अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?
'कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरून घालितो धपाटा आत आधाराचा हात'
'गुरू' या कवितेतील ओळीप्रमाणे प्रत्येक गुरू त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाला घडवत असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रत्येक पैलू अभ्यासातून त्याचा विकास करण्यासाठी अविरत कार्य करत असतो; परंतु हे सध्या दुरापास्त होत चालले आहे. याचे कारण म्हणजे शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे.
'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन सर नुसते लढ म्हणा' या ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' या सुप्रसिद्ध कवितेच्या शेवटच्या ओळी, या ओळीत विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर असलेला विश्वास, आदर दिसून येतो. सध्याचा शिक्षक मात्र या बाबींसाठी पारखा झालाय. कारण शिक्षक विद्यार्थ्यांसमोर खूप कमी वेळ उपस्थित आहे, आणि तो जास्तीत जास्त वेळ अशैक्षणिक कामात व्यस्त आहे. काही सर्वेक्षकांच्या मते तर शिक्षकाचे आठवड्याचे अध्यापनाचे तास जवळपास १० ते १५ टक्केच होतात, परिणामी मुलांना खाजगी शिकवणी लावली जाते. हे आणि असे कितीतरी अनर्थ या अशैक्षणिक कामाच्या अतिरेकामुळे झाले आहेत. 'अति तेथे माती' या म्हणीचा प्रत्यय सध्या ग्रामीण भागातील शिक्षकांना येतोय.
'विद्या ददाति विनयं' या संस्कृत उक्तीप्रमाणे शिक्षणातून विनम्रता आणि शिस्त निर्माण होते. शिक्षक हा समाजाच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. केवळ पाठ्यपुस्तकाचे शिक्षण देणारा नव्हे, तर विद्यार्थी घडवणारा, समाजाला दिशा देणारा शिक्षक हा दीपस्तंभ असतो; परंतु अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांवर भार येतो आणि त्याची मूळ जबाबदारी दूर जाते. अशा कामांपासून शिक्षकांना जर मुक्ती मिळाली तर विद्यार्थ्यांसाठी ते आणखी काय करू शकतात, यावर विचार मांडणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी घडवण्यासाठी अधिक वेळ
हिंदीमध्ये एक सुवचन आहे, 'शिक्षक वह है जो अंधकार में दीप जलाता है'. जर अशैक्षणिक कामाची जबाबदारी कमी झाली तर मला विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्याची संधी मिळेल. मी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक विकासाकडे अधिक लक्ष देवू शकेन. "The best teachers teach from the heart not from the book." याप्रमाणे मी फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यातील आत्मविश्वास, शिस्त आणि सामाजिक मूल्यांचे शिक्षण देवू शकेन. प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू शकेन.
पालक आणि शिक्षक यांच्यातील परस्पर सहकार्य
'मुलांचे पहिले शिक्षक हे त्यांचे आई-वडील असतात. पालक मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. अशैक्षणिक कामांतून मोकळीक मिळाल्यास मी पालकांशी सुसंवाद साधून मुलांच्या शैक्षणिक विकासात अधिक सक्रिय सहभाग घ्यायला सांगू शकतो. पालक आणि शिक्षक यांच्यातील परस्पर सहकार्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष कार्यक्रम, कार्यशाळा करू आयोजित करून पालक -शिक्षक संबंध अधिक मजबूत करू शकतो, ज्यायोगे शिक्षकाचा समाजातील मान-सन्मान वृद्धिंगत होईल.
नवोन्मेषी अध्यापन पद्धतींचा अवलंब
'ज्ञानस्य प्रधान साधनं विज्ञान' या संस्कृत वचनाप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. आज मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. अशैक्षणिक कामातून मोकळा झाल्यास मी विद्यार्थ्यांना ई-लर्निंग स्मार्ट क्लासेस आणि इंटरनेट-लर्निगच्या विविध साधनांचा उपयोग करून शिकवू शकेन. "A teacher affects eternity; he can never tell where his influence stops" या इंग्रजी उक्तीप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीची ओळख करून देवून तंत्रज्ञानाधारीत शिक्षणाने विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक सखोल बनवू शकेन.
संशोधन आणि नवोन्मेष
'ज्ञान ही शक्ती आहे.' या सुवचनाप्रमाणे मी शिक्षण क्षेत्रात नवीन संशोधन आणि नवोन्मेषी प्रकल्प राबवू शकतो. अशैक्षणिक कामामुळे याकडे दुर्लक्ष होते; परंतु अशैक्षणिक कामांतून मुक्तता मिळाल्यास मी शैक्षणिक तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांवर अधिक संशोधन करून नवीन अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र समजून घेऊन, मी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कसे शिकवता येईल यावर काम करु शकेन. ज्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल आणि शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल.
शालेय अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन आणि सुधारणा
'विद्या विनियोगात विस्तारः' या संस्कृत सुभाषितानूसार शिक्षणाचा उद्देश अधिक ज्ञानाचा प्रसार करणे हा असतो. शिक्षक म्हणून मी अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेन. आधुनिक जगाच्या गरजानुसार विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मी शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा सुचवू शकतो. यासाठी जागतिक स्तरावर चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करून, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात मदत करू शकतोः एकविसाव्या शतकातील विविध आव्हाने पेलण्यासाठी सक्षम विद्यार्थी बनवण्यासाठी विविध कृती पाठ्यक्रमात सुचवू शकतो. तसेच जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल, नवनवीन संशोधनाचा विचार करता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम करणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून अभ्यासक्रम निर्मितीमध्ये योगदान देऊ शकेन.
विद्यार्थी कौशल्य विकास
शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी जागा नसून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी प्रयोगशाळा असली पाहिजे. "शिक्षा वह है जो जीवन के लिए तैयार करती है" यानुसार भी विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याचे शिक्षण देऊ शकेन. नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता यांसारख्या जीवन-कौशल्यांच्या विकासासाठी मी सहविचार सत्रे आणि कार्यशाळा आयोजित करू शकेन. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० नुसार मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये (6Cs) Critical thinking, Creative thinking, Collaboration, Communication, Confidence, Compassion विकसित करण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन करू शकेन.
क्रीडा आणि सांस्कृतिक विकासात मार्गदर्शन
'स्वस्थ शरीर में स्वस्थ मन वास करता है।' याचा अर्थ शारीरिक आणि मानसिक आरोग्य विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. अशैक्षणिक कामातून मुक्त झाल्यास मी विद्यार्थ्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अधिक मार्गदर्शन करू शकेन. 'शरीर माध्यम् खलुं सर्व साधनम्' या संस्कृत सुवचनानुसार सक्षम शरीर सर्व प्रकारच्या बाबींसाठी तयार असते. म्हणतात ना 'निरोगी शरीरात निरोगी मन वास करते'. यासाठी विविध समाजघटक, तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून घेऊन विद्यार्थ्यांचा क्रीडा व सांस्कृतिक विकास साध्य करू शकेन व भावी पिढी निरोगी आणि सुसंकृत बनवण्यात योगदान देऊ शकेन.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मदत
अशैक्षणिक कामामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला जातच माही. याचा परिणाम विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासावर झाल्याचे दिसून येते. विद्यार्थी अधिक आक्रमक, सहानुभूतीशून्य असे वागू लागले आहेत. याचा परिणाम समाजजीवनावर होत आहे. आधुनिक काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणे खूप महत्त्वाचे झाले आहे. 'मन के हारे हार है, मन के जीते जीत' यानुसार विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य त्याच्या जीवनातील यशस्वीतेत मोठी भूमिका बजावते. अशैक्षणिक कामातून मोकळीक मिळाल्यास, मी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुधारणेसाठी विशेष सत्रे आयोजित करून तज्ज्ञांच्या मदतीने मानसिक ताण-तणावावर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शन करू शकेन.
सामुदायिक संवाद आणि नेतृत्व
'शिक्षक समाज का मार्गदर्शक होता है' यानुसार सांगायचे झाल्यास समाजात घडणाऱ्या समस्यांवर शिक्षक सकारात्मक दृष्टिकोनातून उपाय शोधू शकतो, संवाद साधू शकतो. पर्यावरण संवर्धन, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करु शकतो. शिक्षक म्हणून मी समाजातील विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजाच्या उन्नतीसाठी काम करू शकेन. 'Unity is strength' नुसार समाजाला एकत्र आणून सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मी विशेष चर्चासत्रे आयोजित करू शकेन. शिक्षणविषयक योजनांमध्ये सहभाग घेतल्यास, मी समाजातील शिक्षणाची पातळी उंचावण्यासाठी मदत करु शकेन. विद्यार्थ्यांना सामुदायिक समस्यांवर जागरूक करून त्यांना समाजसुधारक म्हणून घडवण्यासाठी कार्य करू शकेन.
शिक्षकाच्या कर्तव्यामध्ये अशैक्षणिक कामे अडथळा ठरतात, परंतु त्यापासून मुक्ती मिळाल्यास शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आणि समाजाला अधिक परिणामकारकपणे घडवू शकतो.
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः गुरु: साक्षात् पर ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
यानुसार गुरुचे स्थान, दर्जा खूप उच्च आहे. गुरु हा ईश्वरासमान मानला आहे कारण तो जीवनाचा दीपस्तंभ आहे.
समाजाला घडवण्यासाठी शिक्षकाला वेळ आणि स्वातंत्र्य दिल्यास तो समाजाच्या विकासासाठी अनमोल योगदान देवू शकतो.
"A good teacher can inspire hope, ignite the imagination and instill a love of learning!" याप्रमाणे शिक्षकाचे कार्य समाजात आदर्श परिवर्तन घडवण्यासाठी अनिवार्य आहे.
यासाठी तो अशैक्षणिक कामातून मुक्त असायला हवा. अशा शिक्षकांप्रती विद्यार्थी व समाज सदैव ऋणी राहील....
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा....
-शशिकांत कुंभार
(शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2024 मराठी माध्यमातील प्रथम क्रमांक प्राप्त निबंध)
No comments:
Post a Comment