Tuesday, 11 July 2023

संगीत परीक्षा: मूल्यमापनाचे बदलते स्वरूप


"संगीत परीक्षा: मूल्यमापनाचे बदलते स्वरूप”

                

--------------------------------------------------------------------------

 कोणत्याही कलेचे मूल्यमापन होऊच शकत नाही. कलाकाराच्या कलाकृतीने रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यावा आणि रसिकांकडून दिलसे दाद मिळावी. बस्स! कलाकार आणि रसिक या दोघांनाही याहून अधिक काहीच नको असते. मग संगीत क्षेत्रात समीक्षा, परीक्षा पद्धती आणि मूल्यमापन हा मुद्दा आला तरी कसा ? 



संगीतातील विविध प्रवाहांचा अभ्यास: प्राचीन काळापासून संगीत अभ्यासकांनी, पंडितांनी, शास्त्रकारांनी त्या त्या काळातील उपलब्ध माध्यमे वापरून या कलेचे, त्यातील विचार प्रवाहांचे, संशोधनाचे वेळोवेळी डॉक्युमेंटेशन ( दस्त ऐवजीकरण?) केलेले दिसते. ही परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत चालत आलेली दिसून येते. या शास्त्रीय विवेचनाचा मोठ्या सुप्रसिद्ध आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झालेल्या कलाकारांनी देखील अभ्यास केला असल्याचे दिसून आले आहे. त्या अभ्यासातून त्यांच्या कलेला निश्चितपणे उंची मिळाली असल्याचेही त्यांनी प्रांजळपणे नमूद केल्याचे दिसते. याचा अर्थ, संगीताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, उत्तम कलाकार म्हणून घडण्यासाठी या शास्त्रार्थ विचारांचा अभ्यास करणे निश्चितपणे आवश्यक आहे. 

     पं विष्णू दिगंबर पलूस्कर आणि पं भातखंडे यांनी कालानुरूप संगीत कलेचे विद्यापीठीय अभ्यास पद्धतीत रूपांतर करण्याचे महान कार्य केले आहे. त्या अनुसार रागसंगीताचे पुन्हा नव्या पद्धतीत दस्तऐवजीकरण केले गेले. कलाकार तयार करण्यासाठी ही पद्धती योग्य नव्हे अशी टीका झाली तरी, जन सामान्यांपर्यंत संगीतशास्त्राची मूलभूत तत्वे झिरपत नेण्याचे महत्वाचे कार्य या पद्धतीत साध्य झाल्याचे मान्य करावे लागेल. आजच्या आघाडीच्या कलाकारांनी देखील विद्यापीठीय पदव्या संपादन केलेल्या आहेत. या विद्यापीठीय पद्धतीचा अवलंब करत असताना,त्याच पद्धतीने, थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन भागात विभागणी होऊन संगीत परीक्षांचे मूल्यमापन करण्याची पद्धती साधारण 90 वर्षांपूर्वी निर्माण केली, ती आजतागायत चालू राहिलेली आहे. प्रचलित पद्धतीनुसार भरपूर मार्कांचे थेअरी पेपर लिहिणे विद्यार्थ्यांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तीन परीक्षा दिल्यानंतर म्हणजे स्टेट बोर्ड परीक्षेला मिळणारे मार्कांचे निकष पूर्ण झाले की पुढे या परीक्षांना बसण्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि संगीत विषयाचे मूल्यमापन: 

(National Policy of Education and Evaluation of Music)

भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची नुकतीच घोषणा केलेली आहे. त्यानुसार संगीत हा विषय मुख्य शैक्षणिक विषयगटात समाविष्ट झाला असून त्यात मूल्यमापन हे अध्ययनाचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यानुसार आजच्या काळात पुन्हा एकदा विद्यापीठीय मूल्यमापन पद्धतीत बदल करण्याची मोठी निकड निर्माण झालेली आहे. शाळांना / महाविद्यालयांना राबविता येतील अशा प्रकारचे पाठयक्रम नव्याने तयार करून त्याच्या मूल्यमापनाचा आराखडा तयार करून दिला तर जास्तीत जास्त विद्यार्थी त्याचा आनंद आणि लाभ घेऊ शकतील. प्रारंभिक ते अलंकार पर्यंत प्रत्येक टप्प्यावर गायन, वादन, नृत्य विषयाच्या विद्यार्थ्यांनी कोणती तत्वे आत्मसात केलेली असली पाहिजेत? त्याचे (learning outcomes ) निश्चितीकरण केले तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या मूल्यमापनात लवचिकता आणता येईल. हे जबाबदारीचे काम अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयासारख्या प्रतिष्ठित आणि जागतिक पातळीवर सर्वाना परिचित अशा संस्थेतील तज्ज्ञांनी केले तर त्या शिक्षणाचा आणि मूल्यमापनाचा दर्जा निश्चितपणे उत्तम राखला जाईल असा विश्वास वाटतो. 

 तंत्रज्ञान आणि मूल्यमापनातील बदलाची तत्वे: 

(Technology and principles of evaluation)

ध्वनिमुद्रण आणि छायाचित्रण यातील प्रगत तंत्रज्ञान आज सामान्य माणसालाही मोबाईल मध्ये उपलब्ध झालेले आहे. एके काळी नोटेशन पद्धती वापरून साध्य केलेले कार्य, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक परिणामकारक रित्या आज करता येत आहे.शास्त्रार्थ आणि कलासादरीकरण यांच्या दस्तऐवजीकरणाची उत्तम सोय झालेली आहे. त्यामुळे नोटेशन पद्धतीच्या मर्यादेत अडकून पडण्याची गरजच आज राहिलेली नाही. अशा वेळी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यायाच्या परीक्षांमधील प्रश्नांच्या स्वरूपामध्ये देखील कालानुरूप योग्य ते बदल सुचविले जावेत. 

संगीत विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आता ज्ञान, आकलन आणि उपयोजन अशा तीन पातळ्यांवर व्हावे. हे मूल्यमापन एकाच मोठ्या परीक्षेच्या माध्यमातून न होता CCE पद्धतीने (continuous comprehensive evaluation), सातत्यपूर्ण व सर्वंकष असे व्हावे. ज्यामध्ये आपल्या अंगभूत गुणांचा ( qualities) वेगवेगळ्या क्षमतांचा प्रभावीपणे वापर करून विद्यार्थ्यांना/ अभ्यासकांना स्वतःला व्यक्त करण्याची वारंवार संधी मिळेल; अशा मूल्यमापनासाठी जास्त गुण राखून ठेवले जावेत. जुन्या पद्धतीत अनवश्यकरित्या असलेला लिखाणाचा अतिरेक टाळण्याचा प्रयत्न नव्या पद्धतीत करता येईल. त्यासाठी कमी गुणभार (weightage) असावा. प्रश्नांमध्ये सुद्धा काही प्रमाणात विविधता आणता येऊ शकते. बहुपर्यायी प्रश्न, दिलेल्या मजकुरात असलेली चूक दुरुस्त करणे, recall मेमरी वर आधारित अशा प्रश्नांचा समावेश केलेला केलेला असावा. दिलेल्या माहितीचा उपयोग सूचनेप्रमाणे करा यासारखे कृतीयुक्त प्रश्नही विचारले तर त्याद्वारे क्षमतांचे मूल्यमापन योग्य प्रकारे होऊ शकेल. प्रवेशिका ते अलंकार अशा सर्व पातळ्यांवर कोणत्या प्रकारचे अध्ययन अपेक्षित आहे त्यानुसार नुसत्या पाठांतरावर भर न देता काही प्रमाणात विचारांना चालना देणारे असे हे प्रश्न समाविष्ट करता येतील. 

प्रकल्पपद्धतीचा समावेश आणि बहुशाखीय दृष्टीकोण 

(Multidisciplinary approach): 

क्षणोक्षणी नवनिर्मितीच्या तत्वावर आधारित अशा भारतीय रागसंगीत पद्धतीमध्ये कलाकाराच्या सृजनशीलतेचा मैफिलीत सतत कस लागत असतो. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव देणारे स्वाध्याय (assignments) करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देता यावी. मूल्यमापनातील काही गुण त्यावर आधारित देता यावेत. १ पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर संगीत विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी/ शिष्यांनी संगीतविषयक संशोधन पद्धतीची माहितीही करून घ्यावी व त्यावर आधारीत एक छोटा प्रकल्प सादर करावा. त्यांच्या परिसरतील लोकसंगीत, तेथील वैशिट्यपूर्ण संगीत विषयक परंपरा असा स्थानिक विषय निवडता येईल . तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगीताशी संबंधित एखादे अँप तयार करणे, वेबसाईट तयार करणे, कृत्रिम प्रज्ञेचा (artificial intelligence) संगीत क्षेत्रात भर टाकण्यासाठी कसा उपयोग करता येईल या विषयांवरही प्रकल्प सादर करू शकतील. नवीन वाद्यनिर्मिती तसेच आधुनिक संगीत क्षेत्रातील काही समस्या निवडून त्यावर सुद्धा प्रकल्प करता येतील. या सर्वांमधून समस्या निराकरण क्षमता ( problem solving skills) आणि आजच्या काळास सुसंगत असे संगीतविषयक ज्ञानाचे खऱ्या अर्थाने उपयोजन ( अँप्लिकेशन) करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. 

भाषा, विज्ञान व गणित या विषयांसाठी कलाधिष्ठित शिक्षण पद्धतीचा जोरदार पुरस्कार आज चाललेला आहे. "STEM " शिक्षणामध्ये देखील 'A' फॉर आर्ट चा समावेश करून "STEAM" शिक्षण पद्धतीला सर्वत्र मान्यता आणि पसंती मिळालेली दिसून येते. त्याच तत्वानुसार भौतिकशास्त्र, ध्वनिशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, नाटक, सिनेमा, यांसारख्या विषयांशी निगडित असणारा संगीतविषयाचा भाग यावर देखील सुंदर प्रकल्प होऊ शकतात व तसा समावेश मूल्यमापन व अभ्यासक्रमात केलेला असावा असे वाटते. यामुळे संगीत क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला (innovation) चालना मिळेल. यासाठी काही गुण राखून ठेवण्यात यावेत. 

 संगीतातील अध्ययन निष्पत्ती : 

आज संगीताचे शिक्षण घेणारे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करुन, वेगवेगळ्या घराणेपद्धतीत तालीम घेतात . कला विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांची स्वतःची अशी काही वैयक्तिक आवडही त्यात निर्माण होते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वरज्ञान, लयकारी, तालज्ञान तसेच विविध गायनप्रकार तितक्याच कौशल्याने सादर करण्याची क्षमता यात भिन्नता असू शकते. मौखिक परीक्षेत मात्र ख्यालगायन, धृपद- धमार, ठुमरी - टप्पा, नाट्यगीत इत्यादी असे सर्वच गायनप्रकार सादर करावे ही अपेक्षा व्यक्त झालेली दिसून येत आहे. त्या त्या गायनप्रकाराची अधिकृत (authentic) तालीम घेण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्यास मिळेल याची खात्री नसते. ज्या संगीत प्रकारावर विद्यार्थ्याने तालीम घेऊन प्रभुत्व प्राप्त केले आहे असेच प्रकार सादर करावे आणि ओढून ताणून, उपचार म्हणून इतर गायन प्रकार सादर करावे लागू नयेत यासाठी बदल होणे गरजेचे आहे.यावर उपाय म्हणजे Moodle किंवा MOOC सारख्या माध्यमातून तशी तालीम मिळण्याची व्यवस्था विद्यापीठीय पातळीवर करून देणे. शक्य असल्यास, त्या-त्या संगीतप्रकारातील तज्ज्ञ कलाकारांचे विद्यापीठाच्या माध्यमातून यासाठी मार्गदर्शन घेता येईल. ती शक्यता तपासून पहावी लागेल. संगीताचे अभ्यासक, कलाकार, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांच्या या नव्या स्वरूपाचे निश्चितच स्वागत करतील. 

         आपल्या प्राचीन आणि समृद्ध संगीत कलेचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेला जावा या उद्देशाने हे बदल घडविण्यात यावेत. तंत्रज्ञान युगातील स्मार्ट पिढी या बदलला निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद देईल असा विश्वास वाटतो. आधुनिक काळाच्या लयीत, भारतीय संगीत कलेचा प्रवास अखंड चालू राहो ही सदिच्छा ! 

-©सौ मृदुला अडावदकर. 

M.Sc., B.Ed., Sangeet Alankar 

Email: ad.mridul@gmail.com 

(पूर्वप्रसिद्धी: ‘संगीत कला विहार’ द्वैमासिक, नोव्हेंबर- डिसेंबर 2020 )

******************




No comments:

Post a Comment

मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning)

  मूल्यांकनाच्या नव्या दिशा : स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन (Metacognition / Assessment as Learning) प्रस्तावना: “शिकण्याच...