शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?
शिक्षणाचे पाईक आम्ही गुणवत्ता आमचा ध्यास।
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धरतो आम्ही प्रयत्नांची कास ॥
होय, आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. आनंददायी शिक्षणाची पणती हाती घेऊन या कोवळ्या विद्यार्थ्यांच्या मनातील ज्ञानज्योती पेटवणारे आम्ही शिक्षक. सद्यपरिस्थितीत शिक्षकांच्या बाबतीत ही बिरुदावली आपणास योग्य वाटते का ? विचार करून उत्तर दिल्यास... नाहीच! अशैक्षणिक कामांच्या प्रचंड ओझ्याखाली अतिशय दबावाने काम करणारा आजचा शिक्षक 'पारतंत्र्यात 'असून तो स्वतंत्र होऊन विद्यार्थ्यांच्या मनातील ज्ञानज्योत कधी पेटवणार ? याचे उत्तर सध्या आमच्याकडेही नाही. ज्या शिक्षणपद्धतीत शिक्षकास स्वातंत्र्य नाही, त्याचा विचार समाजातील विविध घटक करत असतात. ते शिक्षणपद्धतीस हसून नावे ठेवतील, परिवर्तनाची वाट पाहतील. 'गुणवत्ता' हा शब्द फक्त कागदावर न राहता विद्यार्थ्यांमध्ये पूर्णत्वास येण्यासाठी खरंच आम्हा शिक्षकांना 'स्वातंत्र्य' हवे आहे. फक्त आणि फक्त विद्यार्थी हितासाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी आम्हांला पुढील काही गोष्टींचे स्वातंत्र्य हवे आहे....
१. सृजनशील कार्य-स्वातंत्र्य
प्रत्येक शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी सृजनशील काम करीत असतो. लहान लहान वर्गकार्यातून त्याची सृजनशीलता दिसून येते, मात्र वर्गपातळीवरून शाळा, समाजापर्यंत जाऊन कार्य करण्याची त्याची क्षमता असते. शालेय प्रशासन त्याला कार्य करण्याचे स्वातंत्र्य देत नाही, त्यामुळे त्याची सृजनशीलता वर्गापुरती मर्यादित राहून त्याला आळा बसतो. 'स्व' पातळीवरून समाज, प्रशासनापर्यंत तो पोहचू शकत नाही.
२. विचारांचे स्वातंत्र्य
आपले अनुभव, आपल्या ज्ञानाच्या जोरावर शिक्षक विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव देत असतो. वर्गाच्या चार भिंतीतच हे अनुभव विद्यार्थ्यांना मिळतात. आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या शैलीत स्वातंत्र्य नाही. कारण शिक्षकांकडे 'विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून' बाकीची कामे करण्यासाठी वेळच नाही. या तणावामुळे वैचारिक स्वातंत्र्यावर बंधने येतात. वैचारिक स्वातंत्र्यावर सारखी बंधने येत राहिल्यास त्यांच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन न मिळता उदासीनता येते, म्हणून शिक्षकांस वैचारिक स्वातंत्र्य हवे.
३. शैक्षणिक स्वातंत्र्य
शिक्षणात वर्गातील वेळापत्रकापासून अभ्यासक्रम, अध्यापन साहित्य, तंत्रज्ञान उपयोगी, साधने, प्रगतीपुस्तकातील गुणवत्तेपासून प्रत्यक्ष वर्गातील गुणवत्ता साध्य होईपर्यंत सर्व शैक्षणिक कामे शिक्षकांनाच करावी लागतात. शिकवण्याच्या अध्यापन पद्धतीपासून वरील सर्व कामे करण्याचे शैक्षणिक स्वातंत्र्य शिक्षकांना मिळायला हवे, कारण ...
शाळा माझी, मी शाळेचा
प्रत्येक क्षण माझा, माझ्या विद्यार्थ्यांचा
विचार करूनी शिक्षणातील स्वातंत्र्याचा
उत्तुंग कळस चढविणार मी ज्ञानाचा......
४. व्यक्तिगत विकासाचे स्वातंत्र्य
शिक्षकांना त्यांच्याकडील कौशल्य व ज्ञान अद्ययावत करण्याचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्वातंत्र्य हवे. शिक्षकांना आजच्या शिक्षणपद्धतीत सातत्याने 'अद्ययावत' राहून स्वतः सह विद्यार्थ्यांचा विकास करायचा असतो. शिक्षकांनी स्वतःची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती साधल्यास नवनवीन शिक्षणपद्धती अंमलात आणता येतील. त्याचा उपयोग एका वर्गापूरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातल्या शाळेतील सर्व मुलांना होईल.
५. प्रशासनिक स्वातंत्र्य
काही वेळा शाळा किंवा शिक्षणसंस्थामधील (मग ते खाजगी असो वा सरकारी) अवास्तव / अमर्याद असा प्रशासनिक दबाव शिक्षकांवर पडत असतो. त्याची कारणे वैयक्तिक असतील वा सामूहिक. त्यामुळे शिक्षक, संस्था, प्रशासन यांमधील दरी वाढत जाते. वितुष्ट निर्माण होते. या गोष्टीचा परिणाम कधीकधी पूर्ण शाळेला भोगावा लागतो. त्यामुळे दबावाशिवाय मनापासून शिकविण्याचे प्रशासनिक स्वातंत्र्य शिक्षकांना मिळायला हवे.
६. अशैक्षणिक कामांपासून स्वातंत्र्य
अलीकडचीच ताजी घटना म्हणजे अशैक्षणिक कार्यांपासून मुक्तता मिळावी यासाठी १ ते १.५ लाख शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन, मोर्चा..... हे सर्व पाहिल्यास वाटते की, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये इतकी त्रेधातिरपीट चालू आहे की, 'आम्हांला आमचे काम करू घा' हे आंदोलन करून सांगावे लागते, तेही चांगल्या, योग्य कारणासाठी. प्रशासनाच्या पारतंत्र्यात अडकलेला आजचा शिक्षक. तो कधी कारकून होतो, मतदान अधिकारी होतो, सफाई कर्मचारी तर कधी शिपाई. वेळ मिळाल्यास 'शिक्षक' बनतो. अशा या द्विधा मनस्थितीत त्याच्या हातून साक्षर, सुसंस्कृत आजची पिढी कशी घडणार ? याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. एक, दोन नाही तर तब्बल दीडशे अशैक्षणिक कामांची यादी शिक्षकांच्या व्यथांमुळे तयार झाली आहे.
'शिकवणे' ही मूळ जबाबदारी सोडून बाकीची सर्व अशैक्षणिक काम केल्यास तुमचा 'पगार' चालू राहील. नाहीतर सर्व 'अनुदान रद्द !' असे आदेश धडकतात. मूळ शिक्षणाच्या जबाबदाऱ्या कमी होऊन शिक्षणातील रस या अशैक्षणिक कामांमुळे कमी होतो. म्हणून या कामांपासून कायमचे स्वातंत्र्य हवे.
अशैक्षणिक कामांचे ओझे
अशैक्षणिक कामांपासून मुक्ती न मिळाल्यास शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर ताण येऊन त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर होतो.
सृजनशीलतेमध्ये निरसता येऊन व्यवसायिक विकासात अडथळे निर्माण होतात. एकंदरीत कार्यक्षमतेत घट होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि समस्त समाजावर त्यांचे वाईट परिणाम होतात.
सांगायचे तात्पर्य म्हणजे शिक्षक हा समाजातील जबाबदार घटक म्हणून काम करत असताना त्याने 'मूलांत मूल होऊन शिकवले पाहिजे' हे वाक्य वाचून खरंच सद्यपरिस्थितीत वाईट वाटते. त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, समजून घेणे, त्यांच्यावरील ताण कमी करणे असे प्रशासनाला का वाटत नाही ? वाटत नसेल तर शिक्षकांनी संभाव्य चांगल्या बदलासाठी असहकार करणे, आंदोलन करणे यांतून विद्यार्थी, समाज काय बोध घेतील ? हे योग्य आहे का ? शिक्षण चांगले मिळण्यासाठी शिक्षणपद्धतीत सामंजस्यासारखे मार्ग निघत नसतील तर अशा शिक्षणाचा काय उपयोग ?
'अर्थपूर्ण स्वातंत्र्य'लाभलेला गुणी शिक्षक
संस्कारांनी घडविती उद्याचा बालक
उत्साही, निर्भय बनवूनी लावितो लळा
सृजनशीलतेने फुलवितो बालमळा.....
सुसंस्कृत असा बालमळा फुलविण्याचे 'पुण्य कार्य घडविण्यासाठी शिक्षक हा परिपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोनाने स्वतंत्र असावा. विचारस्वातंत्र्याने पारंपारिक शिक्षणपद्धती ओलांडून प्रभावी शिक्षण 'शिक्षकच' देऊ शकतो. मानसिकदृष्ट्या सक्षम शिक्षक प्रगल्भ दृष्टीकोनातून विचार करीत समस्या सोडवितो, विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो, त्यांचा बौद्धिक विकास साधतो. विचारस्वातंत्र्य हे शिक्षकांना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय शिकविण्याची मुभा देतो. उदा. वारे गुरुजींची वाबळेवाडी ही पहिली शाळा. कित्येक समस्यांना तोंड देत वारे गुरुजींनी आपली दुसरी शाळाही तेवढीच दर्जेदार बनविली आहे. त्यामुळे त्यांचे विचार 'MOLI'अध्ययन प्रशिक्षणांतून सर्वांपर्यंत पोहचले आहेत. या प्रेरणेतून शिक्षक स्वतःचे ज्ञान, अनुभव वाढवून शिक्षणपद्धतीचा कायापालट करण्यास उत्सुक आहेत, तर काही ठिकाणी काही शिक्षक निरुत्साही आहेत. असे शिक्षक स्वतः काही करत नाहीत, स्वातंत्र्यावर बोलतही नाहीत. "आमचं जे चाललयं ते बरं आहे, तुम्ही काय नवीन करायचे ते करा, आम्हांला काही सांगू नका," असेही काहीजण बोलतात.
विचारस्वातंत्र्य नसेल तर अपेक्षित अशा समाजहितासाठी, प्रगतीसाठी योगदान देणारे, व्यापक दृष्टीकोन असणारे, समोर असलेल्या आव्हानांवर विचार करणारे शिक्षक कसे तयार होतील ? त्यांचे विद्यार्थी कसे तयार होतील ? भारतातील सक्षम नागरिक पिढी कशी तयार होईल ? यावरही चिंतन करावे लागेल ? म्हणूनच आजच्या पिढीला 'स्वतंत्र विचाराने, नवकल्पना अंमलात आणून सुधारणा घडविणारा शिक्षक हवा आहे. तंत्रज्ञानामध्ये Techno addict' न होता 'Techno-savvy 'विद्यार्थी घडविणारा 'स्मार्ट' शिक्षक हवा आहे.
सध्याचे शिक्षण हे बालकेंद्रित शिक्षण असून ज्ञानरचनावादावर आधारित आहे, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षक आपली अध्यापन पद्धती बदलू शकतात. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणारे सक्षम विद्यार्थी आपल्याला तयार करायचे आहेत. शिक्षकांच्या कल्पकतेला चालना देऊन त्यांना संसाधने पुरविणे, प्रशिक्षण देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांना कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, जेणेकरून अपेक्षित वर्तनबदल घडवू शकतील, याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे.
शिक्षकाने 'मुलांना स्वतंत्रपणे विचार करून स्वतः शिकण्यास प्रवृत्त करणे, प्रोत्साहन देणे' गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक हा 'प्रामाणिक' - स्वातंत्र्याने काम करणारा असावा. अशाप्रकारचे शिक्षण आणि शिक्षक एकत्र आले तर विद्यार्थ्यांना जीवनातील खरे ज्ञान मिळू शकते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्याला जगाच्या व्यासपीठावर स्थान मिळवून दयायचे स्वप्न हे सध्याच्या आणि भविष्यातल्या शिक्षकांचे स्वप्न असावे. त्यासाठी ज्ञानदान करण्यासाठी तो स्वतंत्र असला पाहिजे, हो ना ? शेवटी एवढीच शिक्षक अपेक्षा व्यक्त करते की,
ज्ञानदानाचे कार्य करण्या
तत्पर सर्वदा स्वतंत्र' असेन मी...
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
स्वप्न हेच पाहीन मी.. पाहीन मी ।
धन्यवाद !
-नर्मदा नरेश कनकी
(शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2024 मराठी माध्यमातील प्रथम क्रमांक प्राप्त निबंध)