"गुरूने दिला ज्ञानरुपी वसा...."
'बालपणीचा आणि काळ सुखाचा...'असं म्हणतात ते किती बरोबर आहे हे आज वयाच्या पन्नाशीत प्रकर्षाने पटतंय. किती प्रकारचे खेळ, थट्टा, मस्करी, मारामाऱ्या, कट्टी- बट्टी,आरडा -ओरडा,आणि काय काय....... लहानपणी आईची साडी कोठेही पडली असेल तर ती गुपचूप अंगावर जमेल तशी लपेटायची. हातात वह्या पुस्तके घेऊन शिक्षकांची नक्कल करणारी मी..काही एकटी नाही... मग त्यात शिक्षक कसं बोलतात.. त्यांची चालण्याची विशिष्ट पद्धत,... त्यांची राहण्याची स्टाईल... शिकवताना पुन्हा पुन्हा येणारे शब्द ...या गोष्टी हमखास असायच्याच. लहानपणी प्रत्येक वयात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीं आकर्षित करत असतात आणि आपण त्याप्रमाणे त्यावर व्यक्त होत असतो.प्रत्येक टप्प्यावर कोणीतरी वेगळंच आपलं आदर्श असतं हे मात्र सर्वानुमान्य . मला मात्र लहानपणापासून "शिक्षकच" व्हायचं होतं. याला कारण देखील तसंच होतं, माझे वडील सुद्धा एक "शिक्षक" होते आणि त्यांचाच आदर्श माझ्यासमोर होता. घरात,शाळेत आणि समाजात त्यांच्याकडे पाहत, अनुभवत, निरीक्षण करत आम्ही भावंडं लहानाचे मोठे झालो. "ज्ञानदान" हे सर्वात मोठे आणि यथोचित दान आहे शिवाय ते एकमेव असे दान आहे की, ते दुसऱ्याला दिल्याने त्यात वृद्धी होते हे लक्षात येत होते .शिवाय समाजासाठी-देशासाठी तुम्हांला काम करण्याची संधी शिक्षकी पेशामुळे मिळते. त्यामुळेच दहावीमध्ये चांगले गुण असताना देखील मी डी. एड. हे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांचा अध्यापनाचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालू ठेवला.
"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद " असे घोषवाक्य असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून वडील कार्यरत होते.त्यांचा अध्यापनाचा विषय होता इंग्रजी. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे आम्हां बहीणभावंडांचे शिक्षण महाराष्ट्रातील खूप वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. त्यामुळे प्रत्येक भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच व्यावहारिक जीवनमान अनुभवता येत होते. चौथीपर्यंतच्या शाळा किंवा तेथील शिक्षक खूप पुसटसे आठवतात तो वयाचा दोष म्हणावा लागेल. मात्र पाचवी ते दहावी हा शिक्षणाचा कालावधी आयुष्यात अगदी ठळक अक्षरांनी कोरला गेला आहे. रयत शिक्षण संस्था ही शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणारी संस्था आणि त्यांच्या शाळांत असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग हा सर्वगुणसंपन्न असाच असतो हे देखील तितकेच खरे..संस्कारक्षम वयात चांगल्या शाळांप्रमाणे चांगले शिक्षक देखील आयुष्यात आले. या सगळ्यांत माझ्या आयुष्यात घरी भरपूर लाड करणारे आप्पा आणि शाळेत कडक शिस्तीत आणि तितक्याच प्रेमाने मुलांना समजून घेऊन इंग्रजी शिकवणारे माझे वडील श्री. बी. जी. जाधव सर याचं, आदराचं आणि प्रेरणेचं स्थान आहे. मुळात इंग्रजी विषय हा पाचवीपासून अभ्यासक्रमात समाविष्ट होता.सन १९८२ते १९८७ या काळात माझा पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. या काळात व्याकरण सर्वच भाषांचे अधिक भारांश देऊन शिकवले जायचे.पर्यायाने इंग्रजीचे व्याकरण देखील जाधव सर आम्हांला खूप छान रीतीने, सोप्या भाषेत समजून घेऊन शिकवायचे. त्यामुळे परकीय भाषा असली तरी इंग्रजी विषयाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. त्यांचा एक शिरस्ता होता की, शिकवलेला भाग सर्वांना समजला पाहिजे त्यामुळे ते विद्यार्थ्यांना जमेल तितक्या सोप्या पद्धतीने ते शिकवायचे. माझ्यातदेखील सरांची ही सवय शिक्षिका झाल्यावर आपोआप अंगवळणी पडली.त्यात सरांचे हस्ताक्षर अगदी मोत्याप्रमाणे आखीव, रेखीव आणि टपोरे. त्यांनी पाचवीपासून दहावीपर्यंतच्या मुलांच्या हस्ताक्षरासाठी खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आजही मला आठवतात. एकदा हस्ताक्षर स्पर्धेत मी खूप उत्कृष्ट अक्षर काढले आणि अक्षरांवर शीर्षरेषाच दिल्या नाहीत. त्यावर सर मला म्हणाले, "तू एका सुंदर आणि आकर्षक स्त्रीचे चित्र हुबेहूब काढलंस.. मात्र तिला जर नाकच नाही काढलंस तर कसे वाटेल?.." त्यांचे ते बोलणे माझ्या अंतर्मनाला स्पर्शून गेलं.त्यामुळे मला सुंदर, वळणदार आणि टापटीपीत अक्षर काढण्याची दृष्टी मिळाली ."सुंदर हस्ताक्षर हाच मौल्यवान दागिना आहे" आणि ती तुमची ओळख देखील आहे हे देखील मनोमन पटले.कितीही घाईत लिहिलं तरी मी माझ्या अक्षराकडे जाणीवपूर्वक लक्ष देते.त्याचा उपयोग मला आजही माझ्या अध्ययन आणि अध्यापनात जाणीवपूर्वक होतो.
इंग्रजी व्याकरण, हस्ताक्षर, वक्तशीरपणा, समाजाभिमुखता,सुलभ अध्यपनाची दृष्टी मी जाधव सरांच्या सहवासात राहून शिकले खरं, परंतु सगळ्यात जास्त त्यांच्यामधील मला आवडलेला गुण म्हणजे आयुष्यातील "सकारात्मकता ". आयुष्यात किती मोठी संकटं आली, कितीतरी वाईट प्रसंगांना सोमोरे जावे लागले, तरी सुद्धा त्यांनी प्रत्येक गोष्ट अतिशय सकारात्मक मार्गाने सोडवण्यावर भर दिला. अर्धा पेला सरला आहे म्हणायचं की,अर्धा पेला भरला आहे म्हणायचं ते तर स्वतःच ठरवायचं असतं. स्वयंशिस्त,स्वतः च्या विषयाची तयारी, वेळेचे नियोजन, खिलाडूवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपड हे इतरही महत्वाचे गुण सरांमध्ये होते.शिक्षक -विद्यार्थी -पालक आणि समाज यांचा समतोल चौरस सांधण्यात ते यशस्वी झाले.त्यांच्यामधील सर्वच गुण आज शिक्षक म्हणून मला माझ्या आयुष्यात खूप उपयोगी पडतात.शिक्षक असण्याबरोबर सर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. हॉलीबॉल सारख्या मैदानी खेळात त्यांना विशेष नैपुण्य प्राप्त आहे. खेळामुळे आणि नियमित व्यायामामुळे आज वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी सर अतिशय निकोप आणि तंदुरुस्त आयुष्य नातवंडांच्या सहवासात घालवत आहेत.सेवानिवृत्ती नंतर स्वतः ला सामाजिक कार्यात गुंतवून घेऊन जमेल तसे इतरांना मदत करण्यात जास्तीत जास्त ते लक्ष घालत आहेत."मानवतावादी, संस्कृतिनिष्ठ आणि चारित्र्यसंपन्न नागरिक व समाज घडवण्याचे व्रत हातात घेणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय ". माझे प्रेमळ वडील, कर्तव्यदक्ष शिक्षक, समाजशील व्यक्तिमत्व असणारे श्री. बी. जी. जाधव सर यांच्या हातून घडलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात खूप उंचीवर कार्यरत आहेत.प्रत्येक शिक्षकाची खरी संपत्ती ही त्यांनी घडवलेले विद्यार्थी हीच असते. त्या दृष्टीने सर खूप श्रीमंत आहेत, असेच म्हणावे लागेल.अशा व्यक्तिमत्वाचा सहवास जितका जास्त मिळेल तितकं समृद्ध व्हायला होतं. त्यांचाच वारसा चालवत आज जवळजवळ तीन दशकांहून अधिक मी सुद्धा अध्यापन करत आहे, माझी मुलगी याच क्षेत्रात पदार्पण करून पाय रोवत आहे.आमचा वारसा पुढे यशस्वीपणे नेत असताना काही तत्व किंवा मूल्य स्वतः मध्ये अवलंबत आहे,याचा मला सार्थ अभिमान आहे त्यामुळेच म्हणावेसे वाटते,
"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा......"
डॉ. मनीषा दिलीप वारे.
(एम. ए, बी. एड.,एम. फिल, नेट, सेट,पीएच. डी.)
पदवीधर शिक्षिका, पुणे मनपा.विद्यानिकेतन नं.१७,विश्रांतवाडी, पुणे ४११०१५.
इ मेल -manishaware5605@gmail. com
No comments:
Post a Comment