Saturday, 11 November 2023

स्वतःला समृद्ध करण्याचा काळ


स्वतःला समृद्ध करण्याचा काळ



' दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा " ही म्हण आमच्या पिढीतील म्हणजे नव्वदच्या दशकात विद्यार्थी राहिलेल्या आणि त्याही आधीच्या पिढीने अनुभवली आहे. आज काळ बदलला आहे. पालक आणि मुले गुणांच्या मागे धावताना सण आणि एकूणच जगण्यातला आनंदापासून दुरावत असल्याचे स्पष्ट जाणवते आहे. मामा गावाला जाणं अलीकडच्या मुलांचे अगदी नावालाच उरले आहे. 

दिवाळीच्या परीक्षा संपल्या की शाळेचे दप्तर अडगळीत टाकून देत तीन चार आठवडे नुसती मज्जा करत हिंडणारे आम्ही. आज मात्र पालक म्हणून मुलांशी बोलताना त्याच्या सुट्टीतील एक एक दिवस अभ्यासाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे ते पटवून देत असतो.

आज शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत मुलाला टिकायचे आहे यासाठी सर्वांची धडपड चालली आहे,  मुलांचे वेगवेगळे क्लास, शाळेचे सुट्टीचा म्हणून दिलेला भरपूर अभ्यास पूर्ण कण्याताच मुलांची सुट्टी संपून जाते आणि पुन्हा त्यांचे ते घड्याळाच्या काट्यावर चालणारे वेळापत्रक सुरू होते. हे वास्तव ही नाकारता येत नाही. पण त्यातही मुलांची सुट्टी आणि अभ्यास कसा आनंददायी होईल याचा विचार पालकांनी करायला हवा. अभ्यासाबरोबरच इतर काही गोष्टी आहेत, त्या केल्याने मुलांचे व्यक्तिमत्त्व सुंदर होईल.

दिवाळी अंकांचे वाचन

दिवाळी म्हटले नवे कपडे, फराळ, फटाके हे ओघाने येतातच तसेच दिवाळी आणि दिवाळी अंकांचे ही एक अतूट नाते आहे. मोठ्यांप्रमाणे छोट्यांचेही बाजारात सुंदर आणि वाचनीय दिवाळी आले आहेत. किशोर, श्यामची आई, वयम, चंपक आदी मुलांसाठी असलेले अंक पालकांनी घरी आणावे. मुलांच्या अवडी नुसार ते वाचू दिले पाहिजेत. यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि ही वाचन आवड त्यांच्या अभ्यासासोबत व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक ठरेल.

पालकांनी मुलांना वेळ द्यावा

दिवाळी या सणानिमित्त पालकांनी आपल्या मुलांना वेळ द्यायला हवा, दिवाळीचा सण आणि त्यानिमित्त असलेल्या सुट्ट्या ही मुलांशी अनौपचारिक संवाद साधण्यासाठी पालकांना एक चांगली संधी असते. त्यामुळे या काळात अभ्यास,शाळा, प्रगती, गुण हे विषय जरा बाजूला ठेवून  पालकांनी मुलांशी सकारात्मक संवाद साधायला हवा. यामुळे मुले आनंदित राहतील आणि त्यांचा परिणाम मुलांच्या अभ्यासातही जाणवेल. फकत पालकच नाही तर मामा, आत्या, मावशी, आजी, आजोबा यांच्या सोबतही मुलांना वेळ घालू द्यायला हवा.

छंद, आवड आणि कला

दिवाळी सुट्टीच्या काळात मुलांना ज्या विषयाची आवड आहे, छंद आहे त्यासाठी पालकांनी वाव द्यायला हवा, विद्यार्थी एखादी कला शिकत असेल तर त्याला त्या क्षेत्रातील उत्तमतवाची भेट करून द्यायला. त्या कला प्रकारातील नवनवीन बाबी शिकण्यासाठी किंवा समजावून घेण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करायला हवा. कला ही विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवते, सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो. प्रत्येक गोष्ट गुणांच्या तराजूत मोजता येत नाही. गुणांच्या पलिकडेही एक जग असते. त्या जगाकडे मुलांना घेऊन जाण्यासाठी हा सुट्टीचा काळ महत्त्वाचा आहे.

मोबाईलविना सुट्टी

या सुट्टीच्या काळात बऱ्याचदा पालकच मोबाईल, टिव्ही पाहण्यात व्यस्त असतात. मुलेही मग पालकांचे अनुकरण करतात. या सुट्टीच्या काळात पालक आणि मुलांनी मोबाईल, कॉम्पुटर,, टिव्ही बघणे अर्थात स्क्रीन बंदच ठेवावा.  स्क्रीन टाईम कमी झाला की घरातील संवाद आपोआप वाढीस लागतो. मोबाईल विना सुट्टी म्हणजे स्वतः ला जाणून घेण्याची आणि नवीन काहीतरी शिकण्याची संधी असेल.

संकल्पना दृढ होतील

 दिवाळी सुट्टीतील अभ्यास बऱ्याचदा सराव किंवा घोकंपट्टी  स्वरूपाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह येतो. तोच तो अभ्यास मुलांना रटाळवाणा वाटतो. मग मुलांची चिडचड होते. त्यासाठी दिवाळीचा अभ्यास हा संकल्पना दृढीकरण असावा. शाळेत किंवा क्लास मध्ये मुलांना अभ्यासाक्रमातील ज्या संकल्पना गेल्या काळात मुलांना स्पष्ट झाल्या नाहित, त्या संकल्पना घरी सुट्टीच्या काळात पुन्हा नव्याने समजावून घेता येऊ शकता. पालक हे मुलांकडे अभ्यासाचा आग्रह करताना दिसतात पण त्या संकल्पना विद्यार्थ्याना समजतील  असा अभ्यास करावा.

थोडक्यात, मुलांनी दिवाळी सुट्टीचा काळ हा स्वतःला समृद्ध करण्यासाठी उपयोगात आणावा.

-डॉ रूपेश चिंतामणराव मोरे

लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.

( पूर्वप्रसिद्धी दै. महाराष्ट्र टाइम्स , दिनांक ११/११/२०२३) 

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...