Wednesday, 6 March 2024

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन- गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे लक्षण

 अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन- गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे लक्षण

 जेव्हा जेव्हा राष्ट्रीय, राज्य स्तरावरील विविध सर्वेक्षणे प्रकाशित केली जातात. तेव्हा प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे मुलांचा भाषा गणितामधील शिक्षणाचा दर्जा फारसा समाधानकारक जाणवत नसल्याचे आढळून येते. दरवर्षी विविध प्रकारची प्रशिक्षणे किंवा विविध साधनांची उपलब्धता शासन स्तरावरून शाळांना पुरविण्यात येते. तरीही गुणवत्ता उंचावत नसल्याचे जाणवते. यामागील कारणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न लेखातून करू या-

 'जीव तोडून शिकवण्यापेक्षा जीव जोडून शिकवा.' असे या ठिकाणी मी प्रकर्षाने म्हणेल- कारण जीव तोडून शिकवणे आणि जीव जोडून शिकवणे यात खूप मोठे अंतर आहे. जीव तोडून शिकवणे म्हणजे केवळ शिक्षकाने आपले श्रम व्यर्थ वाया घालवणे होय. 'जीव जोडून शिकवणे म्हणजे श्रम निमपट, यश दुप्पट आणि आनंद तिप्पट' या गोष्टीचे गमक म्हणजे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन होय. कोणत्याही गोष्टीचे यश हे व्यवस्थापन, नियोजन व नेतृत्वावर अवलंबून असते .


'एखादे मूल सात वर्षे माझ्याकडे सोपवा, त्यानंतर ते मूल परमेश्वर अथवा सैतान कोणीही न्यावे. ते त्या मुलाला बदलू शकत नाहीत.' पेस्टालॉजी या ग्रीक शिक्षकाचे हे उद्गार डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 'अगम्य जिद्द' या पुस्तकात उद्धृत केले आहेत. यावरून प्राथमिक शिक्षणातील वर्षे किती महत्त्वाची आहेत हे या विधानावरून लक्षात येईल. या काळातील शिक्षणाचा ठसा आयुष्यभर कायम राहतो. त्याला कशासाठी शिकायचे याचे रहस्य उलगडते. त्याला कसे शिकायचे याचे मार्ग आपोआप सापडतात. एखाद्या वर्गात तीस ते चाळीस विद्यार्थी शिकत असले तरी वर्गअध्ययनाचे व्यवस्थापन जमले तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण नाही आणि त्यातून साध्य होणारी उद्दिष्टे भविष्याचा वेध घेणारी असतील यात मात्र शंका नाही .

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण शंभर टक्के शिक्षकांना देणे सुरू आहे आणि मला खात्री आहे या प्रशिक्षणानंतर अध्ययन प्रक्रियेत मुळापासून बदल होतील आणि शंभर टक्के शिक्षक ते बदल स्वीकारतील. हे बदल या प्रकारचे असतील. 

मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे-

 मूल लहान असताना सायकल शिकते व खूप साऱ्या बाबी मित्रांच्या मदतीने शिकते. या गोष्टी शिकण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे कोचिंग लावण्याची गरज नसते. तर या ठिकाणी आपण ती बाब शिकावी याकरता तो धडपड करत असतो या धडपडीत तो मार्गदर्शकाच्या शोधात असतो आणि त्याच्या मनातील शिकण्याची ज्वलंत इच्छा त्याला शिकण्यासाठी प्रेरित करीत असते आणि या इच्छेतून तो खूप साऱ्या गोष्टी मित्रांकडून शिकतो. हाच धागा पकडून मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे हे शिक्षकापुढील मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान जे शिक्षक पूर्ण क्षमतेने पेलतात त्यांची मुले खूप प्रगती करतात.

 मुलांना शिकण्यास आव्हान देणे-

 भुंगा हा भौतिकशास्त्राच्या नियमानुसार उडू शकत नाही कारण त्याच्या शरीराचे वजन हे खूप जास्त आहे त्या तुलनेत पंख फार छोटे,पातळ. परंतु, भुंग्याला भौतिकशास्त्राचे नियम कुठे माहीत असतात? त्याला एवढेच माहीत असते की मला पंख आहेत ते उडण्यासाठीच आणि त्याच इच्छेने तो उडू शकतो. १९९५ साली क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आला आणि पाचव्या वर्गापर्यंत ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ८५ टक्के क्षमता प्राप्त कराव्या ही किमान अपेक्षा होती. ८५ टक्केच विद्यार्थी ८५ टक्के क्षमता प्राप्त करु शकतात हा विचार शिक्षकांनी मनामध्ये पक्का रुजवला.अशा प्रकारे हे शक्य नाही, ते शक्य नाही हे मुलांना कुठे माहीत असते. त्यांच्या मनावर ते विविध माध्यमातून बिंबवले जाते. मग भुंग्यासारखे निर्मळ मन असणाऱ्या मुलांना त्यांच्यातील सुप्त क्षमतेची जाणीव करून देणे हेच शिक्षकाची खरे कर्तव्य आहेत आणि जो शिक्षक हे कार्य करतो त्याची विद्यार्थी कुठलेही आव्हान स्वीकारतात व पूर्ण करतात. मी सांगतो तेच करा,तसंच करा ही पद्धती आता बंद झालेली आहे. मुलांजवळच निसर्गाने खूप क्षमता दिलेल्या आहेत त्या क्षमतांची उकल जरी शिक्षकाने करून दिली तरी पुरेसे आहे. तुम्ही आजपर्यंत जे करत होतात तेच करत राहिला तर तेच मिळेल जे आजपर्यंत तुम्हांला मिळत होते. नवीन काहीतरी मिळवण्यासाठी नवीन काहीतरी करावे लागते हे मात्र खरे आहे.

अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनात ड्रिप एज्युकेशन ही संकल्पना फार महत्वाची आहे.ज्याप्रमाणे कमी कालावधीत, कमी पाण्यात, कमी श्रमात ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) साध्य केल्या जाऊ शकते. त्याचप्रमाणे कमी साधनात, कमी कालावधीत, कमी श्रमात ड्रिप एज्युकेशनच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य केल्या जाऊ शकते.प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो. त्यासाठी जीव तोडून नाही तर जीव जोडून शिकवणे महत्वाचे आहे.कारण जी कोणती अडचण विद्यार्थ्यांना येत आहे ती का येत आहे याचा सर्वार्थाने विचार आपण करणार नाही तोपर्यंत आपण त्या समस्येच्या मुळाशी जाऊ शकणार नाही.त्यासाठी आपण बालक होऊन मी जर त्याठिकाणी असतो तर माझी काय घालमेल झाली असती हा विचार जर शिक्षकाने स्वतःला विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ठेवून केला तर त्याचे उत्तर मिळणे कठीण नाही.

आपण सद्यस्थितीत स्वीकारलेली आकारिक मूल्यमापन पद्धती ही १९८० मध्ये फिनलंड या देशाने टोयोटा या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीतून विकसित केलेली पद्धती आहे. संपूर्ण गाडी तयार झाल्यानंतर तिच्या निर्मितीत राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे हे किती डोकेदुखी आहे.ल, हे कंपनीच्या मालकालाच माहीत. म्हणून गाडी तयार करतानाच प्रत्येक टप्प्यावर राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे किती सोपे व फायदेशीर आहे याचा विचार करून प्रत्येक टप्प्यावर मूल शिकत असताना त्यात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे फिनलंडला सोपे वाटले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आकारिक मूल्यमापन पद्धतीला सुरुवात केली. अशाचप्रकारे गुणवत्ता हवी असेल तर प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक शिक्षकाने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन साधले तर गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणे अशक्य नाही.आपल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी शिकू शकतात हा सकारात्मक विचार सर्वप्रथम शिक्षकाजवळ असला पाहिजे. या विचारातून विद्यार्थी शिकत नसेल तर का शिकत नसेल याचे चिंतन, मनन करुन विद्यार्थी स्वतः शिकण्यास प्रेरित कसा होईल या दिशेने वाटचाल करुन प्रत्येक टप्प्यावर चिंतन करुन शिकण्यासाठी बाधा येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर गतिमान करण्यासाठी आपण सकारात्मक विचार केल्यास निश्चितच यशस्विता मिळते. मीच शिकवू शकतो हा दृष्टिकोन बाजूला ठेवून विद्यार्थी-विद्यार्थी जोड्या लावून विद्यार्थी कसा शिकतो याचे नियोजन करुन विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करणे हाच टप्पा महत्त्वाचा आहे.कारण शिक्षकांच्या शिकवण्याने विद्यार्थी शिकले असते तर शंभर टक्के विद्यार्थी का शिकत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित का राहावा?

 -राजेश वासुदेव कोगदे

yashkogade@gmail.com

 जि.प. म. उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता.-खामगाव जि. -बुलढाणा.


(पूर्व प्रसिद्धी: दैनिक  देशोन्नती ११ जानेवारी २०२४)

No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...