Saturday, 14 February 2026

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : पुस्तकासह चाचणी

 मूल्यांकनाच्या नव्या दिशा : पुस्तकासह चाचणी

अध्ययन-अध्यापनातील प्रगती आजमावून प्रगतीमधील अडचणी, त्रुटी, चुका दूर करणे हे मूल्यांकनाचे खरे कार्य असते. परंतु सद्य:स्थितीमध्ये मूल्यांकन हे काही काळानंतर केले जाते, आणि अध्ययनातील प्रगती ही गुणांच्या स्वरूपात नोंदवली जाते. या प्रकारच्या मूल्यांकनात चुका, त्रुटी, उणिवा शोधून आणि दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक सुधारण्यास वाव उरत नाही. अशा मूल्यांकनात काही प्रमाणात तोंडी, प्रात्यक्षिक स्वरूपांच्या कृतींचा समावेश असला तरी प्रमुख भर हा लेखी स्वरूपाच्या चाचण्यांवर असतो. आधी त्या पद्धतीची काही प्रमाणात अंमलबजावणी होत असली तरी दैनंदिन अध्यापनातील उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 नुसार मूल्यांकन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. आणि दैनंदिन अध्ययन- अध्यापनाचा एक भाग म्हणून नियमितपणे आणि सर्वसमावेशकपणे मूल्यांकन व्हावे यासाठी अनेक तंत्रे सुचविण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतांश तंत्रे ही जशी मूल्यांकनासाठी वापरता येतात तशीच ती अध्ययनासाठी, सरावासाठीही वापरता येतात. या तंत्रांपैकी एक अतिशय उपयुक्त तंत्र म्हणजे पुस्तकासह चाचणी. पुस्तकासह चाचणी या तंत्राच्या अंतर्गत प्रश्न, कृती इ. साधने वापरता येतात.

पुस्तकासह चाचणीचे स्वरूप :

पुस्तकासह चाचणी हे तंत्र 20 ऑगस्ट 2010 च्या शासन निर्णयातही समाविष्ट केलेले आहे. परंतु या तंत्राबद्दल समाजामध्ये काही समज-गैरसमज आहेत. पुस्तकासह चाचणी म्हणजे प्रश्नांची उत्तरे पुस्तकात पाहून लिहिणे, थोडक्यात कॉपी करून उत्तरे लिहिणे, असा एक मोठा गैरसमज आढळून येतो. केवळ माहितीवर आधारित चाचण्या अथवा परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला असावा. तसेच शालांत परीक्षेच्या अथवा इयत्ता बारावीच्या मराठी, इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये दिलेल्या परिच्छेदाखालील प्रश्नांची उत्तरे बऱ्याचदा परिच्छेदामध्ये दिसून येतात, त्यामुळेदेखील असा गैरसमज होण्यास वाव मिळतो.

वस्तुतः पुस्तकासह चाचणी या तंत्रामधील साधनांद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अपेक्षित असणाऱ्या चिकित्सक, सर्जनशीलतेचा विचार, स्वतः शिकण्याची सवय लागणे यांसारख्या क्षमता वा कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने पुस्तकासह चाचणी हे तंत्र उपयुक्त ठरते. पुस्तकासह चाचणी या तंत्रामधील प्रश्न, कृती यांची उत्तरे अथवा प्रतिसाद प्रत्यक्ष पाठ्यांशामध्ये आढळून येत नाहीत.

पाठ्यांशामधील मजकुराचा आधार घेऊन तर्कशुद्ध विचार करून चिकित्सकपणे त्या उत्तरापर्यंत पोहोचावे लागते. उदा. वर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे परिच्छेद देऊन त्यावर आधारित प्रश्न तयार करण्याची कृती दिली तर विद्यार्थ्यांना स्वतः विचार करावा लागतो, आणि ज्या वाक्यांवर प्रश्न तयार करता येतात अशी वाक्ये विचारात घेऊन प्रश्ननिर्मिती करावी लागते. अशा कृतींमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करून प्रश्ननिर्मिती करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचारशक्तीला चालना मिळते, तसेच पाठातील सुविचारवजा वाक्ये निवडून वेगवेगळ्या वाक्यांचे स्पष्टीकरण करणे यामुळे सर्जनशील विचारांचा पाया घातला जातो.

इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन करत अस‌ताना काही इंग्रजी शब्दांचे अर्थ संभ्रमित करतात, असे मला जाणवले. एकाच इंग्रजी शब्दाचे दोन-तीन अर्थ निघत असतील अथवा एकाच समान उच्चाराचे पण स्पेलिंग वेग‌वेगळे असणारे असे काही शब्द पाठ्यांशामध्ये असतील तर त्यांचा योग्य प्रकारे व पाठाला अनुसरून उचित अर्थ लावत असताना माझे विद्यार्थी गोंधळून जात होते. यावर उपाय म्हणून मी इंग्रजी शब्दकोश (कृ. भा. वीरकर) विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. त्याचा वापर कसा करावा, शब्द कसे शोधावेत, याबाबत थोडी माहिती दिल्यानंतर विद्यार्थी कुतूहलाने शब्दकोश हाताळू लागले. त्यांना शब्द शोधताना आनंद मिळत आहे असे जाणवले.

‘My English Book–Seven’ पाठ्यपुस्तकातील ‘In a Class of Their Own’ या पाठातील विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या शब्दांचे अर्थ इंग्रजी शब्दकोशातून शोधण्यास सांगितले. प्रत्येकाला कठीण वाटणारे काही शब्द सारखे होते तर काही शब्द वेगवेगळे होते. Shabby, tell tales, camps, facing others अशा काही शब्दांचे अर्थ शोधत असताना विद्यार्थ्यांना गंमत येत होती. यातच विद्यार्थ्यांना मी ‘Tell me a tale of tail’ या वाक्यातील ‘टेल’ या उच्चाराच्या तीन वेगवेगळ्या स्पेलिंगबाबत माहिती दिली व त्यांना त्यांचा अर्थ समजून घेण्यास सांगितले. शब्दकोशाचा वापर करून मुलांनी tell, tale व tail या शब्दांचे अनुक्रमे सांग, कथा, शेपूट असे अर्थ शोधले. त्याद्वारे पूर्ण वाक्याचा अर्थ ‘मला शेपूटची (शेपटाची) गोष्ट सांग’ असा मिळाला व त्या दिवशी हेच वाक्य विद्यार्थी एकमेकांना म्हणताना मी पाहिले. काही मुलांनी तर घरी आपल्या पालकांना, मोठ्या भावंडांना हे वाक्य सांगून याचा अर्थ विचारला. पाठातील नवख्या शब्दांचे अर्थ मुलांनीच शब्दकोशातून शोधले. शब्दांचे अर्थ मिळाल्यामुळे पाठाची तयारी, शब्दांचा पाठाच्या संदर्भात अपेक्षित अर्थ व काही वेळा तो न समजल्यामुळे त्यांच्या अर्थाबाबत दुरुस्ती करून घेऊन काही शब्दांचे दोन अथवा अधिक अर्थ निघत असल्यास संदर्भानुसार आवश्यक तो अर्थ घ्यावा, हे मुलांना समजले. सातवीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 07.17.29 व 07.17.43 या Learning outcomeच्या सरावासाठी आणि मूल्यमापनासाठी ही कृती मला खूप उपयुक्त वाटली. 

इयत्ता सहावीच्या ‘My English Book–Six’ या पाठ्यपुस्तकातील पान 32 वरील दहावी कृती ही singular - plural बाबत‌च्या सरावाची आहे. s आणि es हे प्रत्यय वापरून दिलेल्या एकवचनी शब्दांची अनेकवचनी रूपे येथे बनवायची आहेत. जसे की dream-dreams, branch- branches याप्रमाणे 's' आणि 'es' या प्रत्ययांचा वापर करून शब्दांच्या जोड्या बनवायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी ही कृती करत असताना मी त्यांची समज दृढ करण्यावर भर दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना plural formची ओळख करून दिली. पाठ्यपुस्तकातील कोणतीही 5 पृष्ठे निवडून त्या पृष्ठावरील पाठ्यांशात आलेले plural formचे शब्द शोधण्यास सांगितले. विदयार्थ्यांनीदेखील पाठ्यपुस्तकातील असे plural form असणारे ‘s’ व ‘es’ प्रत्ययद‌र्शक शब्द शोधण्याचा प्रयत्न केला व असे शब्द शोधून वहीत लिहिले.

पाठ्यपुस्तकातील 06.17.33 व 06.17.34 या Learning outcomeच्या सराव व दृढीकरणासाठी ही कृती मला उपयुक्त वाटली. हे करत असताना विदयार्थ्यांच्या होणाऱ्या चुका मी लिहून ठेवल्या, त्या वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून दिल्या व त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. तसेच यामध्ये कृती पूर्ण झाल्यानंतर वर्गातील मुलांना एकमेकांचे प्रतिसाद तपासण्यास देऊन त्यावर चर्चा घडवून आणली. यातून मुलांना त्यांच्या कोणत्या चुका होतात, ते लक्षात आले. त्यामुळे साहजिकपणे सहाध्यायी मूल्यमापन तंत्राचाही उपयोग करता आला.

पुस्तकासह चाचणी हे तंत्र म्हणजे अशी परीक्षा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याची परवानगी असते किंवा तसे अपेक्षित असते. आणि अशा परीक्षेत विद्यार्थ्यांवरील पाठांतराचा अतिरिक्त ताण निश्चितपणे कमी होतो, असे मला जाणवले. शिवाय पुस्तकासह चाचणी तंत्रामध्ये वर्गातील विद्यार्थी हे पुस्तकाचा वापर करून परीक्षेला सामोरे जात असल्याने ते अधिक आरामशीरपणे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देऊ शकतात. याबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 मध्ये, MSCERT पुणे द्वारे निर्मित शिक्षक हस्तपुस्तिकांमध्ये तसेच ‘My English Book – Six’मध्ये पान नं. 52 व 53 वर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. पाठ्यपुस्तकासह चाचणीकरता काही नमुना उपक्रम आणि कृतीदेखील यात देण्यात आलेल्या आहेत.

पाठ्यपुस्तकासह चाचणीचा भाषेच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास तो 'माहिती विषय' नसून येथे मुख्य भर हा गोष्टी, कविता, किंवा उताऱ्यात वर्णन केलेल्या घटनांच्या स्मरण-पाठांतरापेक्षा भाषेचा वापर करून त्या-त्या पाठातील घटना, व्यक्ती, स्थळे, प्रक्रिया इत्यादी बाबी कशा प्रकारे मांडल्या आहेत यावर असतो.

प्रामुख्याने पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक दैनंदिन अध्यापन करत असताना जो आशय समजावतात तो आशय, त्यातील तथ्ये व वर्णने विद्यार्थी लक्षात ठेवू शकतात आणि परीक्षेच्या वेळी ती पुन्हा लिहू शकतात. पण येथे तेवढेच पुरेसे नाही. पुस्तकासह चाचणीचा उद्देशच असा आहे की, विद्यार्थ्यांनी स्वतःहून तशाच किंवा अगदी नवीन वर्णनांची निर्मिती करावी आणि पुस्तकासह चाचणी या तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना त्यासाठी उत्तम प्रकारे संधी मिळू शकते, असे माझे मत आहे.

पाठ्यपुस्तकासह चाच‌णी या तंत्राचा वापर करताना पाठ्यपुस्तकातील धडे हे मॉडेल, नमुने किंवा साधने म्हणून वापरले जावेत आणि ही साधने विद्यार्थ्यांनी कितपत प्रभावीपणे वापर‌ली आहेत हे तपासले जाणे येथे अपेक्षित आहे. तसेच या तंत्राचा वापर करताना घेतले जाणारे उपक्रम, कृती अथवा खेळ याद्वारे विद्यार्थ्यांना भाषा स्वतः शिकण्यासाठी, मित्रांसोबत शिकण्यासाठी आणि शिक्षकांसोबत शिकण्यासाठी वापरता यावी हे समजले पाहिजे. पाठ्यपुस्तकातील मजकूर वा आशय आणि त्यासाठीचे उपक्रम यांचा दुहेरी हेतू असतो. या आशय व उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना नवीन शब्दसंपत्ती आणि शिकण्याच्या नव्या पद्धती समजतात, असे मला वाटते. त्याद्वारे विद्यार्थी भाषिक खेळांमध्ये पारंगत होण्यास मदत होते, जसे की विदयार्थी वेगवेगळ्या प्रकारे वाक्यरचना करतात, नवीन वाक्ये तयार करतात किंवा विशिष्ट संदर्भामध्ये भाषा कशी वापरायची याबाबतची समज जोपासतात.

पुस्तकासह चाचणी या तंत्राचा अवलंब करताना मला प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे आपण वर्गात व शालेय वेळेव्यतिरिक्तदेखील विद्यार्थ्यांना वारंवार पाठ्यपुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. कारण त्यांच्याशी संबंधित विषयांच्या पाठपुस्तकाशी विद्यार्थी जितके अधिक परिचित असतील तितकी त्यांना परीक्षा देणे सोपे जाईल. पाठ्यपुस्तकांशी विद्यार्थी सुपरिचित नसतील तर त्यांचा बराचसा वेळ हा योग्य ते संदर्भ शोधण्यातच जातो, हे माझे स्वतःचे निरीक्षण आहे.

या अनुषंगाने इयत्ता सहावी मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील काही आशयाचे अध्ययन करताना विद्यार्थी नाम व नामांचे प्रकार, सर्वनामांचे प्रकार इत्यादी व्याकरण घटकांची माहिती घेऊन त्यांचा लेखनात योग्य पद्धतीने वापर करतील अशा प्रकारे पाठ्यांश समजावून देण्याचा प्रयत्न केला. पाठ्यपुस्तकातील 06.01.28 या कृतीचा मला अध्ययन निष्पत्तीसाठी छान उपयोग झाला. याद्वारे विद्यार्थ्याचे स्वतः अध्ययन करण्याचे कौशल्य वाढल्याचे दिसून आले.

पुस्तकासह चाचणी हे तंत्र अध्ययन-अध्यापनादरम्यान वापरता येते. त्यामुळे ते विविध स्वरूपात कसे वापरायचे हे विद्यार्थ्यांना उमगते. विद्यार्थ्यांचा अध्यापनामधील सहभाग वाढतो.

पाठांमधील काही स्वाध्यायांची उत्तरे पाठात असतात परंतु काही स्वाध्याय हे विचारप्रवर्तक, सर्जनशील स्वरूपाचे असतात. पाठाचा आधार घेऊन ते स्वाध्याय वर्गात सोडवणे ही पाठ्यपुस्तकासह चाचणी होते. उदा. इयत्ता सातवी मराठी बालभारती पाठ 8- ‘गचक अंधारी’ याचे संदर्भ स्पष्टीकरण दिल्यानंतर, आशय समजावल्यानंतर पान नं. 37 वरील ‘विचार करा व सांगा’ अंतर्गत 'गचक अंधारी' हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा - या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना पाठाचा आधार घेऊनच स्वमत लिहावे लागणार आहे आणि येथेच त्यांच्या आकलन शक्तीचेही मूल्यमापन होणार आहे .

पुस्तकासह चाचणी हे एक असे तंत्र आहे की विद्यार्थ्यांना वर्गात चाचणी देण्यासाठी शिक्षकांना काही वेगवेगळे परिच्छेद, वेगवेगळ्या शब्दांचे तक्ते (अर्थ शोधण्यासाठी), काही कल्पक स्वाध्याय तयार करून ठेवावे लागतात. काही कृतीही देता येतील. जसे की -

  •  खालील वर्णन वाचा. त्याचा पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक शोधा आणि त्या वर्णनात एक वाक्य अधिक जोडा.
  •  पान क्र .....वरील उतारा वाचा आणि त्यावर आधारित फ्लोचार्ट/वृक्ष आकृती / चित्र तयार करा.
  • उतारा वाचा आणि पान क्र ...... वरील चित्राला योग्य शीर्षक द्या. (येथे पुस्तकातील चित्राला शीर्षक दिलेले नसावे.)
  •  पुढील ओळी वाचा आणि पुस्तकात ती कविता शोधा. त्याच्या पुढील ओळी लिहा.
  • खालील उतारा वाचा. तुमच्या पाठ्यपुस्तकात यासारखा उतारा शोधा आणि दोन्ही उताऱ्यांमधील फरक लिहा.
  •  पान क्र..... वरील संवाद वाचा आणि त्याला योग्य पण वेगळा प्रतिसाद नोंदवा.

व्याकरणदृष्ट्यादेखील काही कृती देता येतील. जसे की -

  • योग्य विशेषण
  • विशेषणांसाठी योग्य नाम
  • योग्य क्रियापदे
  • योग्य क्रियाविशेषणे

हे सर्व करत असताना वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करावे, असे मला वाटते. तसेच परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कोणताही विषय निवडण्याची मुभा देण्यात यावी आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्वतयारीचा एक भाग म्हणून शब्द आणि वाक्ये आधीच निवडण्याची परवानगीदेखील द्यायला हवी. याप्रकारे जर पुस्तकासह चाचणी या तंत्राचा उपयोग केला तर विद्यार्थी त्या कामात मग्न राहतात आणि शिक्षकांना शालेय स्वरूपाची कामे करण्यासाठी थोडासा वेळ मिळू शकतो. चाचणीचे प्रतिसाद तपासण्याचे काम विद्यार्थ्यांना समजावून देऊन त्यांच्याकडून तपासून घेता येते आणि त्यावर चर्चा घडवून आणता येते. विद्यार्थ्यांच्या त्रुटी दूर करता येतात. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित, कृतींवर आधारित करता येते. अशा कामात विद्यार्थ्यांना आनंद मिळतो, असा माझा अनुभव आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थी स्वतःचे स्वतः शिकण्यास तयार होतात. 

प्रत्यक्ष चाचणीच्या वेळी पुस्तकांसह चाचणी हे तंत्र वापरायचे असल्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे अध्ययन-अध्यापनानंतर आढावा घेण्याच्या दृष्टीने अथवा उपयोजन करण्याच्या हेतूने तसेच चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि स्वतः शिकण्याची सवय विकसित करणे यासाठी हे तंत्र अतिशय उपयुक्त ठरू शकते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अपेक्षेनुसार अध्ययन-अध्यापनादरम्यानच्या काळात, सरावाच्या काळात मूल्यांकन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनातील प्रगती लक्षात येणे, अडचणी-चुका समजणे आणि त्या दूर करण्यासाठी वेळीच मार्गदर्शन मिळणे या दृष्टीने पुस्तकासह चाचणी हे तंत्र अतिशय उपयुक्त आहे.

- वैभव विठ्ठल पोरे

जि. प. प्राथमिक शाळा, सिद्राममळा, हवेली, पुणे

(मूल्यांकनाच्या नव्या दिशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 मधील मराठी माध्यमातून द्वितीय क्रमांक प्राप्त निबंध)


3 comments:

  1. पुस्तकासह चाचणी या मूल्यांकन तंत्राविषयी असलेल्या गैरसमजांना दूर करून त्याचा परिणामकारक वापर कसा करता येतो, हे स्पष्ट करत पुस्तकासह चाचणी ही केवळ औपचारिक पद्धत नाही तर विद्यार्थ्यांच्या सखोल आकलनासाठी प्रभावी साधन आहे, हे या निबंधातून उत्तमरीत्या मांडले आहे. मूल्यांकन प्रक्रियेबाबत नवा दृष्टिकोन देणारा हा निबंध निश्चितच मार्गदर्शक ठरतो. माहितीपूर्ण निबंध वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  2. The article on “New Directions in Evaluation” integrated with the concept of assessment is insightful, well-structured, and aligned with current educational reforms. It will certainly guide educators toward effective evaluation practices. Heartiest congratulations to the author.

    ReplyDelete
  3. पुस्तकासह चाचणी बाबत छान मार्गदर्शन

    ReplyDelete

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...