर सरांनाच आपण विचारू, असा आम्ही विचार केला. सरांना राग येईल काय? पण आम्ही धाडस करून सरांना विचारलेच. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे आम्हाला समजावून सांगितले.
“सर्वसामान्य माणसाला आपला जीव खूप प्रिय असतो. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली, तिला तोंड द्यायची त्याच्याकडे हिंमत नसेल, तर वैफल्यग्रस्त होऊन तो आत्महत्या करतो. हे चूकच आहे. म्हणूनच अशा रीतीने आपले जीवन संपवणे कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. परंतु आपले जीवनच समाजासाठी आहे अशा भावनेने आयुष्यभर कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपले या जगातील कार्य संपले असे ज्यावेळी वाटते अशावेळी ते जीवन संपवतात. त्याला समाधी म्हणतात. सावरकरांचे प्रायोपवेशन हा समाधीचाच प्रकार आहे.”
त्यानंतर सावरकरांचा मृत्यू झाल्यानंतर दारव्हेकर सर तीन चार दिवस तरी येणार नाहीत असा आमचा समज होता. पण सर आले. त्यांनी नेहमीप्रमाणे शिकवायला सुरुवात केली. "सर, तुम्ही नाही गेलात मुंबईला?" आम्ही विचारले. "मी? नाही." सर म्हणाले. "का, सर?" आम्ही विचारले. "सावरकरांकडून मी हेच तर शिकलो." ते म्हणाले. त्यांनी पुन्हा शिकवायला सुरवात केली. मात्र ते उदास वाटले. संध्याकाळी आम्ही काहीजण सरांच्या घरी गेलो. ते खूप मनमोकळेपणाने आमच्याशी बोलले. मनातल्या ज्या गोष्टी शाळेत बोलता येत नाहीत अशा. आम्हाला आणखी समृद्ध झाल्यासारखे वाटले.
व्यावसायिक नीतिमत्ता
1964मध्ये नववीला आम्हांला माणिकचंद नेमासा कानेड यांनी इंग्रजी शिकवले. इतर शिक्षक active voice to passive voice, change into past/present/future tense, substitution tables अशा पद्धतीने शिकवायचे. परीक्षेत गुण मिळवायला हे पुरेसे असायचे. पण ही पद्धत खूप कंटाळवाणी वाटायची. कानेड सरांची शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी होती. ते कोणताही पाठ शिकवताना वर्गात जिवंतपणा आणायचे. बहुतेकदा मुलांकडून नाट्यीकरण करवून घ्यायचे. ते स्वत: नाट्यशास्त्राचे अभ्यासक होते. ॲबसर्ड थिएटर, जागतिक रंगभूमी (पूर्वरंग) आणि जागतिक रंगभूमी (पश्चिमरंग) ही पुस्तके त्यांनी लिहिली होती. इंग्रजीबरोबर मराठीचा वापर केला तरी कानेड सरांची हरकत नसायची. Uncle Podger Hangs a Picture हा पाठ त्यांनी आम्हांला शिकवला होता. त्याचे नाट्यीकरण करताना खूप गंमत यायची. नववीनंतर दहावीतसुद्धा कानेड सरच इंग्रजी शिकवायला असतील, अशी आमची खात्री होती. पण दुसरेच शिक्षक आले. पुन्हा तीच कंटाळवाणी पद्धत सुरू झाली. कानेड सरांची विदर्भ महाविद्यालयात लेक्चरर म्हणून निवड झाली होती. दोन-एक महिन्यांत ते काही औपचारिक बाबी पूर्ण झाल्यानंतर शाळा सोडून जाणार होते. अधून मधून ऑफ पिरियड्सना ते यायचे. दहावीत All About a Dog हा पाठ होता. हा पाठ कानेड सरांनी शिकवला असता तर किती छान झाले असते, असे आम्हांला वाटले.
एका ऑफ पिरियडला कानेड सर आले, त्यावेळी आम्ही त्यांना विचारले. ते म्हणाले, "मलाही हा पाठ शिकवायला आवडलं असतं. पण इंग्रजी शिकवायला तुम्हांला चापोरकर सर असल्यामुळे मी तसं करणं व्यावसायिक नीतिमत्तेला धरून नाही." आम्हांला व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे काय, हे माहीत नव्हते. सर आपल्या पेशाकडे धंदा म्हणून पाहतात? असा विचार आमच्या मनात आला. पण तो मनातच ठेवला. असेच काही दिवस गेले. कानेड सरांचा शाळा सोडून जाण्याचा दिवस आला. तो शनिवार होता. त्या दिवशी शेवटचा तास घेणारे शिक्षक आले नव्हते, म्हणून योगायोगाने कानेड सर वर्गावर आले होते. यानंतर ते पुन्हा दिसणार नाहीत, म्हणून वर्गातील वातावरण उदास होते.
"तुम्ही पूर्वी मला All About a Dog हा पाठ शिकवण्याबद्दल विचारलं होतं ना?" त्यांनी आम्हाला विचारले. "हो, सर. पण ते व्यावसायिक नीतिमत्तेला सोडून होईल, असं तुम्ही सांगितलं होतं. व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे काय?" आम्ही विचारलं. प्रोफेशनल इथिक्स म्हणजे काय, हे समजावून सांगितले. ते म्हणाले "तुमचा व्यवसाय कोणताही असो; त्याच्याशी Professional ethics - व्यावसायिक नीतिमत्ता निगडीत असतेच. विद्यार्थी म्हणून तुम्हांलासुद्धा काही नैतिक मूल्यं पाळावी लागतात. तुमच्यासाठी ही मूल्यं पाळणं म्हणजेच व्यावसायिक नीतिमत्ता." या विषयावर बरीच चर्चा झाली.
"आज तुमची इच्छा असेल, तर मी तुम्हांला 'ऑल अबाउट अ डॉग' शिकवेन." सर म्हणाले.
"नको, सर. आज आमचा मूड नाही आणि तुम्ही हा धडा शिकवणं आजसुद्धा व्यावसायिक नीतिमत्तेला सोडून होईल." आम्ही त्यांना सांगितले. पिरियड संपल्यानंतर सरांना निरोप द्यायची वेळ आली. सर वर्गाच्या बाहेर पडले. आम्हीसुद्धा त्यांच्या मागे बाहेर पडलो. पण त्यांची आणि आमची पावले बराच वेळ वर्गाजवळच घुटमळत राहिली.
अनंताचा साक्षात्कार घडवणारे गुरू
कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या साहित्यिक कुसुमावती देशपांडे यांची शिक्षकांवरील “अनंताचा साक्षात्कार” ही एक सुंदर कविता मला कविता वाचायला मिळाली. (पूर्वीच्या काळी शिक्षकांसाठी मास्तर हा शब्द सर्रास वापरला जायचा. त्यामागे अनादराची भावना मुळीच नसायची. श्री. म. माटे आणि प्रा. ग. प्र. प्रधान हे माटे मास्तर आणि प्रधान मास्तर म्हणूनच प्रसिद्ध आहेत.)
एखादा मास्तर असा भेटतो -
शाळेची जाम भीती घालतो
उठता बसता मारतो छडी
थरथर कापतात चिमणे गडी
विद्यार्थी? छे, गोगलगाय
जीवनभर पोटात पाय!
सदा न् कदा छडी हाती
शाळेची, जीवनाची भीतीच भीती
एखादा मास्तर असा भेटतो -
उस्ताद नसला तरी वस्ताद असतो
प्रत्येक चोरवाटेची चावी
या पठ्ठ्याला अचूक ठावी
कुणापुढे वाकावं, कुणा लाथ मारावी
पैसे कसे पचवावे, कॉपी कशी करावी
सार्या विद्यांचे शिक्षण
सदा देतो सोदाहरण
एखादा मास्तर असा भेटतो -
जो ज्ञानाचे पंख देतो
सात स्वर्गांचे दार उघडतो
घरटं बांधायला तोच शिकवतो
घरटं उबदार पिलं शानदार
आभाळातून सारं सांभाळते घार
आभाळाचं मन काही
पिलांना ती देत नाही
नजर तीक्ष्ण एकच लक्ष्य
भक्ष्य भक्ष्य आणखी भक्ष्य !
एखादाच मास्तर असा भेटतो -
डोक्यात घट्ट रुतवून ठेवतो,
भव्य स्वप्नाचा दिव्य बाण !
अंतर्वेधी दृष्टी त्याची
पंखात घालते पंचप्राण !
पंख देतो, देतो शक्ती
नाही देत थिजली शांती
आकाशातून हिंडत असता
भूमीवर खिळवी दृष्टी
नजर नेहमी असतेच त्याची
खुरडणार्या पायांवर
दिगंतातून हिंडता हिंडता
दाखवीत असता विश्वाकार
एखादाच गुरू घडवी
अनंताचा साक्षात्कार
आपल्या विद्यार्थ्यांना अनंताचा साक्षात्कार घडवणाऱ्या गुरूंना विनम्र अभिवादन आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- डॉ. वसंत काळपांडे
(पूर्वप्रसिद्धी- जीवन शिक्षण मासिक सप्टेंबर २०२३)
*****
No comments:
Post a Comment