Saturday, 25 January 2025

प्रामाणिकपणाचा राजमार्ग

प्रामाणिकपणाचा राजमार्ग

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या वेळी पेपरफुटी, कॉपी, तोतयेगिरी अशा गैरमार्गांविरुद्ध बोर्ड मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, वेळ आणि पैसा खर्च करून पोलिस बंदोबस्त, भरारी पथके अशा उपाययोजना करत असते. काही विद्यार्थ्यांना गैरमार्गांनी त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त गुण मिळून इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये हा यामागचा हेतू असतो. पण हे करत असताना शिक्षणव्यवस्थाच विद्यार्थ्यांच्या पदरात पात्रता नसतानाही अन्य मार्गांनी गुण टाकण्याची व्यवस्था करत असते, याकडे मात्र दुर्लक्ष होते. मुळात प्रश्नपत्रिकांच्या अतिसुलभीकरणामुळे आणि अप्रामाणिक अंतर्गत मूल्यमापनामुळे परीक्षांच्या निकालांत आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांत प्रचंड प्रमाणात फुगवटा आला आहे. शाळेच्या पातळीवर मिळणाऱ्या गुणांवर किंवा श्रेणींवर तर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. अनेक शाळांत प्रयोग, प्रकल्प, तोंडी परीक्षा नीट घेतल्या जात नाहीत. तरीही वीसपैकी २० किंवा १९ गुण दिले जातात. श्रेणी विषयांच्या बाबतीत तर कोणतेही काम करवून न घेता श्रेणी दिल्या जातात. विद्यार्थ्यांची वर्षभरातील उपस्थिती ७५ टक्के असल्याचे सरसकट प्रमाणपत्र सर्वच शाळाप्रमुख देतात. पण वस्तुस्थिती तशी नसते, हे उघड गुपित आहे. कॉपी, तोतयेगिरी, पेपर तपासणीतील अप्रामाणिकपणा यांसाठी फौजदारी गुन्हे आणि कठोर शिक्षा यांची तरतूद आहे. पण शालेय स्तरावरील खोटी हजेरी, खोटे गुण आणि श्रेणी यांचे काय? खोटी माहिती देणे, त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून यंत्रणेची आणि एकूण समाजाचीच फसवणूक करणे असे गैरमार्ग शाळांकडून अवलंबले जातात आणि बोर्ड त्यांचे मूक साक्षीदार असते. यात काही चुकीचे आहे याची कोणाला जाणीवही नसते, इतक्या सर्वांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत.      

आजची मूल्यमापनपद्धती अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यांच्यापासून खूपच दूर गेली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी पास होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी साध्या साध्या अध्ययन क्षमतासुद्धा आत्मसात केल्या आहेत, असे दिसत नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर अहवालांत लिहिण्याची किंवा भाषणांत वापरण्याची बाबच राहिली आहे. आपला देश तरुणांचा देश आहे, ही आपण जमेची बाजू म्हणून सांगतो. पण कोणतीही कौशल्ये समाधानकारकरीत्या आत्मसात न केलेले तरुण देशाच्या काय कामाचे? आपल्या सर्वोत्कृष्ट म्हणून मानल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्थासुद्धा जागतिक स्तरावर खूपच खालच्या क्रमांकांवर असतात. सध्याच्या सदोष मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र सुधारणा झाल्याशिवाय अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत आणि पर्यायाने शिक्षणाच्या दर्जात कोणतीही सुधारणा अशक्य आहे.  

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आणि अभ्यासक्रम आराखड्यात शालेय स्तरावरील मूल्यमापन पद्धतीत अनेक बदल सुचवले आहेत. समग्र प्रगतिपत्रक हे या सर्व सुधारणा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे साधन ठरू शकेल. या उपाययोजनांबद्दलचे विवेचन या सदरातील यापूर्वीच्या अनेक लेखांत केले आहेच. यांच्यापैकी बऱ्याचशा उपाययोजना यापूर्वीसुद्धा अभ्यासक्रमांत बदल होताना वेळोवेळी लागू करण्यात आल्या होत्या. पण त्यांची अंमलबजावणी झाली आहे किंवा होत आहे ती फक्त कागदपत्रे आणि अहवाल तयार करण्यापुरतीच. केवळ लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठीच वर्गात शिकवले जाते आणि श्रेणींचे विषय, प्रात्यक्षिके, प्रकल्प, मूल्यशिक्षण, जीवनोपयोगी कौशल्ये यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. लेखी परीक्षेची विश्वासार्हता राहिलेली नाही आणि श्रेणीसुद्धा गुणांच्या आधारेच दिल्या जातात. या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवायचे असतील तर मूल्यमापनपद्धतीच्या अंमलबजावणीशी संबंधित संशोधन, शिक्षकांचे सखोल प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, शिक्षक, पालक, तज्ज्ञ आणि इतर संबंधित यांच्यासोबत व्यापक विचारमंथन या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्या लागतील. पण तेवढीच महत्त्वाची आहे बोर्डाच्या आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची अंमलबजावणीतील जबाबदारी. त्यासाठी या अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण द्यावे लागेल. अधिकाऱ्यांनी आणि तज्ञांनी शाळांना भेटी देऊन वेळोवेळी मूल्यमापनविषयक कामाचा आढावा घेणे, संशयास्पद मूल्यमापन ओळखण्यासाठी दर्शक विकसित करणे, संशयास्पद प्रकरणांची माहिती घेण्यासाठी तक्रार पेटी आणि तत्सम उपाययोजना राबवाव्या लागतील. मात्र सर्वांत महत्त्वाचा आहे तो सर्वच स्तरांवरील, विशेषत: अधिकाऱ्यांच्या स्तरावरील प्रामाणिकपणा. तो नसेल तर गैरमार्गच राजमार्ग होतील.

- डॉ. वसंत काळपांडे

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २७ नोव्हेंबर २०२४)

Saturday, 11 January 2025

तीनशेसाठ अंशांतून मूल्यमापन

तीनशेसाठ अंशांतून मूल्यमापन

महाराष्ट्रात एसएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या माध्यमिक शाळांत इयत्ता नववी ते बारावीमध्ये लेखी परीक्षांसोबतच या विषयांच्या प्रात्यक्षिके, तोंडी परीक्षा, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले काम अशा काही पैलूंचे मूल्यमापन करून २० टक्के गुण शाळेच्या स्तरावर दिले जातात. या विषयांव्यतिरिक्त शारीरिक शिक्षण व आरोग्य, समाजसेवा, स्काउट, कार्यशिक्षण अशा इतर सर्व विषयांना शाळेच्या स्तरावर श्रेणी दिल्या जातात. सध्याच्या मूल्यमापन पद्धतीत गेल्या पंधरा वर्षांपासून बदल होऊनही कुठेही समाधानाची भावना दिसत नाही. याची मुख्य कारणे म्हणजे शाळास्तरावर दिलेल्या गुणांत आणि श्रेणींत प्रामाणिकपणा नसतो आणि बोर्डाच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे यथायोग्य मोजमाप करण्यासाठी उपयोगाच्या नसतात. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण किंवा श्रेणी यांवरून ते नक्की काय शिकले, त्यांची बलस्थाने आणि मर्यादा काय आहेत, याचे वास्तव चित्र उभे राहत नाही. 

पारंपरिक लेखी मूल्यमापनपद्धतीतील त्रुटी लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमाच्या सर्व क्षेत्रांचे सर्व अंगांनी - ३६० अंशांतून मूल्यमापन करण्यासाठी समग्र प्रगतिपत्रका(Holistic Progress Card)ची संकल्पना मांडली आहे. एनसीईआरटीच्या PARAKH या विभागाने पायाभूत, प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक या चारही स्तरांसाठी त्या त्या टप्प्यावरील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या गरजा विचारात घेऊन समग्र प्रगतिपुस्तकांची प्रारूपे तयार केली आहेत. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि नैतिक विकास, समीक्षा, सर्जनशीलता, संवाद आणि सहयोग ही एकविसाव्या शतकाची कौशल्ये, जीवन कौशल्ये आणि इतर सॉफ्ट स्किल्स अशा विद्यार्थिविकासाच्या सर्वच अंगांचा त्यांत विचार केलेला आहे. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकणे ही कोणत्याही औपचारिक शिक्षणपद्धतीची लिटमस टेस्ट असते. त्यामुळेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या, त्यासाठीचे शिक्षण देणाऱ्या संस्था, प्रवेश परीक्षा, मुलाखत, बायोडेटा अशा बाबींची माहिती मिळवणे, आपल्या आवडीनिवडी आणि क्षमता कोणत्या व्यवसायासाठी योग्य आहेत, अशा अंगांनी समग्र प्रगतिपत्रकात नोंदी अपेक्षित आहेत. वैयक्तिक किंवा गटांतील प्रकल्प, शाळेत असतानाच शिकता येतील असे ऑनलाइन अभ्यासक्रम, वर्गाध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि वर्तन, वेळेचे व्यवस्थापन अशा विविध बाबतींत जागरूकता, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन अंगांनी मूल्यमापन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी कोणती लक्ष्ये किती कालावधीत साध्य करायचे ठरवले आहे, त्यासाठी ते स्वत: कोणते प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना घरून, शाळेतून आणि समाजातून कोणती मदत मिळू शकेल, यांबाबतचे मुद्देही समग्र प्रगतिपत्रकात आहेत. 

समग्र प्रगतिपत्रक भरताना शिक्षकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची असली तरी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या स्वयंमूल्यमापनालाही तेवढेच महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्याच्या सहाध्यायांची आणि पालकांची मतेसुद्धा योग्य त्या ठिकाणी या प्रगतिपत्रकात नोंदवली जातील. त्यामुळे इतरांमधील चांगल्या बाबींची नोंद घेण्याची सकारात्मक सवय सर्वच विद्यार्थ्यांना लागेल. पालकांनासुद्धा या प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे त्यांच्या आपल्या पाल्याबाबतच्या अपेक्षा कितपत पूर्ण झाल्या, त्याबाबतींत ते स्वत: काय करू शकतील आणि शाळेने काय करणे अपेक्षित आहे, याबद्दलची पालकांची जाण वाढायला, विविध अभ्यासक्षेत्रांतील पुढच्या संधींबाबतची स्पष्टता यायला मदत होईल आणि पालक आपल्या पाल्यांच्या विकासाकडे अधिक डोळस, वास्तव आणि खुल्या दृष्टिकोनातून पाहू शकतील. 

मूल्यमापन हा शिक्षणपद्धतीतील बदलांसाठी कळीचा मुद्दा आहे. समग्र प्रगतिपुस्तक विद्यार्थ्यांना आपण कसे शिकतो, हे डोळसपणे जाणून घेण्यासाठीचे (मेटाकॉग्निशनचे) आपल्या अध्ययनाचे आरेखन करण्यास मदत करणारे एक महत्त्वाचे साधन ठरू शकते. शिक्षकांना अध्यापनाची योग्य दिशा ठरवण्यासाठीसुद्धा ते महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांसाठीच तीनशेसाठ अंशांतून मूल्यमापन हे सर्वार्थांनी बहुगुणी असे साधन आहे. भविष्यात महाविद्यालयीन प्रवेशांसाठीसुद्धा समग्र प्रगतिपत्रकाचा उपयोग केला जाऊ शकेल. सीबीएसईने आपल्या शाळांसाठी या विषयावर काम सुरू केले आहे. आपल्या इथे मात्र काहीच हालचाल दिसत नाही. अचानक होतील असे हे बदल नाहीत. वर सुरवातीला दिलेल्या कारणांची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर खूपच पूर्वतयारी करावी लागेल. त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी काय करता येईल, हे पुढच्या लेखात पाहू.


- डॉ. वसंत काळपांडे 

( पूर्वप्रसिद्धी: दैनिक सकाळ, २० नोव्हेंबर २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...