Saturday, 31 August 2024

मराठीच्या शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी काय हवे?

मराठीच्या शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी काय हवे?

वेगवेगळ्या बोली बोलणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी प्रमाण मराठीचा विस्तार करायचा झाला, तर ते काम त्या त्या ठिकाणच्या शिक्षकांनीच करावे, असे अनेकांना वाटते. शिक्षकांनी याबाबत उदार धोरण ठेवावे, हे खरे, पण एकेका शिक्षकाने वेळोवेळी आपल्या मनाने घेतलेले निर्णय प्रमाण भाषेच्या विस्तारासाठी पुरेसे नाहीत. ती एक मोठी भाषावैज्ञानिक जबाबदारी आहे. तिचा सगळा भार त्या त्या जागी काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांवर टाकता येणार नाही. खरे तर त्यांच्यासाठी भाषातज्ज्ञ आणि मराठीसाठी काम करणाऱ्या शासकीय, अशासकीय संस्थांनी आवश्यक तो आधार पुरवला पाहिजे. 

प्रमाण मराठी म्हणजे केवळ बिनचूक लेखन आणि व्याकरणशुद्ध वाक्यरचना इतकेच नाही, ती तर केवळ सुरवात आहे; आणि बोली भाषेतील कोणतेही शब्द अधूनमधून वर्गात, पाठ्यपुस्तकांत वापरणे म्हणजे प्रमाण मराठीचा विस्तार असेही नाही. कोणते शब्द, रचना स्वीकारायच्या, त्यासाठी निश्चित भाषावैज्ञानिक निकष हवेत. ते प्रत्येकाने आपल्या मर्जीनुसार ठरवले, तर मुलांचा फायदा होण्याऐवजी गोंधळच होईल. उदाहरणार्थ, मराठीत ‘खूप’ या शब्दाला ‘भरपूर, पुष्कळ, विपुल, आणि रगड, बक्कळ, लई, मस, मायंदळ, मोप’ असे अनेक पर्याय आहेत. त्यातले कोणकोणते कोणत्या औपचारिक/अनौपचारिक संदर्भात स्वीकारायचे आणि का, कोणत्या इयत्तेपर्यंत स्वीकारायचे, याबाबत एकसूत्री धोरण हवे. मराठीच्या काही बोलींत स्त्रियादेखील ‘मी जातो, करतो’ अशी पुल्लिंगी क्रियापदे वापरतात. ही रूपे प्रमाण मराठीची रूपे म्हणून वर्गात मुद्दाम शिकवली जाऊ शकत नाहीत. पण ‘केले जाते, दिले गेले’ या ऐवजी ‘केल्या जाते, दिल्या गेले’ ही वैदर्भी रूपे पर्याय म्हणून देता येतील का, यावर विचार व्हायला हवा. बोलींच्या वापराला प्रोत्साहन म्हणजे, मराठीत रुळलेल्या पारिभाषिक शब्दांचा अपभ्रंश होऊन बोलींत वापरली जाणारी रूपे लेखी स्वरूप देऊन ती पाठ्यपुस्तकांत आणणे असा अर्थ काढणेही योग्य होणार नाही. 

आपले काम करताना प्रमाण-स्वीकारार्ह-अस्वीकारार्ह, योग्य-अयोग्य, बरोबर-चूक या प्रश्नांचा रोज सामना करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काय काय करायला हवे आहे?

आधुनिक मराठीच्या प्रादेशिक आणि इतर बोलींचा अभ्यास करून प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती, वापर, स्वीकारार्हता दर्शवणारा एक मोठा बृहत्कोश तयार करणे फार गरजेचे आहे. नंतर त्याच्या प्राथमिक तसेच प्रगत स्तरावर उपयोगी अशा वेगवेगळ्या आवृत्त्याही तयार कराव्या लागतील. त्या सर्व शाळांना, शिक्षकांना उपलब्ध करून द्याव्या लागतील. 

• याच अनुषंगाने प्रमाण मराठी आणि तिच्या बोली यांची विस्तृत वर्णनात्मक व्याकरणे तयार करावी लागतील. त्यांचा आधार घेऊन शालेय आणि इतर वापरासाठी स्तरनिहाय लहानमोठी सुटसुटीत व्याकरण पुस्तके तयार करून, औपचारिक किंवा विशिष्ट संदर्भात स्वीकारार्ह आणि अस्वीकारार्ह शब्द, रचना अशा बाबी स्पष्ट कराव्या लागतील. 

• लेखनविषयक नियमांचा ठराविक काळाने आढावा घेऊन त्यात आवश्यक ती सुधारणा करणे आणि त्या सर्वांच्या माहितीसाठी सहज उपलब्ध करून देणे, यासाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करावी लागेल. 

• प्रमाण मराठी उच्चार स्वतःचे स्वतः शिकता यावेत, पाहता-ऐकता यावेत, यासाठी उच्चारकोश (प्रोनाउन्सिंग डिक्शनरी) तयार करून ते डिजिटल माध्यमातून सर्वांना सहज उपलब्ध करून द्यावे लागतील. 

• जे शिक्षक आपापल्या भागांत बोलींच्या संदर्भात उत्तम काम करत आहेत, त्यांना आपले काम इतरांसामोर मांडता यावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे यासाठी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे लागेल. 

• प्रमाण आणि बोली यांच्याविषयीचे धोरण आणि तपशील शिक्षक, पालक, प्रशासकीय अधिकारी यांच्यापर्यंत पोचेल यासाठी वेळोवेळी काही उद्बोधन सत्रे, कार्यक्रम घ्यावे लागतील. 

या सगळ्या फार दीर्घकालीन योजना झाल्या, त्यांचा आत्ता काय उपयोग, अशी एक प्रतिक्रिया यावर येऊ शकते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्यात खूप उदात्त ध्येये, उद्दिष्टे ठेवली आहेत. आमूलाग्र बदलाची (पॅराडाइम शिफ्ट) अपेक्षा आहे. त्यासाठी वरवरचे, तात्पुरते उपाय पुरणार नाहीत. दीर्घकालीन पायाभरणी केली, तरच समाजातील आणि पर्यायाने शाळांमधील विद्याविषयक व्यवहाराला योग्य ती दिशा मिळेल.


- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १७ जुलै २०२४)

Saturday, 24 August 2024

'प्रमाण मराठी'चा परीघ

'प्रमाण मराठी'चा परीघ

प्रमाण मराठीचा विषय निघाला की पुष्कळदा दोन टोकाच्या प्रतिक्रिया असतात. एक अर्थातच चिंता व्यक्त करणारी आणि आता भाषा कशी अशुद्ध होत चालली आहे, छोट्या हॉटेलमधील पाट्यांपासून ते पाठ्यपुस्तकांपर्यंत सर्वत्र ‘भाषाशुद्धी’ केली पाहिजे, इंग्रजी-हिंदी किंवा बोली भाषेतील शब्द काढून टाकले पाहिजेत या स्वरूपाची असते. दुसरी याच्या पूर्ण विरोधी, म्हणजे प्रमाण भाषा हे सांस्कृतिक वर्चस्व गाजवण्याचे साधन आहे, असे समजून फक्त प्रादेशिक आणि इतर बोलींचा पुरस्कार करणारी असते. ही दोन्ही टोके मराठीच्या नैसर्गिक विकासाला अटकाव करणारी आहेत.

सर्वांना शिक्षणाची समान संधी हे लोकशाही तत्त्व खऱ्या अर्थाने स्वीकारायचे असेल, तर प्रदेश, वर्ग, व्यवसाय, सांस्कृतिक फरक यामुळे भाषेत होणारे बदलही त्यांमधे कोणतीही उतरंड न लावता स्वीकारले पाहिजेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आणि अभ्यासक्रम आराखड्यातही ‘प्रमाण’ भाषा, अशुद्ध भाषा असा काही उल्लेख नाही. इतकेच नाही, तर भाषा आणि बोली असाही भेद करण्यात आलेला नाही. उलट स्थानिक बोली, लोकभाषा यांच्या वापराला प्रोत्साहन दिलेले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर दैनंदिन शिक्षणव्यवहारात वेळोवेळी पुढीलप्रमाणे अनेक प्रश्न उभे राहतात -- त्या त्या व्यक्तीच्या उच्चारांवरून भाषेतील फरक लगेच लक्षात येतो, त्याला किती महत्त्व द्यायचे? उदाहरणार्थ, ‘न’ आणि ‘ण’ किंवा ‘त्यांना’ आणि ‘त्यान्ला’ असे फरक बदलण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायचा की नाही? करायचा नसल्यास त्याचे फायदेतोटे काय आहेत? करायचा झाल्यास तो कधीपासून आणि कशा प्रकारे करायचा? लेखी भाषेतही असे निर्णय घ्यावे लागतात. मुलांनी निबंध पाठ्यपुस्तकांतील भाषेत लिहावेत की स्वतःच्या बोली भाषेत? दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत बोली भाषेतील निबंध मान्य होतील का? मान्य झाले तरी ते तपासणारे शिक्षक दुसऱ्या भागातील असतील, तर काय अडचणी येतील? प्रमाण लेखी भाषेची तयारी कोणत्या इयत्तेपासून सुरू करावी? पाठ्यपुस्तकात कोथिंबीर, दुधीभोपळा असे शब्द वापरलेले असले, आणि मुले सांभार, लौकी असे शब्द उत्तरांत वापरत असतील, तर त्यावर लाल पेनाने काट मारावी का? कोणत्या इयत्तेत मारू नये? पाठ्यपुस्तक लेखकांनी ‘कार्बन-डाय-ऑक्साइड’ म्हणावे की ‘कर्ब-द्वि-प्रणिल’ वायू म्हणावे? हे प्रश्न क्षुल्लक वाटले, तरी त्यांची उत्तरे शिक्षणप्रक्रियेवर मोठा प्रभाव टाकतात.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात प्रमाण भाषेचा आग्रह नसला, तरी भाषेवरील प्रभुत्व, प्राविण्य, सफाई, प्रभावी संवादकौशल्य, विविध प्रकारच्या साहित्याचे विश्लेषण आणि चिकित्सक चर्चा, असे अनेक उल्लेख विशेषतः माध्यमिक स्तरावरील ध्येये आणि उद्दिष्टांत आहेत. या बाबी प्रमाण भाषेशी निगडित आहेत. तसेच मराठीतील शैक्षणिक, वैचारिक, वैज्ञानिक साहित्यही आज प्रमाण मानल्या जाणाऱ्या भाषेतच उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मुलांचे शिक्षणही त्याच प्रमाण भाषेच्या परिघात होते. मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या सगळ्या मुलांचा एकत्रित विचार केला, तर आज हा परीघ विस्तारण्याची फार गरज आहे. 

शेवटी प्रमाण भाषा म्हणजे तरी काय, तर भाषेच्या ज्या स्वरूपाचे सर्वमान्य व्याकरण नोंदलेले आहे, ज्यासाठी शब्दकोश आणि संदर्भसाहित्य उपलब्ध आहे, ज्यात भरपूर ललित वाङमय, वैचारिक, विज्ञान-तंत्रज्ञानविषयक साहित्य उपलब्ध आहे, रेडिओ-टीव्ही-प्रसारमाध्यमे, वर्तमानपत्रे अशा ठिकाणी सर्वांच्या सोयीसाठी जे स्वरूप वापरले जाते, ते प्रमाण. या सर्व साधनांमुळे हे प्रमाण तुलनेने स्थिर राहत असले, तरी प्रमाण भाषा हीसुद्धा एक भाषाच आहे. तीही प्रवाही असतेच. आणि जिथे शिक्षण आणि विद्याविषयक व्यवहारात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षकही नव्यानेच सहभागी होत आहेत, तिथे ती प्रयत्नपूर्वक प्रवाही ठेवलीही पाहिजे. बोली आणि प्रमाण भाषा या परस्परविरोधी नसून परस्परपूरक मानल्या पाहिजेत. प्रादेशिक आणि इतर फरकांची नोंद घेऊन ते ते शब्द, वाक्प्रचार, गरज असेल तिथे वाक्यरचनांचाही समावेश करून कोश, व्याकरण, इतर साहित्याचे अभ्यासपूर्वक पुनर्लेखन केले पाहिजे. त्याचबरोबर पारिभाषिक शब्दांसाठी कृत्रिम आणि अवघड भाषांतरे शोधण्यापेक्षा प्रचारातील इंग्रजी शब्दांनाही आपलेसे केले पाहिजे. प्रमाण मराठीचा विस्तार केल्याने मुलांचे शिक्षण तर सोपे होईलच, शिवाय मराठी भाषेची समृद्धीही पूर्णांशाने लोकांसमोर येईल.


- धनवंती हर्डीकर

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १० जुलै २०२४)

Saturday, 17 August 2024

वर्गातील संवादाची भाषा

वर्गातील संवादाची भाषा

वर्गाध्यापनात मुख्यतः शिक्षकांनी बोलायचे, स्पष्टीकरण द्यायचे, मुलांनी विचारले तेव्हढ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायची, ती प्रमाण भाषेत आणि शक्य तितकी बिनचूक द्यायची हा पारंपरिक शिक्षणातील आदर्श होता. मात्र अशा साचेबंद संवादामुळे मुलांच्या विकासावर, स्वयंप्रेरणेवर मर्यादा पडतात हे आता स्पष्ट झाले आहे. विशेषतः प्राथमिक स्तरावर मुलांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत -  मग ती कितीही तोडकीमोडकी का असेना -  भरपूर बोलावे, स्वतःचे विचार, भावना व्यक्त कराव्यात, शंका विचाराव्यात, वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी बोलून गटाने किंवा जोडीने समस्यांची उकल करावी, प्रयोग करावे, शैक्षणिक खेळ खेळावे याला आता फार महत्त्व आहे. म्हणजेच वर्गात शिक्षक-विद्यार्थी असा फक्त एकतर्फी संवाद न होता, शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-शिक्षक,  विद्यार्थी-विद्यार्थी असे संवाद औपचारिक, अनौपचारिक अशा दोन्ही स्वरूपांत आणि मोकळ्या वातावरणात घडून येणे अपेक्षित आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही शिक्षकांनी सुरवातीपासूनच सतत औपचारिक, प्रमाण भाषेचा आग्रह न धरता मुलांना समजेल, आपलीशी वाटेल अशी भाषा वापरावी यावर भर देण्यात आला आहे. बोलताना मुलांच्या चुका झाल्या तरी त्यांना नाउमेद न करता शिक्षकांनी हळूहळू प्रमाण भाषेकडे नेणारा पूल बांधावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुलांच्या रोजच्या बोलण्यातील भाषा आणि माध्यम भाषा – मग ती इंग्रजी, प्रमाण मराठी अशी कोणतीही असो – यांत खूप फरक असेल तर शिक्षकांना हे काम पूल बांधण्याचे काम अधिकच कुशलतेने आणि संवेदनशीलतेने करावे लागते. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे?  वर्गातील संवाद आणि भाषा यांच्यातील हे बदल खरोखर घडत आहेत का? हे बदल स्वीकारण्याची, त्यासाठी वेगवेगळी तंत्रे वापरण्याची शिक्षकांची मानसिक आणि भाषिक तयारी किती आहे, त्यावर वर्गातील संवादाचा आणि पर्यायाने मुलांच्या पदरात पडणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अवलंबून असला तरी बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची अशी तयारी नाही, असे दिसते. ती तयारी करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या हाताशी त्या त्या बोली भाषांमधील किंवा बोली-प्रमाण, मातृभाषा-माध्यमभाषा असे द्वैभाषिक स्वरूपाचे विपुल साहित्य असले पाहिजे ही गरज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेली आहे. त्याशिवाय शिक्षकांना आपल्या शाळेच्या भागातील बोलीभाषा किमान कामापुरत्या तरी सहज शिकता येतील अशी ऑनलाइन किंवा इतर प्रकारे सोय करणे, यशस्वी शिक्षकांनी वापरलेल्या तंत्राची देवघेव करता येईल, त्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल अशी व्यासपीठे, संधी निर्माण करणे असेही उपाय करता येतील. शिक्षकांना प्रमाण भाषा लिहिण्याबोलण्यात अडचण असेल, तर त्यासाठी त्यांच्या गरजांवर आधारित वेगवेगळे कोर्सेस आणि संदर्भ साहित्य उपलब्ध करून देणे, स्वयं-मूल्यमापनाच्या सुविधा पुरवणे, हेही करावे लागेल.

इंग्लिश भाषेच्या बाबतीत तर या अनुषंगाने प्रचलित पद्धती, समजुतींचा फेरविचार करण्याची विशेषच गरज आहे. इंग्लिशच्या तासाला फक्त आणि फक्त इंग्लिशच बोलले पाहिजे हा आग्रह लहान मुलांच्या अभिव्यक्तीला आणि बऱ्याचदा त्यांच्या शिक्षकांच्याही अभिव्यक्तीला मारक ठरतो आणि वर्गातील सगळा संवाद कृत्रिम, अतिशय मर्यादित होऊन जातो. याउलट कोणत्या प्रश्नांचे प्रतिसाद फक्त इंग्लिशमध्ये घ्यायचे आणि कोणत्या विचारप्रवर्तक बाबींची चर्चा द्वैभाषिक, मिश्र भाषिक रीतीने घडू द्यायची याची योग्य आखणी केली, तर मुलांची अभिव्यक्ती आणि विषयाची समज दोन्ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतील.

वर्गात मुलांना चुकतमाकत बोलायची परवानगी हवी, पण शिक्षकांना मात्र ती नाही, याचेही भान फक्त इंग्रजीतून बोलण्याचा अट्टाहास धरताना राहत नाही. ते ठेवले पाहिजे, कारण मुले ऐकून ऐकून शिक्षकांच्या चुकाही आत्मसात करतात. वर्गात दडपून चुकीचे इंग्लिश बोलणाऱ्या शिक्षकांपेक्षा ठरावीक कामांसाठीच पण प्रयत्नपूर्वक बरोबर इंग्लिश बोलणारे आणि इतर वेळी मुलांची भाषा वापरणारे शिक्षक कितीतरी चांगले! त्याखेरीज डिजिटल साधने वापरून मुलांना उत्तम इंग्लिशचे भरपूर नमुने ऐकवणेही आज सहज शक्य आहे. हे मार्ग वापरून मुले आपल्यापेक्षाही सरस इंग्लिश बोलू शकतील अशी तरतूद शिक्षक आज करू शकतात. वर्गातील संवादाला अकृत्रिम पण दर्जेदार स्वरूप देणे ही शैक्षणिक परिवर्तनाची पहिली पायरी मानली पाहिजे.

- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, ०३ जुलै २०२४)

Wednesday, 14 August 2024

स्त्री शिक्षणाचे आकाश ठेंगणे

 स्त्री शिक्षणाचे आकाश ठेंगणे

"Women's education is the key economic development, social progress and political stability." Kofi Annan. 

 राष्ट्राच्या आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि राजकीय स्थर्याची गुरू किल्ली म्हणजे स्त्री शिक्षण होय. स्त्री शिक्षणाचा हा गर्भितार्थ फार पूर्वीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखून क्रांतीज्योति सावित्रीबाईंना शिक्षित करत भारतीय स्री शिक्षणाच्या महत्कार्याची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यातील भिडे वाड्यात १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सूरू झाली. या ऐतिहासिक घटनेला आता पावणे दोनशे वर्षे उलटून गेली. किमान आता तरी मुलींच्या नशिबी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाच्या पलिकडील उच्च शिक्षणाचे भव्य आकाश खुले व्हायला हवे होते. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या यूडायस प्रणालीवरील सांख्यिकी माहितीच्या आधारे अद्याप तरी असे झाल्याचे चित्र दिसत नाही. म्हणूनच मुलींच्या उच्च शिक्षणातील मागासलेपणाचे पाणी नेमकी कुठे मुरते आहे हे शोधून त्यावर भक्कम कृतीयोजना राबविण्याची नितांत गरज आहे असे म्हणावे लागते.

     अलिकडेच चिल्ड्रेन राईट अँड यू (CRY)या सामाजिक संस्थेने 'पुरी पढाई, देश की भलाई' हे लक्षवेधी देशव्यापी अभियान हाती घेतले आहे. त्याला कारणही तसेच गंभीर आहे. राष्ट्रीय पातळीवर पाच मुलींपैकी केवळ तीनच मुली बारावी पर्यंतच पोहचू शकतात असे २०२१च्या युडायसच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

        एकट्या महाराष्ट्रातच २०२१ च्या आकडेवारीनुसार पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या १ कोटी ३८ लाख २ हजार ५७० मुलींपैकी बारावीपर्यंत केवळ २० लाख ५४ हजार २५२ मुली पोहोचल्या होत्या. यातील तब्बल ८३ लाख २८ हजार ३१८ मुली उच्च माध्यमिक शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अर्थातच २०२० ते २०२२ हा कोरोना कालखंड मुलींच्या शैक्षणिक जीवनाला ग्रासून टाकणारा ठरला आहे. या काळात ऑनलाईन शिक्षणास तोकडी पडलेली साधने, पालकांवर ओढवलेले बेरोजगारी आणि महागाईचे संकट, मुलींपेक्षा मुलांच्या शिक्षणाला जात्याच महत्व देण्याची संकुचित मनोवृत्ती तसेच आयतेच वयात आलेल्या अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करण्याची कुटील संधीचा लाभ घेणारे पालक कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. उदाहरणा दाखल असे म्हणण्यास पुरेसा वाव तो पालघर जिल्ह्यातील २०२४ च्या ताज्या माहितीतून. पालघर जिल्ह्यातील एकूण छत्तीस हजार गरोदर महिलांपैकी सुमारे दोन हजार स्त्रिया एकोणीस पेक्षा कमी वयाच्या आहेत. याचा अर्थ या मुलींचे नववी दहावीच्या शिकत्या वयातच बेकायदेशीर विवाह लावून दिले गेले असावेत. एका छोट्याश्या जिल्ह्याची ही स्थिती असेल तर त्यावरून राज्य आणि देशातील मुलींच्या शैक्षणिक दुरवस्थेची सहज कल्पना येते. 

'बेटी बचाओ,बेटी पढाओ,' ' सर्व शिक्षा अभियान', ' शिक्षण हक्क कायदा,' मोफत आणि सक्तीचे शिक्षण, 'मोफत पाठ्य पुस्तक योजना, मध्यांन्न भोजन योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्त्याची योजना, शालेय गणवेश योजना, दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून एकात्मिक पाठ्य पुस्तक योजना आणि चालू शैक्षणिक वर्षा पासून आमलात आणली जाणारी मुलींना पदवी अभ्यासक्रमांपर्यंत मोफत शिक्षण योजना यासारख्या कित्येक योजनांच्या नुसत्या सरकारी जाहिरातींवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शासन स्तरावरून अर्थ संकल्पिय तरतुदी घोषित केल्या जातात. हया सर्वच सरकारी योजना खरतर शिक्षणाची ज्ञानगंगा दुथडी भरून वाहू शकण्यास पुरेशा ठरू शकतात. अचूक पट नोंदणीचा चंग बांधून साकारण्यात आलेल्या युडायस प्रणालीतील मुलींच्या गळतीतील ही आकडेवारी जर अशीच वाढत राहिली तर मुलींच्या उच्च शिक्षणातील पाणी नेमकी कुठे मुरते आहे याचा साद्यंत शोध घेण्याची आव्हानात्मक जबाबदारी सरकार आणि प्रशासनाची आहे.

'ती'च्या उच्च शिक्षणाचे पाणी मुरतंय कुठे?

 सरकारी योजनांच्या सदोष अंमलबजावणीखेरीज घर ते शाळा अंतराचा प्रश्न पालकांना चिंतेत टाकणारा ठरत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा ते घराचे अंतर एक किलोमीटर पेक्षा असू नये. मात्र मोठ्या प्रमाणात रोडावत चाललेल्या विद्यार्थी संख्येमुळे समूह शाळांचे धोरण अवलंबिले जात आहे. परिणामी शाळेसाठी मुलींना खाजगी वाहनाने दूरच्या प्रवासाला पाठविणे, तशी वेळच्या वेळी वाहन सुविधा मिळणे, रोजच्या खर्चाची तजवीज करणे पालकांना कंठी प्राण आणणारे ठरते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ पूर्वी भरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. साहजिकच अनेक शाळांनी पाचवी ते दहावी/ बारावीचे वर्ग सकाळी सात वाजता भरविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पुण्या इतकाच ग्रामीण, निम शहरी भागात सकाळच्या वेळी शाळेत वेळेवर पोहचण्याचा प्रश्न घरोघरी चर्चिला जात आहे. 

महिला व बालकल्याण खात्यामार्फत मुलींना सायकल पुरविण्याची योजना असो की वाहन सुविधा पुरविण्याचा प्रयत्न तुटपुंजा ठरतो. शाळेत पोहचत्या झालेल्या मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेशा प्रमाणात महिला शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग आवश्यक ठरतो. मात्र सरकारी शाळांमधील आकड्यांचा पंक्तीभेद लक्ष वेधक ठरतात. एकुण १,७८,८७८ शिक्षकांपैकी १,०६,२७१ पुरुष शिक्षक असून ७२,६०७ महिला शिक्षिका आहेत. १०५८ शाळांमध्ये शौचालये नाहीत तर २५४३ शौचालये असून ती वापरा योग्य नाहीत. हीच बाब वीज आणि पाण्याची म्हणता येईल. १५,१७१ शाळांमध्ये वीजच नाही, १,७७७ शाळांचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे, तर ५४८ शाळांना जलस्त्रोत नाही. 

मुले शाळेत आली पाहिजेत, आलेली मुले शाळेत टिकली पाहिजेत, रमली पाहिजेत आणि अशीच शाळेत रमलेली मुले शिकती झाली पाहिजेत असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शाळांनी काम करावयाचे म्हटल्यास किमान मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपण ही वणवण किती दिवस करणार आहोत?

भौतिक सुविधांची अशी वाताहत एकिकडे असताना दुसरीकडे मुली वयात येताना होणारे अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांना कसे सामोरे जायचे, त्या कुठे लैंगिक अत्याचारांच्या बळी तर ठरत नाहीत ना, त्यांच्या शाळा ते घर प्रवासात, घरी किंवा शाळेत, नातेवाईक, शेजारी किंवा मित्र त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा तर घेत नाहीत ना... समाज माध्यमांच्या आणि काही प्रमाणात व्यसनांच्या विळख्यात त्या ओढल्या तर जात नाहीत ना.. एखाद्या कौटुंबिक अडचणीमुळे बाल विवाह, बालमजुरी किंवा मुलगी म्हणून कुठे पालक सापत्न वागणूक तर देत नाहीत ना... यासारख्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक शाळेत समुपदेशकांची नेमणूक करण्याचे आवाहन नवीन शैक्षणिक धोरणात केले गेले आहे. मात्र यास फारच कमी न्याय दिला जातो. जेव्हा एखादी अप्रिय किंवा अघोरी घटना घडते तेव्हा त्यावर तात्पुरती चर्चाच फक्त माध्यमांवर रंगते. अल्पकालीन सामाजिक स्मृति तत्वाने अशा कित्येक घटना काळाच्या पडद्याआड लोप पावल्या आहेत. 

   शाळांमध्ये अलीकडे अमली पदार्थ, व्यसन विरोधी दिनाचा सोपस्कार पुर्ण केला गेला. काही महिन्यांपूर्वी याच 

व्यसन विरोधी भूमिकेतून शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला घातक हल्ल्याची घटना अजून ताजी आहे. मुलामुलींना शालेय शिक्षणाची वाट धरताना शाळे नजीकच्या देशी दारू आणि बारच्या गल्ल्यांमधून ये जा करावी लागेल अशी परिस्थिती कोणामुळे यावी? 

सीसीटीव्ही बसविण्याची हमी लिहून घेतली जाते, पोक्सो सारख्या कायद्याने गुन्हेगारांच्या नाड्या आवळण्याचे आश्वासन दिले गेले.. मात्र नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आलेखानुसार या घटनांचा आलेख दरवर्षी चढतच जाताना आढळतो. साक्षरतेच्या पातळीपासून पदवी व पदव्यु्तर उच्च शिक्षणाच्या मार्गात अशा रोजच्या संघर्षात मुलींच्या शिक्षणाची वाट धूसर होऊ लागते. योजना येतात जातात, कागदोपत्री आकडेवारीचा फार्स रचला जातो. सर्व काही आलबेल दाखविले जाते. मात्र लाखांच्यापटित दरवर्षी घटत जाणारी मुलींच्या उच्च शिक्षणाची चित्तर कथा दिवसेंदिवस चिंतित करणारी ठरत आहे. हे विषण्ण करणारे वास्तव शासन आणि पालक या दोन्ही ध्रुवांवर जोपर्यंत आस्था आणि सतर्कतेच्या समान अक्षावर सांधले जात नाही तोपर्यंत स्त्रीच्या उच्च शिक्षणावरचे प्रश्न चिन्ह हे अधिक गडद होत जाईल...

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या 'Heaven of Freedom' अर्थात् 'स्वातंत्र्याचा स्वर्ग ' या खालील कवितेतील वास्तव शिक्षणात ज्या दिवशी उतरेल तो दिवस असेल खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचे आकाश खुले करणारा. 

     Heaven of Freedom

 Where The Mind Is Without Fear

Where the mind is without fear and the head is held high

Where knowledge is free

Where the world has not been broken up into fragments

By narrow domestic walls

Where words come out from the depth of truth

Where tireless striving stretches its arms towards perfection

Where the clear stream of reason has not lost its way

Into the dreary desert sand of dead habit

Where the mind is led forward by thee

Into ever-widening thought and action

Into that heaven of freedom, my Father, let my country awake.


-जयवंत कुलकर्णी 

(शिक्षक व समुपदेशक, गांधी बालमंदिर, कुर्ला)

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १३ जुलै २०२४)


Saturday, 10 August 2024

इंग्रजी माध्यमाचे काय करायचे?

 इंग्रजी माध्यमाचे काय करायचे?

भारतात इंग्रजी शिक्षण सुरू होऊन जवळपास 200 वर्षे झाली, तेव्हापासून आतापर्यंत शालेय शिक्षणाचे माध्यम काय असावे, ही चर्चा अव्याहत चालू आहे. ब्रिटिश अमदानीत इंग्रजी की स्थानिक भाषा हे द्वंद्व साहजिक होते, पण आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली तरी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पुन्हा तीच गरज अधोरेखित करावी लागत आहे याचे कारण इंग्रजी माध्यमाला पुन्हा मिळू लागलेली लोकप्रियता. आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे, ही लोकप्रियता म्हणजे मराठी आणि इतर स्थानिक भाषांवरील संकट आहे, परक्या संस्कृतीचे आक्रमण आहे, अशी एक धारणा आहे.

भारतात इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मेकॉले यांना ‘भारतीय रक्ताचा आणि रंगाचा पण अभिरुची, मते, नीती आणि बुद्धीने मात्र ‘इंग्रज’ असणारा वर्ग तयार करायचा होता. पण तेव्हाही ‘इंग्रजी’ शिक्षणाचे बाळकडू मिळूनदेखील भारताशी अजोड निष्ठा बाळगणारे स्वातंत्र्य चळवळीचे अनेक नेते, अनेक समाजसुधारक निर्माण झाले. केवळ शिक्षण घेण्याची भाषा बदलली म्हणून निष्ठा, संस्कृती नष्ट झाल्या नाहीत. उलट पाश्चात्त्य विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान अशा विविध क्षेत्रांतील आधुनिक आशय भाषांतरित, रूपांतरित करून स्थानिक भाषांचा ज्ञानभाषा, शिक्षणाच्या माध्यमभाषा म्हणून विकास करण्याचे कार्य या इंग्रजीतून माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलेल्या वर्गाने केले. त्यामुळे विसाव्या शतकाच्या सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून पालकांचीही पसंती प्राधान्याने स्थानिक भाषांना मिळत राहिली. 

गेल्या काही दशकांमधे मात्र असे दिसत आहे, की मातृभाषा किंवा स्थानिक भाषा माध्यमाला शासनाचा तत्त्वतः पूर्ण पाठिंबा असला, तरी लोक मात्र अनुदानित आणि शासकीय शाळांकडे मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवून, पदरमोड करून मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवत आहेत. याचे एक कारण म्हणजे इंग्रजीत आज ज्या वेगाने विज्ञान-तंत्रज्ञान-माहिती तंत्रज्ञान, वित्त, व्यापार, विविध व्यवसाय, आंतरराष्ट्रीय संपर्क पुढे जाताना दिसतात, तो वेग या मुलांना आणि त्यांच्या पालकांना हवा आहे. त्यांचे विश्व आता त्यांच्या परिसरापुरते मर्यादित नाही. इतर गावांत, शहरांत, राज्यांत, देशांत जिथे ज्या मिळतील त्या संधी त्यांना हव्या आहेत, आणि त्यासाठी इंग्रजी हे इतिहासाने आपल्या हातात आणून दिलेले, समोर दिसणारे साधन त्यांना प्रभावी वाटते. इंग्रजी माध्यम कोणालाही हाताळता येईल, असा विश्वास त्यांच्या मनात आता निर्माण झाला आहे. त्या माध्यमासाठी मुलांना शालेय शिक्षणात अधिक कष्ट पडले, आपला पैसा खर्च झाला, तरी त्यांची तयारी आहे. या त्यांच्या आकांक्षांची दखल घेणे भाग आहे. या आकांक्षा मराठी माध्यमात जाऊनही पूर्ण होतील, याची तातडीने तजवीज करणे, तसा विश्वास पालकांच्या मनात निर्माण करणे ही तर प्राथमिकताच असली पाहिजे, पण त्याचबरोबर पालकांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आज केवळ व्यावसायिक फायद्यासाठी चालवल्या जात आहेत, त्यांच्याकडेही दुर्लक्ष करणे परवडणारे नाही, तिथे आपलीच मुले शिक्षण घेत आहेत. 

अशा अनेक शाळांत सक्षम शिक्षक नाहीत. याचे एक कारण म्हणजे इंग्रजीवर खरोखर प्रभुत्व असलेल्या आणि विविध विषय इंग्रजीतून चांगल्या प्रकारे शिकवू शकणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकांवर खर्च करण्याची संबंधितांची तयारी नाही. मग मुलांच्या शिक्षणाचा परीघ शिक्षकांच्या तयारीएव्हढाच सीमित होतो. तेथे मुलांच्या कुतूहलाला, प्रश्न विचारण्याला, चिकित्सक विचाराला, अभिव्यक्तीला, सर्जनशीलतेला पूर्ण वाव देणाऱ्या अध्यापन पद्धती वापरल्या जात नाहीत. त्यांचा भाषिक विकास सहज आणि समृद्ध होईल, अशी द्वैभाषिक, बहुभाषिक तंत्रेही वापरली जात नाहीत. निरर्थक सराव, घोकंपट्टीवर भर दिला जातो. दर्जेदार ऑफलाइन आणि ऑनलाइन साहित्याऐवजी बाजारू शैक्षणिक साहित्यच मुख्यतः वापरले जाते. मुलांच्या शिक्षणातील या खऱ्या समस्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन, जरी आज होत नसेल, तरी यापुढे शाळांची नियमित शैक्षणिक तपासणी करणे आणि योग्य ते मार्गदर्शन पुरवणे फार गरजेचे आहे. 

वेळ पडली तर आणि दृष्टी आणि तळमळ असेल तर इंग्रजी माध्यमाचाही आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या उत्कर्षासाठी वापर करता येतो, हा आपल्याच इतिहासातील धडा आहे.


- धनवंती हर्डीकर 

( पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, २६ जून २०२४)

Saturday, 3 August 2024

इंग्रजी भाषा – परकी की आपली?

 इंग्रजी भाषा – परकी की आपली?

मराठी भाषेत फक्त इंग्रजीला जितकी नावे, बिरुदे दिलेली आहेत, तितकी क्वचितच दुसऱ्या एखाद्या भाषेला दिली गेली असतील – इंग्रजी, इंग्लिश, आंग्लभाषा, साहेबाची भाषा, वाघिणीचे दूध, - शिवाय इंग्लिशमधील ‘लायब्ररी लँग्वेज’, ‘विंडो ऑन द वर्ल्ड’ ही बिरुदे अधूनमधून वापरली जातात - माध्यमांची चर्चा सुरू झाली, की ‘मावशी’ (मराठीचा जहाल पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने ‘पुतनामावशी’), शालेय अभ्यासक्रमात (जरी कालक्रमानुसार दुसरी असली, तरी कायम) ‘तृतीय भाषा’, वगैरे. या सगळ्या नावांना विशिष्ट ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भ आहेत. हे इंग्रजीशी असलेल्या आपल्या जवळीकीचेच निदर्शक म्हणायला हवे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली, तरी इंग्रजी भाषा नाहीशी झाली नाही. भारताचे संविधान प्रथम इंग्रजीतच तयार झाले. आजही हिंदीबरोबर इंग्रजी ही आपली ‘सहयोगी अधिकृत भाषा – असोसिएट/अॅडिशनल ऑफिशियल लँग्वेज’ आहे. काही राज्यांची एकमेव तर काही राज्यांची दुसरी राज्यभाषा आहे. केंद्र-राज्य संपर्कासाठी, प्रशासनात, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात प्रमुख्याने इंग्रजीच वापरले जाते. मोठे उद्योग, व्यापार, उच्च शिक्षण, वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्ही, डिजिटल माध्यमे आणि साधने यांसाठी इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इतकेच नाही, तर इंग्रजीच्या वापराला अधिक प्रतिष्ठा आहे. लोकांच्या दृष्टीने उच्चशिक्षित, सधन, शहरी, सर्वत्र आत्मविश्वासाने वावरणाऱ्या उच्चभ्रू (या शब्दाचे highbrow हे मूळदेखील इंग्रजीच!) वर्गाचे वलय इंग्रजी भाषा आणि शिक्षण याभोवती आहे. हेच शिक्षण आपल्या मुलांना मिळावे असे पालकांना वाटले, तर नवल नाही. परिणामतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे, आणि त्याचबरोबर थोडेफार, बऱ्यापैकी, तसेच अस्खलित इंग्रजी येणाऱ्या, समजू शकणाऱ्या लोकांची संख्याही वाढते आहे. रोजच्या व्यवहारात सहज वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे, वाक्प्रचारांचे प्रमाणही रोज वाढत आहे. संविधानाच्या आठव्या सूचीत समावेश व्हावा म्हणून इतर भारतीय भाषांच्याबरोबर इंग्रजी भाषाही रांगेत उभी आहे. रांगेतील ही भाषा म्हणजे ब्रिटिश किंवा अमेरिकन इंग्लिश नक्कीच नाही. ती आहे, ‘इंडियन इंग्लिश’.

‘इंडियन इंग्लिश’ म्हणजे चुकीचे, थोड्या कमी दर्जाचे इंग्लिश असे मात्र मुळीच नाही. ‘इंडियन इंग्लिश’ म्हणजे भारतीय लोकांच्या गरजा, भाषिक, सांस्कृतिक आणि इतरही स्थानिक संदर्भ यांतून विकसित झालेला, अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन इंग्लिशसारखाच इंग्लिशचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. त्यात स्थानिक भाषांमधून जसेच्या तसे उचललेले शेकडो शब्द आहेत (नीम, धोती, गुरू, इत्यादी); भारतीयांनी स्वतः तयार केलेले पूर्णपणे नवे किंवा मिश्र शब्द आहेत (प्रीपोन, लंच होम, ब्लाऊजपीस, फॉरिन-रिटर्न्ड इत्यादी); मूळ इंग्रजी पण थोड्या वेगळ्या अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत (हॉटेल, डाऊट, फिंगरचिप्स); वैशिष्ट्यपूर्ण वाक्यरचना आणि वाक्प्रचार आहेत; मिलियन-बिलियन पेक्षा वेगळी लॅख, क्रोर अशी भारतीय संख्यानामेही आहेत. इंग्लिशचा हा प्रकार जरी मुख्यतः भारतातच वापरला जात असला, तरी इतर देशांतील लोकांना समजू नये, इतकाही तो वेगळा नाही. किंबहुना बऱ्याच आशियाई देशांत ब्रिटिश/अमेरिकन इंग्लिशपेक्षा इंडियन इंग्लिश समजणे सोपे आहे.

इंग्रजी भाषेचा भारतातील प्रसार ही खरे तर आजच्या जगात आपली ताकद आहे. इंग्रजीचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या आज काही कोटींच्या घरात आहे. इंग्रजी पुस्तके आणि इतर साहित्य यांची भारत ही सध्या जगात तिसरी बाजारपेठ आहे, आणि लौकरच सर्वात मोठी बाजारपेठ होईल. वेगवेगळ्या स्तरांवर इंग्रजी शिकवण्याच्या व्यवसायासाठीही इथे प्रचंड संधी आहे. अलीकडेच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने इंडियन इंग्लिशमधील शब्द, रचना, अर्थ आणि उच्चारांचीही दखल घेतली आहे, ती उगीच नाही. हे लक्षात घेता आता आपण इंग्रजीच्या बाजारपेठेतील सर्वात मोठे ग्राहक या नात्याने इंग्रजीचा विचार करण्याची, इंडियन इंग्लिशचे शिक्षण, संशोधन याबाबत आत्मविश्वासाने पावले टाकण्याची आणि त्याच अनुषंगाने इंग्रजीचा अभ्यासक्रम, शैक्षणिक साहित्य, अध्ययन अध्यापन पद्धती, मूल्यमापन या सगळ्यांचे स्वरूप ठरवण्याची गरज आहे. आपल्या देशात एकविसाव्या शतकातील इंग्रजी शिक्षण इतरांच्या कसोट्यांना उतरणारे नाही, तर भारतीयांच्या गरजा आणि क्षमतांना पूर्ण न्याय देणारे हवे.


- धनवंती हर्डीकर 

(पूर्वप्रसिद्धी:- दैनिक सकाळ, १९ जून २०२४)

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन प्रस्तावना : मूल्यांकनाच्या क्रांतीची हाक "मी आज काय शिकलो?...